अभ्यास लेख १३
एकमेकांवर जिवापाड प्रेम करा
“एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.”—१ पेत्र १:२२.
गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह
सारांश *
१. येशूने त्याच्या शिष्यांना कोणती खास आज्ञा दिली? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)
येशूने त्याच्या मृत्यूआधी शिष्यांना एक खास आज्ञा दिली. त्याने म्हटलं: “जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.” मग त्याने पुढे असंही म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहा. १३:३४, ३५.
२. एकमेकांवर प्रेम करणं महत्त्वाचं का आहे?
२ येशूने म्हटलं की त्याच्या शिष्यांनी जर इतरांवर त्याच्यासारखं प्रेम केलं, तर सर्व लोकांना स्पष्टपणे दिसून येईल की ते त्याचे शिष्य आहेत. ही गोष्ट पहिल्या शतकात जितकी खरी होती तितकी आजही आहे. त्यामुळे इतरांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे; मग तसं करणं कठीण वाटत असलं तरीही.
३. या लेखात आपण काय चर्चा करणार आहोत?
३ आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला इतरांवर जिवापाड प्रेम करणं कठीण जातं. असं असलं तरी आपण ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे. या लेखात आपण पाहणार आहोत की प्रेम आपल्याला शांती टिकवून ठेवण्यासाठी, भेदभाव न करण्यासाठी आणि पाहुणचार करण्यासाठी कसं मदत करतं. या लेखात अशा काही भाऊबहिणींची उदाहरणं दिली आहेत जे कठीण परिस्थितीतही इतरांना प्रेम करत राहिले. या लेखाचा अभ्यास करताना आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की ‘मला यांच्या उदाहरणांवरून काय शिकता येईल?’
शांती टिकवणारे बना
४. एखाद्याला आपल्याविरुद्ध तक्रार असेल तर मत्तय ५:२३, २४ या वचनांप्रमाणे आपण त्यांच्यासोबत समेट करणं का महत्त्वाचं आहे?
४ येशूने शिकवलं की आपल्याविरुद्ध जर एखाद्या भाऊबहिणीला तक्रार असेल तर त्यांच्यासोबत समेट करणं महत्त्वाचं आहे. (मत्तय ५:२३, २४ वाचा.) त्याने या गोष्टीवर जोर दिला की आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण इतरांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. भाऊबहिणीसोबत जेव्हा समेट करण्याचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण आपण नाराज राहिलो आणि समेट करण्यासाठी पाऊल उचललं नाही तर यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही.—१ योहा. ४:२०.
५. एका बांधवाला कोणत्या कारणामुळे समेट करणं कठीण गेलं?
५ आपल्याला इतरांशी समेट करणं कदाचित कठीण जाऊ शकतं. असं का? हे समजण्यासाठी आता आपण मार्कचा * अनुभव पाहू या. एका बांधवाने जेव्हा मार्कची टीका केली आणि मंडळीतल्या भाऊबहिणींना त्याच्याबद्दल वाईटसाईट सांगितलं तेव्हा त्याचं मन खूप दुखावलं. यावर मार्कची प्रतिक्रिया काय होती? तो म्हणतो: “तेव्हा मला खूप राग आला होता आणि मी त्या बांधवाशी खूप चिडून बोललो.” पण नंतर मार्कला त्याच्या वागण्याबद्दल खूप पस्तावा झाला. त्याने त्या बांधवाची क्षमा मागितली आणि त्याच्याशी समेट करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बांधवाने मार्कला क्षमा केली नाही. सुरुवातीला मार्कला वाटलं, ‘त्या बांधवाला जर माझ्याशी समेट करायचाच नाहीए तर मी तरी का सारखं सारखं प्रयत्न करत राहू?’ पण विभागीय पर्यवेक्षकाने मार्कला प्रयत्न करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. मग मार्कने काय केलं?
६. (क) समेट करण्यासाठी मार्क कोणते प्रयत्न करत राहिला? (ख) कलस्सैकर ३:१३, १४ यात दिलेल्या सल्ल्याचं मार्कने कसं पालन केलं?
६ मार्कने त्याच्या मनोवृत्तीबद्दल विचार केला आणि त्याला जाणवलं की तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो. त्याला त्याच्या मनोवृत्तीत बदल करण्याची गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं. (कलस्सै. ३:८, ९, १२) मार्क पुन्हा त्या बांधवाकडे गेला आणि त्याने नम्रपणे त्याची माफी मागितली. मार्कने त्याला बरीच पत्रंही लिहिली. त्यात त्याने म्हटलं की झालेल्या चुकीबद्दल त्याला खूप पस्तावा आहे आणि पुन्हा मैत्री जोडण्याची त्याची इच्छा आहे. मार्कने त्या बांधवाला आवडतील अशा भेटवस्तूही दिल्या. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्या बांधवाने मार्कला माफ केलं नाही, तो नंतरही नाराज राहिला. तरीपण ‘आपल्या बांधवावर प्रेम कर आणि त्याला माफ कर’ ही येशूची आज्ञा मार्क पाळतच राहिला. (कलस्सैकर ३:१३, १४ वाचा.) आपण समेट करण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही समोरची व्यक्ती आपल्याला माफ करायला तयार नसेल, तर येशूचं अनुकरण करून आपण त्या व्यक्तीला माफ करत राहिलं पाहिजे. तसंच, तिच्यासोबत समेट व्हावा म्हणून आपण प्रार्थनाही करत राहिलं पाहिजे.—मत्त. १८:२१, २२; गलती. ६:९.
७. (क) येशूने आपल्याला काय करण्याचं प्रोत्साहन दिलं? (ख) एका बहिणीला कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला?
७ येशूने सांगितलं की इतरांनी जसं आपल्याशी वागावं अशी आपली इच्छा असते, तसंच आपण इतरांशी वागलं पाहिजे. आपल्यावर जे प्रेम करतात फक्त त्यांच्यावरच आपण प्रेम करू नये असं त्याने म्हटलं. (लूक ६:३१-३३) एका अशा परिस्थितीची कल्पना करा जी क्वचितच घडते. तुमच्या मंडळीतली एखादी व्यक्ती मुद्दाम तुम्हाला टाळत असेल आणि तुमच्याशी बोलतसुद्धा नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? लारा नावाच्या बहिणीसोबतही असंच काहीसं घडलं. ती म्हणते: “एक बहीण मला टाळत होती आणि मला कळतच नव्हतं की ती अशी का वागत होती. मला खूप टेन्शन आलं होतं आणि सभेला जाण्याची इच्छाच होत नव्हती.” सुरुवातीला लाराला वाटलं, ‘मी तर काही चुकीचं केलेलं नाही. आणि नाहीतरी मंडळीतल्या इतरांनासुद्धा वाटतं की ही बहीण जरा विचित्रच वागते.’
८. समेट करण्यासाठी लाराने काय केलं आणि आपण तिच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?
८ लाराने समेट करण्यासाठी काही पावलं उचलली. तिने यहोवाला प्रार्थना केली आणि त्या बहिणीशी बोलण्याचं ठरवलं. त्या एकमेकींशी या विषयावर बोलल्या, त्यांनी एकमेकींना मिठी मारली आणि त्यांच्यात समेट झाला. लाराला वाटलं की आता सगळं काही ठीक झालं आहे. लारा पुढे म्हणते: “ती बहीण पुन्हा आधीसारखीच वागू लागली. मला याचं खूप वाईट वाटलं.” सुरुवातीला लाराला वाटलं की ‘त्या बहिणीने वागण्यात बदल केला तरच माझं मन शांत होईल.’ पण शेवटी लाराला समजलं की ही परिस्थिती हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तिने त्या बहिणीला “मोठ्या मनाने क्षमा” करून तिच्याशी प्रेमाने वागत राहिलं पाहिजे. (इफिस. ४:३२–५:२) लाराला माहीत होतं की “खरं प्रेम चुकांचा हिशोब ठेवत नाही. प्रेम सर्वकाही सहन करते, सर्व गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असते, सर्व गोष्टींची आशा धरते, सर्व बाबतींत धीर धरते.” (१ करिंथ. १३:५, ७) लारा त्या समस्येबद्दल विचार करत बसली नाही. काही दिवसानंतर ती बहीण लाराशी बोलू लागली. आपण बांधवांसोबत समेट केला आणि त्यांच्याशी प्रेमाने वागत राहिलो तर आपण खातरी बाळगू शकता की “प्रेमाचा व शांतीचा देव” आपल्यासोबत राहील.—२ करिंथ. १३:११.
भेदभाव करू नका
९. प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५ यात सांगितल्यानुसार आपण भेदभाव का करू नये?
९ यहोवा भेदभाव करत नाही. (प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५ वाचा.) आपण जेव्हा भेदभाव करत नाही तेव्हा आपण त्याची मुलं असल्याचं दाखवतो. आपण आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करण्याच्या आज्ञेचं पालन करतो आणि यामुळे आपल्या आध्यात्मिक कुटुंबात शांती टिकून राहण्यासाठी मदत होते.—रोम. १२:९, १०; याको. २:८, ९.
१०-११. एक बहीण तिच्या मनात असलेल्या नकारात्मक भावनांवर कशी मात करू शकली?
१० काहींना भेदभाव न करणं कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, रूथ नावाच्या बहिणीसोबत काय झालं याकडे लक्ष द्या. ती तरुण होती तेव्हा दुसऱ्या देशातून आलेली एक व्यक्ती तिच्याशी वाईट वागली होती. याचा तिच्यावर काय परिणाम झाला? रूथ म्हणते: “त्या देशातली कोणतीच गोष्ट मला आवडत नव्हती. मला वाटायचं की त्या देशातले सर्व लोक असेच आहेत; आपले भाऊबहीणसुद्धा.” रूथने अशा नकारात्मक भावनेवर कशी मात केली?
११ रूथला जाणीव झाली की तिला तिच्या नकारात्मक विचारांवर मात करावी लागेल. तिने इयरबुकमध्ये आलेले त्या देशातले अनुभव आणि अहवाल वाचले. ती म्हणते: “त्या देशातल्या लोकांबद्दल मी चांगला विचार करावा यासाठी मी मेहनत घेतली. माझ्या लक्षात येऊ लागलं की त्या देशातले भाऊबहीण यहोवाच्या सेवेत खूप आवेशी आहेत. मला स्पष्ट झालं की हे बांधवसुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचे भाग आहेत.” रूथला हळूहळू जाणवलं की तिला आणखी काही करण्याची गरज आहे. ती म्हणते: “मी त्या देशातल्या भाऊबहिणींना भेटायचे तेव्हा मी स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलल्यामुळे मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखू शकले.” याचा काय परिणाम झाला? रूथ म्हणते: “काही काळाने, माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेली नकारात्मक भावना निघून गेली.”
१२. सारा नावाच्या एका बहिणीला कोणती समस्या होती?
१२ काही लोक भेदभाव करतात पण त्यांना त्याची जाणीवसुद्धा नसते. उदाहरणार्थ, साराला असं वाटायचं की ती भेदभाव करत नाही. एखादी व्यक्ती कोणत्या देशातली आहे, तिच्याकडे किती पैसा आहे, संघटनेत तिचं काय स्थान आहे याच्या आधारावर ती त्यांच्याबद्दल मत बनवत नव्हती. पण ती मान्य करते: “मला जाणीव होऊ लागली की मी भेदभाव करत होते.” असं ती कशावरून म्हणत होती? सारा एका उच्च शिक्षित कुटुंबातली होती आणि तिला तशाच लोकांसोबत वेळ घालवायला आवडायचं. ती तिच्या जवळच्या एका व्यक्तीला बोलली, “मी फक्त उच्च शिक्षण झालेल्या भाऊबहिणींसोबतच वेळ घालवते, कमी शिक्षण झालेल्यांसोबत नाही.” साराला तिच्या मनोवृत्तीत बदल करण्याची गरज होती. पण हे ती कसं करू शकणार होती?
१३. साराने ज्या प्रकारे आपल्या मनोवृत्तीत बदल केला त्यातून आपण काय शिकू शकतो?
१३ एका विभागीय पर्यवेक्षकांनी साराला तिच्या मनोवृत्तीत सुधार करायला मदत केली. ती म्हणते, “त्यांनी माझी प्रशंसा केली आणि म्हटलं की मी विश्वासूपणे सेवा करतेय, चांगली उत्तरं देतेय आणि मला बायबलचं चांगलं ज्ञान आहे. पण त्यांनी मला समजवलं की जसजसं आपलं बायबलबद्दलचं ज्ञान वाढत जातं तसतसं आपण नम्रता, दया हे गुण वाढवले पाहिजे. तसंच, आपण आपल्या मर्यादासुद्धा ओळखल्या पाहिजेत.” विभागीय पर्यवेक्षकांनी दिलेला सल्ला साराने लगेच लागू केला. ती म्हणते, “सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे दयाळू आणि प्रेमळ असणं.” याचा चांगला परिणाम असा झाला की भाऊबहिणींबद्दल असलेलं तिचं मत बदललं. ती म्हणते, “यहोवासाठी भाऊबहीण कोणत्या गुणांमुळे मौल्यवान आहेत हे मी समजून घेतलं.” आपल्याबद्दल काय? आपल्या शिक्षणामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा आपण मुळीच विचार करणार नाही. आपलं जर “संपूर्ण बंधुसमाजावर” जिवापाड प्रेम असेल तर आपण भेदभाव करणार नाही.—१ पेत्र २:१७.
पाहुणचार करा
१४. आपण इतरांचा पाहुणचार करतो तेव्हा इब्री लोकांना १३:१६, या वचनात सांगितल्यानुसार यहोवाला कसं वाटतं?
१४ आपण इतरांचा पाहुणचार करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. (इब्री लोकांना १३:१६ वाचा.) यहोवाच्या नजरेत पाहुणचार करणं हा त्याच्या उपासनेचा एक भाग आहे; खासकरून गरजवंत लोकांना मदत करणं हे त्यात सामील आहे. (याको. १:२७; २:१४-१७) म्हणून, बायबल आपल्याला प्रोत्साहन देतं की “पाहुणचार करत राहा.” (रोम. १२:१३) आपण पाहुणचार करतो तेव्हा आपण दाखवून देतो की आपल्याला इतरांची काळजी आहे, आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपल्याला त्यांच्यासोबत मैत्री करायची इच्छा आहे. आपण आपल्या भाऊबहिणींना चहा-नाश्त्यासाठी, जेवणासाठी बोलवतो किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. (१ पेत्र ४:८-१०) तरीसुद्धा काही गोष्टींमुळे पाहुणचार करणं कठीण जाऊ शकतं.
१५-१६. (क) काही लोक कदाचित पाहुणचार करायला का कचरतात? (ख) पाहुणचार करण्यासाठी इडीथला कशामुळे मदत झाली?
१५ आपल्या परिस्थितीमुळे आपण पाहुणचार करायला कचरू शकतो. इडीथ नावाच्या विधवा बहिणीच्या उदाहरणावर विचार करा. ती सत्यात येण्याआधी इतरांसोबत कमी वेळ घालवायची. इडीथला वाटायचं की तिची परिस्थिती इतरांसारखी चांगली नाही, त्यामुळे ती त्यांच्यासारखा पाहुणचार करू शकत नाही.
१६ सत्यात आल्यानंतर इडीथने तिची विचारसरणी बदलली. पाहुणचार करण्यासाठी तिने काही पावलं उचलली. ती म्हणते, “आमच्या नवीन राज्य सभागृहाचं बांधकाम सुरू होतं तेव्हा मला एका वडिलांनी सांगितलं की एक जोडपं बांधकामाच्या प्रोजेक्टसाठी मदत करायला येणार आहे. त्यांनी मला विचारलं की मी दोन आठवड्यांसाठी या जोडप्याला माझ्या घरी राहू देऊ शकते का? यहोवाने सारफथच्या विधवेला कसा आशीर्वाद दिला यावर मी विचार केला.” (१ राजे १७:१२-१६) ती त्या जोडप्याला आपल्या घरी ठेवायला तयार झाली. इडीथला यामुळे काय फायदा झाला? ती म्हणते: “दोन आठवड्यांचे दोन महिने कधी झाले कळलंच नाही आणि यादरम्यान आमच्यात चांगली मैत्री झाली.” तसंच, मंडळीतल्या भाऊबहिणींसोबतसुद्धा तिची चांगली मैत्री झाली. इडीथ आता एक पायनियर आहे आणि ती ज्यांच्यासोबत प्रचारकार्य करते, त्यांना ती नंतर तिच्या घरी बोलवते. ती म्हणते: “इतरांना मदत केल्यामुळे मला खूप छान वाटतं आणि खरं सांगायचं तर त्याच्या बदल्यात मला खूप आशीर्वादही मिळतात.”—इब्री १३:१, २.
१७. लूक आणि त्याच्या पत्नीला कशाची जाणीव झाली?
१७ आपण पाहुणचार करत असू, पण तो आपण आणखी चांगल्या प्रकारे कसा करू शकतो? एका उदाहरणावर विचार करा. लूक आणि त्याची पत्नी इतरांचा पाहुणचार करायचे. पण ते त्यांच्या घरी फक्त त्यांच्या आईवडिलांना, नातेवाइकांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि विभागीय पर्यवेक्षकांना बोलवायचे. लूक म्हणतो, “आम्हाला जाणवलं की आम्ही फक्त जवळच्या लोकांनाच बोलवतो.” लूक आणि त्याच्या पत्नीने पाहुणचार दाखवण्यात कसा सुधार केला?
१८. पाहुणचार करण्याच्या बाबतीत लूक आणि त्याच्या पत्नीने कशी सुधारणा केली?
१८ येशूने म्हटलं, “तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार?” (मत्त. ५:४५-४७) लूक आणि त्याच्या पत्नीने येशूच्या या शब्दांवर विचार केला आणि पाहुणचार करण्याचा नेमका अर्थ काय होतो हे त्यांना समजलं. यहोवा सर्वांशी उदारपणे वागतो, तसं आपणही वागलं पाहिजे हे त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी ठरवलं की ते अशा भाऊबहिणींना त्यांच्या घरी बोलवतील ज्यांना त्यांनी आधी बोलवलेलं नव्हतं. लूक म्हणतो, “आता जेव्हापण आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. खरंच यामुळे आम्ही एकमेकांच्या आणि यहोवाच्या आणखी जवळ आलोय.”
१९. आपण येशूचे शिष्य असल्याचं कसं दाखवून देतो आणि तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?
१९ आतापर्यंत आपण चर्चा केली की एकमेकांवर जिवापाड प्रेम केल्यामुळे आपल्याला शांती टिकवून ठेवायला, भेदभाव टाळायला आणि इतरांचा पाहुणचार करायला मदत होऊ शकते. आपण आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांवर मात केली पाहिजे आणि भाऊबहिणींवर मनापासून प्रेम केलं पाहिजे. असं केलं तर आपण आनंदी होऊ आणि आपण खरोखर येशूचे शिष्य आहोत हे दाखवून देऊ.—योहा. १३:१७, ३५.
गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे
^ परि. 5 येशूने म्हटलं की प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे. आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण शांती टिकवून ठेवण्याचा, भेदभाव न करण्याचा आणि पाहुणचार करायचा होता होईल तितका प्रयत्न करतो. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम कसं करत राहू शकतो याबद्दल या लेखात काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत.
^ परि. 5 या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 57 चित्रांचं वर्णन: एक बहीण समेट करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला तिला यश मिळत नाही पण ती प्रयत्न करत राहते. ती प्रेम दाखवत राहते आणि यामुळे शेवटी त्यांच्यात समेट होतो.
^ परि. 59 चित्रांचं वर्णन: एका वृद्ध बांधवाला वाटतं की मंडळीतले इतर जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
^ परि. 61 चित्रांचं वर्णन: एक बहीण सुरुवातीला पाहुणचार दाखवायला कचरायची पण तिने नंतर तिची विचारसरणी बदलली आणि यामुळे तिला आनंद मिळाला.