जीवन कथा
“आम्ही जाऊ, आम्हाला पाठवा!”
प्रचारकांची जिथे जास्त गरज आहे तिथे जाऊन तुम्हाला यहोवाची आणखी सेवा करण्याची इच्छा आहे का? यासाठी कदाचित तुम्हाला दुसऱ्या देशातही जावं लागेल. असं असेल तर बंधू जॅक आणि बहीण मॅरी-लीन बेरगेम यांच्या उदाहरणातून तुम्ही बरंच काही शिकू शकता.
जॅक आणि मॅरी-लीन हे १९८८ पासून पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. त्यांना ग्वादेलोप आणि फ्रेंच गायाना या ठिकाणी बऱ्याच नेमणुकी मिळाल्या. ही दोन्ही ठिकाणं फ्रान्स शाखा कार्यालयाच्या देखरेखीखाली आहेत. चला तर मग, आपण जॅक आणि मॅरी-लीन बेरगेम यांना काही प्रश्न विचारू या.
तुम्ही पूर्ण वेळेची सेवा का सुरू केली?
मॅरी-लीन: ग्वादेलोप या ठिकाणी मी लहानाची मोठी झाले. तिथे मी अनेकदा माझ्या आईसोबत दिवसभर प्रचार करायचे. ती एक आवेशी साक्षीदार होती. माझं लोकांवर प्रेम आहे म्हणून १९८५ मध्ये शालेय शिक्षण संपल्यानंतर मी लगेच पायनियरींग सुरू केली.
जॅक: तरुण असताना मी जास्तकरून पूर्ण वेळेच्या सेवकांसोबत राहिलो. त्यांना सेवाकार्य करायला खूप आवडायचं. शाळेला सुट्टी लागायची तेव्हा मी साहाय्यक पायनियरींग करायचो. शनिवारी आणि रविवारी मी, माझी आई किंवा आमच्या मंडळीतला एक बांधव बस पकडून पायनियर भाऊबहिणींसोबत प्रचाराला जायचो. पूर्ण दिवस प्रचार केल्यानंतर आम्ही समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचो. खरंच, ते दिवस खूप मजेशीर होते!
१९८८ मध्ये मॅरी-लीन सोबत लग्न झाल्यानंतर मी विचार केला: “आमच्यावर सध्या तरी काही जबाबदारी नाही, मग सेवा वाढवण्यात काय हरकत आहे?” मीसुद्धा मॅरी-लीन सारखी पायनियरींग सुरू केली. पायनियर स्कूलला हजर राहिल्याच्या एका वर्षांनंतर आम्हाला खास पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. आम्हाला आधी ग्वादेलोप इथे अनेक नेमणुकी मिळाल्या. त्या पुर्ण करताना आम्हाला खूप आनंद झाला. मग नंतर आम्हाला फ्रेंच गायाना या ठिकाणी नेमण्यात आलं.
तुमच्या नेमणुकी अनेक वेळा बदलल्या. प्रत्येक वेळी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली?
मॅरी-लीन: फ्रेंच गायाना इथल्या बेथेलमधल्या बांधवांना माहीत होतं, की यशया ६:८ हे आमचं आवडतं वचन आहे. म्हणून ते जेव्हा आम्हाला फोन करायचे तेव्हा हसून विचारायचे, “तुम्हाला तुमचं आवडतं वचन आठवतं का?” तेव्हा आम्हाला समजायचं की आमची नेमणूक बदलणार आहे. आणि आम्ही उत्तर द्यायचो, “आम्ही जाऊ, आम्हाला पाठवा!”
आम्ही आताच्या नेमणुकीची तुलना आधीच्या नेमणुकीशी करत नाही. तसं केलं तर आम्हाला आताची सेवा आनंदाने करता येणार नाही. तसंच, नवीन ठिकाणी गेल्यावर
आम्ही तिथल्या भाऊबहिणींसोबत मैत्री करण्यासाठी पुढाकारही घेतो.जॅक: काही भाऊबहिणींची इच्छा होती की आम्ही त्यांच्यासोबतच राहावं म्हणून ते आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्यापासून रोखत होते. पण ग्वादेलोप सोडल्यानंतर एका बांधवाने आम्हाला मत्तय १३:३८ मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांची आठवण करून दिली. तिथे म्हटलं आहे “शेत म्हणजे जग.” आमची नेमणूक बदलते तेव्हा आम्ही हे वचन लक्षात ठेवतो. आम्ही स्वतःला आठवण करून देतो, की आम्ही कुठेही गेलो तरी आमचं प्रचाराचं क्षेत्र बदलत नाही. शेवटी प्रचाराचं क्षेत्र आणि लोक हेच जास्त महत्त्वाचे आहेत!
आम्ही नवीन ठिकाणी गेल्यावर पाहतो की तिथले लोक आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्हीसुद्धा तिथल्या स्थानिक लोकांसारखं राहण्याचा प्रयत्न करतो. तिथल्या लोकांचं खाणं-पिणं आमच्यापेक्षा वेगळं असतं, पण तरीही आम्ही स्थानिक पदार्थ खातो-पितो. असं करताना मात्र आम्ही तब्येतीची काळजी घेतो. तसंच, आमच्या प्रत्येक नेमणुकीबद्दल आम्ही सकारात्मक गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो.
मॅरी-लीन: आम्ही स्थानिक भाऊबहिणींकडूनही बरंच काही शिकतो. आम्ही पहिल्यांदा फ्रेंच गायाना इथे आलो तेव्हा काय घडलं ते मला आठवतं. तिथे खूप जोराचा पाऊस पडत होता. म्हणून आम्ही विचार करत होतो की पाऊस थांबेल तेव्हा आम्ही प्रचाराला जाऊ. पण मग एका बहिणीने मला विचारलं की “आपण जाऊ या का?” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं “पण कसं?” तिने म्हटलं की “छत्री घ्या आणि आपण आपल्या सायकलने जाऊ या.” तेव्हा मी छत्री धरून सायकल चालवायची शिकले. मला वाटतं की जर मी हे शिकले नसते तर पावसाळ्यात मी कधीच प्रचार केला नसता.
तुमची १५ वेळा नेमणूक बदलली. ज्यांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेवा करायची आहे त्यांना मदतीची ठरतील अशी काही माहिती तुम्ही द्याल का?
मॅरी-लीन: दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेवा करणं कठीण असू शकतं. तरीपण असं ठिकाण शोधणं गरजेचं आहे जिथे तुम्ही प्रचार करून घरी परत आल्यावर तुम्हाला परक्या ठिकाणी आल्यासारखं वाटणार नाही, तर आपल्याच घरी आल्यासारखं वाटेल.
जॅक: नवीन घरी राहायला गेल्यावर सहसा मी सर्वात आधी खोल्यांना पेंट करतो. मी एका ठिकाणी जास्त वेळ राहणार नसलो तर शाखा कार्यालयातले बांधव कधीकधी हसून म्हणायचे “जॅक, या वेळी पेंट नको करू!”
मॅरी-लीनला सामानाची पॅकींग करायला चांगलं जमतं. ती सर्व गोष्टी बॉक्समध्ये भरते आणि प्रत्येक बॉक्सवर ‘बाथरूम’, ‘किचन’ आणि ‘बेडरूम’ असं नाव असलेलं लेबल लावते. यामुळे आम्हाला नवीन घरी आल्यावर प्रत्येक बॉक्स योग्य त्या
खोलीत ठेवणं सोपं जातं. प्रत्येक बॉक्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या आहेत त्याची यादी बनवून ती त्या-त्या बॉक्समध्ये ठेवते. यामुळे आम्हाला पाहिजे त्या वस्तूंची शोधाशोध करावी लागत नाही तर त्या लगेच सापडतात.मॅरी-लीन: सर्व कामं सुव्यवस्थितपणे करायला शिकल्यामुळे, नवीन ठिकाणी गेल्यावर आम्हाला लगेच प्रचाराला जाता येतं.
“सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण” करता यावी म्हणून तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं करता?—२ तीम. ४:५.
मॅरी-लीन: आम्ही सोमवारी आराम आणि सभांची तयारी करतो. मंगळवारपासून आम्ही सेवाकार्य सुरू करतो.
जॅक: आमच्यावर तासांचं बंधन असलं तरी आम्ही त्यावर जास्त लक्ष देत नाही. प्रचार करणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. घरातून निघाल्यापासून परत येईपर्यंत आम्ही शक्य तितक्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो.
मॅरी-लीन: आम्ही पिकनिकला जातो तेव्हा मी नेहमी माझ्यासोबत ट्रॅक्ट्स ठेवते. आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत असं आम्ही कोणाला सांगितलेलं नसलं तरी काही लोक आमच्याकडे येऊन म्हणतात की ‘आम्हाला काही साहित्यं वाचायला द्याल का?’ यामुळे आम्ही लक्ष देतो की आमचे कपडे, वागणंबोलणं व्यवस्थित आहे की नाही. कारण या गोष्टी लोकांच्या नजरेत येतात.
जॅक: शेजाऱ्यांना मदत करूनही आम्ही त्यांना साक्ष देतो. घराच्या आजूबाजूला पडलेला कचरा, सुकलेली पानं उचलून मी कचऱ्याच्या डब्यात टाकतो. आमचे शेजारी हे पाहतात. कधीकधी ते आम्हाला विचारतात, “तुमच्याकडे एखादं बायबल असेल तर आम्हाला द्याल का?”
तुम्ही दूरवरच्या क्षेत्रात अनेक वेळा प्रचार केला आहे. त्यांपैकी एखादा खास अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का?
जॅक: गायाना इथल्या काही क्षेत्रांत पोहोचणं खूप कठीण आहे. आम्हाला अनेकदा एका आठवड्यात ६०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आणि रस्तेही खूप खराब असतात. ॲमेझॉन जंगलामध्ये एक गाव आहे. त्याचं नाव आहे सेंट एली. तिथला प्रवास आमच्या चांगलाच लक्षात राहिला. आम्हाला अर्धा प्रवास खडबडीत रस्त्यावर चालणाऱ्या एका गाडीने आणि मग उरलेला प्रवास मोटरबोटने करावा लागला. तिथे आम्हाला पोहोचायला बरेच तास लागले. तिथले बरेचसे लोक सोन्याच्या खाणीत काम करायचे. आम्ही दिलेलं साहित्य त्यांना खूप आवडलं आणि म्हणून त्यांनी सोन्याचे काही लहान तुकडे आम्हाला दान म्हणून दिले! संध्याकाळी आम्ही त्यांना संघटनेचा एक व्हिडिओ दाखवला. बरेच लोक तो व्हिडिओ बघायला आले होते.
मॅरी-लीन: अलीकडेच कॅमोपी गावात स्मारकविधीचं भाषण द्यायला जॅकला बोलवलं होतं. तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला ओयापॉक नदीतून मोटरबोटने चार तास प्रवास करावा लागला. तो खूप रोमांचक अनुभव होता!
जॅक: काहीकाही ठिकाणी नदीत मोठे खडक होते. तिथे पाण्याचा वेग खूप जास्त असायचा. हा प्रवास खूपच धोक्याचा होता. नदीत अशा लाटा जवळ येताना पाहून अंगावर शहारे यायचे. अशा परिस्थितीत बोट चालक खूप कुशल असायला हवा. भीती वाटत होती पण खूप सुंदर अनुभव होता. तिथे फक्त ६ साक्षीदार होते पण जवळपास ५० लोक स्मारकविधीला उपस्थित राहिले. त्यांपैकी काही अमेरिंडीयन्स होते. हे लोक दुसऱ्या ठिकाणांवरून अमेरिकेत राहायला आले होते.
मॅरी-लीन: ज्या तरुणांना यहोवाच्या सेवेत जास्त करण्याची इच्छा आहे, त्यांना असे बरेच सुंदर अनुभव येतील. अशा परिस्थितीत तुम्ही यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे आणि यामुळे तुमचा त्याच्यावरचा विश्वास मजबूत होईल. यहोवा आम्हाला मदत करत आहे हे आम्हाला वेळोवेळी जाणवतं.
तुम्हाला बऱ्याच भाषा येतात. त्या शिकणं तुम्हाला सोपं गेलं का?
जॅक: मुळीच नाही. मला प्रचार करता यावा आणि मंडळीला मदत करता यावी म्हणून मी त्या शिकलो. स्रानानटाँगो * या भाषेत मी साधं बायबल वाचनसुद्धा केलं नव्हतं तरी मला त्या भाषेत टेहळणी बुरूज अभ्यास घ्यावा लागला. मी अभ्यास कसा घेतला हे मी एका बांधवाला विचारलं. त्याने म्हटलं: “काही शब्द आम्हाला समजले नाहीत पण तुम्ही अभ्यास छान घेतला.” मुलांनी तर मला खूप मदत केली. मी जेव्हा बोलण्यात चुकायचो तेव्हा मोठे नाही तर लहान मुलं मला त्याबद्दल सांगायचे. खरंच मी लहान मुलांकडून खूप काही शिकलो.
मॅरी-लीन: एकाच क्षेत्रात मी फ्रेंच, पोर्तुगीज, स्रानानटाँगो या भाषा बोलणाऱ्यांचा बायबल अभ्यास घ्यायचे. एका बहिणीने सुचवलं की मला अवघड वाटत असलेल्या म्हणजे पोर्तुगीज भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा बायबल अभ्यास मी आधी घ्यावा आणि शेवटी, सोपी वाटत असलेल्या भाषेतला बायबल अभ्यास घ्यावा. सुरुवातीला मला समजलं नव्हतं की ती अशी का बोलली. पण लवकरच मला तिचं बोलणं पटलं.
एक दिवस मला स्रानानटाँगो आणि नंतर पोर्तुगीज या भाषेत बायबल अभ्यास घ्यायचा होता. मी जेव्हा दुसरा बायबल
अभ्यास म्हणजेच पोर्तुगीज भाषेतला बायबल अभ्यास घ्यायला सुरू केला तेव्हा माझ्यासोबत असलेली बहीण मला म्हणाली की “मॅरी-लीन मला वाटतंय तू काय बोलतेयस ते तिला समजत नाहीए.” मला जाणवलं की एका ब्राझीलियन स्त्रीसोबत मी पोर्तुगीज ऐवजी स्रानानटाँगो या भाषेत बोलत होते.तुम्ही ज्यांच्यासोबत प्रचार केला त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही त्यांचे इतके चांगले मित्र कसे बनू शकला?
जॅक: नीतिसूत्रे ११:२५ मध्ये म्हटलं आहे की “उदार मनाचा समृद्ध होतो.” इतरांना वेळ द्यायला आणि मदत करायला आम्ही मागेपुढे पाहत नाही. एकदा राज्य सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामात मदत करण्याच्या बाबतीत काही बांधव मला म्हणाले: “प्रचारक आहेत ना, ते करतील.” पण मी म्हटलं: “मीसुद्धा एक प्रचारक आहे. जर काही काम करायचं असेल तर मीसुद्धा मदत केलीच पाहिजे.” हे खरं आहे की आपल्या सर्वांना स्वतःसाठी थोडा निवांत वेळ हवा असतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इतरांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा आपण त्याग करायला तयार असलं पाहिजे.
मॅरी-लीन: भाऊबहिणींसोबत मैत्री करायला आम्ही पुढाकार घेतो. असं करून आम्हाला त्यांना मदत करणं शक्य होतं. जसं की, त्यांच्या मुलांकडे लक्ष देणं किंवा शाळेतून घरी आणणं. आणि यासाठी आम्ही आधी ठरवलेल्या कामांमध्ये फेरबदलही करतो. असं केल्यामुळे इतरांसोबत आमची चांगली मैत्री होते. आणि त्यांना जर कधी मदतीची गरज पडली तर आम्ही ती करायला तयार असतो.
प्रचारकांची गरज असलेल्या क्षेत्रात सेवा केल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
जॅक: पूर्ण वेळेच्या सेवेमुळे आम्हाला बरेच आशीर्वाद मिळाले आहेत. यहोवाने सृष्टीत ज्या विविध गोष्टी बनवल्या आहेत त्या जवळून पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. हे खरं आहे की आम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला पण तरीही आम्हाला मनाची शांती अनुभवता आली. कारण आम्हाला खातरी होती की आम्ही कुठेही असलो तरी भाऊबहीण आमची मदत करायला नेहमी तयार असतील.
तरुण असताना एक ख्रिस्ती या नात्याने तटस्थ राहिल्यामुळे मला फ्रेंच गायाना इथे तुरुंगात टाकण्यात आलं. मी कधी विचारही केला नव्हता की मी तिथे परत एक मिशनरी म्हणून जाईन आणि मला तिथल्या कैद्यांना प्रचार करण्याची संधी मिळेल. खरंच, यहोवा किती उदारपणे आशीर्वाद देतो!
मॅरी-लीन: इतरांची मदत केल्यामुळे मला खूप आनंद मिळतो. आम्ही खूश आहोत की आम्ही यहोवाच्या सेवेत आहोत. आणि यामुळे पती-पत्नी म्हणून आमच्या दोघांमधलं नातं आणखी मजबूत झालं आहे. कधीकधी जॅक मला विचारतो की ‘आपण त्या जोडप्याला जेवायला बोलवायचं का कारण त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे.’ खूप वेळा माझं उत्तर असतं की ‘मीसुद्धा हाच विचार करत होते!’ आणि बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सारखाच विचार करत असतो.
जॅक: अलीकडेच मला समजलं की मला कॅन्सर झाला आहे. मी माझ्या आजारपणाबद्दल बोललेलं मॅरी-लीनला आवडत नाही. पण मी तिला सांगितलं आहे : “मॅरी, माझं इतकं काही वय झालेलं नाही, पण मी लवकर मेलो तरी मला माहीत आहे की मी जीवनात तेच केलं जे जास्त महत्त्वाचं आहे. मी यहोवाची सेवा केली आणि याचा मला खूप आनंद आहे.”—उत्प. २५:८.
मॅरी-लीन: यहोवाने आम्हाला अशा नेमणुकी दिल्या ज्यांची आम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. त्याने आम्हाला अशा गोष्टी करण्याची संधी दिली ज्यांचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. खरंच यहोवाने आम्हाला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. यहोवाची संघटना आम्हाला जिथे कुठे जायला सांगेल तिथे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण यहोवा आम्हाला मदत करेल या गोष्टीचा आम्हाला पूर्ण भरवसा आहे.
^ परि. 32 स्रानानटाँगो ही इंग्रजी, डच, पोर्तुगीज आणि आफ्रिकन भाषा मिळून बनलेली भाषा आहे. ही भाषा गुलामांद्वारे अस्तित्वात आली.