व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या

जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या

“‘राजासनावर बसलेला’ ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत.”—प्रकटी. ५:१३.

गीत क्रमांक: ९, १४

१. काही जण आदरास पात्र का असतात, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपण इतरांचा आदर करतो, हे आपण कसं दाखवतो? इतरांना मान देण्याद्वारे आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याद्वारे आपण हे दाखवतो. आदरास पात्र अशी एखादी गोष्ट ज्यांनी केली आहे किंवा मग ज्यांना एखादी खास नेमणूक मिळाली आहे किंवा जे अधिकार पदावर आहेत, त्यांना आपण सहसा आदर आणि सन्मान देतो. या लेखात आपण पाहणार आहोत की आपण कोणाला सन्मान दिला पाहिजे आणि का?

२, ३. (क) यहोवा देव खास सन्मानास पात्र का आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) प्रकटीकरण ५:१३ मध्ये सांगितलेला कोकरा कोण आहे, आणि तो सन्मानास पात्र का आहे?

प्रकटीकरण ५:१३ मध्ये म्हटलं आहे की, “राजासनावर जो बसलेला” आहे तो, व ‘कोकरा’ हे सन्मानास पात्र आहेत. या वचनात “राजासनावर जो बसलेला” आहे तो यहोवा देव आहे. यहोवा सन्मानास पात्र का आहे, यासाठी प्रकटीकरण अध्याय ४ मध्ये बायबल आपल्याला एक कारण देतं. तिथं म्हटलं आहे की, जो “राजासनावर बसलेला” आहे आणि “जो युगानुयुग जिवंत आहे” त्या यहोवा देवाचा गौरव करत स्वर्गातील सर्व जण असं म्हणतात: “हे प्रभो [“यहोवा” NW], आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटी. ४:९-११.

प्रकटीकरण ५:१३ मध्ये सांगितलेला ‘कोकरा’ येशू ख्रिस्त आहे. आपण हे का म्हणू शकतो? कारण जेव्हा येशू या पृथ्वीवर होता, तेव्हा त्याला “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” असं म्हटलं गेलं होतं. (योहा. १:२९) या कारणामुळे आपण त्याचा सन्मान करणं योग्यच आहे. कारण, मनुष्यांमध्ये आजपर्यंत असा कोणताही राजा होऊन गेलेला नाही, ज्याने आपल्या प्रजेसाठी खंडणी म्हणून स्वतःचं बलिदान दिलं असेल. येशू हा “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” आहे, त्यामुळे तो सन्मानास पात्र आहे. (१ तीम. ६:१४-१६) तुम्हालाही कदाचित त्या स्वर्गातील हजारो शक्तिशाली दूतांप्रमाणेच वाटत असेल, जे म्हणतात: “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे.”—प्रकटी. ५:१२.

४. यहोवा देवाचा आणि येशू ख्रिस्ताचा सन्मान करणं हे आपल्यासाठी योग्य का ठरेल?

योहान ५:२२, २३ मध्ये सांगितलं आहे की, यहोवाने येशू ख्रिस्ताला सर्व मानवजातीवर न्यायाधीश म्हणून नेमलं आहे. आपण येशूला सन्मान का दिला पाहिजे यामागचं हे मुख्य कारण आहे. तसंच जेव्हा आपण येशूला सन्मान देतो, तेव्हा आपण यहोवा देवालाही सन्मान देत असतो. येशूला आणि त्याच्या पित्याला सन्मान दिल्याने आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल.—स्तोत्र २:११, १२ वाचा.

५. सर्व मानव योग्य प्रमाणात आदर आणि सन्मानास पात्र का आहेत?

देवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात तयार केलं आहे. (उत्प. १:२७) याचा अर्थ, बहुतेक लोकांकडे देवासारखे गुण प्रदर्शित करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, प्रेम, दया आणि करूणा यांसारखे गुण मानव प्रदर्शित करू शकतात. यासोबतच मानवांना विवेकबुद्धी देऊन निर्माण करण्यात आलं आहे. म्हणजेच योग्य आणि अयोग्य, प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा, चांगलं आणि वाईट यांमधील फरक ओळखण्याची क्षमता देऊन त्यांना निर्माण करण्यात आलं आहे. (रोम. २:१४, १५) अनेक लोकांना सुंदरता व स्वच्छता आवडते. तसंच इतरांसोबत शांतीने राहण्यास अनेकांना आवडतं. याचं कारण म्हणजे, आपला निर्माणकर्ता यहोवा हा शांतीचा आणि व्यवस्थेचा परमेश्वर आहे. यावरून हे स्पष्टच आहे की, मानव कोणत्या ना कोणत्या प्रकारे यहोवाचे गुण प्रदर्शित करू शकतात. आणि यामुळेच इतर मानवदेखील आपल्या आदरास आणि सन्मानास पात्र आहेत.—स्तो. ८:५.

आदर व सन्मान देताना समतोल राखणं

६, ७. आदर आणि सन्मान दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार इतर लोकांपेक्षा कसे वेगळे आहेत?

इतरांना आदर द्यायला हवा हे आपल्याला माहीत आहे. पण कदाचित आपल्याला हे समजणं अवघड जात असेल की, एखाद्याला किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारे आदर दाखवावा. याचं कारण म्हणजे, सैतानाच्या जगामध्ये आढळणाऱ्या मनोवृत्तीचा बऱ्याच लोकांवर प्रभाव पडत असतो. अनेक लोक एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला आपला देव मानतात. यहोवा देव अपेक्षा करतो त्याप्रमाणे मनुष्यांना योग्य प्रमाणात आदर आणि सन्मान देण्याऐवजी, ते इतरांना अधिकच जास्त प्रमाणावर मान-सन्मान देतात व त्यांना देवाच्या ठिकाणी ठेवतात. अशा प्रकारचे लोक कदाचित एखादा नेता, धर्मपुढारी, खेळाडू किंवा प्रसिद्ध व्यक्ती यांसारखेच कपडे घालतात आणि त्यांच्यासारखंच वागतात व बोलतात.

इतरांना इतक्या जास्त प्रमाणात आदर आणि सन्मान देणं चुकीचं आहे, याची जाणीव खऱ्या ख्रिश्चनांना आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर जितके लोक होऊन गेले, त्यांपैकी फक्त येशूनेच अनुकरण करण्यासारखं एक परिपूर्ण उदाहरण आपल्यासमोर मांडलं आहे. (१ पेत्र २:२१) इतर “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. (रोम. ३:२३) कोणताही मनुष्य उपासनेसाठी पात्र नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त सन्मान देतो, तेव्हा आपण यहोवाचं मन दुखावतो.

८, ९. (क) यहोवाचे साक्षीदार सरकारी अधिकाऱ्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? (ख) कोणत्या परिस्थितीत आपण मनुष्यांऐवजी देवाची आज्ञा पाळतो?

असेही काही लोक आहेत ज्यांना त्यांच्या पदामुळे सन्मान देणं योग्य ठरेल. उदाहरणार्थ, सरकारी अधिकाऱ्यांचा आणि ते करत असलेल्या कामांचा विचार करा. हे अधिकारी आपण राहत असलेला परिसर सुरक्षित ठेवतात आणि नागरिकांना सुविधा पुरवण्याचं काम करतात. ते करत असलेल्या कामामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. प्रेषित पौलाने सांगितलं की अशा लोकांकडे आपण ‘वरिष्ठ अधिकारी’ म्हणून पाहावं. पुढे तो असंही सांगतो की आपण त्यांचे नियम पाळावेत. पौल म्हणतो: “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या” आणि “ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा.”—रोम. १३:१, ७.

यहोवाचे साक्षीदार या नात्यानं आपण सरकारी अधिकाऱ्यांना आदर व सन्मान देण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करतो. हे खरं आहे की, प्रत्येक देशामधील संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे हे सरकारी अधिकारी आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतात, त्या वेगवेगळ्या देशांनुसार वेगवेगळ्या असू शकतात. असं असलं तरी, आपण या अधिकाऱ्यांना सहकार्य करतो. पण, सरकारी अधिकारी आपल्याला यहोवाच्या आज्ञेविरुद्ध जेव्हा एखादी गोष्ट करण्यास सांगतात, तेव्हा मात्र आपण ती करत नाही. अशा वेळी आपण मनुष्यांऐवजी देवाची आज्ञा पाळतो आणि त्याला सन्मान देतो.—१ पेत्र २:१३-१७ वाचा.

१०. यहोवाच्या प्राचीन काळातील सेवकांनी आपल्यासमोर चांगलं उदाहरण कसं मांडलं आहे?

१० सरकारी अधिकाऱ्यांना सन्मान देण्याच्या बाबतीत आपण यहोवाच्या प्राचीन काळातील सेवकांपासून शिकू शकतो. याबाबतीत योसेफ आणि मरीया यांनी चांगलं उदाहरण मांडलं. त्या काळी रोमन अधिकाऱ्यांना हे माहीत करून घ्यायचं होतं की, त्यांच्या प्रांतात एकूण किती लोक राहत आहेत. मरीया गरोदर होती आणि तिच्या प्रसूतीचा काळ जवळ आला होता. पण अशा परिस्थितीतही ती दोघं नाव नोंदवण्यासाठी बेथलेहेमला गेले. (लूक २:१-५) प्रेषित पौलानेदेखील आपल्यासमोर याबाबतीत चांगलं उदाहरणं मांडलं आहे. जेव्हा त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला, तेव्हा त्याने राजा हेरोद अग्रिप्पा आणि यहूदा प्रांताचा राज्यपाल फेस्त यांना आदर दाखवत स्वतःची बाजू मांडली.—प्रे. कृत्ये २५:१-१२; २६:१-३.

११, १२. (क) धर्मपुढाऱ्यांना आपण इतरांपेक्षा खास सन्मान का देत नाही? (ख) ऑस्ट्रियातील एका बांधवाने जेव्हा एका राजकारणी व्यक्तीला आदर दाखवला तेव्हा त्याचा काय परिणाम झाला?

११ धर्मपुढाऱ्यांबद्दल काय? आपण त्यांना इतरांपेक्षा खास सन्मान द्यावा का? आपण इतर लोकांना जो आदर आणि सन्मान देतो, तोच धर्मपुढाऱ्यांनाही देतो. इतरांनी आपल्याला विशेष सन्मान द्यावा अशी त्यांची इच्छा असली, तरी त्यांना इतरांपेक्षा खास सन्मान देणं योग्य ठरणार नाही. असं का? कारण खोटा धर्म हा देवाविषयी आणि बायबलविषयी खरी शिकवण देत नाही. येशूने खोट्या धर्मपुढाऱ्यांची टीका केली आणि त्यांना ‘ढोंगी’ व ‘आंधळे वाटाडी’ असं म्हटलं. (मत्त. २३:२३, २४) पण दुसऱ्या बाजूला पाहता, सरकारी अधिकाऱ्यांना विशेष सन्मान व आदर देणं चुकीचं ठरणार नाही. असं केल्याने काही वेळा त्यांनी आपल्याला मदतही केली आहे.

१२ याचं एक उदाहरण म्हणजे, ऑस्ट्रियामधील राजकारणी डॉ. हिनरीक ग्लेसनर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना नाझी सैनिकांनी पकडलं आणि एका ट्रेनमधून छळ छावणीकडे नेलं. ट्रेनमध्ये त्यांची भेट ऑस्ट्रियाच्या लिओपोल्ट एनग्लीथने या एका आवेश साक्षीदारासोबत झाली. बंधू एनग्लीथने यांनी त्यांच्या विश्वासाबद्दल फार आदराने डॉ. हिनरीक यांना सांगितलं. त्यांनीदेखील बंधू एनग्लीथने यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, तेव्हा डॉ. हिनरीक यांनी अनेक वेळा आपल्या पदाचा वापर करून ऑस्ट्रियातील साक्षीदारांना मदत केली. तुम्हालादेखील असे काही अनुभव माहीत असतील ज्यांत ख्रिश्चनांनी सरकारी अधिकाऱ्यांना आदर दाखवल्यामुळे चांगले परिणाम घडून आले आहेत.

इतरांचा आदर व सन्मान करा

१३. आपल्या आदरास खासकरून कोण पात्र आहेत, आणि का?

१३ आपले बंधुभगिनी आदर व सन्मान मिळवण्यास पात्र आहेत. खासकरून संघटनेमध्ये पुढाकार घेणारे बांधव. म्हणजेच मंडळीतील वडील, विभागीय पर्यवेक्षक, शाखा समितीचे सदस्य आणि नियमन मंडळातील बांधव. (१ तीमथ्य ५:१७ वाचा.) हे सर्व बांधव देवाच्या मंडळीची काळजी वाहतात. बायबल त्यांना, माणसांच्या रूपात देणग्या असं म्हणतं. (इफिस. ४:८) त्यामुळे त्यांना आदर आणि सन्मान देणं योग्यच आहे. मग ते कोणत्याही देशाचे असले, किंवा त्यांचं शिक्षण, सामाजिक दर्जा आणि आर्थिक परिस्थिती कशीही असली तरीही. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी याबाबतीत आपल्यासमोर चांगलं उदाहरण मांडलं. मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांना त्यांनी आदर दाखवला आणि आज आपणही त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतो. संघटनेत किंवा मंडळीत पुढाकार घेणारे हे बांधव जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा आपण त्यांना, ते फार खास आहेत किंवा देवदूतांसारखे आहेत असं समजून विशेष वागणूक देणार नाही. पण ते घेत असलेल्या मेहनतीसाठी आणि ते दाखवत असलेल्या नम्रपणासाठी, आपण त्यांना नक्कीच आदर आणि सन्मान देऊ.—२ करिंथकर १:२४; प्रकटीकरण १९:१० वाचा.

१४, १५. मंडळीतील वडील इतर अनेक धर्मपुढाऱ्यांपेक्षा वेगळे कसे आहेत?

१४ मंडळीत मेहनत घेणारे हे वडील एखाद्या नम्र मेंढपाळाप्रमाणे आहेत. आपल्याला कोणी खास वागणूक द्यावी किंवा एखादी विशेष व्यक्ती समजावं असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते येशूच्या काळातील आणि आजच्या काळातील धर्मपुढाऱ्यांपेक्षा फार वेगळे आहेत. या धर्मपुढाऱ्यांबद्दल बोलताना येशूने म्हटलं: “जेवणावळींतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारांत नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते.”—मत्त. २३:६, ७.

१५ पण मंडळीतील वडील येशूच्या आज्ञेचं पालन करतात. येशूने म्हटलं: “तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.” (मत्त. २३:८-१२) जेव्हा जगभरातील ख्रिस्ती मंडळ्यांमधील वडील नम्रता दाखवतात आणि येशूच्या आज्ञेचं पालन करतात, तेव्हा ते आपल्या बंधुभगिनींकडून प्रेम, आदर आणि सन्मान कमवतात.

जेव्हा जगभरातील ख्रिस्ती मंडळ्यांमधले वडील नम्रपणे सेवा करतात, तेव्हा ते आपल्या बंधुभगिनींकडून प्रेम, आदर आणि सन्मान कमवतात (परिच्छेद १३-१५ पाहा)

१६. इतरांना आदर व सन्मान देण्यासाठी प्रयत्न करणं का गरजेचं आहे?

१६ इतरांना आदर व सन्मान देताना समतोल कसा राखावा, हे शिकण्यासाठी आपल्याला कदाचित वेळ लागेल. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनादेखील ही गोष्ट शिकण्यास वेळ लागला होता. (प्रे. कृत्ये १०:२२-२६; ३ योहा. ९, १०) पण यासाठी प्रयत्न करणं मात्र नक्कीच योग्य ठरेल. यहोवा आपल्याकडून जशी अपेक्षा करतो त्याप्रमाणे जर आपण इतरांना आदर व सन्मान दिला, तर आपल्याला अनेक फायदे होतील.

आदर व सन्मान देण्याचे फायदे

१७. अधिकार असलेल्यांना आदर दाखवल्यामुळे कोणते फायदे होतात?

१७ जेव्हा आपण इतरांना आदर दाखवतो, तेव्हा समाजामध्ये ज्यांना अधिकार आहे त्यांच्याकडून आपल्या प्रचारकार्याच्या अधिकाराचं समर्थन होण्याची जास्त शक्यता असते. आपल्या प्रचारकार्याकडे कदाचित ते सकारात्मक दृष्टिकोनानंही पाहतील. काही वर्षांपूर्वी जर्मनीमधील एका शाळेत हेच घडलं. आपली एक पायनियर बहीण बेरगीट, प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या आपल्या मुलीच्या निकालाच्या दिवशी तिथं गेली. शाळेतील शिक्षकांनी बेरगीटला सांगितलं की, बऱ्याच वर्षांपासून साक्षीदार मुलं त्यांच्या शाळेत शिकत आहेत आणि त्यांना शिकवताना त्यांना खरोखर आनंद होतो. तसंच शाळेत या साक्षीदार मुलांमुळे चांगलं वातावरण निर्माण होतं, असंही त्यांना वाटतं. यावर बेरगीट म्हणाली: “आमच्या मुलांना देवाच्या स्तरांनुसार जगण्यासाठी शिकवलं जातं. यांत शिक्षकांना आदर आणि सन्मान देणं हेदेखील सामील आहे.” एक शिक्षिका म्हणाली की जर शाळेतील सर्वच मुलं साक्षीदार असती, तर शिकवणं खूप सोपं झालं असतं. या शिक्षकांचा साक्षीदारांच्या मुला-मुलींबद्दल इतका सकारात्मक दृष्टिकोन होता, की काही आठवड्यांनंतर एक शिक्षिका साक्षीदारांच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहिली.

१८, १९. मंडळीतील वडिलांना आदर व सन्मान देताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

१८ देवाच्या वचनांतील तत्त्वं आपल्याला हे समजण्यास मदत करतात की, मंडळीतील वडिलांना आपण कशा प्रकारे आदर दिला पाहिजे. (इब्री लोकांस १३:७, १७ वाचा.) ते घेत असलेल्या मेहनतीसाठी आपण त्यांची प्रशंसा करू शकतो; खरंतर आपण तसं करायलाही हवं. जेव्हा ते काही मार्गदर्शन देतात तेव्हा आपण त्यांच्याशी सहकार्य केलं पाहिजे. यामुळे ते करत असलेली सेवा आनंदाने करण्यास त्यांना मदत होईल. बायबल आपल्याला हेदेखील सांगतं की आपण त्यांच्या विश्वासाचं अनुकरण केलं पाहिजे. पण याचा अर्थ असा होत नाही, की मंडळीतील एखादा नावाजलेला वडील ज्या प्रकारे बोलतो, भाषण देतो किंवा कपडे घालतो त्याच प्रकारे आपणही करावं. जर आपण असं करत असू, तर आपण ख्रिस्ताऐवजी माणसांचे अनुकरण करणारे होऊ. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याप्रमाणेच मंडळीतील वडीलही अपरिपूर्ण आहेत.

१९ आपण मंडळीतील वडिलांना योग्य आदर व सन्मान देतो. पण आपण त्यांना एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीप्रमाणे किंवा ते फार खास व्यक्ती आहेत, असं समजून वागणूक देत नाही. असं केल्याने त्यांना मदतच होते. ती कशी? जेव्हा आपण त्यांना इतरांपेक्षा काही खास वागणूक देत नाही, तेव्हा ‘आपण इतरांपेक्षा अधिक चांगले आहोत आणि आम्ही जे करतो ते नेहमी योग्यच आहे’ अशा मनोवृत्तीपासून दूर राहण्यास त्यांना मदत होत असते. यामुळे गर्वापासून दूर राहण्यास आणि नम्र वृत्ती बाळगण्यास त्यांना मदत होते.

२०. इतरांना जेव्हा आपण आदर देतो तेव्हा आपल्याला कोणते फायदे होतात?

२० इतरांना आदर दिल्याने आपणदेखील स्वार्थी वृत्तीपासून बचावतो. तसंच जेव्हा इतर जण आपल्याला काही खास वागणूक देतात तेव्हादेखील आपल्याला नम्र राहण्यास मदत होते. इतरांना आदर देणं ही गोष्ट आपल्यासाठी संरक्षणाचंच काम करते. कारण, आपण ज्यांचा आदर व सन्मान करतो त्यांनी काही चुकीची गोष्ट केली, तरी त्यामुळे आपण अडखळत नाही. याचा आणखी एक फायदा म्हणजे, यामुळे यहोवाच्या संघटनेत बांधवांमध्ये ऐक्य टिकून राहण्यास मदत होते. यहोवाची संघटना कोणत्याही मानवाला, मग तो सत्यात असो अथवा सत्याबाहेरचा, प्रमाणापेक्षा जास्त आदर व सन्मान देत नाही.

२१. इतरांना आदर देण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता आहे?

२१ इतरांना आदर देण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, असं करण्याद्वारे आपण यहोवा देवाला खूश करतो. आपण इतरांना आदर देतो, तेव्हा यहोवा आपल्याकडून ज्या गोष्टीची अपेक्षा करतो ती गोष्ट आपण करत असतो. तसंच आपण त्याला विश्वासू आहोत हेदेखील दाखवत असतो. असं केल्याने यहोवा त्याच्यावर दोषारोप लावणाऱ्या सैतानाला उत्तर देऊ शकेल. (नीति. २७:११) इतरांना योग्य प्रमाणात आदर कसा द्यावा हे या जगातील अनेकांना माहीत नाही. पण यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो त्याप्रमाणे इतरांना योग्य आदर कसा द्यावा हे आपल्याला माहीत आहे, यासाठी आपण खरंच किती कृतज्ञ आहोत!