आपल्या संग्रहातून
“कोणताही रस्ता—कठीणही नाही आणि लांबही”
२६ मार्च १९३७ चा दिवस. प्रवासाने अगदी थकून गेलेले दोन पुरुष, धुळीने माखलेली आपली ट्रक घेऊन ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात पोचले. एक वर्षाआधी त्यांनी हे शहर सोडलं होतं आणि १९,३०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करत ते फिरले होते. त्यांचा हा प्रवास ऑस्ट्रेलिया खंडाच्या काही अगदी दुर्गम आणि खडतर प्रदेशातून झाला होता. ते दोघे कोणी साहसी पर्यटन करणारे किंवा नवनवीन ठिकाणांचा शोध लावणाऱ्यांपैकी नव्हते. तर ऑस्ट्रेलियाच्या त्या विशाल आणि दुर्गम भागात देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्याचा ठाम निर्धार असलेले आवेशी पायनियर होते. त्यांच्यापैकी एकाचं नाव आर्थर विलिस तर दुसऱ्याचं बिल न्यूलँड्स होतं.
१९२० दशकाच्या अगदी शेवटपर्यंत, संख्येने कमी असलेल्या बायबल विद्यार्थ्यांनी * ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या शहरांमध्ये आणि गावांमध्येच प्रचारकार्य केलं होतं. पण, ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागातील अतिशय उष्ण आणि विरळ लोकसंख्या असलेल्या ठिकाणी प्रचाराचं कार्य झालंच नव्हतं. हा प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याचं क्षेत्रफळ युनायटेड स्टेट्सच्या क्षेत्रफळाच्या (अमेरिका) निम्म्यापेक्षा जास्त आहे. पण, बांधवांना या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की या ठिकाणीही सुवार्ता पोचवणं गरजेचं आहे. कारण, येशूने सांगितलं होतं की “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याच्याबद्दलची साक्ष दिली गेली पाहिजे. आणि यात ऑस्ट्रेलियातील या दुर्गम प्रदेशाचाही समावेश होता. (प्रे. कृत्ये १:८) या दुर्गम भागांत सुवार्ता पोचवणं म्हणावं तितकं सोपं नव्हतं. पण, यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल याची या बांधवांना पूर्ण खात्री होती. त्यामुळेच, स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा आणि हे आव्हान स्वीकारण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता.
पायनियर प्रचारकार्याचा मार्ग मोकळा करतात
१९२९ साली क्वीन्झलँन्ड आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील मंडळ्यांनी दुर्गम भागांत सुवार्ता पोचवण्यासाठी काही मोटार व्हॅनची व्यवस्था केली. प्रवासादरम्यान लागणाऱ्या सर्व गोष्टीही बांधवांनी आपल्यासोबत या गाड्यांमध्ये घेतल्या. या गाड्या असे काही पायनियर बांधव चालवायचे, जे अतिशय कठीण परिस्थितीत प्रवास करू शकत होते आणि गाडी खराब झालीच तर ती कशी दुरुस्त करावी याचीही त्यांना माहिती होती. या पायनियरांनी अशा बऱ्याच ठिकाणांना भेट दिली जिथं पूर्वी कधीच प्रचाराचं कार्य करण्यात आलेलं नव्हतं.
असेही काही पायनियर होते ज्यांना गाडी विकत घेणं शक्य नव्हतं. पण, म्हणून ते या कार्यात मागे राहिले नाहीत. सायकलवर प्रवास करून ते दुर्गम भागांत गेले. बेनेट ब्रिकल नावाच्या बांधवाचंच उदाहरण घ्या. १९३२ साली, २३ वर्षांचे असताना ते रॉकहॅम्टन इथून प्रचारकार्यासाठी आपल्या सायकलवर निघाले. त्यांनी क्वीन्झलँन्डच्या उत्तर भागातील दुर्गम क्षेत्रांमध्ये पाच महिन्यांसाठी सायकलवर प्रवास करून प्रचारकार्य केलं. त्यांनी आपल्या सायकलवर भरपूर सामान घेतलं होतं. त्यात काही ब्लँकेट्स, कपडे, खाण्याचं सामान आणि बरीच पुस्तकं होती. प्रवासादरम्यान त्यांच्या सायकलचे दोन्ही टायर खराब झाले. पण, यामुळे त्यांचा आत्मविश्वास मात्र कमी झाला नाही. त्यांनी आपला प्रवास पुढे चालूच ठेवला. यहोवा आपलं मार्गदर्शन करेल याची त्यांना पूर्ण खात्री होती. ज्या प्रदेशातून प्रवास करताना पूर्वी कितीतरी
लोकांनी तहानेनं व्याकूळ होऊन आपला जीव गमावला होता, अशा प्रदेशातून त्यांनी ३२० किलोमीटरचं अंतर सायकल लोटत पार केलं. बेनेट यांनी पुढील ३० वर्षांदरम्यानही ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागांत प्रचार करण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला. यासाठी त्यांनी कधी सायकलने, कधी मोटार-सायकलने तर कधी कारने प्रवास केला. अॅबऑर्जिन्स (आदिवासी) लोकांपर्यंत सुवार्ता पोचवणारे ते पहिले बांधव होते. तिथं नवीन मंडळ्या स्थापन करण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली. ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागांत ते लोकांच्या ओळखीचे झाले आणि लोकही त्यांचा खूप आदर करायचे.आव्हानांचा सामना करणे
ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश आहे. खासकरून त्याच्या मध्य भागात लोकसंख्या तर खूपच विरळ आहे. पण, या दुर्गम भागांत राहणाऱ्या लोकांना शोधण्याचा यहोवाच्या लोकांचा निर्धार नेहमीच पक्का राहिला आहे.
अशाच प्रकारचा ठाम निर्धार असलेले दोन पायनियर म्हणजे स्टुअर्ट केल्टे आणि विल्यम टॉरिंग्टन. १९३३ साली दूरवर पसरलेल्या सिमसन या वाळवंटातल्या लहान-मोठ्या वाळूच्या टेकड्यांना पार करत, हे पायनियर अॅलिस स्प्रिंग्स या शहरात पोचले. हे शहर म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या अगदी मधोमध असलेलं एक ठिकाण. बंधू केल्टे हे एका पायाने अधू होते. त्यांचा एक पाय लाकडाचा होता. पण, तरी जेव्हा प्रवासादरम्यान त्यांची कार खराब झाली व त्यांना ती तिथंच टाकून द्यावी लागली, तेव्हादेखील त्यांनी आपला पुढचा प्रवास थांबवला नाही. त्यांनी आपला पुढचा प्रवास उंटाच्या साहाय्याने सुरू ठेवला. या पायनियरांना त्यांच्या परिश्रमांचे चांगले फळ मिळाले. त्यांची भेट चार्ल्स बर्नहार्ट नावाच्या एका हॉटेल मालकासोबत झाली. त्यांचं हॉटेल विलियम क्रीक नावाच्या दुर्गम भागात असलेल्या एका रेल्वे स्थानकाजवळ होतं. बर्नहार्ट यांनी नंतर सत्य स्वीकारलं. पुढे त्यांनी आपलं हॉटेल विकलं आणि कोणीही पायनियर सोबती नसताना १५ वर्षं ऑस्ट्रेलियाच्या अतिशय उष्ण आणि दुर्गम भागात पायनियर सेवा केली.
सुरवातीच्या या पायनियरांसमोर जी आव्हानं आली, त्यांना तोंड देण्यासाठी धैर्याची आणि चिकाटीची खूप गरज होती. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेले आर्थर विलिस आणि बिल न्यूलँड्स यांना, ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात प्रचार करत असताना ३२ किलोमीटरचं लहानसं अंतर गाठण्यासाठी तब्बल दोन आठवडे लागले! याचं कारण म्हणजे जोरदार पाऊस पडल्यामुळे वाळवंट जणू काही चिखलाचा समुद्रच झाला होता. कधीकधी त्यांना अगदी रखरखत्या उन्हात घामाघूम होऊन आपली ट्रक मातीच्या टेकड्यांवरून ढकलून न्यावी लागायची, तर कधी खडकाळ दऱ्या आणि भरपूर वाळू असलेल्या नदीच्या पात्रातून. अशा परिस्थितीत त्यांची ट्रक नेहमी खराब व्हायची. पण, जेव्हा-जेव्हा त्यांची ट्रक खराब व्हायची, तेव्हा-तेव्हा ते चालत किंवा सायकलवर प्रवास करून जवळपासच्या गावात जायचे. गावात पोचण्यासाठी त्यांना कधीकधी बरेच दिवसही लागायचे. मग, खराब झालेल्या त्यांच्या ट्रकचे नवीन भाग मिळेपर्यंत काही आठवडे त्यांना तिथं थांबून राहावं लागायचं. इतक्या समस्या असूनही या बांधवांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. आर्थर विलिस यांनी आपल्या अनुभवाबद्दल द गोल्डन एज या मासिकाला एकदा मुलाखत दिली. या मुलाखतीचा सारांश देताना नंतर ते म्हणाले: “साक्षीदारांसाठी, कोणताही रस्ता—कठीणही नाही आणि लांबही.”
अनेक वर्षांपासून पायनियर सेवा केलेले चार्ल्स हॅरिस म्हणतात की, दुर्गम भागांत प्रचार करताना त्यांना एकटेपणा आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. पण, त्यामुळे खरंतर यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास त्यांना मदतच झाली. ते म्हणतात: “आपल्याजवळ जितकं कमी सामान असेल तितकं चांगलंच आहे. गरज पडली तेव्हा येशूही मोकळ्या आकाशाखाली झोपण्यास तयार होता, तर मग आपल्या नेमणुकीत आपणही त्याच्याप्रमाणे करण्यास आनंदाने तयार असायला नको का?” आणि बऱ्याच पायनियरांनी अशीच मनोवृत्ती दाखवली. त्यांनी जे परिश्रम घेतले ते खरंच प्रशंसनीय आहेत. त्यांनी घेतलेल्या अफाट मेहनतीमुळे राज्याची सुवार्ता ऑस्ट्रेलिया खंडाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत पोहचू शकली. याचा परिणाम म्हणजे अनेक लोकांना सत्य स्वीकारण्यास मदत झाली.