मन लावून सेवा करा!
एखाद्या जवळच्या मित्राचं पत्र येतं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला खूप आनंद होतो, यात शंका नाही. तीमथ्यलासुद्धा आपल्या प्रिय मित्राकडून, प्रेषित पौलकडून एक पत्र मिळालं होतं. ते पत्र म्हणजे बायबलमधलं २ तीमथ्यचं पुस्तक. पौलने पत्रात काय म्हटलं आहे, ते वाचायला तीमथ्य नक्कीच खूप उत्सुक असेल. आणि एका एकांत ठिकाणी बसून त्याने ते वाचलं असेल. पत्र मिळाल्यावर तीमथ्यच्या मनात कितीतरी प्रश्न आले असतील. जसं की: ‘पौल कसा आहे? माझ्या सेवेबद्दल त्याने काही सल्ला दिला आहे का? हा सल्ला मला सेवाकार्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी कसा उपयोगी ठरेल?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि बरंच काही मोलाचं तीमथ्यला या पत्रात वाचायला मिळालं. त्यांपैकी काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखात आपण पाहू या.
“मी सर्वकाही सोसत आहे”
तीमथ्यने पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा पौलसोबत आपलं किती जवळचं नातं आहे, हे त्याला लगेच जाणवलं असेल. कारण पत्राच्या सुरुवातीलाच पौल त्याला “माझा प्रिय मुलगा” असं म्हणतो. (२ तीम. १:२) तीमथ्यला इ.स. ६५ च्या आसपास हे पत्र मिळालं, तेव्हा तो तीसएक वर्षांचा असावा. पण तोपर्यंत त्याने ख्रिस्ती वडील म्हणून बराच अनुभव मिळवला होता. कारण त्याने दहापेक्षा जास्त वर्षं पौलसोबत काम केलं होतं आणि त्याच्याकडून त्याला बरंच काही शिकायला मिळालं होतं.
पत्रातून तीमथ्यला कळलं, की पौल खूप धीराने संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला किती प्रोत्साहन मिळालं असेल याचा विचार करा. पौल त्या वेळी रोममध्ये कैदेत होता आणि लवकरच त्याला मृत्युदंड दिला जाणार होता. (२ तीम. १:१५, १६; ४:६-८) पण तरीसुद्धा पौल म्हणाला, “मी सर्वकाही सोसत आहे.” यावरून तीमथ्यला कळलं असेल, की पौल किती धैर्यवान आहे. (२ तीम. २:८-१३) पौलने दाखवलेल्या धीरामुळे तीमथ्यला जसं बळ मिळालं, तसंच आपल्यालाही मिळू शकतं.
“जे दान तुला मिळालं होतं ते ज्वलंत ठेव”
तीमथ्यला देवाच्या सेवेत जी जबाबदारी मिळाली होती ती त्याने मौल्यवान समजावी असा पौलने त्याला सल्ला दिला. देवाकडून मिळालेलं हे “दान” तीमथ्यने “ज्वलंत” ठेवावं, अशी पौलची इच्छा होती. (२ तीम. १:६) “दान” या शब्दासाठी पौलने खारिस्मा हा ग्रीक शब्द वापरला. या शब्दाचा अर्थ असा होतो: ‘अशी एखादी गोष्ट जी मिळवण्यासाठी आपण काहीच मेहनत केलेली नसते; तर कोणीतरी आपल्यावर कृपा करून ती मोफत आपल्याला दिलेली असते.’ तर मग, सेवेचं हे दान तीमथ्यला केव्हा मिळालं? ख्रिस्ती मंडळीत एका खास मार्गाने सेवा करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली तेव्हा त्याला ते मिळालं.—१ तीम. ४:१४.
सेवेच्या या दानाबद्दल पौलने तीमथ्यला काय सांगितलं? त्याने त्याला ते “ज्वलंत” ठेवायला सांगितलं. “ज्वलंत” हा शब्द वाचल्यावर तीमथ्यला काय आठवलं असेल? त्या काळात
लोकांच्या घरी चुली असायच्या. चुलीतली आग जर विझू लागली तर लोक सहसा काय करतात हे त्याला आठवलं असेल. आग पेटती ठेवण्यासाठी निखाऱ्यांना वारा दिला जायचा. ‘ज्वलंत ठेवणं’ या क्रियेसाठी पौलने एक ग्रीक शब्द (ॲनाझोपायरिओ ) वापरला आहे. एका शब्दकोशानुसार या शब्दाचा अर्थ “आग पेटती ठेवणं, तिला वारा घालणं” किंवा “एखादं काम आवेशाने किंवा उत्साहाने करणं” असा होतो. दुसऱ्या शब्दांत पौल तीमथ्यला असा सल्ला देत होता, की ‘तुला जे काम सोपवलं आहे ते आवेशाने, मन लावून कर.’ आज आपणसुद्धा तेच केलं पाहिजे. आपणही उत्साहाने आणि आवेशाने आपली सेवा पूर्ण केली पाहिजे.“हा ठेवा . . . जपून ठेव”
आपल्या प्रिय मित्राचं पत्र वाचताना तीमथ्यचं लक्ष आणखी एका गोष्टीकडे गेलं असेल. त्या गोष्टीमुळे त्याला आपलं सेवाकार्य चांगल्या प्रकारे करायला मदत होणार होती. पत्रात पौलने असं म्हटलं होतं: “तुला सोपवण्यात आलेला हा ठेवा, आपल्यामध्ये राहणाऱ्या पवित्र शक्तीच्या मदतीने जपून ठेव.” (२ तीम. १:१४) तीमथ्यला कोणता ठेवा किंवा मौल्यवान गोष्ट सोपवण्यात आली होती? आधीच्या वचनात पौलने ‘फायदेकारक वचनांचा,’ म्हणजेच शास्त्रवचनांत दिलेल्या सत्याचा उल्लेख केला होता. (२ तीम. १:१३) एक ख्रिस्ती सेवक असल्यामुळे तीमथ्यवर मंडळीतल्या आणि क्षेत्रातल्या लोकांना हे सत्य शिकवायची जबाबदारी होती. (२ तीम. ४:१-५) तसंच, एक ख्रिस्ती वडील असल्यामुळे देवाच्या कळपाची काळजी घ्यायची जबाबदारीही त्याच्यावर होती. (१ पेत्र ५:२) यहोवाच्या पवित्र शक्तीच्या आणि त्याच्या वचनाच्या मदतीने तीमथ्य हा ठेवा, म्हणजेच सत्य जपून ठेवू शकत होता.—२ तीम. ३:१४-१७.
आज आपल्यालासुद्धा सत्याचा अनमोल ठेवा देण्यात आला आहे. आणि हे सत्य इतरांना सांगायची जबाबदारी आपल्यावर आहे. (मत्त. २८:१९, २०) या मौल्यवान गोष्टीबद्दल आपण आपली कदर कशी वाढवू शकतो? नेहमी प्रार्थना करून आणि नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करून. (रोम. १२:११, १२; १ तीम. ४:१३, १५, १६) सत्याचा प्रचार करण्याशिवाय आपल्यापैकी काही जण मंडळीत वडील म्हणून किंवा पूर्ण-वेळचे सेवक म्हणून सेवा करतात. यहोवाने आपल्यावर भरवसा ठेवून सेवा करायची संधी आपल्याला दिली आहे. त्यामुळे आपण नम्र असलं पाहिजे आणि ती सेवा पूर्ण करण्यासाठी यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. आपण जर असं केलं, तर यहोवाने आपल्याला जो ठेवा दिला आहे त्याची आपल्याला कदर आहे हे दिसून येईल.
“त्या गोष्टी विश्वासू पुरुषांच्या स्वाधीन कर”
सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना तीमथ्यने आणखी एक गोष्ट करायची होती. ती म्हणजे, तो करत असलेलं काम त्याने इतरांनाही शिकवायचं होतं. म्हणूनच पौलने तीमथ्यला असं म्हटलं: “ज्या गोष्टी तू माझ्याकडून ऐकल्या . . . त्या गोष्टी विश्वासू पुरुषांच्या स्वाधीन कर; म्हणजे, इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल.” (२ तीम. २:२) पौलने तीमथ्यला याची आठवण करून दिली, की त्याने इतर बांधवांकडून शिकलेल्या गोष्टी दुसऱ्यांनाही शिकवाव्यात. आज ख्रिस्ती मंडळीची देखरेख करणाऱ्या बांधवांनीही तीमथ्यप्रमाणेच इतर बांधवांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. अमुक एक काम कसं करायचं, हे एखाद्याला शिकवताना त्यांनी त्याला फक्त वरवर माहिती देऊ नये; तर त्यांना जे काही माहीत आहे, ते सगळं त्यांनी त्याला शिकवावं. त्यांना या गोष्टीची भीती नसावी, की आपण जर त्याला सगळं काही शिकवलं तर तो आपल्या पुढे जाईल आणि ते काम आपल्यापेक्षा चांगलं करेल. तसंच, कुठल्याही गोष्टीचा खोलवर विचार करून चांगले निर्णय कसे घ्यायचे हेही त्यांनी त्याला शिकवलं पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, त्यांनी त्याला एक प्रौढ ख्रिस्ती बनायला मदत केली पाहिजे. याचा परिणाम असा होईल, की ज्या ‘विश्वासू पुरुषाला’ त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे, त्याचा पुढे मंडळीला खूप फायदा होईल.
पौलकडून मिळालेलं हे पत्र तीमथ्यसाठी लाखमोलाचं असेल. त्याने ते पत्र कितीतरी वेळा वाचलं असेल. आणि त्यात दिलेला सल्ला आपल्या कामात आणखी चांगल्या प्रकारे कसा लागू करता येईल याचा त्याने विचार केला असेल.
पौलने तीमथ्यला दिलेला सल्ला आज आपणही पाळला पाहिजे. देवाकडून मिळालेलं सेवेचं दान ज्वलंत ठेवण्यासाठी, तो मौल्यवान ठेवा जपून ठेवण्यासाठी आणि आपल्याला जे काही माहीत आहे ते सगळं इतरांना शिकवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. आपण जर असं केलं, तर पौलने तीमथ्यला म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही “आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण” करता येईल.—२ तीम. ४:५.