अभ्यास लेख २५
“मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन”
“मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन. मी स्वतः त्यांची काळजी घेईन.”—यहे. ३४:११, NW.
गीत ३ “देव प्रीती आहे”
सारांश *
१. यहोवा एका आईसारखा कसा आहे?
“अंगावर पाजणारी स्त्री आपल्या बाळाला कधी विसरू शकते का?” असा प्रश्न यहोवाने यशया संदेष्ट्याच्या दिवसांत आपल्या लोकांना विचारला. त्याने पुढे असंही म्हटलं: “एक वेळ आई आपल्या बाळाला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही.” (यश. ४९:१५, NW) यहोवा सहसा स्वतःची तुलना आईसोबत करत नाही. पण या प्रसंगी मात्र त्याने केली. आपल्या सेवकांवर आपलं किती प्रेम आहे हे यहोवाला दाखवायचं होतं. आणि त्यासाठी त्याने आईचं आपल्या बाळासोबत असलेल्या घनिष्ठ नात्याचा उपयोग केला. जॅस्मीन नावाची एक बहीण म्हणते: “तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजता तेव्हा त्याच्यासोबत तुमचं आयुष्यभरासाठी एक खास नातं जोडलं जातं.” अनेक स्त्रियांना आपल्या बाळाबद्दल अगदी असंच वाटतं.
२. यहोवाचं एक जरी मूल त्याच्यापासून दूर गेलं तर त्याला कसं वाटतं?
२ यहोवाचं एक जरी मूल सभांना आणि प्रचाराला जायचं सोडून देतं, तेव्हा त्याला त्याची काळजी वाटू लागते. तर मग, त्याचे हजारो सेवक दरवर्षी अक्रियाशील * होतात, तेव्हा त्याला किती वाईट वाटत असेल याचा जरा विचार करा!
३. अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींबद्दल यहोवाची काय इच्छा आहे?
३ अक्रियाशील झालेले आपले अनेक प्रिय भाऊबहीण मंडळीत परत येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो! त्यांनी परत यावं अशी यहोवाची इच्छा आहे आणि आपलीही तीच इच्छा आहे. (१ पेत्र २:२५) या भाऊबहिणींना यहोवाकडे परत येण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपण हे माहीत करून घेणं गरजेचं आहे, की हे भाऊबहीण सभांना आणि प्रचारकार्याला यायचं का सोडून देतात?
काही जण यहोवाची सेवा करायचं का सोडून देतात?
४. नोकरी-व्यवसायाचा काहींवर काय परिणाम होऊ शकतो?
४ काही जण आपल्या नोकरी-व्यवसायात पार गुंतून जातात. दक्षिणपूर्व * नावाचा बांधव म्हणतो: “मी माझा बहुतेक वेळ आणि ताकद कामामागेच खर्च करायचो. मला असं वाटायचं, की माझ्याकडे जर जास्त पैसा असेल तर मी यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन. पण माझा हा विचार अगदीच चुकीचा होता. मी जास्त वेळ काम करू लागलो. मग हळूहळू मी सभा चुकवू लागलो, आणि शेवटी मी सभांना जायचंच बंद केलं. खरंच, सैतान या जगाचा वापर आपलं लक्ष विचलित करण्यासाठी करतो आणि हळूहळू आपण यहोवापासून दूर जातो.”
आशियात राहणारा हॅन५. अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे एका बहिणीच्या बाबतीत काय घडलं?
५ काही भाऊबहिणींना इतक्या समस्या असतात, की ते निराश होऊन जातात. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ॲन नावाच्या बहिणीला पाच मुलं आहेत. ती म्हणते: “माझा सगळ्यात लहान मुलगा जन्मापासूनच अपंग आहे. काही काळाने, माझी एक मुलगी बहिष्कृत झाली, आणि माझ्या एका मुलाला मानसिक आजार झाला. मी इतकी निराश झाले, की मी सभांना आणि प्रचाराला जायचं सोडून दिलं. शेवटी मी अक्रियाशील झाले.” ॲन आणि तिच्या कुटुंबासारखंच जगभरातल्या कितीतरी भाऊबहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आणि या गोष्टीचं आपल्याला खूप वाईट वाटतं.
६. कलस्सैकर ३:१३ यात दिलेला सल्ला लागू न केल्यामुळे एखादी व्यक्ती यहोवाच्या लोकांपासून दूर कशी जाऊ शकते?
६ कलस्सैकर ३:१३ वाचा. यहोवाचे काही सेवक मंडळीतल्या एखाद्या भावामुळे किंवा बहिणीमुळे दुखावले गेले आहेत. आणि यामुळे कदाचित ते यहोवापासून दूर गेले असतील. प्रेषित पौलने म्हटलं, की आपल्याला काही वेळा एखाद्या भावाविरुद्ध किंवा बहिणीविरुद्ध “तक्रार” असण्याचं काही रास्त कारण असू शकतं. किंवा आपल्यासोबत कदाचित अन्यायही झाला असेल. पण आपण जर सावध राहिलो नाही, तर आपण मनात राग बाळगू आणि हळूहळू यहोवाच्या लोकांपासून दूर जाऊ. दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या पाब्लो नावाच्या बांधवासोबत काहीसं असंच घडलं. त्यांच्यावर चुकीचं काम करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला; आणि यामुळे मंडळीतल्या त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. असं घडलं तेव्हा पाब्लो यांनी काय केलं? ते म्हणतात: “मला राग आला, आणि हळूहळू मी मंडळीपासून दूर गेलो.”
७. दोषीपणाच्या भावनेमुळे एखाद्या व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो?
७ एखाद्याने जर पूर्वी गंभीर पाप केलं असेल, तर बऱ्याच काळापर्यंत त्याचं मन कदाचित त्याला खात असेल. यहोवाचं आता आपल्यावर प्रेम नाही असंही कदाचित त्याला वाटेल. आपण केलेल्या गंभीर पापाबद्दल त्याने पश्चात्ताप केला असेल आणि त्याला क्षमाही करण्यात आली असेल. पण तरीसुद्धा त्याला असं वाटत असेल, की आपण देवाच्या लोकांमध्ये राहण्याच्या लायकीचे नाही. फ्रान्सिस्को नावाच्या एका बांधवाला अगदी असंच वाटलं. तो म्हणतो: “अनैतिक लैंगिक कृत्य केल्याबद्दल मला ताडन देण्यात आलं. पण नंतर मंडळीत माझा पुन्हा स्वीकार करण्यात आला. सुरुवातीला जरी मी सभांना जात असलो, तरी मी निराश होतो. यहोवाच्या लोकांमध्ये राहण्याची माझी लायकी नाही असं मला वाटू लागलं. माझा विवेक अजूनही मला बोचत होता. मला वाटत होतं, की यहोवाने मला क्षमा केली नाही. काही काळाने मी सभांना जायचं आणि प्रचार करायचं सोडून दिलं.” अशा भाऊबहिणींबद्दल तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही त्यांचं दुःख समजू शकता का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाला त्यांच्याबद्दल कसं वाटतं?
यहोवाचं त्याच्या मेंढरांवर प्रेम आहे
८. जे पूर्वी यहोवाची सेवा करायचे त्यांना तो कधी विसरतो का? स्पष्ट करा.
८ जे लोक पूर्वी यहोवाची सेवा करायचे, पण काही काळापासून त्यांनी यहोवाच्या लोकांसोबत संगती करायचं सोडून दिलं आहे अशांना यहोवा कधीच विसरत नाही. तसंच, त्यांनी केलेली सेवाही तो विसरत नाही. (इब्री ६:१०) यहोवा आपल्या लोकांची कशी काळजी घेतो हे समजण्यासाठी यशया संदेष्ट्याने एका सुंदर उदाहरणाचा वापर केला. यशयाने म्हटलं: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांस संभाळून नेईल.” (यश. ४०:११) महान मेंढपाळ यहोवा याच्या कळपातून एखादं मेंढरू भरकटतं तेव्हा त्याला कसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर येशूने आपल्या शिष्यांना जे म्हटलं त्यावरून मिळतं. त्याने म्हटलं: “तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं, तर तो नव्याण्णव मेंढरांना तसंच डोंगरावर सोडून त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का? आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल.”—मत्त. १८:१२, १३.
९. चांगले मेंढपाळ आपल्या मेंढरांची कशी काळजी घेतात? (मुखपृष्ठावरचं चित्रं पाहा.)
९ यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी का करता येईल? कारण एका चांगल्या मेंढपाळाला त्याच्या मेंढरांची खूप काळजी असते. उदाहरणार्थ, दावीद आपल्या कळपाचं संरक्षण करण्यासाठी एकदा एका सिंहाशी आणि एकदा एका अस्वलाशी लढला. (१ शमु. १७:३४, ३५) आपल्या कळपातलं एक जरी मेंढरू कमी असल्याचं दिसलं तर एका चांगल्या मेंढपाळाच्या ते लगेच लक्षात येतं. (योहा. १०:३, १४) अशा प्रकारचा मेंढपाळ त्याच्या नव्याण्णव मेंढरांना मेंढवाड्यात सुरक्षित ठेवून किंवा इतर मेंढपाळांवर त्यांची जबाबदारी सोपवून आपल्या हरवलेल्या मेंढराला शोधायला जाईल. या उदाहरणाचा वापर करून येशूने आपल्या पित्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा शिकवला. तो म्हणजे: “या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी माझ्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.”—मत्त. १८:१४.
यहोवा त्याच्या मेंढराला शोधतो
१०. यहेज्केल ३४:११-१६ या वचनांनुसार यहोवाने आपल्या हरवलेल्या मेंढरासाठी काय करायचं अभिवचन दिलं आहे?
१० यहोवाचं आपल्या कळपातल्या प्रत्येक मेंढरावर प्रेम आहे; कळपापासून भरकटलेल्या अगदी लहान मेंढरावरसुद्धा त्याचं प्रेम आहे. यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देवाने हे वचन दिलं, की तो त्याच्या हरवलेल्या मेंढराला शोधून काढेल आणि त्याला पुन्हा आपल्यासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत करेल. तसंच, त्याला वाचवण्यासाठी तो कोणती पावलं उचलेल हेही त्याने सांगितलं. एक इस्राएली मेंढपाळ आपल्या हरवलेल्या मेंढराला कळपात परत आणण्यासाठी हेच करायचा. (यहेज्केल ३४:११-१६ वाचा. *) सर्वात आधी तो आपल्या हरवलेल्या मेंढराला शोधून काढायचा; आणि यासाठी त्याला बराच वेळ द्यावा लागायचा आणि मेहनत घ्यावी लागायची. मग, हरवलेलं मेंढरू सापडल्यावर तो त्याला कळपात घेऊन यायचा. पण एवढ्यावरच त्याचं काम थांबायचं का? नाही. मेंढरू जर जखमी झालं असेल किंवा उपाशी असेल तर मेंढपाळ त्या कमजोर मेंढराची प्रेमळपणे काळजी घ्यायचा. त्याच्या जखमांची मलमपट्टी करायचा, त्याला उचलून घ्यायचा आणि त्याला भरवायचाही. ख्रिस्ती वडील “देवाच्या कळपाचे” मेंढपाळ आहेत. त्यामुळे मंडळीपासून भरकटलेल्या यहोवाच्या सेवकांना मदत करण्यासाठी ते हीच पावलं उचलतात. (१ पेत्र ५:२, ३) ते त्यांचा शोध घेतात, त्यांना मंडळीत परत येण्यासाठी मदत करतात आणि यहोवासोबत पुन्हा नातं जोडायला त्यांना प्रेमळपणे मदत करतात. *
११. एका चांगल्या मेंढपाळाला काय माहीत असतं?
११ एखादं मेंढरू कळपापासून भरकटू शकतं हे एका चांगल्या मेंढपाळाला माहीत असतं. म्हणून, जेव्हा एखादं मेंढरू कळपापासून दूर जातं तेव्हा मेंढपाळ त्याच्याशी कठोरपणे वागत नाही. देवाचे काही सेवक थोड्या काळासाठी त्याच्यापासून भरकटले, तेव्हा त्याने त्यांना कशी मदत केली यावर आता आपण चर्चा करू या.
१२. यहोवा योनाशी कसा वागला?
१२ यहोवाने योना संदेष्ट्याला निनवेला जायला सांगितलं तेव्हा त्याने त्याचं ऐकलं नाही. पण म्हणून योना काहीच कामाचा नाही असं यहोवाने लगेच त्याच्याबद्दल मत बनवलं नाही. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे यहोवाने त्याचा जीव वाचवला आणि त्याला आपली नेमणूक पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकदही दिली. (योना २:७; ३:१, २) नंतर, प्रत्येक माणसाचा जीव किती मोलाचा आहे हे योनाला समजावण्यासाठी यहोवाने भोपळ्याच्या वेलाचा वापर केला. (योना ४:१०, ११) यातून काय शिकायला मिळतं? अक्रियाशील झालेल्यांबद्दल वडील लगेच हार मानत नाहीत. याउलट, एखादं मेंढरू कळपापासून का भरकटलं हे समजून घेण्याचा वडील प्रयत्न करतात. आणि ते जेव्हा परत यहोवाकडे येतं तेव्हा वडील त्याच्याशी प्रेमळपणे वागतात आणि त्याची काळजी घेतात.
१३. स्तोत्र ७३ च्या लेखकाशी यहोवा जसा वागला त्यावरून आपल्याला काय शिकता येईल?
१३ स्तोत्र ७३ च्या लेखकाने जेव्हा पाहिलं, की दुष्टांची भरभराट होत आहे तेव्हा तो निराश झाला. यहोवाची सेवा करण्याचा काही फायदा आहे का असा प्रश्नही त्याच्या मनात आला. (स्तो. ७३:१२, १३, १६) यावर यहोवाने काय प्रतिक्रिया दिली? तो त्याच्यावर रागावला नाही; उलट त्याने त्याचे शब्द बायबलमध्ये लिहून ठेवले. शेवटी त्या स्तोत्रकर्त्याच्या लक्षात आलं, की जीवनात सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे यहोवासोबतची आपली मैत्री. (स्तो. ७३:२३, २४, २६, २८) यातून वडील काय शिकू शकतात? यहोवाची सेवा करण्याचे काही फायदे आहेत का, असं जर एखाद्याला वाटत असेल तर वडिलांनी त्याच्याबद्दल लगेच चुकीचं मत बनवू नये. त्याला दोषी ठरवण्याऐवजी तो असं का बोलतो किंवा वागतो हे वडिलांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे समजून घेतल्यामुळे वडिलांना त्याला बायबलमधून अशी वचनं दाखवता येतील ज्यांमुळे त्याला प्रोत्साहन मिळेल.
१४. एलीया संदेष्ट्याला मदतीची गरज का होती, आणि यहोवाने ती कशी पुरवली?
१४ एलीया संदेष्ट्याचा विचार करा. आपला जीव वाचवण्यासाठी तो ईजबेल राणीपासून पळ काढत होता. (१ राजे १९:१-३) त्याला असं वाटत होतं, की आपल्याशिवाय आता देवाचा कोणताही संदेष्टा उरलेला नाही, आणि आपल्या सेवेचा काहीच फायदा नाही. एलीया इतका निराश झाला, की त्याला त्याचा जीव नकोसा झाला. (१ राजे १९:४, १०) पण यामुळे यहोवा त्याच्यावर रागावला नाही. उलट यहोवाने त्याला याचं आश्वासन दिलं, की तो एकटा नाही. तसंच, यहोवाने त्याला सामर्थ्य देण्याचं आणि आणखी बरंच काम करण्यासाठी त्याचा वापर करण्याचंही आश्वासन दिलं. शिवाय, एलीयाला ज्या गोष्टींची चिंता वाटत होती त्या गोष्टी यहोवाने प्रेमळपणे ऐकून घेतल्या आणि त्याला नवीन नेमणुकाही दिल्या. (१ राजे १९:११-१६, १८) यातून आपण काय शिकू शकतो? आपण सर्वांनीच, खासकरून वडिलांनी यहोवाच्या मेंढरांशी प्रेमळपणे वागलं पाहिजे. आपल्या मनात खूप राग आहे किंवा यहोवा आपल्याला कधीच क्षमा करणार नाही, असं एखादी व्यक्ती वडिलांना सांगते तेव्हा त्यांनी तिचं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. तसंच, यहोवासाठी ती खूप मौल्यवान आहे या गोष्टीचंही त्यांनी तिला आश्वासन दिलं पाहिजे.
देवाच्या हरवलेल्या मेंढराबद्दल आपल्याला कसं वाटलं पाहिजे?
१५. योहान ६:३९ या वचनानुसार येशूला आपल्या पित्याच्या मेंढरांबद्दल कसं वाटत होतं?
१५ यहोवाच्या एखाद्या हरवलेल्या मेंढराबद्दल आपल्याला कसं वाटलं पाहिजे? या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणातून शिकू शकतो. यहोवाची सगळीच मेंढरं त्याच्यासाठी मौल्यवान आहेत हे येशूला माहीत होतं. त्यामुळे ‘इस्राएलच्या घराणातल्या हरवलेल्या मेंढरांना’ परत आणण्यासाठी येशूने पुरेपूर प्रयत्न केला. (मत्त. १५:२४; लूक १९:९, १०) तसंच, एक चांगला मेंढपाळ या नात्याने यहोवाचं एकही मेंढरू हरवू नये याचीही त्याने पुरेपूर काळजी घेतली.—योहान ६:३९ वाचा.
१६-१७. यहोवापासून दूर गेलेल्यांबद्दल वडिलांना कसं वाटलं पाहिजे? (“ एका हरवलेल्या मेंढराला कसं वाटतं?” ही चौकट पाहा.)
१६ प्रेषित पौलने इफिस मंडळीतल्या वडिलांना येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचं प्रोत्साहन दिलं. त्याने त्यांना म्हटलं: “तुम्हीही अशा प्रकारे कष्ट करून दुर्बलांना मदत करावी आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावे की, ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’” (प्रे. कार्ये २०:१७, ३५) यावरून दिसून येतं, की यहोवाच्या लोकांची काळजी घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वडिलांवर आहे. स्पेनमध्ये राहणारे साल्वडोर नावाचे बांधव म्हणतात, “यहोवाला आपल्या हरवलेल्या मेंढरांची किती काळजी आहे यावर विचार केल्यामुळे मलाही त्यांना मदत करावीशी वाटते. आणि नक्कीच यहोवाचीसुद्धा हीच इच्छा असेल, की मी त्यांची काळजी घ्यावी.”
१७ या लेखात उल्लेख केलेले देवाचे काही सेवक थोड्या काळासाठी त्याच्यापासून दूर गेले. पण त्यांना यहोवाकडे परत येण्यासाठी मदत मिळाली. आजसुद्धा असे अनेक भाऊबहीण आहेत ज्यांना यहोवाकडे परत येण्याची इच्छा आहे. मग अशा भाऊबहिणींना त्याच्याकडे परत यायला आपण कशी मदत करू शकतो? याबद्दल पुढच्या लेखात चर्चा केली जाईल.
गीत ५५ चिरकालाचे जीवन!
^ परि. 5 यहोवाची अनेक वर्षं विश्वासूपणे सेवा केलेले काही जण मंडळीपासून दूर का गेले आहेत? अशा सेवकांबद्दल देवाला कसं वाटतं? या प्रश्नांची उत्तरं या लेखात दिली आहेत. तसंच, प्राचीन काळात देवाचे काही सेवक थोड्या काळासाठी त्याच्यापासून दूर गेले, तेव्हा देवाने त्यांना कशा प्रकारे मदत केली, आणि त्यावरून आपण काय शिकू शकतो याबद्दलही या लेखात आपण चर्चा करणार आहोत.
^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: एक व्यक्ती सहा महिने किंवा त्याहून जास्त काळ मंडळीसोबत प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभाग घेत नसेल, तर तिला अक्रियाशील प्रचारक म्हटलं जातं. पण असे प्रचारक अक्रियाशील असले, तरी ते अजूनही आपले भाऊबहीण आहेत आणि त्यांच्यावर आपलं प्रेम आहे.
^ परि. 4 काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 10 यहेज्केल ३४:११-१६ (NW): “११ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “पाहा, मी जिवंत आहे! मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन. मी स्वतः त्यांची काळजी घेईन. १२ आपली विखुरलेली मेंढरं परत सापडल्यावर एखादा मेंढपाळ जसं त्यांना खाऊ-पिऊ घालतो, तसं मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. काळ्या ढगांच्या आणि अंधाराच्या दिवशी जिथे कुठे माझी मेंढरं विखुरली गेली होती, त्या सगळ्या ठिकाणांहून मी त्यांना परत आणीन. १३ मी सर्व राष्ट्रांमधून त्यांना बाहेर आणीन. मी त्यांना सगळ्या देशांमधून गोळा करून त्यांच्या स्वतःच्या देशात घेऊन येईन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांजवळ आणि लोकवस्ती असलेल्या ठिकाणी चारीन. १४ मी त्यांना उत्तम कुरणांत चारीन; इस्राएलच्या उंच-उंच डोंगरांवर त्यांची चरण्याची ठिकाणं असतील. तिथे ती हिरव्यागार मैदानात विसावा घेतील आणि इस्राएलच्या उंच डोंगरांवर, लुशलुशीत गवत असलेल्या कुरणांत चरतील.” १५ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी स्वतः माझ्या मेंढरांना चारीन आणि मी स्वतः त्यांना विसावा देईन. १६ मी हरवलेल्या मेंढराला शोधून काढीन आणि भरकटलेल्या मेंढराला परत घेऊन येईन. मी जखमी झालेल्या मेंढराची मलमपट्टी करीन आणि कमजोराला बळ देईन. पण, धष्टपुष्ट आणि ताकदवान असलेल्याचा मी नाश करीन. त्याचा न्याय करून मी त्याला योग्य शिक्षा देईन.”
^ परि. 10 मंडळीतले वडील ही तीन पावलं कशी उचलू शकतात याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.
^ परि. 61 चित्रांचं वर्णन: एका इस्राएली मेंढपाळाला आपल्या हरवलेल्या मेंढराची फार काळजी असायची. तो त्याला शोधून काढायचा आणि परत कळपात घेऊन यायचा. मेंढपाळासारखे असलेले मंडळीतले वडील आज हेच करतात.
^ परि. 65 चित्रांचं वर्णन: अक्रियाशील झालेली एक बहीण बसमध्ये बसली आहे, आणि ती पाहते की दोन साक्षीदार आनंदाने सार्वजनिक साक्षकार्य करत आहेत.