अभ्यास लेख २७
गीत ७३ आम्हाला धैर्य दे!
सादोकसारखं धाडसी बना!
“[सादोक] तरुण असून शूर आणि धाडसी होता.”—१ इति. १२:२८.
या लेखात:
सादोकच्या उदाहरणामुळे आपल्याला धाडसी बनायला कशी मदत होऊ शकते, ते पाहा.
१-२. सादोक कोण होता? (१ इतिहास १२:२२, २६-२८)
कल्पना करा: दावीदला संपूर्ण इस्राएलवर राजा बनवण्यासाठी ३,४०,००० पेक्षा जास्त माणसं हेब्रोनजवळ जमली आहेत. ती माणसं तीन दिवसांपासून तिथल्या डोंगराळ भागात राहत आहेत. ते हसत आहेत, बोलत आहेत, यहोवाच्या स्तुतीत गाणी गात आहेत. (१ इति. १२:३९) त्या जमावात सादोक नावाचा एक तरुण माणूससुद्धा आहे. एवढ्या लोकांमध्ये कदाचित कोणाचंच त्याच्याकडे लक्ष गेलं नसावं. पण यहोवाचं त्याच्याकडे लक्ष होतं आणि त्याची इच्छा आहे की आपणही सादोकबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्याकडून शिकावं. (१ इतिहास १२:२२, २६-२८ वाचा.) पण हा सादोक कोण होता?
२ सादोक एक याजक होता आणि त्याने महायाजक अब्याथारसोबत काम केलं होतं. तो एक द्रष्टा होता. म्हणजे देवाने त्याला त्याची इच्छा जाणून घ्यायची क्षमता आणि बुद्धीही दिली होती. (२ शमु. १५:२७) लोकांना जेव्हा एक चांगला सल्ला हवा असायचा तेव्हा ते सादोककडे यायचे. तो एक धाडसी माणूस होता. त्याच्या याच गुणावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
३. (क) यहोवाच्या सेवकांना धाडस दाखवायची गरज का आहे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ या शेवटच्या दिवसांत, सैतान देवाच्या लोकांवर आणखी जास्त हल्ले करत आहे. (१ पेत्र ५:८) यहोवा जोपर्यंत सैतानाचा आणि या दुष्ट व्यवस्थेचा नाश करत नाही, तोपर्यंत आपल्याला वाट पाहत धाडस दाखवायची गरज आहे. (स्तो. ३१:२४) आपण सादोकच्या धाडसाचं अनुकरण कसं करू शकतो याचे आता तीन मार्ग पाहू या.
देवाच्या राज्याला पाठिंबा द्या
४. देवाच्या राज्याला मनापासून पाठिंबा देण्यासाठी देवाच्या लोकांना धैर्याची गरज का आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
४ यहोवाचे लोक म्हणून आपण देवाच्या राज्याला मनापासून पाठिंबा देतो. पण असं करण्यासाठी सहसा आपल्याला धैर्याची गरज असते. (मत्त. ६:३३) उदाहरणार्थ, या दुष्ट जगात देवाच्या स्तरांप्रमाणे जगायला आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला आपल्याला धैर्य लागतं. (१ थेस्सलनी. २:२) आणि राजकीय दृष्टीने फुटी पडत चाललेल्या या जगात तटस्थ राहण्यासाठी आपल्याला सहसा हिंमतीची गरज असते. (योहा. १८:३६) त्यामुळे यहोवाच्या लोकांपैकी बऱ्याच जणांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यांना शारीरिक शोषण सहन करावं लागलंय. तसंच, राजकारणात किंवा सैन्यात भाग घ्यायला नकार दिल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलंय.
५. दावीदला पाठिंबा देण्यासाठी सादोकला धैर्याची गरज का होती?
५ दावीद राजा बनल्याचा आनंद साजरा करण्यासाठीच सादोक हेब्रोनला गेला नव्हता, तर तो तिथे शस्त्रं घेऊन गेला होता आणि युद्धाच्या तयारीत होता. (१ इति. १२:३८) दावीदच्या पाठोपाठ युद्धात जायला तो तयार होता. आणि इस्राएल राष्ट्राचं शत्रूंपासून रक्षण करायलाही तो तयार होता. सादोककडे युद्धाचा काहीच अनुभव नव्हता कारण तो एक याजक होता. पण त्याच्या धैर्याने त्याची ही कमी भरून काढली.
६. दावीदने सादोकसमोर धैर्याचं एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (स्तोत्र १३८:३)
६ सादोकसारख्या याजकाला कशामुळे धैर्य दाखवता आलं? त्याच्यासोबत काही ताकदवान आणि धाडसी माणसं होती. त्यांच्या उदाहरणामुळे त्याला नक्कीच फायदा झाला असेल. उदाहरणार्थ, “युद्धाच्या मोहिमांमध्ये” दावीदने धाडसाने इस्राएलचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे संपूर्ण इस्राएलने अगदी मनापासून त्याला पाठिंबा दिला. (१ इति. ११:१, २) आपल्या शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी दावीद नेहमी यहोवावर विसंबून होता. (स्तो. २८:७; स्तोत्र १३८:३ वाचा.) याशिवाय, यहोयादा, त्याचा मुलगा बनाया (एक धाडसी योद्धा) आणि दावीदच्या बाजूने असलेले इतर वंशांचे २२ प्रमुख यांचंही उदाहरण सादोकसमोर होतं. (१ इति. ११:२२-२५; १२:२६-२८) या सगळ्यांनी दावीदला आपला राजा बनवायचा आणि त्याला सुरक्षित ठेवायचा निश्चय केला होता.
७. (क) अलीकडच्या काळातले तरुण भाऊ धैर्य कसं दाखवत आहेत? (ख) व्हिडिओत दाखवलेल्या एनसिलू नावाच्या भावाकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
७ यहोवाच्या राज्याला धैर्याने पाठिंबा देणाऱ्यांच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे आपल्याला ताकद आणि धैर्य मिळतं. सैतानाच्या राजकीय व्यवस्थेत सामील होण्याच्या दबावाला आपला राजा येशू ख्रिस्ताने ठामपणे नकार दिला. (मत्त. ४:८-११; योहा. ६:१४, १५) योग्य ते करायला लागणाऱ्या ताकदीसाठी तो नेहमी यहोवावर अवलंबून राहिला. आपल्यासमोर अलीकडच्या काळातल्या तरुण भावांचीसुद्धा बरीच उदाहरणं आहेत. त्यांनी सैन्यात किंवा राजकीय कार्यात भाग घ्यायला साफ नकार दिला. jw.org वर असलेली त्यांची उदाहरणं वाचायचं प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो. a
भावांना मदत करा
८. वडिलांना धाडस दाखवायची गरज केव्हा पडू शकते?
८ यहोवाच्या लोकांना एकमेकांना मदत करायला आवडतं. (२ करिंथ. ८:४) पण असं करताना कधीकधी धैर्य दाखवावं लागतं. जसं की, जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा भाऊबहिणींना प्रोत्साहनाची, आधाराची आणि कदाचित आध्यात्मिक किंवा जीवनावश्यक गोष्टींची गरज पडू शकते, हे स्थानिक वडिलांना माहीत असतं. म्हणून ते मेंढरांवर असलेल्या प्रेमामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवतात. (योहा. १५:१२, १३) हे भाऊ सादोकच्या धाडसी उदाहरणाचं अनुकरण करत असतात.
९. २ शमुवेल १५:२७-२९ प्रमाणे दावीदने सादोकला काय करायला सांगितलं? (चित्रसुद्धा पाहा.)
९ दावीदचा जीव धोक्यात होता. त्याचा मुलगा अबशालोम याने त्याचं राज्य बळकावण्याच्या निश्चय केला होता. (२ शमु. १५:१२, १३) त्यामुळे दावीदला ताबडतोब यरुशलेम सोडून जावं लागलं. त्याने त्याच्या सेवकांना सांगितलं: “चला, आपण इथून पळून जाऊ. नाहीतर आपल्यापैकी कोणीही अबशालोमच्या हातून सुटणार नाही!” (२ शमु. १५:१४) त्याचे सेवक तिथून निघत असताना दावीदच्या लक्षात आलं, की अबशालोमच्या कटाबद्दल माहिती द्यायला शहरात कोणीतरी थांबायला हवं. म्हणून तो सादोक आणि इतर याजकांना हेर म्हणून पुन्हा शहरात पाठवतो. (२ शमुवेल १५:२७-२९ वाचा.) या लोकांना खूप सावध असण्याची गरज होती. कारण दावीदने त्या याजकांना जे करायला सांगितलं होतं, ते खूप धोक्याचं होतं. त्या कामात त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकत होता. विचार करा, अहंकारी, बदला घेण्याची वृत्ती असणाऱ्या विश्वासघातकी अबशालोमला जर हे कळलं असतं, की दावीदचं रक्षण करण्यासाठी सादोक आणि इतर याजक त्याच्यावर पाळत ठेवून आहेत, तर त्याने काय केलं असतं!
१०. सादोक आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी दावीदचा जीव कसा वाचवला?
१० दावीदने एक योजना केली. या योजनेत सादोक आणि दावीदचा आणखी एक विश्वासू मित्र हूशयसुद्धा होता. (२ शमु. १५:३२-३७) या योजनेप्रमाणे हूशयने अबशालोमचा विश्वास जिंकला आणि दावीदला हल्ल्यासाठी वेळ मिळेल अशी एक रणनीती अबशालोमला सुचवली. नंतर हूशयने सादोक आणि अब्याथारला याबद्दल सांगितलं. (२ शमु. १७:८-१६) मग या दोघांनी दावीदला याबद्दल संदेश पाठवला. (२ शमु. १७:१७) अशा प्रकारे यहोवाच्या मदतीने सादोक आणि इतर याजकांनी दावीदचा जीव वाचवण्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली.—२ शमु. १७:२१, २२.
११. भाऊबहिणींना मदत करताना आपण सादोकच्या धैर्याचं अनुकरण कसं करू शकतो?
११ धोकेदायक परिस्थितीत आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी जर आपल्याला सांगण्यात आलं, तर सादोकसारखं धैर्य दाखवायला आपण काय करू शकतो? (१) सूचनांचं पालन करा. स्थानिक शाखा कार्यालयाकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करा. कारण अशा परिस्थितीत सूचनांचं पालन करून एकता टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. (इब्री १३:१७) शिवाय, मंडळीतल्या वडिलांनी विपत्तीसाठी तयार राहायला स्थानिक योजना काय आहेत याबद्दल आणि विपत्ती आली तर संघटनेकडून काही सूचना आहेत का, याबद्दल नेहमी माहिती घेतली पाहिजे. (१ करिंथ. १४:३३, ४०) (२) धैर्य दाखवा पण सावध राहा. (नीति. २२:३) कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार करा आणि अनावश्यक धोके टाळा. (३) यहोवावर विसंबून राहा. हे लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची आणि तुमच्यासोबतच इतर भावांचीसुद्धा काळजी आहे. त्यामुळे सुरक्षित राहून भाऊबहिणींना कशी मदत करता येईल, यासाठी तो तुम्हाला साहाय्य करू शकतो.
१२-१३. व्हिक्टर आणि विटाली यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)
१२ युक्रेनमध्ये आपल्या भाऊबहिणींना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवणाऱ्या व्हिक्टर आणि विटाली या दोन भावांच्या अनुभवाचा विचार करा. व्हिक्टर म्हणतात: “आम्ही सगळीकडे खाण्या-पिण्याच्या वस्तू शोधल्या आणि हे करत असताना आमच्या आजूबाजूला गोळीबार होत होता. एका भावाने आम्हाला त्याच्या दुकानातून खाण्या-पिण्याच्या गोष्टी दिल्या. त्याने दिलेल्या या दानामुळे काही दिवसांसाठी बऱ्याच भाऊबहिणींच्या गरजा भागणार होत्या. पण गाडीत हे सगळं सामान ठेवत असताना आमच्यापासून जवळजवळ ६० फुटावर एक बॉम्ब पडला. म्हणून दिवसभर आम्ही यहोवाला हीच प्रार्थना करत होतो, की आमच्या भाऊबहिणींना मदत करत राहण्यासाठी लागणारं धैर्य त्याने आम्हाला द्यावं.”
१३ विटाली म्हणतात: “हे सगळं करण्यासाठी आम्हाला खूप धैर्य लागलं. मी पहिल्यांदा भाऊबहिणींना खाण्यापिण्याच्या गोष्टी पुरवायला बाहेर पडलो तेव्हा मला १२ तास लागले. माझ्या संपूर्ण प्रवासात मी यहोवाला प्रार्थना करत होतो.” विटाली धाडसी होते, पण त्यासोबतच ते सावधसुद्धा होते. ते म्हणतात: “मी सतत यहोवाकडे बुद्धीसाठी आणि नेहमी त्याच्यावर विसंबून राहता यावं म्हणून प्रार्थना करत होतो. मी अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या रस्त्यांवरच गाडी घेऊन गेलो. भाऊबहीण एकत्र मिळून कशा प्रकारे काम करत आहेत हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे मला खूप फायदा झाला. त्यांनी रस्त्यांवरचे अडथळे दूर केले. तसंच मदत कार्यासाठी आलेल्या गोष्टी गोळा केल्या आणि ट्रकमध्ये भरल्या. तसंच आमच्या खाण्या-पिण्याची आणि आराम करण्याची सोयसुद्धा केली.”
यहोवाला एकनिष्ठ राहा
१४. आपली जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
१४ काही संकटं अशी असतात, ज्यामुळे आपल्याला खूप दुःख होऊ शकतं. जसं की, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती किंवा जवळचा एखादा मित्र यहोवाला सोडून जातो, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. (स्तो. ७८:४०; नीति. २४:१०) त्या व्यक्तीसोबतचं आपलं नातं खूप जवळचं असल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तुम्हाला जर असा वाईट अनुभव आला असेल, तर सादोकने दाखवलेल्या एकनिष्ठेच्या उदाहरणामुळे तुम्हाला बळ मिळू शकतं.
१५. यहोवाला एकनिष्ठ राहायला सादोकला धैर्याची गरज का होती? (१ राजे १:५-८)
१५ दावीदच्या शासनाच्या शेवटी सादोकच्या एका जवळच्या मित्राने म्हणजे अब्याथारने विश्वासघात केला, तेव्हासुद्धा सादोक यहोवाला विश्वासू राहिला. दावीद अंथरुणाला खिळला होता, तेव्हा यहोवाने शलमोनला जे राजासन द्यायचं वचन दिलं होतं ते बळकावण्याचा, दावीदचा मुलगा अदोनीया प्रयत्न करत होता. (१ इति. २२:९, १०) अब्याथारने अदोनीयाला साथ द्यायचं निवडलं. (१ राजे १:५-८ वाचा.) असं केल्यामुळे अब्याथार फक्त दावीदचाच नाही, तर यहोवाचासुद्धा विश्वासघात करत होता. पण हे सगळं बघून सादोकला किती वाईट वाटलं असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्याने आणि अब्याथारने याजक म्हणून जवळजवळ चार दशकं सोबत मिळून काम केलं होतं. (२ शमु. ८:१७) तसंच त्यांनी “खऱ्या देवाच्या कराराची पेटी” सोबत मिळून सांभाळली होती. (२ शमु. १५:२९) सुरुवातीला या दोघांनीही दावीदच्या राज्याला पाठिंबा दिला होता आणि यहोवाच्या सेवेत अशी बरीच कामं केली होती.—२ शमु. १९:११-१४.
१६. कोणत्या गोष्टीमुळे सादोकला एकनिष्ठ राहायला मदत झाली असेल?
१६ अब्याथारने विश्वासघात केला असला तरी सादोक मात्र यहोवाला एकनिष्ठ होता. दावीदने त्याच्या एकनिष्ठेवर कधीच शंका घेतली नाही. अदोनियाचा कट जेव्हा उघड झाला तेव्हा राजा म्हणून शलमोनचा अभिषेक करण्यासाठी दावीदने सादोक, नाथान आणि बनायावर भरवसा ठेवला. (१ राजे १:३२-३४) नाथान आणि दावीदला साथ देणाऱ्यांसारख्या यहोवाच्या विश्वासू लोकांसोबत राहिल्यामुळे सादोकला नक्कीच बळ आणि प्रोत्साहन मिळालं असेल. (१ राजे १:३८, ३९) म्हणून शलमोन जेव्हा राजा बनला तेव्हा त्याने “अब्याथारच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमलं.”—१ राजे २:३५.
१७. तुमची जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा तुम्ही सादोकचं अनुकरण कसं करू शकता?
१७ तुम्ही सादोकचं अनुकरण कसं करू शकता? जेव्हा तुमची जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा तुम्ही यहोवाला एकनिष्ठ आहात हे दाखवा. (यहो. २४:१५) त्यामुळे यहोवा तुम्हाला लागणारं बळ आणि धैर्य देईल. म्हणून प्रार्थना करून त्याच्यावर विसंबून राहा आणि त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या जवळ राहा. तुमच्या एकनिष्ठतेची यहोवा कदर करतो आणि तो त्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रतिफळ देईल.—२ शमु. २२:२६.
१८. मार्को आणि सिडसेच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१८ मार्को आणि त्यांची पत्नी सिडसेच्या उदाहरणावर विचार करा. त्यांच्या दोन्हीही मुली सत्य सोडून गेल्या. मार्को म्हणतात: “आपलं आपल्या मुलांवर अगदी जन्मल्यापासून प्रेम असतं. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. त्यामुळे ती जेव्हा यहोवाला सोडून देतात, तेव्हा आपण एकदम खचून जातो.” ते पुढे म्हणतात: “पण यहोवा आमच्या पाठीशी होता. त्याने आम्हाला एकमेकांचा वापर करून खूप सांभाळलं. कारण मी जेव्हा हताश असतो तेव्हा सिडसे मला सावरते. आणि सिडसे जेव्हा हताश असते तेव्हा मी तिला धीर देतो.” सिडसे म्हणते: “आम्हाला लागणारी ताकद जर यहोवाने आम्हाला दिली नसती तर आम्ही यातून सावरूच शकलो नसतो. या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःलाच दोष देत होते. म्हणून मी एकदा यहोवासमोर माझं मन मोकळं केलं. याच्या काही वेळानंतरच एक बहीण बऱ्याच वर्षांनी मला भेटायला आली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवले, माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हटली: ‘सिडसे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, यात तुझी काहीएक चूक नाही.’ खरंच, यहोवाच्या मदतीने मला त्याच्या सेवेतला आनंद टिकवून ठेवता आला.”
१९. तुम्ही काय निश्चय केलाय?
१९ यहोवाची इच्छा आहे की त्याच्या सर्व सेवकांनी सादोकसारखं धैर्य दाखवावं. (२ तीम. १:७) पण यासाठी आपण स्वतःवर नाही तर त्याच्यावर अवलंबून राहावं असं त्याला वाटतं. त्यामुळे तुम्हाला जेव्हा धैर्य दाखवायची गरज पडते तेव्हा यहोवाकडे वळा. तुम्ही याची खातरी ठेवू शकता की तो तुम्हाला सादोकसारखं धैर्य दाखवायला नक्की मदत करेल!—१ पेत्र ५:१०.
गीत १२६ जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
a खऱ्या ख्रिश्चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?—तटस्थ भूमिका घेण्यासाठी हा jw.org वरचा व्हिडिओ पाहा.