अभ्यास लेख ४
गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ
येशूच्या खंडणी बलिदानातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
“यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.”—१ योहा. ४:९.
या लेखात:
खंडणी बलिदानामुळे आपल्याला यहोवा देवाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या सुंदर गुणांबद्दल काय शिकायला मिळतं ते पाहा.
१. आपण दरवर्षी होणाऱ्या स्मारकविधीला का हजर राहिलं पाहिजे?
आपण सगळेच ही गोष्ट मान्य करू, की खंडणी बलिदान ही यहोवाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे! (२ करिंथ. ९:१५) येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिल्यामुळेच आपण यहोवा देवासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. इतकंच नाही तर त्यामुळे आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशासुद्धा मिळते. म्हणून यहोवाबद्दल आणि त्याने प्रेमाने केलेल्या खंडणीच्या तरतुदीबद्दल कदर असणं खरंच किती महत्त्वाचं आहे! (रोम. ५:८) यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे केलं ते आपण कधीच विसरू नये आणि खंडणीबद्दल आपल्या मनात नेहमी कदर राहावी म्हणूनच येशूने स्मारकविधीची सुरुवात केली.—लूक २२:१९, २०.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ या वर्षी १२ एप्रिल २०२५ ला आपण येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करणार आहोत. आपण सगळेच तिथे हजर राहायला उत्सुक आहोत. यहोवाने आणि त्याच्या मुलाने आपल्यासाठी जे केलंय त्यावर या स्मारकविधीच्या काळात मनन a केल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा होईल. म्हणूनच या लेखात आपण, खंडणी बलिदानातून आपल्याला यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करणार आहोत. तसंच, खंडणी बलिदानामुळे आपल्याला कसा फायदा होतो आणि त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो, यावर आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत.
खंडणीमुळे आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
३. एका माणसाच्या मृत्यूमुळे लाखो लोकांना पाप आणि मृत्यूपासून सुटका कशी मिळू शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
३ खंडणी बलिदानामुळे आपल्याला यहोवाच्या न्यायाबद्दल शिकायला मिळतं. (अनु. ३२:४) ते कसं? विचार करा: आदामने आज्ञा मोडल्यामुळे आपल्याला वारशाने पाप मिळालं आणि आपल्यावर मृत्यू ओढावला. (रोम. ५:१२) आपल्याला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी यहोवाने येशूच्या खंडणी बलिदानाची व्यवस्था केली. पण एका परिपूर्ण माणसाने बलिदान दिल्यामुळे लाखो लोकांची पाप आणि मृत्यूपासून सुटका कशी होणार होती? प्रेषित पौलने याबद्दल म्हटलं: “जसं एका माणसाने [आदामने] आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसंच, एकाच माणसाने [येशूने] आज्ञापालन केल्यामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवलं जाईल.” (रोम. ५:१९; १ तीम. २:६) दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, एका परिपूर्ण माणसाने आज्ञा मोडल्यामुळे आपण सगळे पापाचे आणि मृत्यूचे गुलाम बनलो. पण दुसऱ्या एका परिपूर्ण माणसाने आज्ञा पाळल्यामुळे आपल्याला पापापासून आणि मृत्यूपासून सुटका मिळू शकते.
४. आज्ञाधारक असलेल्या आदामच्या मुलांना यहोवाने असंच सर्वकाळ जगू का दिलं नाही?
४ आपल्याला वाचवण्यासाठी येशूला खरंच मरायची गरज होती का? आणि यहोवा आज्ञाधारक असलेल्या आदामच्या मुलांना असंच कायमचं जगू देऊ शकला नसता का? आपल्याला कदाचित वाटेल की, यहोवाने असं केलं असतं तर समस्या लगेच सुटली असती. पण खरंतर यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तसं करणं योग्य ठरलं नसतं. का? कारण जर त्याने खंडणीची व्यवस्था केली नसती तर असं वाटलं असतं, की आदामने कधीच गंभीर पाप केलं नाही आणि त्याची मुलंसुद्धा पापी नाहीत. पण ही गोष्ट खरी नव्हती.
५. आपण या गोष्टीची खातरी का बाळगू शकतो की यहोवा नेहमी योग्य तेच करेल?
५ पण कल्पना करा, यहोवाने न्यायाबद्दल विचार केला नसता तर? खंडणी बलिदानाची व्यवस्था न करताच त्याने आदामच्या अपरिपूर्ण मुलांना कायम जगू दिलं असतं तर? जर त्याने तसं केलं असतं तर लोकांना वाटलं असतं, की ‘देवाने जर या बाबतीत न्यायाशी तडजोड केली आहे, तर तो कदाचित इतर बाबतीतही करेल. आणि कदाचित त्याने दिलेली दुसरी अभिवचनंही तो पूर्ण करणार नाही.’ पण आपल्याला याबद्दल चिंता करायची गरज नाही. यहोवाने योग्य ते करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाचं खंडणी बलिदान दिलंय. यामुळे आपण हे ठामपणे म्हणू शकतो की यहोवा नेहमी योग्य तेच करेल.
६. खंडणी बलिदानातून यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं? (१ योहान ४:९, १०)
६ खंडणी बलिदानामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की यहोवा न्यायी आहे. पण त्यासोबतच त्याचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे हेसुद्धा आपल्याला कळतं. (योहा. ३:१६; १ योहान ४:९, १० वाचा.) खंडणीच्या शिकवणीवरून आपल्याला हेही कळतं, की आपल्याला कायमचं जीवन मिळावं असं यहोवाला वाटतं. पण त्यासोबतच आपल्याला हेसुद्धा कळतं, की आपण त्याच्या कुटुंबाचा भाग बनावं असंही त्याला वाटतं. विचार करा: जेव्हा आदामने पाप केलं तेव्हा यहोवाने त्याला आपल्या कुटुंबातून काढून टाकलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा आपण यहोवाच्या कुटुंबाचा भाग नव्हतो. पण खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणं शक्य झालं आहे. यहोवा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आज्ञाधारक लोकांना पुढे आपल्या कुटुंबाचा भाग बनवणार आहे. पण आजसुद्धा आपण यहोवा देवासोबत आणि आपल्या भाऊबहिणींसोबत एक चांगलं नातं जोडू शकतो. खरंच, यहोवाचं आपल्या सगळ्यांवर मनापासून प्रेम आहे!—रोम. ५:१०, ११.
७. येशूने खंडणी देण्यासाठी जे दुःख सहन केलं त्यावरून यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला कसं कळतं?
७ खंडणी बलिदानासाठी यहोवाला किती मोठी किंमत द्यावी लागली याचा जर आपण विचार केला, तर त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. सैतानाने असा दावा केला की जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा देवाचा कोणताही सेवक त्याला विश्वासू राहत नाही. सैतानाला खोटं ठरवायला, यहोवा देवाने येशूला दुःख सहन करून मरू दिलं. (ईयो. २:१-५; १ पेत्र २:२१) कल्पना करा, धार्मिक पुढारी येशूची थट्टा करत होते, सैनिक त्याला चाबकांनी फटके मारत होते, त्याच्या हातापायांना खिळे ठोकून त्याला वधस्तंभावर लटकवण्यात आलं. हे सगळं यहोवा पाहत होता. आपल्या प्रिय मुलाचा यातनादायक मृत्यू पाहून त्याला कसं वाटलं असेल, याचा विचार करा. (मत्त. २७:२८-३१, ३९) हे सगळं घडत असताना यहोवा ते कोणत्याही क्षणी थांबवू शकला असता. उदाहरणार्थ, विरोधक जेव्हा असं म्हणत होते की “देवाची याच्यावर मर्जी असेल, तर त्याने याला वाचवावं,” तेव्हा यहोवा खरोखरंच तसं करू शकला असता. (मत्त. २७:४२, ४३) पण त्याने तसं केलं असतं, तर खंडणी दिली गेली नसती आणि आपल्याला कोणतीच आशा मिळाली नसती. म्हणून यहोवाने आपल्या मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत दुःख सहन करू दिलं आणि त्याचा मृत्यू होऊ दिला.
८. आपल्या प्रिय मुलाला यातना सहन करताना पाहून यहोवाला दुःख झालं असेल का? समजावून सांगा. (चित्रसुद्धा पाहा.)
८ यहोवा देव सर्वशक्तिमान आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याला भावना नाहीत. आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवण्यात आलंय. म्हणजे जर आपल्यात भावना आहेत तर यहोवा देवालासुद्धा नक्कीच भावना आहेत. बायबलमध्ये असं म्हणण्यात आलंय, की “त्याचं मन दुखावलं” आणि त्याला “दुःख” देण्यात आलं. (स्तो. ७८:४०, ४१) अब्राहाम आणि इसहाकसोबत काय घडलं त्याचा विचार करा. तुम्हाला आठवत असेल की यहोवाने अब्राहामला त्याच्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान द्यायला सांगितलं होतं. (उत्प. २२:९-१२; इब्री ११:१७-१९) विचार करा, अब्राहाम इसहाकचं बलिदान देण्याची तयारी करतोय. त्या वेळी त्याच्या मनात भावनांचं किती मोठं वादळ उठलं असेल! त्याच्या मनाला किती वेदना होत असतील! जर अब्राहामला इतकं दुःख झालं, तर मग यहोवाला किती दुःख झालं असेल! कारण यहोवाने दुष्ट लोकांना आपल्या प्रिय मुलाला यातना देऊन ठार मारताना पाहिलं होतं.—jw.org वर त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा—अब्राहाम, भाग २ हा व्हिडिओ पाहा.
९. रोमकर ८:३२, ३८, ३९ या वचनांतून आपल्याला यहोवाच्या प्रेमाबद्दल काय शिकायला मिळतं?
९ खंडणी बलिदानामुळे आपल्याला शिकायला मिळतं की यहोवा आपल्यावर जितकं प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही; आपले सर्वात जवळचे नातेवाईक किंवा आपले सर्वात चांगले मित्रही. (रोमकर ८:३२, ३८, ३९ वाचा.) आपण स्वतःवर जितकं प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम यहोवा आपल्यावर करतो यातही काही शंका नाही. तुम्हाला सर्वकाळ जगायची इच्छा आहे का? खरंतर, आपल्याला सर्वकाळाचं जीवन द्यायची यहोवाला आपल्यापेक्षा जास्त इच्छा आहे. तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे का? खरंतर, आपल्याला क्षमा करायची यहोवाला आपल्यापेक्षा जास्त इच्छा आहे. त्याची फक्त हीच अपेक्षा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आणि त्याच्या आज्ञा पाळून खंडणीची सुंदर भेट स्वीकारावी. खरंच, खंडणी बलिदान हा देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि या प्रेमाबद्दल आपल्याला नवीन जगात आणखी बरंच काही शिकायला मिळेल.—उप. ३:११.
खंडणीमुळे आपल्याला येशूबद्दल काय शिकायला मिळतं?
१०. (क) येशूच्या मरणाच्या वेळी त्याला कोणत्या गोष्टीचं दुःख झालं होतं? (ख) येशूने आपल्या पित्याचं नाव कोणत्या मार्गांनी पवित्र केलं? (“ येशूने एकनिष्ठ राहून आपल्या पित्याचं नाव पवित्र केलं” ही चौकटसुद्धा पाहा.)
१० लोक आपल्या पित्याबद्दल काय विचार करतात याची येशूला खूप काळजी आहे. (योहा. १४:३१) येशूवर जेव्हा देवाची निंदा करण्याचा आणि अपराधी असण्याचा आरोप लावण्यात आला तेव्हा त्याला खूप दुःख झालं. कारण त्यामुळे त्याच्या पित्याच्या नावावरसुद्धा कलंक लागला असता. म्हणून त्याने अशी प्रार्थना केली: “माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काढून घे.” (मत्त. २६:३९) पण तरी, शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासू राहून त्याने आपल्या पित्याचं नाव पवित्र केलं.
११. येशूने कसं दाखवून दिलं की त्याचं लोकांवर खूप प्रेम आहे? (योहान १३:१)
११ खंडणी बलिदानातून आपल्याला हेसुद्धा शिकायला मिळतं, की येशूला लोकांची मनापासून काळजी आहे. खासकरून त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांची त्याला जास्त काळजी आहे. (नीति. ८:३१; योहान १३:१ वाचा.) उदाहरणार्थ, येशूला माहीत होतं, की पृथ्वीवर असताना त्याला काही गोष्टी करणं कठीण जाणार आहे; जसं की, एका यातनादायक मृत्यूचा सामना करणं. तरीसुद्धा पृथ्वीवर असताना त्याने आपली सेवा फक्त करायची म्हणून केली नाही. त्याने प्रचार करण्यासाठी, लोकांना शिकवण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. आपल्या मृत्यूच्या दिवशीही त्याने आपल्या प्रेषितांचे पाय धुवायला वेळ काढला. तसंच, त्याने त्यांना सांत्वन आणि मार्गदर्शनही दिलं. (योहा. १३:१२-१५) त्याला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यात आलं, तेव्हा त्याने त्याच्यासोबत लटकवण्यात आलेल्या अपराध्याला नवीन जगाच्या आशेबद्दलही सांगितलं. तसंच, त्याच्या आईची काळजी घेण्याची जबाबदारी त्याने त्याच्या शिष्यावर सोपवली. (लूक २३:४२, ४३; योहा. १९:२६, २७) अशा प्रकारे, येशूचं लोकांवरचं प्रेम फक्त त्याच्या बलिदानातूनच नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तो लोकांशी जसं वागला त्यावरूनही दिसून आलं.
१२. कोणत्या अर्थाने येशू आजही आपल्यासाठी त्याग करतोय?
१२ येशू आपल्यासाठी “एकदाच मेला.” पण तो आजही आपल्यासाठी बरेच त्याग करतोय. (रोम. ६:१०) ते कसं? खंडणी बलिदानाचे फायदे आपल्याला मिळावेत म्हणून तो आजही मेहनत घेतोय आणि वेळ देतोय. तो आज कोणत्या कामात व्यस्त आहे याचा विचार करा. तो आपला राजा, महायाजक आणि मंडळीचं मस्तक म्हणून सेवा करतोय. (१ करिंथ. १५:२५; इफिस. ५:२३; इब्री २:१७) तसंच, अभिषिक्तांना आणि मोठ्या समुदायातल्या लोकांना गोळा करायची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर आहे. हे काम मोठं संकट संपायच्या आधी पूर्ण केलं जाईल. b (मत्त. २५:३२; मार्क १३:२७) तसंच, या शेवटच्या दिवसांत त्याच्या विश्वासू सेवकांना भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न मिळेल याकडेही तो लक्ष देतोय. (मत्त. २४:४५) पुढे, त्याच्या हजार वर्षांच्या राज्यातसुद्धा तो आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करणार आहे. खरंच, यहोवाने त्याच्या मुलाला आपल्यासाठी खऱ्या अर्थाने दिलंय!
कायम शिकत राहा
१३. मनन केल्यामुळे यहोवा आणि येशूने आपल्यावर जे प्रेम केलंय त्याबद्दल शिकत राहायला आपल्याला कशी मदत होईल?
१३ यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय त्यावर मनन केल्यामुळे, त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे याबद्दल शिकत राहायला आपल्याला मदत होईल. कदाचित या वर्षी स्मारकविधीच्या काळात तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त शुभवर्तमानाची पुस्तकं वाचू शकता. पण एकाच वेळी बरेच अध्याय वाचायचा प्रयत्न करू नका. थोडेच अध्याय वाचा. मग यहोवावर आणि येशूवर आपण प्रेम का केलं पाहिजे याची आणखी कारणं शोधा. तसंच, शिकलेल्या गोष्टी इतरांनाही सांगा.
१४. स्तोत्र ११९:९७ आणि तळटीप यांप्रमाणे, संशोधन केल्यामुळे आपल्याला खंडणी आणि इतर सत्यांबद्दल शिकत राहण्यासाठी कशी मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ जर तुम्ही बऱ्याच वर्षांपासून सत्यात असाल तर कदाचित तुमच्या मनात असा विचार येईल, की देवाचा न्याय, त्याचं प्रेम आणि खंडणी बलिदान या विषयांबद्दल आणखी नवीन शिकण्यासारखं काय असू शकतं? खरं पाहिलं तर, या आणि यांसारख्या इतर विषयांबद्दल आपण आणखी बरंच काही शिकू शकतो. तर मग तुम्ही काय करू शकता? आपल्या साहित्यांमध्ये असलेल्या माहितीच्या खजिन्याचा पूर्ण उपयोग करा. जेव्हा तुम्ही बायबलमधून असं काही वाचता जे तुम्हाला नीट समजत नाही, तेव्हा त्यावर संशोधन करा. मग शिकलेल्या नवीन गोष्टींवर आणि त्यातून तुम्हाला यहोवाबद्दल, त्याच्या मुलाबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल काय शिकायला मिळतं यावर “दिवसभर” मनन करा.—स्तोत्र ११९:९७ आणि तळटीप वाचा.
१५. आपण बायबलमधून रत्नं का शोधत राहिली पाहिजेत?
१५ जेव्हा तुम्ही बायबल वाचता किंवा संशोधन करता, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला जर नवीन गोष्ट सापडली नाही तर निराश होऊ नका. एका अर्थाने तुम्ही सोनं शोधणाऱ्या लोकांसारखे आहात. हे लोक सोन्याचा एखादा छोटासा तुकडा शोधण्यासाठी तासंतास घालवतात, तर कधी अनेक दिवस घालवतात. ते इतकी मेहनत घेतात, कारण त्यांच्यासाठी सोन्याचा प्रत्येक कण मौल्यवान असतो. तर मग बायबलमधल्या सत्यांची रत्नं त्यापेक्षा किती जास्त मोलाची आहेत! (स्तो. ११९:१२७; नीति. ८:१०) म्हणून धीर धरा आणि नियमितपणे बायबल वाचत राहा.—स्तो. १:२.
१६. आपण यहोवा देवासारखं आणि येशूसारखं कसं वागू शकतो?
१६ जसजसं तुम्ही अभ्यास करता, तसतसं शिकलेल्या गोष्टी लागू कशा करता येतील याचे मार्ग शोधा. उदाहरणार्थ, यहोवासारखं न्यायाने वागा. इतरांशी भेदभाव करू नका. येशूसारखं यहोवा देवावर आणि इतरांवर प्रेम करा. परिस्थिती कठीण असली तरी यहोवाच्या नावासाठी दुःख सोसायला आणि आपल्या भाऊबहिणींची सेवा करायला तयार राहा. यहोवाने दिलेली खंडणी बलिदानाची अनमोल भेट इतरांनाही मिळावी म्हणून त्यांना प्रचार करा. असं करूनसुद्धा तुम्ही येशूसारखं वागू शकता.
१७. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१७ आपण खंडणीबद्दल जितकं जास्त समजून घेऊ आणि आपली कदर वाढवू, तितकं यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल आपलं प्रेम आणखी वाढत जाईल. आणि यामुळे त्यांचंही आपल्यावरचं प्रेम आणखी वाढेल. (योहा. १४:२१; याको. ४:८) म्हणून, खंडणीबद्दल शिकून घ्यायला यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा आपण चांगला वापर करू या. खंडणीपासून आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात यावर आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच, यहोवाच्या प्रेमासाठी आपण आणखी कदर कशी वाढवू शकतो यावरही चर्चा करणार आहोत.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श
a शब्दाचा अर्थ: “मनन” करण्याचा अर्थ एखाद्या विषयावर खोलवर विचार करणं. आणि तो विषय चांगल्या प्रकारे समजून घ्यायला त्याबद्दल आणखी बारीकसारीक माहिती घेणं.
b इफिसकर १:१० मध्ये पौलने “स्वर्गातल्या गोष्टींना” एकत्र करण्याबद्दल सांगितलं. तर येशूने मत्तय २४:३१ आणि मार्क १३:२७ मध्ये “निवडलेल्या लोकांना” गोळा करण्याबद्दल सांगितलं. या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पौल इथे, यहोवा येशूसोबत राज्य करण्याऱ्यांना निवडून त्यांचा पवित्र शक्तीने अभिषेक करेल त्या काळाबद्दल बोलत होता. तर येशू, मोठ्या संकंटाच्या वेळी पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्तांना गोळा करून स्वर्गात घेतलं जाईल त्या काळाबद्दल बोलत होता.