तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन काळात आग ‘एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी’ कशी नेत असत?
बायबलमधील उत्पत्ति २२:६ या अध्यायात उल्लेख करण्यात आलेला अहवाल सांगतो, की दूरवर असलेल्या ठिकाणी देवाप्रीत्यर्थ होमार्पण करण्यासाठी अब्राहामाने “लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव [“आग,” NW] व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले.”
प्राचीन काळात कोणत्या पद्धतीने आग पेटवली जात होती, याचा कोणताही उल्लेख बायबलमध्ये दिला गेलेला नाही. पण, या अहवालाबद्दल एका टिकाकाराचं असं म्हणणं आहे की, अब्राहाम आणि इसहाक यांनी केलेल्या त्या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांनी ती आग किंवा विस्तव थोडा जळत ठेवला असावा. यावरून त्यांच्याकडे कदाचित आग पेटवण्यासाठी लागणारं साहित्यं असावं असं दिसतं.
इतर काही जण या गोष्टीकडे लक्ष वेधतात की, प्राचीन काळात आग पेटवणं हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं. आग स्वतःहून पेटवण्याऐवजी, जेव्हा-जेव्हा शक्य आहे तेव्हा-तेव्हा आपल्या शेजाऱ्यांकडून एखादा जळता निखारा घेऊन आग पेटवणं हे त्यांच्यासाठी अधिक सोपं होतं. या कारणामुळे बरेच विद्वान असं मानतात की, अब्राहामाने आग किंवा विस्तव वाहून नेण्याकरता या प्रवासादरम्यान साखळी असलेलं एखादं भांडं घेतलं असावं आणि यात मागील रात्री पेटवलेल्या आगीचे काही जळते निखारे त्याने ठेवले असावेत. (यश. ३०:१४) अशा प्रकारे वाहून नेण्यात येणाऱ्या जळत्या निखाऱ्यांच्या आणि चटकन पेट घेणाऱ्या लागडाच्या मदतीनं, प्राचीन काळात प्रवासादरम्यान केव्हाही आग पुन्हा पेटवता येणं सहज शक्य होतं.