देवाचा आत्मा स्वतः आपल्याला साक्ष देतो
“तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो.”—रोम. ८:१६.
१-३. कोणत्या घटनांमुळे ३३ सालचा पेन्टेकॉस्ट एक खास दिवस ठरला, आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांमुळे बायबलमधील कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
रविवार सकाळची वेळ होती. यरुशलेममधील लोकांसाठी हा खूप खास दिवस होता. कारण, हा पेन्टेकॉस्ट सणाचा दिवस होता. पेन्टेकॉस्ट हा गव्हाच्या हंगामाच्या सुरवातीला साजरा केला जाणारा एक पवित्र सण होता. त्या दिवशी सकाळी महायाजकानं मंदिरात नेहमीप्रमाणे वेगवेगळी अर्पणे दिली. मग, सुमारे नऊ वाजता त्यानं गव्हाच्या पहिल्या पिकातून किंवा कापणीच्या प्रथमफळातून, खमीर घालून तयार करण्यात आलेल्या दोन भाकरी अर्पण केल्या. महायाजकानं या दोन भाकरी घेतल्या आणि उजवी-डावीकडे हलवून यहोवाला अर्पण केल्या. यालाच ओवाळणीचं अर्पण म्हणण्यात येतं. हा ३३ सालचा पेन्टेकॉस्टचा दिवस होता.—लेवी. २३:१५-२०.
२ मंदिरात या सर्व गोष्टी घडत असतानाच यरुशलेम शहरातील एका माडीवरच्या खोलीत एक अत्यंत महत्त्वाची घटना घडणार होती. या खोलीत “प्रार्थना करण्यात तत्पर” असे १२० शिष्य एकत्र जमले होते. (प्रे. कृत्ये १:१३-१५) या शिष्यांसोबत जे घडणार होतं त्याचा पेन्टेकॉस्टच्या दिवशी महायाजक जे ओवाळणीचं अर्पण सादर करायचा त्याच्याशी जवळचा संबंध होता. शिवाय, आठशे वर्षांआधी योएल संदेष्ट्यानं या घटनेविषयी भविष्यवाणी केली होती. (योए. २:२८-३२; प्रे. कृत्ये २:१६-२१) पण, असं काय घडणार होतं जे इतकं महत्त्वाचं होतं?
३ प्रेषितांची कृत्ये २:२-४ वाचा. ३३ सालच्या त्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी या १२० शिष्यांवर यहोवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि ते अभिषिक्त बनले. (प्रे. कृत्ये १:८) हे शिष्य त्यांनी नुकतंच जे पाहिलं होतं आणि ऐकलं होतं, त्या अद्भुत गोष्टींविषयी बोलू लागले. आणि त्यामुळे लोकांचा मोठा समुदाय त्यांच्या भोवती जमू लागला. मग, प्रेषित पेत्रानं जे घडलं त्याबद्दल आणि ते इतकं महत्त्वाचं का होतं त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. आणि तो तिथं जमलेल्या लोकांना म्हणाला: “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” पेत्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्याच दिवशी जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांनाही पवित्र आत्मा देण्यात आला.—प्रे. कृत्ये २:३७, ३८, ४१.
४. (क) ३३ सालच्या पेन्टेकॉस्ट रोजी जे घडलं ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं का आहे? (ख) अनेक वर्षांआधी याच दिवशी आणखी कोणती महत्त्वाची घटना घडली असावी? (अंत्यटीप पाहा.)
४ महायाजक आणि पेन्टेकॉस्टच्या दिवशी तो देत असलेल्या भाकरी कशाला चित्रित करत होत्या? हा महायाजक येशूला चित्रित करत होता. तसंच, या भाकरी येशूच्या अभिषिक्त शिष्यांना सूचित करत होत्या. या शिष्यांना अपरिपूर्ण मानवांमधून निवडण्यात आलं आहे आणि बायबलमध्ये त्यांना “प्रथमफळ” असं म्हणण्यात आलं आहे. (याको. १:१८) देवानं त्यांना आपली मुलं या नात्यानं स्वीकारलं आहे. आणि त्याच्या राज्यात येशूसोबत राजे या नात्यानं राज्य करण्यासाठी त्यांची निवड केली आहे. (१ पेत्र २:९) यहोवा त्याच्या राज्याद्वारे सर्व विश्वासू मानवांना आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे, आपल्याला येशूसोबत स्वर्गात जाण्याची आशा असो किंवा पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याची, ३३ सालचा पेन्टेकॉस्ट आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. [1]
एखाद्याला अभिषिक्त म्हणून निवडण्यात येतं तेव्हा काय घडतं?
५. सर्वांना एकाच प्रकारे अभिषिक्त करण्यात येत नाही, असं का म्हणता येईल?
५ माडीवरच्या खोलीत असलेले ते शिष्य हा खास दिवस कधीच विसरले नसतील. प्रत्येकाच्या डोक्यावर अग्नीच्या ज्योतीसारखं दिसणारं काहीतरी होतं. यहोवानं त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याची क्षमता दिली होती. त्यामुळे आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलं आहे, याविषयी त्यांच्या मनात जराही शंका नव्हती. (प्रे. कृत्ये २:६-१२) पण, अभिषिक्त करण्यात येणाऱ्या सर्वच ख्रिश्चनांसोबत अशा आश्चर्यकारक घटना घडत नाहीत. उदाहरणार्थ, नंतर त्याच दिवशी ज्या हजारो लोकांना अभिषिक्त करण्यात आलं त्यांच्याही डोक्यावर अग्नीच्या ज्योतीसारखं काहीतरी दिसलं, असं बायबल सांगत नाही. त्यांचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्यांना अभिषिक्त करण्यात आलं. (प्रे. कृत्ये २:३८) पण, सर्वांना त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळीच अभिषिक्त करण्यात येतं असंही नाही. उदाहरणार्थ, शोमरोनी लोकांना त्यांच्या बाप्तिस्म्याच्या काही काळानंतर अभिषिक्त करण्यात आलं. (प्रे. कृत्ये ८:१४-१७) आणि याहूनही वेगळी गोष्ट म्हणजे, कर्नेल्य आणि त्याच्या घरात असलेल्या लोकांना त्यांचा बाप्तिस्मा होण्याआधीच अभिषिक्त करण्यात आलं.—प्रे. कृत्ये १०:४४-४८.
६. सर्व अभिषिक्तांना कोणती गोष्ट मिळते, आणि याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो?
६ तेव्हा, आपल्याला अभिषिक्त करण्यात आलं आहे याची जाणीव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे होते, हे स्पष्ट आहे. काहींना अभिषिक्त केल्याची जाणीव लगेचच होते, तर काहींना ही गोष्ट हळूहळू समजते. पण, अभिषिक्त केल्यानंतर प्रत्येकाच्या बाबतीत काय होतं हे प्रेषित पौलानं स्पष्ट केलं. तो म्हणाला, की तुम्ही “विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे . . . हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.” (इफिस. १:१३, १४) यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे ख्रिश्चनांना या गोष्टीची पक्की खात्री देतो की त्यांना स्वर्गात जाण्यासाठी निवडण्यात आलं आहे. अशा प्रकारे पवित्र आत्मा या अभिषिक्त जनांसाठी स्वर्गात सदासर्वकाळ जगण्याच्या आशेचा एक “विसार” किंवा पुरावा ठरतो.—२ करिंथकर १:२१, २२; ५:५ वाचा.
७. स्वर्गीय प्रतिफळ मिळवण्यासाठी प्रत्येक अभिषिक्त ख्रिश्चनाने काय करणं गरजेचं आहे?
७ एखाद्याला अभिषिक्त करण्यात आलं म्हणजे त्याला त्याचं प्रतिफळ मिळेलच असा याचा अर्थ होतो का? असं म्हणता येणार नाही. त्याला स्वर्गात जाण्यासाठी निवडण्यात आलं आहे या गोष्टीची खात्री त्याला असते. २ पेत्र १:१०, ११) तेव्हा, अभिषिक्त ख्रिश्चनाने कोणत्याही कारणामुळे यहोवाची सेवा करण्याचं कधीही थांबवू नये. त्याला स्वर्गीय जीवनाची आशा असली तरी, प्रतिफळ मिळवण्यासाठी त्यानं शेवटपर्यंत विश्वासू राहणं खूप गरजेचं आहे.—इब्री ३:१; प्रकटी. २:१०.
पण, जर तो यहोवाला विश्वासू राहिला नाही तर स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ तो गमावून बसेल. याचं स्पष्टीकरण देत पेत्रानं म्हटलं: “म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही; आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.” (एखाद्याला अभिषिक्त होण्याची जाणीव कशी होते?
८, ९. (क) एखाद्याला अभिषिक्त करण्यात येतं तेव्हा त्याच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे समजून घेणं बऱ्याच जणांना कठीण का जातं? (ख) आपल्याला स्वर्गातील जीवनासाठी निवडण्यात आलं आहे हे एखाद्याला कसं समजतं?
८ एखाद्याला अभिषिक्त करण्यात येतं तेव्हा त्याच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे समजून घेणं देवाच्या बऱ्याच सेवकांना कठीण जातं. आणि हे साहजिकच आहे कारण ते स्वतः अभिषिक्त नाहीत. देवानं खरंतर मानवांना स्वर्गात नाही, तर या पृथ्वीवर जगण्यासाठी निर्माण केलं होतं. (उत्प. १:२८; स्तो. ३७:२९) असं असलं तरी, यहोवानं काहींची निवड स्वर्गात राजे आणि याजक या नात्यानं सेवा करण्यासाठी केली आहे. त्यामुळे, जेव्हा एखाद्या व्यक्तीची अभिषिक्त म्हणून निवड करण्यात येते, तेव्हा तिच्यात खूप मोठा बदल होतो. तिची आशा आणि तिची विचार करण्याची पद्धत बदलते, ज्यामुळे स्वर्गातील जीवनाच्या आशेकडे लक्ष केंद्रित करण्यास तिला शक्य होतं.—इफिसकर १:१८, १९ वाचा.
९ पण, आपल्याला स्वर्गात जगण्यासाठी निवडण्यात आलं आहे हे एका भावाला किंवा बहिणीला कसं समजतं? रोममधील “पवित्र होण्यास” बोलवलेल्या अभिषिक्त बांधवांना पौलानं काय सांगितलं त्याकडे लक्ष द्या. (रोम. १:७, पं.र.भा.) तो त्यांना म्हणाला: “कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो.” (रोम. ८:१५, १६) देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे एखाद्याला या गोष्टीची खात्री करून देतो, की त्याला किंवा तिला स्वर्गात येशूसोबत राजा या नात्यानं राज्य करण्यासाठी निवडण्यात आलं आहे.—१ थेस्सलनी. २:१२.
१०. पहिले योहान २:२७ यात अभिषिक्त ख्रिश्चनांना कोणी शिकवण्याची गरज नाही, असं जे सांगितलं आहे त्याचा काय अर्थ होतो?
१० स्वर्गीय जीवनासाठी ज्यांची निवड करण्यात आली आहे, त्यांना दुसऱ्या कोणीतरी ही गोष्ट सांगण्याची गरज नाही. कारण स्वतः यहोवाकडून त्यांना या गोष्टीची खात्री मिळते की त्यांना अभिषिक्त करण्यात आलं आहे. प्रेषित योहानानं अभिषिक्त ख्रिश्चनांना सांगितलं: “जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.” तो पुढे असं म्हणतो: “तुम्हाविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक—तो सत्य आहे, खोटा नाही—तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.” (१ योहा. २:२०, २७) इतर ख्रिश्चनांप्रमाणेच अभिषिक्त ख्रिश्चनांनादेखील यहोवा देत असलेल्या आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. पण, त्यांना अभिषिक्त करण्यात आलं आहे या गोष्टीची खात्री दुसऱ्यांनी त्यांना करून देण्याची गरज नाही. कारण, यहोवानं पवित्र आत्म्याद्वारे त्यांना या गोष्टीची पक्की खात्री करून दिलेली असते.
त्यांचा नव्यानं जन्म होतो
११, १२. एखाद्या अभिषिक्त व्यक्तीला कदाचित काय वाटू शकतं, पण कोणत्या गोष्टीची तिला पूर्ण खात्री असते?
११ जेव्हा एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात येतं, तेव्हा त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. याबद्दल बोलताना येशू म्हणाला की जणू ते ‘नव्याने जन्मतात.’ (योहा. ३:३, ५) तो पुढे याचं स्पष्टीकरण असं देतो: “तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” (योहा. ३:७, ८) यावरून स्पष्टच होतं की जेव्हा एखाद्याला अभिषिक्त करण्यात येतं तेव्हा त्याला नेमकं कसं वाटतं, हे अभिषिक्त नसलेल्या व्यक्तीला पूर्णपणे समजावून सांगणं शक्य नाही. [2]
१२ ज्यांना अभिषिक्त करण्यात येतं त्यांना कदाचित याचं आश्चर्य वाटेल, की ‘यहोवानं मलाच का निवडलं, दुसऱ्या कोणाला का नाही?’ आपण अभिषिक्त होण्याकरता खरंच पात्र आहोत का असंही कदाचित त्यांना वाटेल. स्वतःच्या पात्रतेबद्दल जरी त्यांना शंका वाटत असली, तरी यहोवानं त्यांना निवडलं आहे याबद्दल त्यांच्या मनात जराही शंका नसते. उलट, हे दान मिळाल्याबद्दल त्यांना खूप आनंद होतो आणि याकरता ते खूप कृतज्ञही असतात. सर्व अभिषिक्तांना पेत्राप्रमाणेच वाटतं. त्यानं म्हटलं: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहा, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.” (१ पेत्र १:३, ४) जेव्हा अभिषिक्त जन हे वचन वाचतात, तेव्हा आपला पिता आपल्याशी व्यक्तिगत रीत्या बोलत आहे अशी खात्री त्यांना असते.
१३. आत्म्यानं अभिषिक्त झाल्यानंतर एका व्यक्तीच्या विचारसरणीत कोणता बदल होतो, आणि हा बदल कशामुळे होतो?
१३ एखाद्याला अभिषिक्त म्हणून निवडण्याआधी त्याच्या मनात पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असते. यहोवा या पृथ्वीवरून सर्व दुष्टता काढून तिचं एका सुंदर नंदनवनात रूपांतर करेल त्या काळाची तो आतुरतेनं वाट पाहत असतो. तसंच, आपल्या प्रियजनांचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांचं स्वागत करत असल्याची कल्पनाही तो करत असेल. शिवाय, स्वतःचं एक सुंदर घर असेल आणि त्यात राहण्याची किंवा झाडं लावून त्यांची फळं खाण्याची कल्पनाही त्यानं केली असेल. (यश. ६५:२१-२३) पण मग, त्याच्या विचारसरणीत असा अचानक बदल का होतो? अनेक समस्या सहन कराव्या लागत असल्यामुळे किंवा अतिशय निराश झाल्यामुळे त्याचे विचार बदलतात का? की, या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगणं खूप कंटाळवाणं असेल आणि आपल्याला इथं खरा आनंद मिळणार नाही असा विचार तो करू लागतो? की, स्वर्गात जगणं कसं असेल हे पाहण्याची त्याची तीव्र इच्छा असल्यामुळे त्याचे विचार बदलतात? मुळीच नाही. उलट, जेव्हा यहोवा त्याला अभिषिक्त करतो, तेव्हा त्याचा पवित्र आत्मा त्याची विचारसरणी आणि आशादेखील बदलतो.
१४. पृथ्वीवरील जीवनाबद्दल अभिषिक्तांचा कसा दृष्टिकोन आहे?
१४ याचा अर्थ असा होतो का, की पृथ्वीवरील आपलं जीवन लवकरच संपावं असं अभिषिक्तांना वाटतं? अभिषिक्तांना काय वाटतं याबद्दल पौलानं स्पष्ट केलं. त्यानं त्यांच्या मानवी शरीराची तुलना एका ‘तंबूशी’ केली आणि म्हटलं: “जे आम्ही या मंडपात आहो ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे.” (२ करिंथ. ५:४) यावरून स्पष्ट होतं की स्वर्गीय जीवन मिळवण्यासाठी आपण लवकरात लवकर मरून जावं असं त्यांना वाटत नाही. उलट, ते आपल्या जीवनाचा खूप आनंद घेतात आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत प्रत्येक दिवस यहोवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. पण, हे सर्व करत असताना देवानं भविष्याबद्दल त्यांना जी आशा दिली आहे, तिला ते नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात.—१ करिंथ. १५:५३; २ पेत्र १:४; १ योहा. ३:२, ३; प्रकटी. २०:६.
आपणही अभिषिक्तांपैकी आहोत असं तुम्हाला वाटतं का?
१५. कोणत्या गोष्टींवरून एका व्यक्तीला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलं आहे हे सिद्ध होत नाही?
१५ यहोवानं मलाही स्वर्गीय जीवनाचं आमंत्रण दिलं आहे का? असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात डोकावत असेल. असं असेल तर या महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करा: तुम्ही १ करिंथ. २:१०) यहोवाच्या मदतीमुळे प्रचारकार्यात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळाले आहेत का? तुमच्या जीवनात यहोवाच्या इच्छेलाच सर्वात जास्त महत्त्व आहे का? इतरांप्रती तुम्हाला मनापासून प्रेम वाटतं का आणि त्यांनीही यहोवाची सेवा करावी म्हणून त्यांना मदत करण्याची एक खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे असं तुम्हाला वाटतं का? यहोवानं तुम्हाला जीवनात विशिष्ट मार्गांनी मदत केली आहे याचे पुरावे तुम्ही पाहिले आहेत का? या सर्वच प्रश्नांना तुमचं उत्तर होय असेल, तर तुम्हालाही यहोवानं स्वर्गीय जीवनाचं आमंत्रण दिलं आहे असा याचा अर्थ होत नाही. कारण फक्त अभिषिक्तांनाच नाही तर देवाच्या इतर सेवकांनाही असं वाटू शकतं. शिवाय, एखाद्याला कोणतीही आशा असली तरी यहोवाचा पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनात एकसारखंच कार्य करतो. खरंतर, आपण स्वर्गात जाणार आहोत की नाही ही शंकाच मुळात तुम्हाला स्वर्गीय जीवनाचं आमंत्रण मिळालेलं नाही हे सिद्ध करते. कारण, ज्यांना यहोवानं निवडलं आहे त्यांच्या मनात याविषयी मुळीच शंका राहत नाही, तर त्यांना या गोष्टीची पक्की खात्री असते!
प्रचारकार्यात खूप आवेशी आहात असं तुम्हाला वाटतं का? बायबलचा अभ्यास करून “देवाच्या गहन” गोष्टींविषयी जाणून घेण्याची तुम्हाला आवड आहे का? (१६. ज्यांना देवाचा पवित्र आत्मा देण्यात आला होता त्या सर्वांना स्वर्गात जाण्याची आशा नाही, असं आपण का म्हणू शकतो?
१६ बायबलमध्ये आपल्याला अशा बऱ्याच विश्वासू जणांची उदाहरणं पाहायला मिळतात ज्यांना यहोवाचा पवित्र आत्मा मिळाला. पण, ते सर्वच स्वर्गात गेले नाहीत. याचं एक उदाहरण म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान. येशूनं म्हटलं की योहानापेक्षा थोर असा कोणीही दुसरा मनुष्य नव्हता. पण, तरीही योहान स्वर्गात राजा या नात्यानं राज्य करणार नाही हे त्यानं स्पष्ट केलं. (मत्त. ११:१०, ११) दाविदालाही पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन मिळालं होतं. (१ शमु. १६:१३) यहोवाविषयीच्या गहन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि बायबलमधील काही भाग लिहिण्यासाठी पवित्र आत्म्यानं त्याला मदत केली. (मार्क १२:३६) असं असलं तरी “दावीद स्वर्गास चढून गेला नाही,” असं प्रेषित पेत्रानं म्हटलं. (प्रे. कृत्ये २:३४) यहोवानं या सर्व सेवकांना स्वर्गीय जीवनासाठी नव्हे, तर आश्चर्यकारक गोष्टी करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा दिला होता. मग याचा अर्थ असा होतो का, की स्वर्गात राज्य करण्याइतपत ते विश्वासू नव्हते किंवा तेवढी त्यांची पात्रता नव्हती? नाही, असा याचा मुळीच अर्थ होत नाही. उलट, यहोवा पृथ्वीवरील नंदनवनात त्यांना पुन्हा जिवंत करेल असा याचा अर्थ होतो.—योहा. ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५.
१७, १८. (क) आज यहोवाच्या बहुतेक सेवकांना कोणती आशा आहे? (ख) पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
१७ देवाच्या सेवकांपैकी आज बहुतेक लोकांना स्वर्गीय जीवनाची आशा नाही. बायबल काळातील अब्राहाम, दावीद, बाप्तिस्मा करणारा योहान आणि इतर अनेकांनाही या पृथ्वीवर देवाच्या राज्याखाली जगण्याची आशा होती. (इब्री ११:१०) स्वर्गात येशूसोबत १,४४,००० जण राज्य करतील. पण, या शेवटल्या काळात या पृथ्वीवर अभिषिक्तांपैकी फार कमी लोक उरले आहेत आणि बायबलमध्ये यांना ‘बाकीचे लोक’ असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१७) याचा अर्थ १,४४,००० जणांपैकी बहुतेकांचा मृत्यू झाला आहे आणि आता ते स्वर्गात आहेत.
१८ तर मग, स्वर्गीय जीवनाची आशा असल्याचा दावा करणाऱ्यांबद्दल पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्यांनी कसा दृष्टिकोन राखला पाहिजे? तुमच्या मंडळीतील एखादी व्यक्ती स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करू लागल्यास तुम्ही तिच्याशी कसा व्यवहार कराल? स्वर्गीय आशा असल्याचा दावा करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे याविषयी चिंता करण्याची गरज आहे का? या प्रश्नांवर आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत.
^ [१] (परिच्छेद ४) पेन्टेकॉस्ट हा सण कदाचित वर्षाच्या त्याच वेळी साजरा केला जात होता जेव्हा मोशेला सीनाय पर्वतावर नियमशास्त्र देण्यात आलं. (निर्ग. १९:१) ज्या दिवशी इस्राएल राष्ट्रासोबत यहोवानं केलेला नियमशास्त्राचा करार अंमलात आला, कदाचित वर्षाच्या त्याच दिवशी येशूनं अभिषिक्तांसोबत केलेला नवा करार अंमलात आला.
^ [२] (परिच्छेद ११) “नव्याने जन्मले” असं जे म्हणण्यात आलं आहे, त्याबद्दल आणखी स्पष्टीकरणासाठी टेहळणी बुरूज १ एप्रिल २००९ (इंग्रजी) यातील पृष्ठे ३-११ पाहा.