व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवासोबत रोज काम करा

यहोवासोबत रोज काम करा

“आपण देवाचे सहकारी आहोत.”—१ करिंथ. ३:९.

गीत क्रमांक: ४४, २८

१. आपण कोणकोणत्या मार्गांनी यहोवासोबत काम करू शकतो?

यहोवाने मानवांना घडवलं तेव्हा त्याची इच्छा होती की त्यांनी त्याचे सहकारी बनावं. आज मानव अपरिपूर्ण असले तरी विश्‍वासू सेवक यहोवासोबत रोज काम करू शकतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा राज्याचा आनंदाचा संदेश सांगून शिष्य बनवतो तेव्हा आपण “देवाचे सहकारी” म्हणून काम करत असतो. (१ करिंथ. ३:५-९) इतकं महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी सर्वसमर्थ सृष्टिकर्त्याने आपल्याला निवडलं आहे, हा खरंच खूप मोठा बहुमान आहे! असं असलं तरी प्रचारकार्य करणं फक्‍त हाच यहोवासोबत काम करण्याचा मार्ग नाही. या लेखात आपण चर्चा करणार आहोत की इतर मार्गांनीही आपण यहोवासोबत काम करू शकतो. ते मार्ग म्हणजे आपल्या कुटुंबाला व मंडळीतल्या बंधुभगिनींना मदत करणं, आदरातिथ्य दाखवणं, आपल्या संघटनेने जगभरात जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्याला हातभार लावणं आणि यहोवाची सेवा वाढवणं.—कलस्सै. ३:२३.

२. आपण यहोवासाठी जे करतो त्याची तुलना इतर जण यहोवासाठी जे करतात त्याच्याशी का करू नये?

या लेखाचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्‍ती वेगळी आहे. आपलं वय, आरोग्य, परिस्थिती, आणि क्षमता सारख्या नाहीत. त्यामुळे तुम्ही यहोवासाठी जे करता त्याची तुलना इतर जे करतात त्याच्याशी करू नका. प्रेषित पौलने म्हटलं: “प्रत्येकाने स्वतःच्या कार्यांचे परीक्षण करावे, म्हणजे मग दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कार्यांमुळे त्याला आनंदी होता येईल.”—गलती. ६:४.

आपल्या कुटुंबाला आणि मंडळीतल्या बंधुभगिनींना मदत करा

३. कुटुंबाची काळजी घेणं म्हणजे देवासोबत काम करणं असं आपण का म्हणू शकतो?

आपण कुटुंबाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो. जसं की, तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसा कमवावा लागत असेल. पुष्कळ स्त्रियांना आपल्या तान्ह्या मुलांची देखभाल करता यावी म्हणून घरी राहावं लागत असेल. तसंच, काही जणांवर आपल्या आजारी पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी असेल. आणि या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. कारण बायबल म्हणतं: “जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्‍वास नाकारला आहे, आणि विश्‍वास नसलेल्या मनुष्यापेक्षाही तो वाईट आहे.” (१ तीम. ५:८) जर तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्‍या आहेत आणि तुम्हाला यहोवाची जास्त सेवा करण्याची इच्छा असूनही तुम्हाला ती करता येत नसेल तर निराश होऊ नका. कारण जेव्हा आपण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतो तेव्हा यहोवाचं मन आनंदित होतं.—१ करिंथ. १०:३१.

४. पालक देवाच्या राज्याला प्रथम स्थानी कसं ठेवू शकतात आणि असं केल्याने काय परिणाम होतात?

आपल्या मुलांना यहोवाच्या सेवेत ध्येय ठेवायला मदत करण्याद्वारे ख्रिस्ती पालक यहोवासोबत काम करू शकतात. आणि बऱ्‍याच पालकांनी असं केलंही आहे. याचा काय परिणाम झाला? त्यांच्या मुला-मुलींनी यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्याचा निर्णय घेतला मग यासाठी त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर जावं लागलं तरीही. त्यातले काही मिशनरी सेवा करत आहेत तर इतर जण जास्त प्रचारकांची गरज आहे तिथे जाऊन पायनियरींग करत आहेत. तसंच, आणखी काही बेथेल सेवेत आहेत. हे खरं आहे की मुलं दूर असल्यामुळे पालकांना त्यांच्यासोबत हवा तितका वेळ घालवायला जमत नाही. पण तरी ते निस्वार्थपणे आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात की ते जिथे आहेत तिथे त्यांनी यहोवाच्या सेवेत टिकून राहावं. ते असं का करतात? कारण त्यांची मुलं यहोवाला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवतात याचा त्यांना आनंद आहे. (३ योहा. ४) त्यांपैकी बऱ्‍याच पालकांना हन्‍नासारखं वाटतं. तिने म्हटलं की ती आपल्या मुलाला, शमुवेलला यहोवासाठी “उसना” देत आहे. अशा पालकांना वाटतं की हा यहोवासोबत काम करण्याचा एक मार्ग आहे आणि हा खूप मोठा बहुमान आहे!—१ शमु. १:२८, पं.र.भा.

५. मंडळीतल्या बंधुभगिनींना तुम्ही कशी मदत करू शकता? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

तुमच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी नसल्यास तुम्ही आजारी, वृद्ध किंवा इतर काही गरज असलेल्या बंधुभगिनींना मदत करण्यात हातभार लावू शकता का? किंवा त्यांची काळजी घेणाऱ्‍यांना तुम्ही मदत करू शकता का? तुमच्या मंडळीत एखाद्याला अशा मदतीची गरज आहे का? उदाहरणार्थ, कदाचित एका बहिणीला तिच्या वृद्ध पालकाची काळजी घ्यावी लागत असेल. तिला इतर काही महत्त्वाची कामं करता यावी म्हणून तुम्ही तिच्या पालकासोबत थोडा वेळ घालवू शकता का? किंवा सभेला जाण्यासाठी, खरेदी करण्यासाठी तुम्ही एखाद्याला मदत करू शकता का? किंवा हॉस्पिटलमध्ये सोबत म्हणून जाऊ शकता का? असं करण्याद्वारे तुम्ही जणू एखाद्याच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी यहोवासोबत काम करत असता.—१ करिंथकर १०:२४ वाचा.

पाहुणचार करा

६. आपण पाहुणचार कसा दाखवू शकतो?

देवाचे सहकारी पाहुणचार दाखवण्यासाठी ओळखले जातात. बायबलमध्ये, “पाहुणचार” या शब्दासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘अनोळखी लोकांशी प्रेमळपणे वागणं’ असा होतो. (इब्री १३:२; तळटीप) बायबलमध्ये अनेक उदाहरणं दिली आहेत ज्यांवरून अशा प्रकारचं प्रेम कसं दाखवलं जाऊ शकतं हे आपण शिकू शकतो. (उत्प. १८:१-५) विश्‍वासात असलेल्या आणि नसलेल्या लोकांना आपण मदत करण्याची संधी शोधू शकतो आणि असं करणं गरजेचंसुद्धा आहे.—गलती. ६:१०.

७. पूर्ण वेळेच्या सेवकांना पाहुणचार दाखवल्यामुळे कोणते फायदे होतात?

पूर्णवेळेच्या सेवकांना पाहुणचार दाखवण्याद्वारे तुम्ही यहोवासोबत काम करत आहात हे दिसून येईल. (३ योहान ५,  वाचा.) त्यांना आपल्या घरी राहू दिल्याने त्यांच्यासोबतच आपल्यालाही फायदा होतो. बायबलमध्ये याला “एकमेकांना प्रोत्साहन” देणं असं म्हटलं आहे. (रोम. १:११, १२) बंधू ओलाफ याच्या उदाहरणाचा विचार करा. तो तरुण होता तेव्हा एक अविवाहित विभागीय पर्यवेक्षक त्याच्या मंडळीला भेटायला आले. त्यांना राहायला जागा हवी होती पण मंडळीतल्या कोणत्याच बांधवाला त्यांना आपल्या घरी ठेवणं शक्य नव्हतं. ओलाफचे आईवडील साक्षीदार नव्हते. त्याने त्यांना विचारलं की तो त्या विभागीय पर्यवेक्षकांना आपल्या घरी राहायला बोलवू शकतो का? त्याच्या आईवडिलांनी होकार दिला. पण म्हटलं की ओलाफला सोफ्यावर झोपावं लागेल. ओलाफ यासाठी तयार झाला आणि त्याला या गोष्टीचा पस्तावा झाला नाही. विभागीय पर्यवेक्षकांसोबत तो आठवडा खूपच चांगला गेला! रोज सकाळी ते नाश्‍ता करताना बऱ्‍याच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. त्या विभागीय पर्यवेक्षकांनी ओलाफला खूप प्रोत्साहन दिलं. याचा काय परिणाम झाला? ओलाफने यहोवाची पूर्णवेळेची सेवा सुरू केली. मागच्या ४० वर्षांपासून त्याने वेगवेगळ्या देशांत मिशनरी म्हणून सेवा केली आहे.

८. इतरांनी सुरुवातीला कृतज्ञता दाखवली नाही तरी आपण दया का दाखवली पाहिजे? एक उदाहरण द्या.

आपण अनोळखी लोकांना अनेक मार्गांनी प्रेम दाखवू शकतो; मग त्यांनी सुरुवातीला कृतज्ञता दाखवली नाही तरीही. उदाहरणार्थ, स्पेनमध्ये राहणारी एक बहीण एक्वाडॉर मधून आलेल्या एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करायची. त्या स्त्रीचं नाव येसीका होतं. एकदा बायबल अभ्यास चालू असताना येसीका रडू लागली. बहिणीला कळलंच नाही, की ती का रडत आहे. म्हणून तिने तिला कारण विचारलं. येसीकाने म्हटलं, की स्पेनला यायच्याआधी ती खूप गरीब होती. एकदा तर तिच्या मुलीला द्यायला तिच्याकडे फक्‍त पाणी होतं, खाण्यासाठी काहीच नव्हतं. त्या तान्ह्या मुलीला झोपवत असताना येसीकाने मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर दोन साक्षीदार बहिणी तिच्या घरी आल्या आणि त्यांनी तिला नियतकालिक दिलं. पण येसीका त्यांच्याशी खूप रागाने बोलली आणि तिने नियतकालिक फाडून टाकलं. तिने म्हटलं: “माझ्या मुलीला काय मी हे खायला देऊ?” त्या बहिणींनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण येसीका काहीएक ऐकायला तयार नव्हती. नंतर त्या बहिणी खाद्यपदार्थांनी भरलेली एक बास्केट येसीकाच्या दाराबाहेर ठेवून गेल्या. आज ती गोष्ट तिला बायबल अभ्यास करताना आठवली आणि तिला जाणवलं की देवाने तिच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष केलं नव्हतं आणि म्हणून ती रडत होती. यहोवाची सेवा करण्याचा येसीकाने आता ठाम निश्‍चय केला आहे. या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं, की त्या बहिणींनी उदारता दाखवल्यामुळे खूप चांगले परिणाम घडून आले.—उप. ११:१, ६.

संघटनेच्या प्रकल्पांत स्वयंसेवक म्हणून काम करणं

९, १०. (क) इस्राएली लोकांकडे स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या कोणत्या काही संधी होत्या? (ख) आज बांधव कोणत्या मार्गांनी मंडळीत मदत करू शकतात?

प्राचीन काळात इस्राएली लोकांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी बऱ्‍याच संधी होत्या. (निर्ग. ३६:२; १ इति. २९:५; नहे. ११:२) हीच गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. आज आपल्याकडेही पुष्कळ संधी आहेत. आपण आपला वेळ, भौतिक गोष्टी, कौशल्यं यांचा वापर करून आपल्या बंधुभगिनींना मदत करू शकतो. असं करण्याद्वारे आपण आनंदी तर होऊ पण सोबतच आपल्याला बरेच आशीर्वादही मिळतील.

१० देवाचं वचन बांधवांना उत्तेजन देतं की त्यांनी मंडळीत साहाय्यक सेवक आणि वडील म्हणून इतरांची सेवा करण्याद्वारे यहोवासोबत काम करावं. (१ तीम. ३:१, ८, ९; १ पेत्र ५:२, ३) उपासनेसंबंधी साहाय्य करण्याद्वारे आणि व्यावहारिक मदत करण्याद्वारे ते इतरांना मदत करू शकतात. (प्रे. कार्ये ६:१-४) तुमच्या मंडळीतल्या वडिलांनी तुम्हाला अटेन्डंट म्हणून काम करायला किंवा साहित्य विभाग, प्रचारक्षेत्र, सभागृहाची दुरुस्ती अथवा इतर कोणत्या बाबतीत मदत करायला सांगितलं आहे का? या कामांमध्ये जे बांधव हातभार लावतात त्यांचा अनुभव आहे की त्यांना या कामांत खूप आनंद मिळतो.

जे स्वयंसेवक संघटनेच्या प्रकल्पांत भाग घेतात ते सहसा नवीन मित्र बनवतात (परिच्छेद ११ पाहा)

११. बांधकाम प्रकल्पांमध्ये काम केल्याने एका बहिणीला कोणते फायदे झाले?

११ बांधकाम प्रकल्पांमध्ये जे स्वयंसेवक म्हणून काम करतात त्यांना सहसा पुष्कळ नवीन मित्र बनवता येतात. मारजी नावाच्या बहिणीने १८ वर्षं राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक तरुण बहिणींना प्रशिक्षण देण्यात मदत केली आहे. ती म्हणते की हा एकमेकांना उत्तेजन देण्याचा खूप चांगला मार्ग आहे. (रोम. १:१२) तिच्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा प्रकल्पांमध्ये तिच्यासोबत ज्यांनी काम केलं त्या मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिलं. तुम्ही कधी बांधकाम प्रकल्पांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे का? तुमच्याकडे जरी काही खास कौशल्य नसलं तरी तुम्ही अशा प्रकल्पामध्ये हातभार लावू शकता.

१२. नैसर्गिक आपत्तीनंतर तुम्ही कशी मदत करू शकता?

१२ नैसर्गिक आपत्तीनंतर आपल्या बांधवांना मदत करण्याद्वारेही आपण यहोवासोबत काम करू शकतो. जसं की, दान देण्याद्वारे. (योहा. १३:३४, ३५; प्रे. कार्ये ११:२७-३०) आपत्तीनंतर साफसफाई किंवा दुरुस्तीच्या कामात हातभार लावण्याद्वारेही आपण मदत करू शकतो. पोलंडची एक बहीण गॅब्रीएला हिच्या घराचं पूरामुळे खूप नुकसान झालं होतं. पण  मदतीला आलेल्या जवळच्या मंडळीतल्या बंधुभगिनींना जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. त्या प्रसंगाबद्दल सांगताना ती म्हणते, की तिने कोणत्या गोष्टी गमावल्या त्याबद्दल ती जास्त विचार करत नाही, तर त्याऐवजी तिने काय मिळवलं त्यावर ती लक्ष केंद्रित करते. ती म्हणते: “या अनुभवावरून मला आणखी जास्त खात्री पटलीये, की ख्रिस्ती मंडळीचा भाग असणं एक खास सुहक्क आहे. तसंच, यामुळे आपण आनंदीही राहू शकतो.” ज्या लोकांना नैसर्गिक आपत्तीनंतर मदत मिळाली त्यांनाही असाच अनुभव आला आहे असं ते म्हणतात. शिवाय जे बांधव यहोवासोबत काम करून इतरांना मदत करतात तेदेखील यामुळे समाधान आणि आनंद अनुभवतात.—प्रेषितांची कार्ये २०:३५; २ करिंथकर ९:६, ७ वाचा.

१३. आपण स्वयंसेवक म्हणून काम करतो तेव्हा आपलं यहोवावरचं प्रेम कसं वाढतं? एक उदाहरण द्या.

१३ दुसऱ्‍या देशात युद्ध चालू असल्यामुळे तिथले बंधुभगिनी अमेरिकेला पळून आले. तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्‍या स्टेफनी नावाच्या बहिणीने आणि तिच्या क्षेत्रात राहणाऱ्‍या इतर साक्षीदारांनी त्यांना मदत करण्याद्वारे देवासोबत काम केलं. त्यांनी या निर्वासितांना घर शोधण्यासाठी आणि घरात लागणारं फर्निचर घेण्यासाठी मदत केली. ती म्हणते: “जागतिक बंधुप्रेम अनुभवल्यामुळे त्यांना झालेला आनंद आणि त्यांनी दाखवलेली कृतज्ञता आमच्या मनाला भिडली. त्या कुटुंबांना वाटतं की आम्ही त्यांना मदत केली, पण खरंतर त्यांनीच आम्हाला मदत केली. त्यांचं प्रेम, विश्‍वास, ऐक्य आणि यहोवावरचा भरवसा पाहून आमचं यहोवावरचं प्रेम वाढलंय आणि त्याच्या संघटनेद्वारे तो आपल्याला ज्या सर्व गोष्टी पुरवतो त्याबद्दल आमची कदर आणखी वाढलीये.”

आपली सेवा वाढवा

१४, १५. (क) यशया संदेष्ट्याने कशी मनोवृत्ती दाखवली? (ख) आज ख्रिस्ती यशयासारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकतात?

१४ तुम्हाला यहोवासोबत आणखी जास्त काम करायला आवडेल का? जिथे प्रचारकांची जास्त गरज आहे तिथे तुम्ही जायला तयार आहात का? पण उदारता दाखवण्यासाठी दूर गेलंच पाहिजे हे गरजेचं नाही. पण काही बंधुभगिनींची परिस्थिती अनुकूल आहे आणि ते दूर जाऊन सेवा करू शकतात. अशांची मनोवृत्ती यशया संदेष्ट्यासारखी आहे. जेव्हा यहोवाने विचारलं: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा तो म्हणाला: “हा मी आहे, मला पाठव.” (यश. ६:८) यहोवाच्या संघटनेला मदत करण्याची तुमची इच्छा आहे का? तसं करण्यासाठी तुमची परिस्थिती अनुकूल आहे का? तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी मदत करू शकता?

१५ येशूने प्रचारकार्य आणि शिष्य बनवण्याच्या कार्याबद्दल म्हटलं: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करण्यासाठी कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.” (मत्त. ९:३७, ३८) जिथे प्रचारकांची जास्त गरज आहे तिथे तुम्ही पायनियर म्हणून सेवा करू शकता का? किंवा इतर कोणी असं करायला तयार असेल तर त्यांना तुम्ही मदत करू शकता का? अनेक बंधुभगिनींना वाटतं की देवासाठी आणि शेजाऱ्‍यांसाठी प्रेम दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन पायनियरींग करणं. तुम्ही आणखी कोणत्या मार्गाने सेवा वाढवू शकता? आपली सेवा वाढवल्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.

१६, १७. यहोवाची सेवा वाढवण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत?

१६ तुम्ही बेथेलमध्ये सेवा करायला किंवा बांधकाम प्रकल्पांमध्ये थोडा काळ किंवा आठवड्यात एक अथवा काही दिवस मदत करायला तयार आहात का? संघटनेला जिथे गरज आहे तिथे जाऊन सेवा करणाऱ्‍या आणि पडेल ते काम करण्यासाठी तयार असणाऱ्‍या बंधुभगिनींची नेहमी गरज असते. मग त्यांना इतर कामाचा अनुभव असला तरी संघटना त्यांचा वापर करते. त्याग करायला आणि जास्त गरज असलेल्या ठिकाणी जायला जो कोणी स्वेच्छेने तयार असतो त्या प्रत्येकाला यहोवा मौल्यवान समजतो.—स्तो. ११०:३.

१७ यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी तुम्हाला जास्त प्रशिक्षण हवं आहे का? तुम्ही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरू शकता. ही प्रशाला यहोवाची पूर्णवेळेची सेवा करणाऱ्‍या प्रौढ बंधुभगिनींना प्रशिक्षण देते. यामुळे यहोवाची संघटना त्यांचा आणखी जास्त वापर करू शकते. प्रशालेतल्या विद्यार्थ्यांना जिथे कुठे सेवा करायला पाठवलं जाईल तिथे जाण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. यहोवाची जास्त सेवा करण्याचा हादेखील एक मार्ग आहे.—१ करिंथ. ९:२३.

१८. यहोवासोबत रोज काम करण्याचे कोणते फायदे आहेत?

१८ आपण यहोवाचे लोक असल्यामुळे उदारता, दया, चांगुलपणा आणि प्रेम हे गुण दाखवतो. आपण प्रत्येक दिवशी इतरांची काळजी करतो. यामुळे आपल्याला आनंद आणि शांती अनुभवायला मिळते. (गलती. ५:२२, २३) तुमची परिस्थिती कशीही असो, जोपर्यंत तुम्ही यहोवाच्या उदारतेचं अनुकरण कराल तोपर्यंत तुम्ही आनंदी राहाल आणि त्याचे एक मौल्यवान सहकारी ठराल!—नीति. ३:९, १०.