अभ्यास लेख ४३
‘तो तुम्हाला बळ देईल’—कसं?
“[यहोवा] तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल आणि स्थिर उभं राहायला मदत करेल.”—१ पेत्र ५:१०.
गीत ३८ तो तुला बळ देईल
सारांश a
१. प्राचीन काळातले देवाचे सेवक ताकदवान होते असं का म्हणता येईल?
बायबलमध्ये देवाच्या विश्वासू सेवकांचं वर्णन करताना ते खूप ताकदवान आणि खंबीर होते असं म्हटलंय. पण त्यांच्यातल्या सगळ्यात ताकदवान व्यक्तीलासुद्धा नेहमीच तसं वाटलं नाही. उदाहरणार्थ, काही प्रसंगी दावीदला वाटलं की तो ‘पर्वतासारखाच खंबीर’ आहे. पण इतर वेळी तो खूप “भयभीत” झाला. (स्तो. ३०:७) शमशोनला जेव्हा देवाची पवित्र शक्ती मिळाली तेव्हा तो खूप शक्तिशाली बनला, पण त्याला याचीही जाणीव होती की जर देवाने त्याला मदत केली नाही तर ‘त्याची शक्ती जाईल आणि तो इतर माणसांसारखाच होईल.’ (शास्ते १४:५, ६; १६:१७) या विश्वासू सेवकांना देवाच्या मदतीमुळेच सामर्थ्य मिळालं होतं.
२. पौलने ‘मी दुर्बळ असतो तेव्हाच मी ताकदवान होतो’ असं का म्हटलं? (२ करिंथकर १२:९, १०)
२ प्रेषित पौलला याची जाणीव होती की त्यालासुद्धा देवाकडून मिळणाऱ्या शक्तीची गरज आहे. (२ करिंथकर १२:९, १० वाचा.) आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखं पौललासुद्धा आरोग्याच्या समस्या होत्या. (गलती. ४:१३, १४) कधीकधी तर योग्य ते करण्यासाठीसुद्धा त्याला संघर्ष करावा लागायचा. (रोम. ७:१८, १९) काही वेळा तर तो निराश व्हायचा आणि आपल्यासोबत पुढे काय होईल याची त्याला काळजी असायची. (२ करिंथ. १:८, ९) पण जेव्हा पौल कमजोर होता तेव्हाच तो ताकदवान बनला. ते कसं? त्याला लागणारी शक्ती यहोवाने त्याला दिली. आणि पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवाने त्याला बळ दिलं.
३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?
३ यहोवा आपल्यालासुद्धा बळ देण्याचं वचन देतो. (१ पेत्र ५:१०) पण जोपर्यंत आपण स्वतः मेहनत घेत नाही, तोपर्यंत यहोवा आपल्याला मदत करेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्यापुढे जेवणाचं ताट वाढून ठेवलं असेल, पण जोपर्यंत आपण स्वतः हाताने घेऊन खात नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा आस्वाद घेता येणार नाही आणि त्यापासून आपल्याला फायदा होणार नाही. त्याच प्रकारे यहोवा आपल्याला बळ द्यायला तयार आहे. पण त्यासाठी आपण स्वतः पावलं उचलली पाहिजेत. आपल्याला बळ देण्यासाठी यहोवाने काय केलंय? आणि त्यातून फायदा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी आपण बायबलमधल्या तीन उदाहरणांवर विचार करू या. ती उदाहरणं म्हणजे, योना संदेष्टा, येशूची आई मरीया आणि प्रेषित पौल. त्यांना बळ देण्यासाठी यहोवाने काय केलं ते आपण पाहू या. तसंच यहोवा आजसुद्धा त्याच्या सेवकांना बळ देण्यासाठी काय करतो तेही आपण पाहू या.
प्रार्थना आणि अभ्यास करून बळ मिळवा
४. आपण यहोवाकडून बळ कसं मिळवू शकतो?
४ यहोवाकडून बळ मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. आपण प्रार्थना केल्यानंतर यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देतो. (२ करिंथ. ४:७) तसंच आपण जेव्हा बायबल वाचतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हासुद्धा आपल्याला बळ मिळू शकतं. (स्तो. ८६:११) कारण यहोवाचं वचन “प्रभावशाली” आहे. (इब्री ४:१२) आपण जर यहोवाला प्रार्थना केली आणि बायबल वाचलं, तर धीर धरण्यासाठी, आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी किंवा एखादी कठीण नेमणूक पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला बळ देईल. त्याने योना संदेष्ट्याला कसं बळ दिलं ते आता आपण पाहू या.
५. योना संदेष्ट्याला धैर्याची गरज का होती?
५ योना संदेष्ट्यालासुद्धा धैर्याची गरज होती. यहोवाने त्याला एक कठीण काम दिलं होतं. पण हे काम न करता तो उलट दिशेला पळून गेला. याचा परिणाम असा झाला की तो एका भयंकर वादळात सापडला. आणि यामुळे त्याचा आणि जहाजात त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचा जीवसुद्धा जाणार होता. म्हणून त्याच्या सांगण्यावरून लोकांनी त्याला समुद्रात फेकून दिलं. पण त्या खोल समुद्रात एका मोठ्या माशाने त्याला गिळून टाकलं. विचार करा योनाला कसं वाटलं असेल! आता आपण मरणारच आहोत असं त्याला वाटलं असेल का? यहोवाने आपल्याला सोडून दिलंय असा विचार तो करत असेल का? योनाच्या मनात किती घालमेल होत असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो.
६. योना २:१, २, ७ या वचनांप्रमाणे माशाच्या पोटात असताना योनाला बळ कुठून मिळालं?
६ त्या माशाच्या पोटात, अंधाऱ्या ठिकाणी बळ मिळवण्यासाठी योनाने काय केलं? एक गोष्ट म्हणजे, त्याने यहोवाला प्रार्थना केली. (योना २:१, २, ७ वाचा.) त्याने यहोवाची आज्ञा मोडली होती. पण त्याला या गोष्टीची खातरी होती की यहोवा नम्र आणि पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो. तसंच, प्रार्थना करण्यासोबतच योनाने शास्त्रवचनांवरसुद्धा विचार केला. असं आपण का म्हणू शकतो? योना पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायात त्याच्या प्रार्थनेवरून आपल्याला हे कळतं. त्यात स्तोत्र पुस्तकात उल्लेख केलेले शब्द आणि वाक्यांश आपल्याला जसेच्या तसे वाचायला मिळतात. (उदाहरणार्थ, योना २:२, ५ ची तुलना स्तोत्र ६९:१; ८६:७ सोबत करा.) यावरून स्पष्ट होतं की योनाला ही वचनं चांगल्या प्रकारे माहीत होती. कठीण काळात असताना या वचनांवर मनन केल्यामुळे यहोवा आपल्याला नक्की मदत करेल याची त्याला खातरी होती. पुढे त्या माशाने योनाला कोरड्या जमिनीवर ओकून टाकलं. आणि नंतर यहोवाने दिलेलं काम करण्यासाठी योना तयार झाला.—योना २:१०–३:४.
७-८. समस्यांचा सामना करत असताना तैवानमधल्या भावाला बळ कसं मिळालं?
७ आपण जेव्हा वेगवेगळ्या परीक्षांमधून जात असतो, तेव्हा योनाच्या उदाहरणामुळे आपल्याला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, तैवानमध्ये राहणाऱ्या झिमिंग b नावाच्या भावाला गंभीर आरोग्याच्या समस्या आहेत. यासोबतच, त्याला त्याच्या विश्वासामुळे घरच्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. यहोवाला प्रार्थना करून आणि अभ्यास करून त्याला या गोष्टीचा सामना करण्यासाठी बळ मिळतं. तो म्हणतो: “जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा मी इतका दुःखी असतो, की व्यक्तिगत अभ्यास करायलासुद्धा माझ्यात शक्ती उरत नाही.” पण तो हार मानत नाही. याबद्दल तो म्हणतो: “सगळ्यात आधी मी यहोवाला प्रार्थना करतो. नंतर मी आपली राज्य गीतं ऐकतो. कधीकधी तर जोपर्यंत माझं मन शांत होत नाही तोपर्यंत मी ही गीतं गुणगुणत असतो. आणि त्यानंतर मी अभ्यास करायला सुरू करतो.”
८ व्यक्तिगत अभ्यासामुळे झिमिंगने विचारही केला नसेल अशा पद्धतीने त्याला समस्यांचा सामना करायला बळ मिळालं. उदाहरणार्थ, एका मोठ्या ऑपरेशनमधून तो बरा होत होता, तेव्हा नर्सने त्याला सांगितलं की त्याच्या लाल रक्त पेशी कमी झाल्यामुळे त्याला रक्त घ्यावं लागेल. पण अशा परिस्थितीतही झिमिंग त्याच्या विश्वासात टिकून राहिला. तो हे कसं करू शकला? त्याच्या ऑपरेशनच्या आदल्या दिवशी त्याने एका बहिणीच्या अनुभवाबद्दल वाचलं होतं. तिचंही त्याच्यासारखंच ऑपरेशन झालं होतं. तिच्या लाल रक्त पेशी तर त्याच्यापेक्षाही खूप कमी झाल्या होत्या, पण तरी तिने रक्त घेतलं नाही. आणि ती तिच्या आजारातूनही बरी झाली. या अनुभवामुळे झिमिंगला विश्वासात टिकून राहण्यासाठी बळ मिळालं.
९. समस्यांमुळे तुम्ही निराश झाला असाल, तर तुम्ही काय करू शकता? (चित्रंसुद्धा पाहा.)
९ एखाद्या समस्येतून जात असताना तुम्ही इतके निराश होऊन जाता का, की तुम्हाला प्रार्थनाच करावीशी वाटत नाही? किंवा तुम्ही इतके थकून जाता का, की तुम्हाला अभ्यास करायची इच्छाच होत नाही? लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही एक साधीशी प्रार्थना जरी केली, तरी तुम्हाला ज्या गोष्टीची नेमकी गरज आहे ती तो तुम्हाला देईल, याची तुम्ही खातरी बाळगू शकता. (इफिस. ३:२०) तुम्हाला कदाचित शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे बायबल वाचणं आणि अभ्यास करणं कठीण जात असेल. अशा वेळी तुम्ही बायबल किंवा बायबल आधारित प्रकाशनांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकू शकता. तसंच आपल्या वेबसाईटवर तुम्ही एखादं गाणं किंवा एखादा व्हिडिओ पाहू शकता. यहोवाकडून बळ मिळवण्यासाठी तुम्ही त्याला प्रार्थना करू शकता, तसंच त्याने ज्या आध्यात्मिक तरतुदी केल्या आहेत त्यांतून तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं मिळतं ते पाहू शकता. यावरून दिसून येईल की तुम्ही त्याची मदत स्वीकारत आहात.
भाऊबहिणींकडून प्रोत्साहन मिळवा
१०. आपल्या भाऊबहिणींमुळे आपल्याला बळ कसं मिळतं?
१० यहोवा आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करून, आपल्याला बळ देऊ शकतो. आपण जेव्हा एखाद्या परीक्षेतून जात असतो किंवा एखादी नेमणूक पूर्ण करणं आपल्याला कठीण वाटतं, तेव्हा भाऊबहिणींकडून आपल्याला “खूप सांत्वन” मिळू शकतं. (कलस्सै. ४:१०, ११) खासकरून, “दुःखाच्या प्रसंगी” आपल्याला त्यांची गरज असते. (नीति. १७:१७) जेव्हा आपण कमजोर असतो, तेव्हा हे भाऊबहीण आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवू शकतात. तसंच ते आपल्याला भावनिक आणि आध्यात्मिक रितीनेसुद्धा मदत करू शकतात. येशूची आई मरीया हिला इतरांकडून मदत कशी मिळाली हे आता आपण पाहू या.
११. मरीयाला धैर्याची गरज का होती?
११ मरीयालासुद्धा धैर्याची गरज होती. जेव्हा गब्रीएल स्वर्गदूताने तिच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली तेव्हा तिला कसं वाटलं असेल याचा विचार करा. तिचं लग्न झालं नव्हतं तरीही ती गरोदर राहणार होती. तिला मुलं वाढवण्याचा काहीच अनुभव नव्हता. पण तरी तिला अशा एका बाळाला वाढवायचं होतं, जे पुढे जाऊन मसीहा बनणार होतं. तिने कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते, पण तरी ती आई बनणार होती. आणि आता ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्या योसेफला हे सगळं कसं समजावून सांगायचं, हा प्रश्नसुद्धा तिच्यासमोर होता.—लूक १:२६-३३.
१२. लूक १:३९-४५ प्रमाणे मरीयाला बळ कुठून मिळालं?
१२ ही अनोखी आणि कठीण जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मरीयाला कुठून बळ मिळालं? यासाठी तिने इतरांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तिने गब्रीएल स्वर्गदूताला तिच्यावर असलेल्या या जबाबदारीबद्दल आणखी माहिती विचारली. (लूक १:३४) याच्या काही काळानंतर ती तिची नातेवाईक अलीशिबा हिला “डोंगराळ प्रदेशातल्या यहूदाच्या एका शहरात” भेटायला गेली. आणि यामुळे मरीयाला फायदा झाला. कारण अलीशिबाने मरीयाचं कौतुक केलं आणि मरीयाच्या होणाऱ्या बाळाबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने तिला प्रेरित केलं. (लूक १:३९-४५ वाचा.) यामुळे मरीयाला आनंद झाला आणि तिने म्हटलं, की यहोवाने “आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवलाय.” (लूक १:४६-५१) अशा प्रकारे गब्रीएल स्वर्गदूताद्वारे आणि अलीशिबाद्वारे यहोवाने मरीयाला बळ दिलं.
१३. इतर भाऊबहिणींची मदत घेतल्यामुळे बोलिव्हियामध्ये राहणाऱ्या बहिणीला कशी मदत झाली?
१३ मरीयाप्रमाणेच तुम्हालाही भाऊबहिणींकडून बळ मिळू शकतं. बोलिव्हियामध्ये दसूरी नावाच्या बहिणीलाही मदतीची गरज होती. तिच्या वडिलांना एक गंभीर आजार झाला होता आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्या वेळी दसूरीला तिच्या वडिलांची होताहोईल तितकी काळजी घ्यायची होती. (१ तीम. ५:४) पण हे नक्कीच तिच्यासाठी सोपं नव्हतं. याबद्दल ती म्हणते: “बऱ्याच वेळा मला असं वाटत होतं की आता आपल्याला हे जमणार नाही.” पण मग तिने कोणाची मदत घेतली का? सुरुवातीला तर तिने मदत घेतली नाही. ती म्हणते: “मला भाऊबहिणींना त्रास द्यायचा नव्हता. मी असा विचार करत होते, की मला ज्या मदतीची गरज आहे ती यहोवाच मला पुरवू शकतो. पण नंतर मला हे जाणवलं, की स्वतःला इतरांपासून वेगळं करून मी माझी समस्या एकटीनेच सोडवायचा प्रयत्न करत होते.” (नीति. १८:१) मग पुढे तिने काय केलं? तिने काही भाऊबहिणींना पत्रं लिहिली. आणि त्यांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. ती म्हणते: “भाऊबहिणींमुळे मला किती बळ मिळालं ते मला शब्दांत सांगता येणार नाही. ते मला हॉस्पिटलमध्ये जेवण आणून द्यायचे आणि मला सांत्वन मिळेल अशी वचनं दाखवायचे. आपण एकटे नाही, ही भावनाच ताकद देणारी आहे. खरंच, आपण यहोवाच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत. एक असं कुटुंब जे गरजेच्या वेळी मदतीचा हात द्यायला, सोबत मिळून अश्रू गाळायला आणि समस्येचा सामना करायला नेहमी तयार असतं.”
१४. आपण मंडळीतल्या वडिलांकडून मदत का घेतली पाहिजे?
१४ यहोवा आपल्याला आणखी एका मार्गाने बळ देतो. तो म्हणजे मंडळीतल्या वडिलांद्वारे. ते यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला बळ मिळतं आणि आपण ताजेतवाने होतो. (यश. ३२:१, २) म्हणून जेव्हा तुम्ही चिंतेत असता, तेव्हा तुमच्या समस्यांबद्दल वडिलांशी बोला. आणि जेव्हा ते तुम्हाला मदत करतात तेव्हा आनंदाने ती मदत स्वीकारा. कारण त्यांच्याद्वारेच यहोवा आपल्याला मजबूत करतो.
भविष्याच्या आशेतून बळ मिळवा
१५. सर्व ख्रिश्चनांना कोणती आशा आहे?
१५ बायबलमधल्या आशेमुळे आपल्याला ताकद मिळते. (रोम. ४:३, १८-२०) ख्रिस्ती या नात्याने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा आहे. मग ते स्वर्गातलं जीवन असो किंवा पृथ्वीवरच्या नंदनवनातलं जीवन असो. या आशेमुळे आपल्याला परीक्षांचा सामना करण्यासाठी, आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बळ मिळतं. (१ थेस्सलनी. १:३) याच आशेमुळे प्रेषित पौललासुद्धा मदत झाली.
१६. प्रेषित पौलला ताकदीची गरज का होती?
१६ पौललासुद्धा ताकदीची गरज होती. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात त्याने स्वतःची तुलना मातीच्या भांड्याशी केली. कारण मातीचं भांडं खूप कमजोर असतं. प्रेषित पौलवर सगळ्या बाजूंनी “दबाव” होता. त्याच्यावर अशी परिस्थिती आली की तो ‘गोंधळात’ पडला, त्याचा “छळ” करण्यात आला आणि त्याला जणू “खाली पाडलं” गेलं. इतकंच काय तर त्याचा जीवसुद्धा धोक्यात होता. (२ करिंथ. ४:८-१०) पौलने हे शब्द त्याच्या तिसऱ्या मिशनरी दौऱ्यादरम्यान लिहिले होते. पण त्या वेळी त्याला हे माहीत नव्हतं, की पुढे त्याला आणखी बरीच संकटं सोसावी लागणार होती. कारण पुढे त्याला जमावाकडून मारहाण झाली, त्याला अटक करण्यात आली, तो ज्या जहाजातून प्रवास करत होता ते जहाज फुटलं. तसंच त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं.
१७. २ करिंथकर ४:१६-१८ प्रमाणे पौलला त्याच्यावर आलेल्या परीक्षांचा सामना करण्यासाठी कशामुळे बळ मिळालं?
१७ पौलने त्याच्या आशेवर लक्ष दिल्यामुळे त्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळालं. (२ करिंथकर ४:१६-१८ वाचा.) त्याने करिंथकरांना सांगितलं की त्याचं शरीर जरी “हळूहळू झिजत” असलं तरी तो निराश होणार नाही. त्याला ज्या परीक्षा सहन कराव्या लागल्या, त्यांच्यापेक्षा स्वर्गातल्या जीवनाची आशा त्याच्यासाठी “कितीतरी पटीने श्रेष्ठ” होती. पौलने त्याच्या आशेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याची मनोवृत्ती “दिवसेंदिवस नवीन” होत गेली.
१८. तिहोमीर आणि त्याच्या कुटुंबाला भविष्याच्या आशेमुळे कसं बळ मिळालं?
१८ बल्गेरियामध्ये राहणाऱ्या तिहोमीर नावाच्या भावालाही त्याच्या आशेमुळे हिंमत मिळाली. काही वर्षांआधी त्याचा लहान भाऊ द्राव्हको याचा एका अपघातात मृत्यू झाला. यामुळे तिहोमीर दुःखात बुडून गेला. या दुःखातून सावरण्यासाठी तिहोमीर आणि त्याच्या कुटुंबाने पुनरुत्थानाच्या आशेवर मनन केलं. तो म्हणतो: “आम्ही त्याला कुठे भेटणार, तो येईल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी काय जेवण बनवणार, तो आल्यावर आम्ही सर्वात आधी कोणाला घरी बोलवणार, तसंच शेवटच्या दिवसांमध्ये काय घडलं याबद्दल आम्ही त्याला कायकाय सांगणार, या गोष्टींवर आम्ही चर्चा करायचो.” अशा प्रकारे भविष्याच्या आशेवर विचार केल्यामुळे त्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी त्याच्या कुटुंबाला बळ मिळालं. तसंच यहोवा त्याच्या भावाला पुन्हा उठवेल तो दिवस येईपर्यंत वाट पाहायलासुद्धा त्यांना मदत झाली.
१९. आपण आपली आशा मजबूत कशी करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१९ तुम्हीसुद्धा तुमची आशा कशी मजबूत करू शकता? तुम्हाला जर पृथ्वीवर कायम जगण्याची आशा असेल तर बायबलमध्ये नंदनवन पृथ्वीचं जे वर्णन केलं आहे, ते वाचा आणि त्यावर मनन करा. (यश. २५:८; ३२:१६-१८) नवीन जगात जीवन कसं असेल याचा विचार करा. तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात अशी कल्पना करा. तिथे तुम्हाला कोणकोण दिसतंय? कोणकोणते आवाज तुमच्या कानावर पडत आहेत? तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय? याची कल्पना करा. तुमच्या कल्पनाशक्तीला आणखी चालना देण्यासाठी आपल्या प्रकाशनांमधली नंदनवनाची चित्रं पाहा. किंवा मग जब दुनिया होगी नयी, बस चार कदम आगे किंवा कैसा समाँ होगा यांसारखे व्हिडिओ पाहा. जर अशा प्रकारे आपण नवीन जगाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवली, तर आपल्याला आपल्या समस्या ‘तात्पुरत्या आणि हलक्या’ वाटतील. (२ करिंथ. ४:१७) यहोवाने आपल्याला जी आशा दिली आहे, त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळतं.
२०. आपल्याला कमजोर असल्यासारखं वाटत असलं, तरी आपण बळ कसं मिळवू शकतो?
२० आपल्याला जरी खूप कमजोर असल्यासारखं वाटत असलं, तरी देवाकडून आपण ताकद मिळवू शकतो. (स्तो. १०८:१३) यहोवाकडून बळ मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या त्याने आपल्याला आधीच पुरवल्या आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमची नेमणूक पूर्ण करण्यासाठी, समस्येचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदतीची गरज असते, तेव्हा यहोवाला कळकळून प्रार्थना करा. आणि व्यक्तिगत अभ्यास करून त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवा. तसंच भाऊबहिणींकडून मिळणारं प्रोत्साहन स्वीकारा. आणि आपल्या आशेवर मनन करण्यासाठी वेळ काढा. असं केल्यामुळे “सहनशक्ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा, म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्तीने ताकद” मिळेल.—कलस्सै. १:११.
गीत ३३ आपला भार यहोवावर टाक
a काहींना कदाचित त्यांच्यावर आलेल्या परीक्षांमुळे खूप भारावून गेल्यासारखं वाटत असेल. किंवा त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांच्या क्षमतेपलीकडे आहे असं वाटत असेल. अशा भाऊबहिणींना या लेखामुळे मदत होईल. यहोवा आपल्याला कसं बळ देतो आणि त्याची मदत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, हे या लेखात आपण पाहू या.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.
c चित्राचं वर्णन: मूकबधिर असलेली एक बहीण बायबलमधल्या अभिवचनांवर विचार करत आहे. नवीन जगात आपलं जीवन कसं असेल याची आणखी चांगल्या प्रकारे कल्पना करता यावी म्हणून ती संगीत व्हिडिओ पाहत आहे.