१९२१—शंभर वर्षांआधी
“या वर्षी कोणतं महत्त्वाचं काम आपल्यासमोर आहे जे आपण केलं पाहिजे?” १ जानेवारी १९२१ च्या टेहळणी बुरूज अंकात बायबल विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देण्यासाठी यशया ६१:१, २ हे वचन दिलं होतं. या वचनाने त्यांना प्रचार करण्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली. त्या वचनात असं सांगितलं आहे: ‘दीनदुबळ्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवाने माझा अभिषेक केला आहे. यहोवाच्या कृपेचं वर्ष जाहीर करण्यासाठी, सूड उगवण्याच्या आमच्या देवाच्या दिवसाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.’
धैर्याने प्रचार करणारे
प्रचाराचं हे काम करण्यासाठी बायबल विद्यार्थ्यांना धैर्याची खूप गरज होती. कारण त्यांना दीनदुबळ्यांना ‘आनंदाचा संदेश’ तर सांगायचा होताच, पण त्यासोबतच दुष्ट लोकांना देवाच्या ‘सूडाच्या दिवसाबद्दलही’ सांगायचं होतं.
उदाहरणार्थ, कॅनडामध्ये राहणारे बंधू जे. एच. हॉस्कीन यांनी भयंकर विरोध होत असतानाही धैर्याने साक्ष दिली. १९२१ मध्ये त्यांना मेथडिस्ट चर्चचे एक पाळक भेटले. बंधू हॉस्कीन त्यांना म्हणाले: “बायबलविषयी आपण मनमोळलेपणे बोलू या. आणि काही गोष्टींच्या बाबतीत आपले विचार जुळले नाहीत, तरी काय हरकत नाही. आपण आपली चर्चा शांतीने थांबवू या.” पण असं मुळीच झालं नाही. कारण बंधू हॉस्कीन यांनी म्हटलं: “आम्ही चर्चा करायला सुरवात केली, पण काही मिनिटांतच पाळकांनी दारावर इतक्या जोरात मारलं, की दाराच्या खिडकीची काच फुटते की काय असं मला वाटलं.”
पाळक ओरडून म्हणाले: “जे ख्रिश्चन नाहीत ना, त्यांना हे सगळं जाऊन सांगा.” तेव्हा बंधू हॉस्कीनने त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. पण निघताना ते मनातल्या मनात म्हणाले, ‘मी तेच तर करत होतो!’
पण त्या पाळकांचा राग तेवढ्यावरच शांत झाला नाही. दुसऱ्या दिवशी चर्चेमध्ये प्रवचन देताना बंधू हॉस्कीनबद्दल तो खूप वाईटसाईट बोलला. बंधू हॉस्कीन म्हणतात: “त्यांनी चर्चमधल्या लोकांना असं सांगितलं, की आजपर्यंत मी इतका लबाड माणूस पाहिला नव्हता. अशा व्यक्तीला गोळ्या घालून मारलं पाहिजे.” पण बंधू हॉस्कीन जरासुद्धा घाबरले नाहीत. ते प्रचार करत राहिले आणि लोकांनीही त्यांचं चांगलं ऐकून घेतलं. ते पुढे म्हणाले: “प्रचारकार्यात मला इतका आनंद कधीच मिळाला नव्हता. काही लोकांनी तर मला असंही म्हटलं, ‘आम्हाला माहितीए तुम्ही देवाचं काम करता! तुम्हाला काही मदत हवी असेल तर नक्की सांगा.’”
वैयक्तिक आणि कौटुंबिक अभ्यास
ज्यांना बायबलबद्दल आणखी जाणून घ्यायची आणि प्रगती करायची इच्छा होती, त्यांच्यासाठी द गोल्डन एज या मासिकात एक बायबल अभ्यासक्रम दिला जायचा. त्या अभ्यासक्रमात, लहान मुलांसाठी काही प्रश्न दिले जायचे. आणि आईवडील ते प्रश्न मुलांना विचारून त्यांवर चर्चा करायचे. काही प्रश्न असे होते की त्यांमुळे मुलांना बायबलबद्दल छोट्याछोट्या गोष्टी शिकायला मिळायच्या. जसं की: “बायबलमध्ये किती पुस्तकं आहे?” तर काही प्रश्न असे असायचे, की त्यामुळे त्यांना धैर्याने साक्ष द्यायला मदत व्हायची. जसं की: “प्रत्येक खऱ्या ख्रिश्चनाचा छळ केला जाईल का?”
ज्यांना बायबलची चांगली समज होती अशा बायबल विद्यार्थ्यांसाठीसुद्धा द गोल्डन एज या मासिकात प्रश्न आणि
उत्तरं दिली जायची. ही उत्तरं स्टडीज इन द स्क्रिप्चर्स या पुस्तकातून घेतली होती. या अभ्यासक्रमामुळे हजारो वाचकांना फायदा झाला. पण २१ डिसेंबर १९२१ च्या द गोल्डन एज मासिकात असं सांगण्यात आलं, की हे दोन्ही अभ्यासक्रम आता छापले जाणार नाहीत. अचानक हा बदल का करण्यात आला?एक नवीन पुस्तक!
त्या वेळी संघटनेत पुढाकार घेणाऱ्या बांधवांना जाणवलं, की नवीन बायबल विद्यार्थ्यांनी बायबलचा पद्धतशीरपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे नोव्हेंबर १९२१ मध्ये द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. जे लोक हे पुस्तक घ्यायचे त्यांना एका बायबल अभ्यासक्रमात सामील केलं जायचं. या अभ्यासक्रमामुळे “मानवांना सर्वकाळाचं जीवन देण्याचा देवाचा उद्देश” वाचकांना समजणार होता. हा अभ्यासक्रम प्रत्येकाने स्वतःच पूर्ण करायचा होता. या अभ्यासक्रमात कोणकोणत्या गोष्टी होत्या?
जो कोणी हे पुस्तक घ्यायचा त्याला एक छोटं कार्ड पाठवलं जायचं. त्यात त्याला हे सांगितलं जायचं, की पुस्तकातला कोणता भाग त्याने वाचून ठेवला पाहिजे. मग पुढच्या आठवडी त्याला आणखी एक कार्ड पाठवलं जायचं. त्यावर बरेच प्रश्न लिहिलेले असायचे. त्याने जो भाग वाचून काढला आहे त्याबद्दल ते प्रश्न असायचे. मग पुढच्या आठवडी पुस्तकातला कोणता भाग वाचून ठेवायचा हे सांगण्यासाठी त्याला परत एक कार्ड पाठवलं जायचं.
अशा प्रकारे १२ आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात प्रत्येक आठवडी एक जवळची मंडळी विद्यार्थ्याला एक नवीन कार्ड पाठवायची. सहसा मंडळीतले जे वयस्कर जण होते किंवा जे घरोघरचं प्रचार कार्य करू शकत नव्हते ते हे कार्ड पाठवायचे. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया इथे राहणाऱ्या ॲना के. गार्डनर असं म्हणतात: “माझी बहीण जास्त चालू-फिरू शकत नव्हती. त्यामुळे द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा खूप बरं वाटलं. कारण आता ती दर आठवडी कार्ड पाठवण्याचं काम करू शकत होती.” हा अभ्यासक्रम संपल्यावर विद्यार्थ्याला बायबल समजण्यासाठी आणखी मदत करता यावी म्हणून मंडळीतला एक जण त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटायचा.
आता पुढे काय?
१९२१ या वर्षाच्या शेवटी बंधू जे. एफ. रदरफर्ड यांनी सगळ्या मंडळ्यांना एक पत्र पाठवलं. पत्रात त्यांनी म्हटलं: “या वर्षी आपण जितक्या लोकांना प्रचार केला आणि बायबल समजायला मदत केली तितकं यापूर्वी कधीच केलं नव्हतं.” पुढे ते म्हणाले: “पण अजून बरंच काम बाकी आहे. त्यामुळे इतरांनाही हे आनंदाचं काम करायचं प्रोत्साहन द्या.” बंधू रदरफर्ड यांचा हा सल्ला बायबल विद्यार्थ्यांनी नक्कीच ऐकला असं म्हणता येईल, कारण १९२२ या वर्षादरम्यान कधी नव्हे इतक्या आवेशाने आणि धैर्याने बायबल विद्यार्थ्यांनी राज्याबद्दल प्रचार केला.
^ परि. 21 त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हटलं जायचं.