आपलं नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्तावर भरवसा ठेवा
“तुमच्यात प्रमुख केवळ एकच, म्हणजे ख्रिस्त आहे.”—मत्त. २३:१०.
१, २. मोशेच्या मृत्यूनंतर यहोशवावर कोणती मोठी जबाबदारी आली?
यहोवाने यहोशवाला म्हटलं: “माझा सेवक मोशे मृत्यु पावला आहे; तर आता ऊठ व ह्यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहीत ही यार्देन ओलांडून जा.” (यहो. १:१, २) यहोशवासाठी हा खूप मोठा बदल होता. त्याने मोशेचा सेवक म्हणून जवळजवळ ४० वर्षं काम केलं होतं.
२ मोशेने इस्राएली लोकांचं खूप वर्षांपर्यंत नेतृत्व केलं होतं, पण आता यहोशवा त्यांचं नेतृत्व करणार होता. त्याला लोक प्रमुख म्हणून स्वीकारतील की नाही, अशी शंका त्याच्या मनात आली असावी. (अनु. ३४:८, १०-१२) यहोशवा १:१, २ या वचनाबद्दल एका बायबलच्या संदर्भग्रंथात म्हटलं आहे, की गतकाळात किंवा आजही जेव्हा एका नेत्याच्या जागी दुसरा नेता येतो तेव्हा तो काळ त्या राष्ट्रासाठी खूप कठीण व धोकादायक असतो.
३, ४. यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे देवाने यहोशवाला कसं आशीर्वादित केलं आणि आपण कोणता प्रश्न विचारू शकतो?
३ अशा वेळी यहोशवाला चिंता वाटणं साहजिकच होतं. पण त्याने यहोवावर भरवसा ठेवला आणि वेळ न घालवता लगेच त्याच्या निर्देशनांचं पालन केलं. (यहो. १:९-११) यहोशवाने यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं व इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी एका स्वर्गदूताचा वापर केला. आणि असं दिसून येतं की हा स्वर्गदूत शब्द, म्हणजे देवाचा प्रथम पुत्र असावा.—निर्ग. २३:२०-२३; योहा. १:१.
४ यहोशवा आता इस्राएल राष्ट्राचा नवीन नेता होता. यहोवाने इस्राएली लोकांना या बदलाशी जुळवून घ्यायला मदत केली. आज आपल्या दिवसांतसुद्धा मोठमोठे बदल होत आहेत. अशा वेळी कदाचित आपण विचार करू की ‘देवाची संघटना दिवसेंदिवस प्रगती करत असताना आपल्या नियुक्त राजावर, येशूवर विश्वास ठेवण्याची आपल्याकडे कोणती कारणं आहेत?’ (मत्तय २३:१० वाचा.) या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण पाहू की यहोवाने कशा प्रकारे प्राचीन काळात त्याच्या लोकांच्या बदलत्या परिस्थितींमध्ये त्यांचं नेतृत्व केलं.
वचन दिलेल्या देशात जाण्यासाठी देवाच्या लोकांचं नेतृत्व
५. यरीहो शहराजवळ यहोशवाला कोणता वेगळा अनुभव आला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
५ इस्राएली लोकांनी यार्देन नदी ओलांडल्यानंतर यहोशवाला एक वेगळा अनुभव आला. यरीहो शहराजवळ हातात तलवार असलेला एक माणूस त्याला भेटला. यहोशवाने त्या माणसाला विचारलं: “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?” जेव्हा त्या माणसाने म्हटलं, की तो “परमेश्वराचा सेनापती” आहे तेव्हा यहोशवाला खूप आश्चर्य झालं. तो एक स्वर्गदूत होता आणि देवाच्या लोकांच्या वतीने लढायला तयार होता. (यहोशवा ५:१३-१५ वाचा.) या वचनात सांगितलं आहे की यहोवा यहोशवाशी बोलला. पण खरंतर त्याच्याशी बोलायला देवाने एका स्वर्गदूताचा वापर केला होता. आणि असं दिसून येतं की आपल्या वतीने बोलण्यासाठी देवाने या स्वर्गदूताचा इतर वेळीही वापर केला.—निर्ग. ३:२-४; यहो. ४:१, १५; ५:२, ९; प्रे. कार्ये ७:३८; गलती. ३:१९.
६-८. (क) स्वर्गदूताच्या काही सूचना कदाचित वेगळ्या का वाटल्या असतील? (ख) आपण असं का म्हणू शकतो की स्वर्गदूताने दिलेल्या सूचना सुज्ञ होत्या आणि योग्य वेळी देण्यात आल्या? (तळटीपही पाहा.)
६ यरीहो शहर जिंकण्यासाठी नक्की काय करण्याची गरज आहे याबद्दल त्या स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं. स्वर्गदूताने सुरुवातीला दिलेल्या काही सूचना कदाचित वेगळ्या वाटल्या असतील. उदाहरणार्थ, स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं की सर्व सैनिकांची सुंता केली जावी. याचा अर्थ आता त्यांना काही दिवस लढणं शक्य होणार नव्हतं. या सैनिकांची सुंता करण्याची खरंच ही योग्य वेळ होती का?—उत्प. ३४:२४, २५; यहो. ५:२, ८.
७ कदाचित त्या सैनिकांना वाटलं असेल, की ‘शत्रूंनी जर आमच्या छावणीवर हल्ला केला तर आम्ही आमच्या कुटुंबाचं कसं रक्षण करणार?’ पण काहीतरी अनपेक्षित घडलं! इस्राएली लोकांवर हल्ला करण्याऐवजी यरीहोची माणसं त्यांना घाबरू लागली. बायबल म्हणतं: “इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.” (यहो. ६:१) या बातमीमुळे, देवाच्या मार्गदर्शनावर इस्राएली लोकांचा भरवसा नक्कीच वाढला असावा!
८ एका स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं की इस्राएली लोकांनी यरीहोवर हल्ला करू नये. याऐवजी त्यांना दिवसातून एकदा, असं सहा दिवसांसाठी संपूर्ण शहराभोवती फेरी मारायची होती. पण सातव्या दिवशी मात्र त्यांना सात वेळा फेऱ्या मारायच्या होत्या. सैनिकांना कदाचित असं वाटलं असेल: ‘कशाला आपला वेळ आणि शक्ती उगाचच वाया घालवायची!’ पण इस्राएलच्या अदृश्य नेत्याला त्याच्या कार्यांवर पूर्ण भरवसा होता. त्याच्या निर्देशनांचं पालन केल्यामुळे इस्राएली लोकांचा विश्वास मजबूत झाला. तसंच, त्यांना यरीहोच्या सैनिकांशी युद्ध करण्याची गरज पडली नाही.—यहो. ६:२-५; इब्री ११:३०. *
९. देवाच्या संघटनेकडून मिळणारे निर्देशन आपण का पाळले पाहिजे? उदाहरण द्या.
९ या अहवालातून आपण काय शिकू शकतो? यहोवाची संघटना कधीकधी अशा नवनवीन पद्धती वापरते ज्या आपल्याला नेहमीच समजत नाही. उदाहरणार्थ, वैयक्तिक अभ्यास, सेवाकार्य किंवा सभा यांसाठी
मोबाईल किंवा टॅबचा वापर करणं योग्य राहील की नाही, असा प्रश्न आपल्या मनामध्ये सुरुवातीला आला असेल. पण जर आपण यांचा वापर करत असू तर त्याचे चांगले परिणाम होत असल्याचे आपण पाहू शकतो. जेव्हा आपण अशा बदलांचे सकारात्मक परिणाम पाहतो तेव्हा आपला विश्वास मजबूत होतो आणि बंधुभगिनींमधलं ऐक्य आणखीन वाढतं.येशूने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांचं नेतृत्व कसं केलं?
१०. सुंतेविषयीचा मुद्दा यरुशलेममधल्या नियमन मंडळाने हाताळावा हे खरंतर कोणी ठरवलं?
१० सुंता न झालेला विदेशी कर्नेल्य हा ख्रिस्ती बनला. याच्या जवळपास १३ वर्षांनंतरही काही यहुदी ख्रिश्चनांचं असं म्हणणं होतं की सुंता करणं गरजेचं आहे. (प्रे. कार्ये १५:१, २) अंत्युखिया शहरातल्या बांधवांमध्ये या विषयावर वाद सुरू होता. म्हणून वडिलांनी असं ठरवलं की पौलने यरुशलेमला जाऊन नियमन मंडळाला याबद्दल विचारावं. पण पौलने तिथे जावं हे खरंतर कोणी ठरवलं? पौलने म्हटलं: “एका प्रकटीकरणाद्वारे मला आज्ञा देण्यात आल्यामुळे मी तिथे गेलो.” यावरून स्पष्टच होतं की हा विषय नियमन मंडळाने हाताळावा हे येशूचंच निर्देशन होतं.—गलती. २:१-३.
११. (क) काही यहुदी ख्रिश्चनांचं सुंतेविषयी अजूनही काय मत होतं? (ख) पौलने यरुशलेममधल्या वडिलांची नम्रपणे कशी साथ दिली? (तळटीपही पाहा.)
११ ख्रिस्ताच्या निर्देशनानुसार नियमन मंडळाने हे स्पष्ट केलं की गैरयहुदी ख्रिश्चनांना सुंता करण्याची गरज नाही. (प्रे. कार्ये १५:१९, २०) तरी अनेक वर्षांनंतर बरेच यहुदी ख्रिश्चन त्यांच्या मुलांची सुंता करत होते. त्यानंतर यरुशलेममधल्या वडिलांनी अशी अफवा ऐकली, की पौल मोशेच्या नियमशास्त्राचा आदर करत नाही. म्हणून वडिलांनी पौलला असं काहीतरी करायला सांगितलं ज्यामुळे हे स्पष्ट होणार होतं की तो नियमशास्त्राचा आदर करत आहे. * (प्रे. कार्ये २१:२०-२६) त्यांनी सांगितलं की पौलने चार माणसांना मंदिरात घेऊन जावं. यावरून दिसून येणार होतं, की पौल नियमशास्त्राचा आदर करत आहे. अशा सूचनेबद्दल पौल कदाचित असं म्हणू शकला असता: ‘याला काय अर्थ आहे? तुम्ही मला का सांगताय हे करायला? समस्या मला नाही त्यांना आहे. सुंतेविषयी खरंतर या यहुदी ख्रिश्चनांनाच नीट समजलेलं नाही!’ पण पौलला समजलं की सर्व ख्रिश्चनांमध्ये ऐक्य असावं अशी वडिलांची इच्छा होती. म्हणून त्याने नम्रपणे या सूचनेचं पालन केलं. असं असलं तरी आपल्या मनात कदाचित असा प्रश्न येईल, की येशूच्या मृत्यूनंतर मोशेचं नियमशास्त्र रद्द झालं, तरीही येशूने सुंतेविषयीचा हा मुद्दा इतक्या वर्षांपर्यंत का राहू दिला?—कलस्सै. २:१३, १४.
१२. सुंतेविषयीचा वाद पूर्णपणे सोडवण्यासाठी येशूने काही काळ का जाऊ दिला असावा?
१२ एखादी नवीन समज आल्यावर तिच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागू शकतो. काही यहुदी ख्रिश्चनांना हे स्वीकारायला वेळ लागणार होता की ते आता मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. (योहा. १६:१२) कारण त्यांना अजूनही वाटायचं की सुंता करणं, हे देवासोबत असलेल्या एका खास नातेसंबंधाचं चिन्ह आहे. (उत्प. १७:९-१२) तर काहींना अशी भीती होती, की सुंता न केल्यामुळे यहुदी समाज त्यांचा छळ करेल. (गलती. ६:१२) पण काही काळानंतर येशूने त्यांना पौलच्या पत्रांद्वारे आणखीन सूचना दिल्या.—रोम. २:२८, २९; गलती. ३:२३-२५.
ख्रिस्त आजही त्याच्या मंडळीचं नेतृत्व करतो
१३. ख्रिस्ताच्या नेतृत्वाचं समर्थन करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
१३ ख्रिस्त आजही ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व करत आहे. म्हणून जर तुम्हाला संघटनेत होणारे बदल समजत नसले तर प्राचीन काळात ख्रिस्ताने देवाच्या लोकांचं नेतृत्व कसं केलं याचा विचार करा. येशूने नेहमीच देवाच्या लोकांचं सुज्ञपणे मार्गदर्शन केलं आहे, मग ते यहोशवाच्या दिवसांत असो अथवा प्रेषितांच्या काळात. यामुळे देवाच्या लोकांचं संरक्षण झालं, त्यांचा विश्वास मजबूत झाला आणि ऐक्यात राहण्यासाठी त्यांना मदत झाली.—इब्री १३:८.
१४-१६. “विश्वासू आणि बुद्धिमान दास” याच्याकडून मिळणाऱ्या निर्देशनावरून कसं कळतं की आपला विश्वास मजबूत ठेवण्यासाठी येशूला आपली मदत करण्याची इच्छा आहे?
१४ आज “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला अगदी योग्य वेळी निर्देशन देतो. (मत्त. २४:४५) यावरून आपल्याला पुरावा मिळतो की येशूला आपली काळजी आहे. मार्क नावाच्या बांधवाला चार मुलं आहेत. तो म्हणतो: “सैतान कुटुंबांवर हल्ला करण्याद्वारे मंडळींना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. दर आठवड्याला कौटुंबिक उपासना करण्याचं प्रोत्साहन मिळाल्यामुळे ‘आपल्या कुटुंबाचं रक्षण करा’ हा संदेश कुटुंबप्रमुखांना स्पष्ट झाला आहे.”
१५ ख्रिस्त आपलं नेतृत्व कसं करत आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला याची जाणीव होईल की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. उदाहरणार्थ, पॅटरीक नावाचे वडील म्हणतात: “शनिवारी-रविवारी लहान गटात भेटून सेवाकार्य करणं ही गोष्ट सुरुवातीला काही जणांना निरुत्साहित करणारी वाटली.” पण तो म्हणतो की येशू मंडळीतल्या प्रत्येकाची काळजी घेतो हे या बदलामुळे समजतं. जसं की, काही बंधुभगिनींचा स्वभाव लाजाळू आहे किंवा काही जण नेहमी प्रचाराला जात नाही, अशांना वाटतं की आता आपला जास्त उपयोग होत आहे आणि आपली कदर केली जात आहे. यामुळे त्यांचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे.
१६ प्रचारकार्य हे पृथ्वीवर होणारं सर्वात महत्त्वाचं काम आहे. या कामावर आपलं लक्ष केंद्रित राहावं यासाठीही येशू आपली मदत करतो. (मार्क १३:१० वाचा.) आंद्रे नावाच्या बांधवाला नुकतंच वडील म्हणून नियुक्त करण्यात आलं. यहोवाच्या संघटनेकडून येणाऱ्या प्रत्येक नवीन निर्देशनाचं तो पालन करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो: “शाखा कार्यालयात काम करणाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली, त्यावरून आपल्या लक्षात येतं की वेळ खूप कमी उरला आहे आणि आता आपण प्रचारकार्यात जास्त मेहनत घेण्याची गरज आहे.”
आपण ख्रिस्ताच्या निर्देशनांचं समर्थन कसं करू शकतो?
१७, १८. बदलांशी जुळवून घेतल्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर आपण लक्ष केंद्रित का केलं पाहिजे?
१७ आपला राजा येशू ख्रिस्त याच्याकडून मिळत असलेल्या निर्देशनामुळे आपल्याला आज आणि भविष्यात मदत होईल. अलीकडे झालेल्या बदलांशी जुळवून घेतल्यामुळे तुम्हाला झालेल्या फायद्यांचा विचार करा. सभांमध्ये किंवा सेवाकार्यात बदल झाल्यामुळे तुमच्या कुटुंबाला कसा फायदा झाला आहे, हे तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करू शकता.
१८ यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या निर्देशनाचं पालन केल्यामुळे चांगले परिणाम घडून येतात ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, तर त्या निर्देशनांचं आनंदाने पालन करणं आपल्याला सोपं जाईल. उदाहरणार्थ, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे आपण पूर्वीप्रमाणे जास्त साहित्यांची छपाई करत नाही आणि यामुळे आता आपल्या पैशांची बचत होत आहे. हा बदल केल्यामुळे संघटना जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश सांगू शकते. आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की ‘मी इलेक्ट्रॉनिक प्रतींचा आणि आपल्या वेबसाईटवर असलेल्या ऑडिओ-व्हिडिओचा जास्त वापर करू शकतो का?’ या मार्गानेही आपण ख्रिस्ताला समर्थन देऊ शकतो कारण ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण संघटनेच्या साधनांचा सुज्ञपणे वापर करावा.
१९. आपण ख्रिस्ताच्या निर्देशनांचं समर्थन का केलं पाहिजे?
१९ आपण जेव्हा ख्रिस्ताच्या निर्देशनाचं समर्थन करतो तेव्हा आपण आपल्या बंधुभगिनींचा विश्वास मजबूत करायला आणि त्यांना ऐक्यात राहायला मदत करतो. अलीकडे जगभरातल्या बेथेल कुटुंबाच्या संख्येत झालेल्या बदलांबद्दल आंद्रे म्हणतो: “पूर्वी बेथेलमध्ये काम करणाऱ्यांनी बदलांशी जुळवून घेण्याबाबतीत जी चांगली मनोवृत्ती दाखवली त्यामुळे माझा विश्वास आणि आदर वाढला आहे. त्यांना मिळालेली कोणतीही नेमणूक आनंदाने पूर्ण करण्याद्वारे ते यहोवाच्या रथासोबत चालत आहेत.”
आपलं नेतृत्व करणाऱ्यावर भरवसा ठेवा
२०, २१. (क) आपला प्रमुख ख्रिस्त यावर आपण का भरवसा ठेवू शकतो? (ख) आपण पुढच्या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?
२० लवकरच आपला प्रमुख, येशू ख्रिस्त त्याचा “विजय पूर्ण” करेल आणि विस्मयकारक गोष्टी साध्य करेल. (प्रकटी. ६:२; स्तो. ४५:४) पण तोपर्यंत तो आपल्याला नवीन जगात राहण्यासाठी तयार करत आहे. नवीन जगात प्रत्येक जण पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या आणि पुनरुत्थान झालेल्यांना शिकवण्याच्या कामात हातभार लावेल.
२१ आपला अभिषिक्त राजा आपल्याला नवीन जगात घेऊन जाईल. पण त्यासाठी आपल्याला बदलत्या परिस्थितींतही त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवणं गरजेचं आहे. (स्तोत्र ४६:१-३ वाचा.) आज आपल्याला कधीकधी बदलांशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं. खासकरून त्या वेळी जेव्हा त्यांचा आपल्यावर अनपेक्षित परिणाम होतो. पण अशा वेळी आपण मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो आणि यहोवावर पूर्ण भरवसा कसा बाळगू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू.
^ परि. 8 यरीहोच्या भीतींच्या ढिगाऱ्यात पुरातत्व शास्त्रज्ञांना धान्याचा मोठा साठा सापडला. लोकांनी कापणी करून धान्य साठवून ठेवलं होतं पण ते वापरलं नव्हतं. ही गोष्ट बायबल अहवालाचं समर्थन करते. त्यात म्हटलं आहे, की वेढा फार कमी काळ होता आणि यरीहो शहराला लुटण्यासाठी इस्राएली लोकांना मनाई होती. कापणीचा हंगाम असल्यामुळे यरीहो शहर काबीज करण्याची ही चांगली वेळ होती कारण शेतात भरपूर अन्न होतं.—यहो. ५:१०-१२.
^ परि. 11 टेहळणी बुरूज १५ मार्च, २००३ च्या अंकात पृष्ठ २४ वरील “पौल नम्रपणे एका परीक्षेला तोंड देतो” ही चौकट पाहा.