अभ्यास लेख १५
गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!
यहोवाच्या संघटनेबद्दल असलेली तुमची कदर वाढवा
“जे तुमचं नेतृत्व करत आहेत आणि ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं आहे, त्यांची आठवण ठेवा.”—इब्री १३:७.
या लेखात:
यहोवाच्या संघटनेचा नेहमी आदर करण्यासाठी आणि तिच्यावर भरवसा ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहा.
१. पहिल्या शतकात यहोवाचे लोक व्यवस्थित पद्धतीने कसं काम करायचे?
यहोवा जेव्हा त्याच्या लोकांना एखादी गोष्ट करायला सांगतो, तेव्हा त्यांनी ती व्यवस्थित पद्धतीने करावी अशी त्याची इच्छा असते. (१ करिंथ. १४:३३) उदाहरणार्थ, संपूर्ण जगात आनंदाचा संदेश सांगितला जावा अशी देवाची इच्छा आहे. (मत्त. २४:१४) आणि या कामाची जबाबदारी यहोवाने येशूवर सोपवली आहे. हे काम व्यवस्थित पद्धतीने व्हावं याची येशूने काळजी घेतली आहे. पहिल्या शतकात, यरुशलेममध्ये प्रेषितांचा आणि वडिलांचा एक गट होता. हा गट मंडळ्यांसाठी निर्णय घ्यायचा. (प्रे. कार्यं १५:२; १६:४) पुढे वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ्या बनू लागल्या. मग मंडळीतले वडील यरुशलेममधल्या भावांकडून मिळालेल्या सूचना मंडळीतल्या भाऊबहिणींना कळवायचे. (प्रे. कार्यं १४:२३) जेव्हा भाऊबहिणींनी या सूचनांचं पालन केलं, तेव्हा “मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.”—प्रे. कार्यं १६:५.
२. १९१९ पासून यहोवाने त्याच्या लोकांना मार्गदर्शन आणि आध्यात्मिक अन्न कसं पुरवलंय?
२ यहोवा आजही त्याच्या लोकांना व्यवस्थित पद्धतीने काम करायला मदत करतोय. १९१९ पासून, येशू अभिषिक्तांच्या एका छोट्याशा गटाचा वापर करून प्रचाराचं आणि त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक अन्न पुरवायचं काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहे. a (लूक १२:४२) साहजिकच, यहोवा या गटाच्या कामावर आशीर्वाद देतोय.—यश. ६०:२२; ६५:१३, १४.
३-४. (क) व्यवस्थित पद्धतीने आणि संघटितपणे काम केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो हे समजावून सांगा. (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?
३ आपण जर व्यवस्थित पद्धतीने काम करत नसतो, तर येशूने सोपवलेलं काम आपल्याला पूर्ण करता आलं नसतं. (मत्त. २८:१९, २०) उदाहरणार्थ, आपण कुठे प्रचार केला पाहिजे हे जर भावांनी आपल्याला सांगितलंच नसतं, तर कोणीही कुठेही प्रचार केला असता. यामुळे काही क्षेत्रांमध्ये सारखा-सारखा प्रचार झाला असता, तर काही क्षेत्रं तशीच राहिली असती. व्यवस्थित पद्धतीने काम केल्यामुळे आपल्याला आणखी कोणते फायदे होत आहेत?
४ पृथ्वीवर असताना येशूने त्याच्या शिष्यांना व्यवस्थित पद्धतीने काम करण्यासाठी जसं संघटित केलं होतं, तसंच तो आजही देवाच्या लोकांच्या बाबतीत करत आहे. त्याने आपल्यासमोर एक उदाहरण कसं मांडलंय आणि आपली संघटना त्याप्रमाणे कसं काम करते हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच आपण यहोवाच्या संघटनेबद्दल कशी कदर दाखवू शकतो हेसुद्धा पाहणार आहोत.
येशूने जसं केलं तसंच आपली संघटना करते
५. येशूच्या उदाहरणाप्रमाणे चालण्याचा एक मार्ग कोणता? (योहान ८:२८)
५ आपण काय केलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी येशू त्याच्या पित्याकडून शिकला. यहोवाची संघटना येशूप्रमाणे वागून योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घ्यायला आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर करते. (योहान ८:२८ वाचा; २ तीम. ३:१६, १७) आपल्याला वेळोवेळी बायबल वाचण्यासाठी आणि त्यातल्या गोष्टी लागू करण्यासाठी आठवून करून दिली जाते. मग या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?
६. बायबल अभ्यासातून फायदा करून घ्यायचा एक महत्त्वाचा मार्ग कोणता?
६ आपल्या साहित्यांच्या मदतीने जेव्हा आपण बायबलचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला खूप फायदा होतो. उदाहरणार्थ, संघटनेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाची आपण बायबलमधल्या शिकवणींशी तुलना करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की हे मार्गदर्शन बायबलवर आधारित आहे, तेव्हा यहोवाच्या संघटनेवरचा आपला भरवसा आणखी मजबूत होतो.—रोम. १२:२.
७. येशूने कोणता संदेश सांगितला आणि यहोवाच्या संघटनेतले लोक त्याच्या उदाहरणाप्रमाणे कसे चालतात?
७ येशूने “देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश” सांगितला. (लूक ४:४३, ४४) त्याने त्याच्या शिष्यांनाही तसंच करायची आज्ञा दिली. (लूक ९:१, २; १०:८, ९) आज यहोवाच्या संघटनेतले लोक, मग ते कुठेही राहत असोत किंवा कितीही जबाबदाऱ्या पार पाडत असोत, ते सगळे राज्याचा आनंदाचा संदेश सांगतात.
८. आपल्याला कोणता बहुमान मिळालाय?
८ इतरांना देवाच्या राज्याचा संदेश सांगणं हा आपल्यासाठी एक बहुमानच आहे. आणि हा बहुमान सगळ्यांनाच मिळालेला नाही. उदाहरणार्थ, येशू जेव्हा पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने दुष्ट स्वर्गदूतांना त्याच्याबद्दल साक्ष देऊ दिली नाही. (लूक ४:४१) आज जेव्हा एखाद्या व्यक्तीला यहोवाच्या लोकांसोबत प्रचार करायचा असतो, तेव्हा तिला आधी यहोवाला आवडेल अशा पद्धतीने जीवन जगावं लागतं. आपण केव्हाही आणि कुठेही प्रचार करून आपल्याला या बहुमानाची किती कदर आहे हे दाखवत असतो. येशूप्रमाणेच लोकांच्या मनात राज्याच्या सत्याचं बी पेरणं आणि त्याला पाणी घालणं हा आपला उद्देश आहे.—मत्त. १३:३, २३; १ करिंथ. ३:६.
९. आपल्या संघटनेने लोकांना देवाचं नाव कसं कळवलंय?
९ येशूने लोकांना देवाचं नाव सांगितलं. आपल्या पित्याला प्रार्थना करताना तो म्हणाला: “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय.” (योहा. १७:२६) येशूप्रमाणेच आज यहोवाची संघटना लोकांना देवाचं नाव कळावं म्हणून जे काही शक्य आहे ते करायचा प्रयत्न करते. पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर हे याचंच एक उदाहरण आहे. मूळ भाषेत ज्या-ज्या ठिकाणी देवाचं नाव होतं, त्या-त्या ठिकाणी ते या भाषांतरात टाकण्यात आलंय. या भाषांतराचा काही भाग किंवा संपूर्ण बायबल २७० पेक्षा जास्त भाषांमध्ये आज उपलब्ध आहे. या भाषांतराच्या अतिरिक्त लेख क४ आणि क५ मध्ये देवाचं नाव बायबलमध्ये पुन्हा कसं आणि का टाकण्यात आलं, याबद्दलची सविस्तर माहिती आहे. इंग्रजीमधल्या स्टडी बायबलच्या अतिरिक्त लेख ग मध्ये ख्रिस्त ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव २३७ वेळा का आलं पाहिजे याबद्दलचे बरेच पुरावे दिले आहेत.
१०. म्यानमारमध्ये राहणाऱ्या स्त्रीने जे म्हटलं त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
१० येशूसारखंच आपल्यालासुद्धा जास्तीत जास्त लोकांना देवाच्या नावाबद्दल सांगायची इच्छा आहे. देवाला नाव आहे हे समजल्यावर म्यानमारमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षांच्या एका स्त्रीच्या डोळ्यांत पाणीच आलं. आणि तिने म्हटलं: “माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच देवाचं नाव यहोवा आहे हे ऐकलं. . . . तू मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे, जी मी कधी शिकू शकले नसते.” या अनुभवावरून हेच कळतं की देवाचं नाव समजल्यावर प्रामाणिक मनाच्या लोकांवर जबरदस्त प्रभाव पडतो.
आपल्या संघटनेबद्दल कदर दाखवत राहा
११. वडील यहोवाच्या संघटनेबद्दल कदर असल्याचं कसं दाखवतात? (चित्रसुद्धा पाहा.)
११ वडील कोणत्या एका मार्गाने देवाच्या संघटनेबद्दल कदर असल्याचं दाखवू शकतात? जेव्हा त्यांना एखादं मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्यांनी ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि ते लागू करायचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. त्यांना फक्त सभांमधले भाग कसे हाताळायचे आणि मंडळीत प्रार्थना कशी करायची याबद्दलच मार्गदर्शन मिळत नाही, तर ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी कशी घ्यायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन मिळतं. वडील जेव्हा संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन करतात तेव्हा भाऊबहिणींना यहोवाच्या प्रेमाची आणि त्याच्या काळजीची जाणीव होते.
१२. (क) वडिलांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं आपण मनापासून पालन का केलं पाहिजे? (इब्री लोकांना १३:७, १७) (ख) आपण पुढाकार घेणाऱ्यांच्या चांगल्या गुणांकडे का लक्ष दिलं पाहिजे?
१२ आपल्याला वडिलांकडून जेव्हा मार्गदर्शन मिळतं, तेव्हा आपण त्याचं मनापासून पालन केलं पाहिजे. त्यामुळे पुढाकार घेणाऱ्या बांधवांना त्यांचं काम करायला सोपं जातं. पुढाकार घेणाऱ्यांच्या “आज्ञा पाळा” आणि त्यांच्या “अधीन राहा” असं प्रोत्साहन बायबल आपल्याला देतं. (इब्री लोकांना १३:७, १७ वाचा.) असं करणं नेहमीच सोपं नसतं. का? कारण पुढाकार घेणारे भाऊ अपरिपूर्ण आहेत. पण आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याऐवजी जर त्यांच्या चुकांकडे लक्ष दिलं, तर आपण आपल्या शत्रूंना मदत करत असू. ती कशी? देव संघटनेचा वापर करून आपल्याला मार्गदर्शन देतोय या गोष्टीबद्दल आपल्या मनात शंका निर्माण व्हावी, अशी आपल्या शत्रूंची इच्छा आहे. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या वडिलांच्या चुकांबद्दल विचार करत राहतो, तेव्हा आपण संघटनेबद्दलसुद्धा चुकीचा विचार करतो आणि त्यामुळे आपल्या संघटनेवरचा आपला भरवसा आपण गमावू शकतो. मग आपले शत्रू हे कसं करतात हे ओळखण्यासाठी आणि त्यापासून लांब राहण्यासाठी आपण काय करू शकतो?
इतरांना यहोवाच्या संघटनेवरचा तुमचा भरवसा कमजोर करू देऊ नका
१३. देवाचे शत्रू आपल्या संघटनेची बदनामी कशी करतात?
१३ देवाचे विरोधक आपल्या संघटनेबद्दलच्या चांगल्या गोष्टी वाईट आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, आपण बायबलमधून शिकलोय की यहोवाला त्याच्या उपासकांनी शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक रित्या शुद्ध असावं असं वाटतं. त्याला वाटतं, की पश्चात्ताप न करता वाईट कामं करत राहणाऱ्यांना मंडळीतून काढून टाकलं जावं. (१ करिंथ. ५:११-१३; ६:९, १०) बायबलमधल्या या आज्ञेचं आपण काटेकोरपणे पालन करतो. पण आपले विरोधक याच गोष्टीचा वापर करून आपल्यावर असा आरोप लावतात की आपलं लोकांवर प्रेम नाही, आपण त्यांची टिका करतो आणि आपल्यापेक्षा वेगळे असलेले लोक आपल्याला आवडत नाहीत.
१४. आपल्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवण्यामागे कोणाचा हात आहे?
१४ आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यांमागे कोण आहे हे ओळखा. आपल्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवण्यामागे सैतानाचा हात आहे. तो “खोटेपणाचा बाप आहे.” (योहा. ८:४४; उत्प. ३:१-५) त्यामुळे तो काही लोकांचा वापर करून आपल्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. पहिल्या शतकातही असंच झालं होतं.
१५. (क) धार्मिक पुढाऱ्यांनी येशूसोबत काय केलं? (ख) धार्मिक पुढाऱ्यांनी येशूच्या शिष्यांसोबत काय केलं?
१५ देवाचा मुलगा येशू परिपूर्ण होता आणि त्याने बरेच अद्भुत चमत्कार केले होते. पण तरी सैतानाने काही लोकांचा वापर करून त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवली. उदाहरणार्थ, त्या काळच्या धार्मिक पुढाऱ्यांनी लोकांना सांगितलं की येशू “दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्याच्या मदतीनेच” दुष्ट स्वर्गदूत काढतोय. (मार्क ३:२२) नंतर जेव्हा येशूवर खटला चालला होता तेव्हा धार्मिक पुढाऱ्यांनी त्याच्यावर देवाची निंदा करायचा आरोप लावला आणि त्याला मृत्यूदंड मिळावा म्हणून लोकांना भडकवलं. (मत्त. २७:२०) पुढे जेव्हा ख्रिस्ताचे शिष्य आनंदाच्या संदेशाचा प्रचार करू लागले, तेव्हा त्यांना छळण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी “लोकांना भडकवलं आणि बांधवांविरुद्ध त्यांची मनं दूषित केली.” (प्रे. कार्यं १४:२, १९) १ डिसेंबर १९९८ च्या टेहळणी बुरूज अंकात, प्रेषितांची कार्यं १४:२ या वचनाबद्दल असं सांगितलं होतं: “स्वतः संदेश नाकारून यहुदी विरोधक शांत बसले नाहीत तर, ख्रिश्चनांवर काळीमा फासण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली; विदेशी लोकांची मनं ख्रिश्चनांविरुद्ध कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.”
१६. आपण खोटी माहिती ऐकल्यावर काय आठवायचा प्रयत्न केला पाहिजे?
१६ पहिल्या शतकाप्रमाणे सैतान आजसुद्धा खोटी माहिती पसरवत आहे. तो आजही ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवत आहे.’ (प्रकटी. १२:९) जर तुम्ही आपल्या संघटनेबद्दल किंवा पुढाकार घेणाऱ्या भावांबद्दल चुकीची माहिती ऐकली तर देवाचे शत्रू येशूसोबत आणि पहिल्या शतकातल्या त्याच्या शिष्यांसोबत कसे वागले हे आठवायचा प्रयत्न करा. येशूने म्हटलं होतं, की यहोवाची उपासना करणाऱ्यांचा लोक छळ करतील आणि त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवतील. आणि आज अगदी तसंच घडत आहे. (मत्त. ५:११, १२) खोट्या माहितीमागे कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि लगेच पावलं उचलली पाहिजेत. जर आपण असं केलं तर खोट्या माहितीमुळे आपली फसवणूक होणार नाही. पण मग आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?
१७. खोट्या माहितीमुळे आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? (२ तीमथ्य १:१३) (“ खोटी माहिती ऐकल्यावर तुम्ही काय कराल?” ही चौकटसुद्धा पाहा.)
१७ खोट्या माहितीपासून दूर राहा. आपण खोटी माहिती ऐकली असेल, तर आपण काय केलं पाहिजे याबद्दल प्रेषित पौलने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. प्रेषित पौलने तीमथ्यला सांगितलं होतं, की त्याने इफिसमधल्या लोकांना ‘काल्पनिक कथांकडे [खोट्या माहितीकडे] लक्ष न देण्याची आज्ञा’ द्यावी. तसंच, त्याने त्याला हेही सांगितलं, की त्याने “काल्पनिक आणि देवाचा अनादर करणाऱ्या कथा कहाण्यांपासून दूर” राहावं. (१ तीम. १:३, ४; ४:७) आपल्याला माहीत आहे, की एक लहान मूल खाली पडलेली कुठलीही गोष्ट तोंडात घालतं. पण, एक मोठा माणूस तसं करणार नाही, कारण त्याला त्याचे धोके माहीत असतात. तसंच आपण खोट्या माहितीपासून दूर राहतो, कारण त्यामागे कोण आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याऐवजी आपण फक्त सत्याची ‘फायदेकारक वचनं’ ऐकतो.—२ तीमथ्य १:१३ वाचा.
१८. आपल्याला यहोवाच्या संघटनेबद्दल कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
१८ देवाची संघटना येशूप्रमाणे कसं काम करते याचे आपण या लेखात फक्त तीन मार्ग पाहिले. पण, बायबलचा अभ्यास करताना आपली संघटना येशूच्या पावलावर पाऊल ठेवून कसं चालते याचे आणखी मार्ग शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आपल्या संघटनेबद्दल कदर वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मंडळीतल्या इतर लोकांनाही मदत करू शकता. यासोबतच, यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करा आणि तो ज्या संघटनेचा वापर करतोय तिला साथ द्या. असं केल्यामुळे तुम्हाला संघटनेबद्दल कदर आहे हे तुम्ही दाखवत राहू शकता. (स्तो. ३७:२८) आपण यहोवाच्या प्रेमळ आणि एकनिष्ठ कुटुंबाचा भाग आहोत हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे आणि आपण नेहमी त्यासाठी आभार मानले पाहिजे.
तुमचं उत्तर काय असेल?
-
देवाचे लोक कोणत्या मार्गांनी येशूसारखं वागतात?
-
यहोवाच्या संघटनेबद्दल कदर असल्याचं आपण कसं दाखवत राहू शकतो?
-
खोटी माहिती ऐकल्यावर आपण काय केलं पाहिजे?
गीत १०३ मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!
a शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना! या पुस्तकात पान १०२-१०३ वर असलेली “१९१९ हे वर्षच का?” ही चौकट पाहा.
b चित्राचं वर्णन: वडील सार्वजनिक साक्षकार्याच्या योजनेबद्दल चर्चा करतात. आणि मग गट पर्यवेक्षक प्रचारकांना भिंतीकडे पाठ करून उभं राहायची सूचना देतात.