अभ्यास लेख १७
युनीकेच्या उदाहरणातून एक आई काय शिकू शकते?
“तुझ्या आईची शिकवण सोडू नकोस. [ते] शिक्षण तुझ्या डोक्यावर सुंदर मुकुटासारखं; आणि तुझ्या गळ्यात मौल्यवान हारासारखं आहे.”—नीति. १:८, ९.
गीत ३ “देव प्रीती आहे”
सारांश a
१-२. (क) युनीके कोण होती, आणि एक आई म्हणून तिच्यासमोर कोणती समस्या होती? (ख) चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं ते सांगा.
बायबलमध्ये तीमथ्यचा बाप्तिस्मा कसा आणि केव्हा झाला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याच्या आईला, युनीकेला नक्कीच खूप आनंद झाला असेल यात काही शंका नाही. (नीति. २३:२५) कल्पना करा तीमथ्य बाप्तिस्म्यासाठी कंबरेएवढ्या पाण्यात उभा आहे. त्याला पाहून त्याच्या आईला किती अभिमान वाटत असेल. त्याची आजी लोईससुद्धा युनीकेसोबत उभी आहे. आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. तीमथ्य पाण्याखाली गेला आहे आणि युनीके त्याच्याकडे श्वास रोखून पाहत आहे. तो उसळत्या पाण्यासोबत बाहेर येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं. हे पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. यहोवा आणि येशूवर प्रेम करायला शिकवण्यासाठी तिने जी मेहनत घेतली होती, तिचं चीज झालं होतं. पण हे सगळं करण्यासाठी तिला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं?
२ तीमथ्यचे आईवडील वेगवेगळ्या धर्मातून होते. त्याचे वडील ग्रीक आणि त्याची आई व आजी यहुदी होते. आणि अशा घरात तो लहानाचा मोठा झाला होता. (प्रे. कार्यं १६:१) तीमथ्य किशोर वयात होता, तेव्हा कदाचित युनीके आणि लोईसने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असावा. पण त्या वेळीसुद्धा त्याच्या वडिलांनी आपला धर्म सोडला नाही. पण आपण कोणत्या धर्माप्रमाणे चालायचं, हा प्रश्न तीमथ्यसमोर होता. कारण हा निर्णय घेण्याइतपत तो मोठा झाला होता. त्याच्यासमोर आता तीन पर्याय होते: आपल्या वडिलांचा धर्म स्वीकारायचा, लहानपणापासून शिकलेल्या यहुदी संस्कृतीला धरून राहायचं किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा.
३. आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी ख्रिस्ती स्त्रिया जी मेहनत घेत आहेत त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? (नीतिवचनं १:८, ९)
३ आज आईची भूमिका पार पाडणाऱ्या ख्रिस्ती स्त्रियासुद्धा आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. आपल्या मुलांचं यहोवासोबत एक चांगलं नातं असावं, असं त्यांना मनापासून वाटतं. आणि यासाठी त्या जी मेहनत घेत आहेत, त्याची यहोवा खूप कदर करतो. (नीतिवचनं १:८, ९ वाचा.) त्याने अशा कित्येक बहिणींना आपल्या मुलांना सत्य शिकवायला मदत केली आहे.
४. मुलांना वाढवताना आज बहिणींना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे?
४ तीमथ्यसारखंच आपली मुलंसुद्धा यहोवाची सेवा करायचं निवडतील का, अशी चिंता काही बहिणींना वाटत असेल. आणि असं वाटणं साहजिकच आहे. कारण सैतानाच्या या जगात आपल्या मुलांना किती वेगवेगळ्या दबावांचा सामना करावा लागतो, हे त्यांना माहीत आहे. (१ पेत्र ५:८) शिवाय आपल्या काही बहिणींना एकट्यानेच आपल्या मुलांना वाढवावं लागतं. तसंच, काहींचे पतीही सत्यात नाहीत. उदाहरणार्थ क्रिस्टीन नावाची एक बहीण म्हणते: “माझे पती तसे खूप चांगले आहेत आणि मुलांवरही खूप प्रेम करतात. पण मी मुलांना यहोवाबद्दल शिकवलेलं त्यांना बिलकूल आवडत नाही. त्यामुळे माझी मुलं पुढे जाऊन यहोवाची सेवा करतील की नाही, याचा विचार करून मी बऱ्याच वेळा रडले.” b
५. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
५ तुम्ही एक आई असाल, तर तुम्हीही युनीकेसारखंच तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवू शकता. या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत: मुलांना वाढवत असताना तुम्ही युनीकेच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकता? आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून तुम्ही आपल्या मुलांना कसं शिकवू शकता? आणि त्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करेल?
तुमच्या बोलण्यातून मुलांना शिकवा
६. तीमथ्य ख्रिस्ती कसा बनला? (२ तीमथ्य ३:१४, १५)
६ तीमथ्य लहान होता तेव्हापासूनच युनीकेने त्याला “पवित्र लिखाणांचं” ज्ञान देण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. हे खरं आहे, की तिला त्या वेळी येशूबद्दल काहीच माहीत नव्हतं. तरी यहुदी असल्यामुळे तिला ख्रिस्ताबद्दल जितकं काही माहीत होतं, ते तिने तीमथ्यला शिकवलं. बालपणापासून तीमथ्यला त्याच्या आईने जे शिकवलं होतं, आणि ज्या गोष्टींची त्याला खातरी पटवून देण्यात आली होती, त्या आधारावर त्याला काही प्रमाणात हे समजलं असेल की येशूच मसीहा आहे. (२ तीमथ्य ३:१४, १५ वाचा.) अनेक अडचणी असतानासुद्धा युनीके आपल्या मुलाला यहोवाबद्दल शिकवू शकली, याचा तिला किती आनंद झाला असेल! युनीके हे नाव ज्या शब्दावरून तयार झालं आहे, त्याचा अर्थ ‘जिंकणं’ किंवा ‘विजयी होणं’ असा होतो. आणि खरंच आपल्या मुलाला यहोवाबद्दल शिकवण्याच्या बाबतीत युनीके आपल्या नावाप्रमाणेच विजयी ठरली होती.
७. बाप्तिस्म्यानंतरही युनीके तीमथ्यला कशी मदत करू शकत होती?
७ तीमथ्यच्या आयुष्यात बाप्तिस्मा एक महत्त्वाचं पाऊल होतं. पण युनीकेला अजूनही तीमथ्यबद्दल काळजी वाटत होती. तिच्या पुढे कदाचित बरेच प्रश्न असतील. तीमथ्य आपल्या आयुष्यात पुढे काय करेल? तो वाईट मित्रांच्या संगतीत अडकणार तर नाही ना? तो अथेन्समध्ये शिक्षण घ्यायला गेला, आणि तिथल्या मूर्तिपूजक तत्त्वज्ञानी लोकांच्या शिकवणींचा त्याच्यावर प्रभाव पडला तर? तो श्रीमंत होण्याच्या मागे लागून आपला वेळ, शक्ती आणि तारुण्य वाया तर घालवणार नाही ना? असे बरेच प्रश्न तिला पडले असतील. तीमथ्य काय निर्णय घेईल, हे युनीकेच्या हातात नव्हतं. पण त्याला मदत करणं मात्र तिच्या हातात होतं. कसं? ती त्याच्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि त्याच्या मुलाबद्दल कदर उत्पन्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकत होती. आजसुद्धा आईवडिलांपैकी फक्त एकच जण सत्यात असेल, तर मुलांना यहोवाविषयी शिकवणं कठीण जाऊ शकतं. पण ज्या कुटुंबात आईवडील दोघंही सत्यात आहेत, त्यांनासुद्धा आपल्या मुलांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्न करणं कठीण जाऊ शकतं. तर मग, युनीकेच्या उदाहरणातून आज पालक काय शिकू शकतात?
८. मुलांना शिकवण्यासाठी बहिणी आपल्या पतीला कशी मदत करू शकतात?
८ आपल्या मुलांसोबत बायबलचा अभ्यास करा. बहिणींनो, जर तुमचा पती सत्यात असेल तर आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवताना तुम्ही आपल्या पतीला मदत करावी अशी यहोवाची इच्छा आहे. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी हे करू शकता. एक मार्ग म्हणजे, आपल्या पतीला कौटुंबिक उपासनेसाठी नियमितपणे मदत करत राहणं. उदाहरणार्थ, कौटुंबिक उपासनेच्या बाबतीत आपल्या मुलांशी नेहमी चांगल्या गोष्टी बोला. तसंच कौटुंबिक उपासना आनंदी वातावरणात आणि खेळीमेळीत पार पाडता यावी म्हणून काय करता येईल याचा विचार करा. शिवाय, कौटुंबिक उपासनेत बायबलमधून शिकवताना एखादा खास उपक्रम किंवा प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्ही आपल्या पतीला मदत करू शकता. तुमची मुलं जर थोडी मोठी असतील, तर कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून त्यांचा अभ्यास घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पतीला मदत करू शकता.
९. ज्या बहिणींचे पती सत्यात नाहीत त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
९ कधीकधी आपल्या काही बहिणींना एकट्यानेच आपल्या मुलांना वाढवावं लागतं. किंवा कदाचित काही बहिणींचे पती सत्यात नसतात. अशा वेळी, या बहिणींनाच आपल्या मुलांसोबत बायबल अभ्यास करावा लागतो. तुमच्या बाबतीतही हीच गोष्ट असेल, तर काळजी करू नका. यहोवा तुमची नक्की मदत करेल. यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे पुरवलेल्या शिकवण्याच्या साधनांचा वापर करून तुमच्या मुलांचा अभ्यास घ्या. कौटुंबिक उपासनेसाठी इतर अनुभवी पालक या साधनांचा वापर कसा करतात, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. c (नीति. ११:१४) तुमच्या मुलांसोबत मनमोकळेपणाने बोलण्यासाठीसुद्धा यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. तुमच्या मुलांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेता याव्यात म्हणून तुम्ही त्याला मदतीसाठी प्रार्थना करू शकता. (नीति. २०:५) त्यांच्यासोबत बोलण्यासाठी तुम्ही अगदी साध्या-साध्या प्रश्नांचाही वापर करू शकता. जसं की, ‘शाळेत तुला काही प्रॉब्लेम आहेत का?’ असे प्रश्न विचारून तुम्ही त्यांना बोलायला लावू शकता.
१०. यहोवाबद्दल शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना आणखी कोणत्या प्रकारे मदत करू शकता?
१० मिळेल त्या संधीचा वापर करून आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवा. यहोवाबद्दल आणि त्याने तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल आपल्या मुलांसोबत बोला. (अनु. ६:६, ७; यश. ६३:७) खासकरून, घरात जेव्हा त्यांच्यासोबत नियमितपणे अभ्यास करणं शक्य नसतं तेव्हा असं करणं खूप महत्त्वाचं ठरेल. आधी उल्लेख केलेली क्रिस्टीन म्हणते, “घरी मुलांसोबत यहोवाबद्दल बोलायच्या खूप कमी संधी मला मिळायच्या. म्हणून मी मिळेल त्या संधीचा फायदा करून घ्यायचे. उदाहरणार्थ, आम्ही जेव्हा पायी किंवा बोटीतून फिरायला जायचो, तेव्हा मी यहोवाच्या सृष्टीबद्दल आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलायचे. शिवाय, जेव्हा माझी मुलं थोडी मोठी झाली तेव्हा स्वतःहून बायबलचा अभ्यास करायचं प्रोत्साहन मी त्यांना दिलं.” क्रिस्टीनने जे केलं तसंच तुम्हालाही करता येईल. आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या मुलांना यहोवाच्या संघटनेबद्दल आणि आपल्या भाऊबहिणींबद्दल चांगल्या गोष्टीसुद्धा सांगू शकता. त्यांच्यासमोर मंडळीतल्या वडिलांची टिका करू नका. नाहीतर समस्या येतील तेव्हा ते वडीलांची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे जाणार नाहीत.
११. याकोब ३:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे घरात शांती टिकवून ठेवणं का महत्त्वाचं आहे?
११ घरात शांती टिकून ठेवायचा प्रयत्न करा. तुमचं आपल्या पतीवर आणि मुलांवर प्रेम आहे, याची त्यांना नेहमी जाणीव करून द्या. तुमच्या पतीसोबत नेहमी प्रेमाने आणि आदराने बोला. आणि मुलांनाही तसंच करायला शिकवा. यामुळे तुमच्या घरात शांती टिकून राहील आणि अशा वातावरणात तुमच्या मुलांना यहोवाबद्दल शिकायला सोपं जाईल. (याकोब ३:१८ वाचा.) रोमानियामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या योसेफचंच उदाहरण घ्या. तो लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांमुळे त्याला, त्याच्या आईला आणि त्याच्या भावडांना यहोवाची उपासना करायला खूप कठीण गेलं. तो म्हणतो: “माझी आई घरातलं वातावरण शांत ठेवायचा खूप प्रयत्न करायची. माझे वडील कितीही चिडले तरी आई नेहमी त्यांच्याशी प्रेमानेच वागायची. पण आम्हाला त्यांचा आदर करणं आणि त्यांचं ऐकणं कठीण जातंय, हे जेव्हा ती पाहायची, तेव्हा ती आमच्यासोबत इफिसकर ६:१-३ या वचनांवर बोलायची. मग वडीलांच्या चांगल्या गुणांबद्दल ती आम्हाला सांगायची आणि आम्ही त्यांना आदर का दिला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम का केलं पाहिजे ते समजावून सांगायची. अशा प्रकारे आईने कित्येक वेळा तापलेलं वातावरण शांत केलंय.”
तुमच्या कृतीतून मुलांना शिकवा
१२. युनीकेच्या चांगल्या उदाहरणाचा तीमथ्यवर कसा परिणाम झाला? (२ तीमथ्य १:५)
१२ २ तीमथ्य १:५ वाचा. युनीकेने आपलं चांगलं उदाहरण तीमथ्यसमोर ठेवलं होतं. खरा विश्वास हा नेहमी कृतीतून दिसून येतो, हे तिने त्याला नक्कीच शिकवलं असेल. (याको. २:२६) ती जे काही करत होती, त्यावरून तिचं यहोवावर किती प्रेम आहे हे तीमथ्यला नक्कीच दिसून आलं असेल. शिवाय, यहोवाची सेवा करत असल्यामुळे ती किती आनंदी होती, हेसुद्धा त्याला जाणवलं असेल. मग तिच्या या चांगल्या उदाहरणाचा तीमथ्यवर कसा परिणाम झाला? प्रेषित पौलने लिहिलं, की त्याच्यामध्ये त्याचा आईसारखाच मजबूत विश्वास होता. आणि ही आपोआप घडून आलेली गोष्ट नव्हती. तीमथ्यसमोर आपल्या आईचं चांगलं उदाहरण होतं, आणि त्याचंच अनुकरण त्याने केलं होतं. आजही आपल्या बऱ्याच बहिणींनी, “एकाही शब्दाशिवाय” आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना यहोवाची सेवा करायला प्रवृत्त केलं आहे. (१ पेत्र ३:१, २) तुम्हीसुद्धा असंच करू शकता. कसं, ते आता पाहू या.
१३. मुलांची काळजी घेण्यासोबतच यहोवासोबतच्या नात्याला सगळ्यात जास्त महत्त्व देणं का गरजेचं आहे?
१३ यहोवासोबतच्या नात्याला तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या. (अनु. ६:५, ६) आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बराच त्याग करत आहात. त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ, पैसा, झोप आणि यासारख्या इतर गोष्टींचा त्याग करता. पण त्यात इतकं व्यस्त होऊ नका की तुम्हाला यहोवासाठी वेळच उरणार नाही. उलट यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करता यावं म्हणून तुमच्या वैयक्तिक प्रार्थनांसाठी, व्यक्तिगत बायबल अभ्यासासाठी आणि मंडळीच्या सभांसाठी वेळ काढा. असं केल्यामुळे यहोवासोबत तुमचं नातं मजबूत तर होईलच, पण त्यासोबत तुमच्या कुटुंबासमोर आणि इतरांसमोरही तुमचं चांगलं उदाहरण असेल.
१४-१५. लिएन, मरीया आणि जोआ यांच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१४ बरीच मुलं आपल्या आईचं चांगलं उदाहरण पाहून यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्यावर भरवसा ठेवायला शिकली आहेत. याची काही उदाहरणं आपण पाहू या. क्रिस्टीनची मुलगी लिएन म्हणते: “पप्पा घरी असताना आम्हाला बायबलचा अभ्यास करता येत नव्हता. पण मम्मीने सभेला जाणं कधीच सोडलं नाही. बायबलमधून जरी आम्हाला जास्त शिकता आलं नाही, तरी तिच्या उदाहरणामुळे आमचा विश्वास वाढला. सभेला जायला सुरुवात करण्याआधीच आम्हाला कळलं होतं, की हेच सत्यय.”
१५ मरीया नावाच्या एका बहिणीचंही असंच उदाहरण आहे. तिची आई तिला आणि तिच्या भावंडांना घेऊन सभेला जायची म्हणून तिचे वडील त्यांना खूप मारहाण आणि शिवीगाळ करायचे. ती म्हणते: “मला आठवतंय, की मी लहान होते तेव्हा लोकांच्या भीतीने काही वेळा आध्यात्मिक गोष्टी करायला टाळायचे. पण माझी आई मात्र कधीच घाबरली नाही. तिच्यात किती हिंमत आहे आणि तिच्या जीवनात ती यहोवाला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायची, हे पाहून माझ्यातली माणसांची भीती निघून गेली.” जोआ नावाचा एक भाऊ सांगतो, की घरी आध्यात्मिक गोष्टीवर बोलायची त्याच्या वडिलांनी सक्त मनाई केली होती. तो म्हणतो: “माझ्या वडिलांसाठी माझी आई यहोवाशिवाय बाकी सगळं काही सोडायला तयार होती. आणि याच गोष्टीमुळे मला पुढे यायला मदत झाली.”
१६. एका आईच्या चांगल्या उदाहरणाचा इतरांवर कसा प्रभाव पडतो?
१६ बहिणींनो, आपल्या मुलांचा सांभाळ करत असताना तुम्ही जे उदाहरण मांडत आहात त्याचा दुसऱ्यांवरही प्रभाव पडतो. युनीकेच्या उदाहरणाचा प्रेषित पौलवर कसा प्रभाव पडला त्याचाच विचार करा. त्याने हे ओळखलं की जो निष्कपट विश्वास तीमथ्यमध्ये होता, तो सर्वात आधी त्याची आई ‘युनीके हिच्यामध्ये होता.’ (२ तीम. १:५) पौलने तिचा हा विश्वास सर्वात आधी कधी पाहिला होता? आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान लुस्त्रमध्ये तो लोईस आणि युनीके यांना भेटला होता. त्या वेळी ख्रिस्ती बनण्यासाठी त्याने त्यांना मदत केली होती. तेव्हा कदाचित पहिल्यांदा त्याने तिचा विश्वास पाहिला असावा. (प्रे. कार्यं १४:४-१८) विचार करा, याच्या १५ वर्षांनंतर जेव्हा पौलने तीमथ्यला पत्र लिहिलं तेव्हासुद्धा तो युनीकेच्या विश्वासाबद्दल लिहित होता. आणि अनुकरण करण्यासारख्या तिच्या उदाहरणाबद्दल तो तीमथ्यला सांगत होता. खरंच पौलवर आणि पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींवर तिच्या उदाहरणाचा जबरदस्त प्रभाव पडला होता. तुम्हीही कदाचित एकट्यानेच आपल्या मुलांना वाढवत असाल किंवा तुमचाही जोडीदार सत्यात नसेल. असं असतानाही मुलांना वाढवताना तुम्ही जे उदाहरण मांडत आहात त्यामुळे इतर भाऊबहिणींचा विश्वास मजबूत होतो आणि त्यांना त्यातून प्रेरणा मिळते याची खातरी बाळगा.
१७. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला तुमचं मूल योग्य प्रतिसाद देत नसेल तर काय?
१७ पण तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला तुमचं मूल योग्य प्रतिसाद देत नसेल तर काय? अशा वेळी हे विसरू नका, की मुलांना शिकवताना वेळ लागतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपण एखादं बी पेरतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे वाढून फळ देईल का, हे आपल्याला माहीत नसतं. तरीसुद्धा ते चांगलं वाढावं म्हणून आपण त्याला पाणी घालत असतो, त्याची काळजी घेत असतो. (मार्क ४:२६-२९) त्याचप्रमाणे, आई या नात्याने आपल्या मुलांना तुम्ही जे काही शिकवत आहात ते त्यांच्या मनात रूजत आहे का, असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येईल. पण हे लक्षात घ्या, की मुलं पुढे जाऊन यहोवाची सेवा करतील की नाही, हे तुमच्या हातात नाही. पण यहोवाबद्दल त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही पुरेपूर मेहनत घेत राहिलात तर त्याच्यासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी तुमच्या मुलांना सर्वात चांगली संधी मिळेल.—नीति. २२:६.
यहोवाच्या मदतीवर विसंबून राहा
१८. यहोवा तुमच्या मुलांना त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायला कशी मदत करू शकतो?
१८ प्राचीन काळापासून यहोवाने अनेक तरूणांना आपल्याशी जवळचं नातं जोडण्यासाठी मदत केली आहे. (स्तो. २२:९, १०) तुमच्या मुलांचीही अशीच इच्छा असेल तर तो त्यांनाही मदत करेल. (१ करिंथ. ३:६, ७) तुमची मुलं पुढे जाऊन जरी आपल्या मार्गातून भरकटली तरी यहोवा त्यांच्याकडे प्रेमळपणे लक्ष देत राहील. (स्तो. ११:४) त्यांच्यात “योग्य मनोवृत्ती” असल्याचं यहोवाला थोडं जरी जाणवलं, तरी त्यांना मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असेल. (प्रे. कार्यं १३:४८; २ इति. १६:९) गरज असेल तेव्हा योग्य शब्द योग वेळी बोलायला तो तुम्हाला मदत करेल. (नीति. १५:२३) किंवा मंडळीतल्या एखाद्या प्रेमळ भावाला किंवा बहिणीला तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायला तो प्रवृत्त करेल. तुमची मुलं मोठी झाली असली तरी तुम्ही त्यांना लहानपणी शिकवलेल्या काही गोष्टी यहोवा त्यांच्या आठवणीत आणून देईल. (योहा. १४:२६) तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या कृतीतून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवा तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल.
१९. बहिणींनो, तुम्ही यहोवाच्या प्रेमाची खातरी का बाळगू शकता?
१९ तुमची मुलं यहोवाची सेवा करायचं निवडतात की नाही यावर यहोवाचं तुमच्यावर असलेलं प्रेम अवलंबून नाही. बहिणींनो, यहोवाचं तुमच्यावर जिवापाड प्रेम आहे. आणि तुमच्या मुलांनी पुढे कोणतीही निवड केली तरी तो तुमच्यावर प्रेम करत राहील. तो तुमच्यावर प्रेम करतो कारण तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्ही जर एकट्यानेच तुमच्या मुलांना वाढवत असाल तर तुमच्या मुलांचा पिता व्हायचं आणि त्यांचं संरक्षण करायचं वचन तो देतो. (स्तो. ६८:५) तुमची मुलं योग्य निवड करतील की नाही हे तुमच्या हातात नाही. पण तुम्ही जर यहोवाच्या मदतीवर विसंबून राहिलात आणि तुमच्याकडून होताहोईल तितकी मेहनत घेत राहिलात तर यहोवा नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल.
गीत ४१ तारुण्यात यहोवाची सेवा करा
a या लेखात आपण ख्रिस्ती स्त्रियांना आईची भूमिका पार पाडत असताना तीमथ्यची आई युनीके हिच्या उदाहरणाचा कसा फायदा होऊ शकतो ते पाहू या. तसंच ख्रिस्ती स्त्रियांना आपल्या मुलांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकवत असताना, युनीकेच्या उदाहरणाचा कसा फायदा होऊ शकतो तेही पाहू या.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.
c उदाहरणार्थ, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ५० आणि १५ ऑगस्ट २०११ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या पृष्ठ ६-७ वर दिलेला, “कौटुंबिक उपासना आणि व्यक्तिगत अभ्यासाकरता काही कल्पना,” हा लेख पाहा.