अभ्यास लेख १४
उत्तरेकडून हल्ला!
“एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे.”—योए. १:६, पं.र.भा.
गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!
सारांश *
१. बंधू रस्सल आणि त्यांचे सोबती कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचे आणि ती पद्धती चांगली का होती?
आजपासून शंभरपेक्षा जास्त वर्षांआधी बंधू रस्सल आणि बायबल विद्यार्थ्यांचा एक लहान गट एकत्र मिळून बायबलचा खोलवर अभ्यास करू लागले. यहोवा देव, येशू ख्रिस्त, मृत लोकांची स्थिती आणि खंडणी यांबद्दल बायबल नेमकं काय शिकवतं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. अभ्यास करण्याची त्यांची पद्धत फार साधी होती. एक जण प्रश्न विचारायचा आणि मग सर्व जण त्या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक वचनाचं बारकाईने परीक्षण करायचे. संशोधन केल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या ते लिहून ठेवायचे. यहोवाने त्यांना अनेक महत्त्वाची बायबल सत्यं समजून घ्यायला मदत केली. आणि ती सत्यं आजही आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेत.
२. बायबलची भविष्यवाणी समजून घेताना कधीकधी तिचा चुकीचा निष्कर्ष कसा काढला जाऊ शकतो?
२ त्या बायबल विद्यार्थ्यांना लवकरच जाणीव झाली की बायबलमधल्या मूलभूत शिकवणी समजून घेणं सोपं आहे, पण बायबलमधल्या भविष्यवाण्या समजणं तितकं सोपं नाही. असं का म्हणता येईल? त्याचं एक कारण म्हणजे, सहसा बायबल भविष्यवाण्या पूर्ण होत असताना किंवा पूर्ण झाल्यावरच स्पष्टपणे समजणं शक्य असतं. तसंच आणखी एका कारणामुळे आपल्याला भविष्यवाणी समजणं कठीण जाऊ शकतं. एखाद्या भविष्यवाणीचा योग्य अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्याची मागची-पुढची माहिती वाचणं गरजेचं आहे. जर आपण भविष्यवाणीच्या एकाच भागाकडे लक्ष दिलं आणि बाकीची माहिती लक्षात घेतली नाही तर आपण चुकीच्या निष्कर्षावर पोहोचू शकतो. योएलच्या पुस्तकातल्या एका भविष्यवाणीच्या बाबतीत असंच काहीसं घडल्याचं दिसून येतं. आता आपण या भविष्यवाणीचं पुन्हा एकदा परीक्षण करू या आणि पाहू या की या भविष्यवाणीबद्दल आपली समज सुधारण्याची गरज का आहे.
३-४. योएल २:७-९ यांत दिलेल्या भविष्यवाणीबद्दल आतापर्यंत आपली समज काय होती?
३ योएल २:७-९ वाचा. टोळांच्या पीडेमुळे इस्राएल उद्ध्वस्त होईल असं योएलने भविष्यवाणी केली होती. त्यांचे दात आणि जबडा सिंहाच्या दातांसारखे आणि जबड्यासारखे असतील असंही त्यात म्हटलं होतं. हे अधाशी टोळ इस्राएलमधलं सर्व पीक आणि धान्य उद्ध्वस्त करून टाकतील. (योए. १:४, ६) आतापर्यंत आपली अशी समज होती की ही भविष्यवाणी लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या लोकांना लागू होते. कारण झुंडीने येणाऱ्या टोळांना जसं कोणी थांबवू शकत नाही, तसं यहोवाच्या लोकांना आवेशाने प्रचार करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तसंच, आपली अशीही समज होती, की या प्रचारकार्याचा धार्मिक पुढाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या “देशावर” किंवा लोकांवर असा जबरदस्त परिणाम होईल की ते गोंधळून जातील. *
४ आपण जर फक्त योएल २:७-९ ही वचनं वाचली तर आपल्याला वाटेल की या वचनांचा हाच अर्थ होतो. पण आपण जर मागची-पुढची वचनं वाचली, म्हणजेच संपूर्ण भविष्यवाणीचा विचार केला तर आपल्याला जाणवेल की या भविष्यवाणीचा वेगळा अर्थ होतो व आपली समज सुधारण्याची गरज आहे. असं करण्यामागची कोणती चार कारणं आहेत ते आता आपण पाहू या.
समजूतीत बदल होण्यामागची चार कारणं
५-६. (क) योएल २:२० (ख) योएल २:२५ ही वचनं वाचल्यावर आपल्या मनात कोणते प्रश्न येतात?
५ सर्वात आधी झुंडीने येणाऱ्या टोळांबद्दल यहोवाने काय अभिवचन दिलं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं, की मी “उत्तरेकडून आलेल्या [टोळांना] तुम्हापासून घालवून . . . देईन.” (योए. २:२०) जर टोळ, यहोवाच्या साक्षीदारांना जे येशूच्या आज्ञेचं पालन करून प्रचार आणि शिष्य बनवण्याचं काम करतात यांना सूचित करत असतं, तर यहोवा त्यांना घालवून देण्याबद्दल अभिवचन का देईल? (यहे. ३३:७-९; मत्त. २८:१९, २०) तर हे स्पष्टच आहे, की यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना नाही, तर अशा गोष्टीला किंवा व्यक्तीला घालवत आहे जिच्याकडून त्याच्या लोकांना धोका आहे.
६ दुसरं कारण समजण्यासाठी योएल २:२५ मध्ये काय सांगितलं आहे त्याकडे लक्ष द्या. त्यात यहोवा म्हणतो, “मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ व कुरतुडणारे टोळ यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन.” इथे यहोवाने अभिवचन दिलं की तो टोळांमुळे झालेल्या नुकसानाची “भरपाई” करेल. जर टोळ प्रचारकांना सूचित करत असते, तर वचनांत असं का म्हटलं आहे की ते सांगत असलेल्या संदेशामुळे लोकांचं नुकसान होईल? पण खरं पाहिलं तर या संदेशामुळे लोकांचं जीवन वाचू शकतं आणि वाईट लोकांना पश्चात्ताप करायला प्रेरणा मिळू शकते. (यहे. ३३:८, १९) आणि ही एक चांगली गोष्ट आहे!
७. योएल २:२८, २९ मध्ये उल्लेख केलेल्या “यानंतर” शब्दावरून आपल्याला काय समजायला मदत होते?
७ योएल २:२८, २९ वाचा. तिसरं कारण समजण्यासाठी भविष्यवाणीत उल्लेख केलेल्या घटनेचा क्रम लक्षात घ्या. इथे यहोवा म्हणतो, की मी “यानंतर . . . आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन.” म्हणजेच, टोळांवर सोपवलेलं काम ते पूर्ण करतील त्यानंतर त्यांच्यावर आत्म्याचा वर्षाव होईल. जर टोळ प्रचारकरांना सूचित करत असते, तर त्यांनी साक्ष देण्याचं काम पूर्ण केल्यानंतर यहोवा त्यांच्यावर पवित्र आत्मा का ओतेल? पण खरं पाहिलं तर देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय ते इतकी वर्षं प्रचारकार्य करूच शकले नसते; खासकरून विरोध आणि बंदी असतानाही.
८. प्रकटीकरण ९:१-११ यांत सांगितलेले टोळ कोणाला सूचित करतात? (मुखपृष्ठावर दिलेलं चित्र पाहा.)
८ प्रकटीकरण ९:१-११ वाचा. आता आपण चौथ्या कारणाकडे लक्ष देऊ या. योएलने उल्लेख केलेली टोळांची पीडा ही आपल्या प्रचारकार्याला सूचित करते असं आपण आधी म्हटलं होतं. कारण प्रकटीकरण या पुस्तकातसुद्धा अशीच एक भविष्यवाणी दिली आहे. या भविष्यावाणीत सांगितलं आहे की झुंडींनी येणाऱ्या टोळांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्यांसारखे होते आणि “त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काहीतरी होते.” (प्रकटी. ९:७) “ज्यांच्या [देवाच्या शत्रूंच्या] कपाळावर देवाचा शिक्का नाही” अशा लोकांना पाच महिने यातना देण्याचा अधिकार या टोळांना देण्यात आला. सहसा टोळ पाच महिने जगतात. (प्रकटी. ९:४, ५) हे टोळ यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना सूचित करतात. हे अभिषिक्त सेवक धैर्याने सांगतात की देव या दुष्ट जगाचा न्याय करणार आहे. आणि जे लोक जगाचं समर्थन करतात ते ही गोष्ट ऐकून अस्वस्थ होतात.
९. प्रकटीकरण आणि योएल या पुस्तकांत दिलेल्या भविष्यवाणीतल्या टोळांमध्ये कोणते महत्त्वपूर्ण फरक आहेत?
९ हे खरं आहे, की प्रकटीकरण आणि योएल या पुस्तकांत दिलेल्या भविष्यवाणीत काही गोष्टींमध्ये साम्य आहे. पण यांत काही महत्त्वाचे फरकसुद्धा आहेत. योएलच्या पुस्तकात दिलेल्या भविष्यवाणीत सांगितलं आहे की टोळ वनस्पतीला उद्ध्वस्त करतात. (योए. १:४, ६, ७) पण योहानने पाहिलेल्या दृष्टान्तात टोळांना सांगण्यात आलं होतं की त्यांनी “पृथ्वीवरील वनस्पतीला . . . नुकसान पोचवू नये.” (प्रकटी. ९:४) योएलने पाहिलेले टोळ उत्तरेकडून आले. (योए. २:२०) पण योहानने पाहिलेले टोळ ‘अथांग डोहातून’ आले. (प्रकटी. ९:२, ३) योएलने पाहिलेल्या टोळांना घालवून लावण्यात आलं. पण प्रकटीकरण या पुस्तकातल्या टोळांना घालवून देण्यात आलं नाही, तर त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याची अनुमती देण्यात आली. तसंच त्यांना यहोवाची स्वीकृती नव्हती किंवा तो त्यांच्यावर खूश नव्हता असंही बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही.—““ टोळांबद्दलच्या भविष्यवाण्या—मिळत्याजुळत्या तरी वेगळ्या” ही चौकट पाहा.
१०. बायबलमधलं एखादं उदाहरण वेगवेगळ्या गोष्टी सूचित करण्यासाठी कसं वापरलं जाऊ शकतं? एक उदाहरण द्या.
१० या दोन्ही भविष्यवाणीतले महत्त्वाचे फरक प्रकटीकरण ५:५ यात येशूला “यहुदाच्या वंशातला सिंह” म्हटलं आहे, तर १ पेत्र ५:८ यात सैतान हा “गर्जणाऱ्या सिंहासारखा” आहे असं म्हटलं आहे. आतापर्यंत आपण अशी चार कारणं पाहिली ज्यांमुळे आपल्याला समजलं की योएलच्या भविष्यवाणीबद्दल आपली समज सुधारण्याची गरज आहे. मग प्रश्न येतो, की योएलच्या भविष्यवाणीचा नेमका काय अर्थ होतो?
पाहिल्यावर स्पष्ट होतं, की त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. योएलच्या पुस्तकातले ‘टोळ’ आणि प्रकटीकरण पुस्तकातले ‘टोळ’ हे एक नसून वेगवेगळे आहेत, असा याचा अर्थ होतो का? हो. बायबल कधीकधी एकाच उदाहरणाचा वापर वेगवेगळ्या गोष्टी समजवण्यासाठी करतं. जसं की,योएलच्या भविष्यवाणीचा काय अर्थ होतो?
११. टोळ कोणाला सूचित करतात हे योएल १:६; २:१, ८, ११ या वचनांतून कसं दिसून येतं?
११ योएलच्या भविष्यवाणीच्या इतर वचनांचं आपण परीक्षण केलं तर आपल्याला समजतं की योएल, भविष्यात होणाऱ्या एका सैन्याच्या हल्ल्याबद्दल सांगत होता. (योए. १:६; २:१, ८, ११) यहोवाने सांगितलं की तो त्याच्या ‘महासैन्याचा’ (बाबेलच्या सैन्याचा) वापर करून, आज्ञा न मानणाऱ्या इस्राएली लोकांना शिक्षा करेल. (योए. २:२५) हल्ला करणारे “उत्तरेकडून” येतील असं जे म्हटलं आहे ते अगदी योग्य आहे, कारण बाबेलचं सैन्य हे इस्राएलवर उत्तरेकडून हल्ला करणार होतं. (योए. २:२०) या सैन्याची तुलना सुव्यवस्थित असलेल्या टोळांच्या झुंडीशी केली आहे. त्यांच्याबद्दल योएल म्हणतो, “ते आपआपल्या वाटेने जातात . . . ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरांत शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.” (योए. २:८, ९) तुम्ही कल्पना करू शकता का की हे दृश्य कसं होतं? ते सैन्य सगळीकडे होतं. कोणीही त्यांच्यापासून लपू शकलं नाही, किंवा त्यांच्या तावडीतून कोणीही सुटू शकलं नाही.
१२. टोळांबद्दल असलेली योएलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
१२ टोळांप्रमाणे बाबेलच्या (किंवा खास्द्यांच्या) सैन्याने इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमवर हल्ला केला. खास्द्यांच्या राजाबद्दल बायबल म्हणतं: “त्याने त्यांच्या तरुण पुरुषांस . . . तरवारीने वधले; त्याने तरुणांवर किंवा कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांस त्याच्या हाती दिले. खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तिथले वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.” (२ इति. ३६:१७, १९) खास्द्यांनी हल्ला करून सर्व काही नष्ट केल्यानंतर लोकांनी ते पाहून म्हटलं: “तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे.”—यिर्म. ३२:४३.
१३. यिर्मया १६:१६, १८ या वचनांचा काय अर्थ होतो?
१३ योएलने भविष्यवाणी केल्याच्या जवळपास २०० वर्षांनंतर यहोवाने यिर्मयाद्वारे या हल्ल्याबद्दल आणखी काहीतरी सांगितलं. त्याने म्हटलं की हल्ला करणारे, वाईट कामं करणाऱ्या एकेक इस्राएली व्यक्तीला शोधून काढतील आणि कोणीच त्यांच्या हातून सुटणार नाही. त्याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे की “परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणाऱ्यांस [मच्छीमारांना] बोलावीन, म्हणजे ते त्यांस पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकाऱ्यांस बोलावीन; म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारीतून त्यांस हुसकून काढून त्यांची शिकार करतील. . . . त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांस देईन.” म्हणजेच, पश्चात्ताप न करणारे इस्राएली लोक समुद्र, डोंगर किंवा रान अशा कुठल्याच ठिकाणी बाबेलच्या सैन्यापासून लपू शकणार नव्हते.—यिर्म. १६:१६, १८.
भरभराटीचा काळ येईल
१४. योएल २:२८, २९ ही भविष्यवाणी कधी पूर्ण झाली?
१४ योएल पुढे एक चांगली बातमी सांगतो. तो म्हणतो देशात पुन्हा भरभराट होईल. (योए. २:२३-२६) भविष्यात भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न उपलब्ध असेल. यहोवा म्हणतो: “मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, . . . दास व दासी यांवरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.” (योए. ) बाबेलमधून इस्राएली लोक पुन्हा आपल्या मायदेशी परत आले तेव्हा लगेच असं घडलं नाही. तर जवळपास सहाशे वर्षांनंतर म्हणजे, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी हे घडलं. असं आपण का म्हणू शकतो? २:२८, २९
१५. योएल २:२८ मधल्या शब्दांमध्ये, प्रेषितांची कार्ये २:१६, १७ या वचनांनुसार पेत्रने कोणते फेरबदल केले आणि यावरून काय दिसून येतं?
१५ प्रेषित पेत्रने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटलं, की योएल २: २८, २९ यांत दिलेली भविष्यवाणी पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या अद्भुत घटनेला लागू होते. त्या दिवशी सकाळी जवळपास ९ वाजता देवाने त्याचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांवर ओतला. आणि ज्यांच्यावर तो ओतण्यात आला ते वेगवेगळ्या भाषांमध्ये “देवाच्या अद्भुत गोष्टींबद्दल” बोलू लागले. (प्रे. कार्ये २:११) पण योएलच्या भविष्यवाणीबद्दल बोलताना पेत्रने जरा वेगळ्या शब्दांचा वापर केला. ते कोणते हे तुमच्या लक्षात आलं का? (प्रेषितांची कार्ये २:१६, १७ वाचा.) पेत्रने “यानंतर” असं म्हणण्याऐवजी “शेवटल्या दिवसांत” असं म्हणून सुरुवात केली. पण पेत्रने म्हटलेले शेवटले दिवस हे यहुदी व्यवस्थेचा, म्हणजेच यरुशलेम आणि त्यातल्या मंदिराचा नाश होण्याआधीचे दिवस याला सूचित करतात. आणि त्या दिवसांत देवाचा आत्मा “सर्व प्रकारच्या माणसांवर” ओतला जाणार होता. यावरून दिसून येतं, की योएलची भविष्यवाणी पूर्ण व्हायला बराच काळ लागला.
१६. पहिल्या शतकात देवाच्या पवित्र आत्म्याचा प्रचारकार्यावर कोणता परिणाम झाला आणि आजच्या दिवसांबद्दल आपण काय म्हणू शकतो?
१६ पहिल्या शतकात ख्रिश्चनांवर देवाने पवित्र आत्मा ओतल्यानंतर प्रचाराचं काम पूर्वी कधीही झालं नव्हतं, इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. यामुळेच इ.स. ६१ च्या सुमारास प्रेषित पौलने कलस्सैकरांना पत्र लिहिलं तेव्हा तो म्हणू शकला, की आनंदाचा संदेशाची घोषणा “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” करण्यात आली आहे. (कलस्सै. १:२३) आपल्या दिवसांतही यहोवाच्या शक्तिशाली पवित्र आत्म्याच्या मदतीने प्रचारकार्य खूप वाढलं आहे. आणि या आनंदाच्या संदेशाची घोषणा “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” केली जात आहे! —प्रे. कार्ये १३:४७; “ मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन” ही चौकट पाहा.
काय बदललं आहे?
१७. योएलने टोळांबद्दल सांगितलेल्या भविष्यवाणीबद्दल आता आपल्याला काय समजलं आहे?
१७ काय बदललं आहे याबद्दल आपण काय म्हणू शकतो? योएल २:७-९ यांत दिलेली भविष्यवाणी आता आपल्याला आणखी स्पष्टपणे समजली आहे. सोप्या शब्दांत सांगायचं, तर ही वचनं आपण आवेशाने करत असलेल्या प्रचारकार्याला नाही, तर इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलच्या सैन्याने यरुशलेमवर केलेल्या हल्ल्याला सूचित करतात.
१८. यहोवाच्या लोकांबद्दल कोणती गोष्ट बदललेली नाही?
१८ योएल २:७-९ यांत दिलेल्या भविष्यवाणीची आपली समज बदलली असली, तरी काय बदललेलं नाही? प्रचारकार्यातला आपला आवेश बदललेला नाही. आजही आपण प्रचार करण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग करून सगळीकडे प्रचार करतो. (मत्त. २४:१४) कोणतंही सरकार आपल्याला प्रचाराची जबाबदारी पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. खरंतर, आज आपण यहोवाच्या आशीर्वादामुळे प्रचाराचं काम धैर्याने आणि कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात करत आहोत. तेव्हा, बायबलच्या भविष्यवाण्यांचा अर्थ समजण्यासाठी आपण नम्रपणे यहोवावर विसंबून राहू या. आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो की तो आपल्याला योग्य वेळी “सत्य पूर्णपणे समजून घेण्यास मदत करेल.”—योहा. १६:१३.
गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या
^ परि. 5 बऱ्याच वर्षांपासून आपली अशी समज होती की योएल अध्याय १ आणि २ मध्ये दिलेली भविष्यवाणी आजच्या काळातल्या आपल्या प्रचारकार्याबद्दल आहे. पण असं दिसून येतं की या भविष्यवाणीबद्दल आपली समज सुधारण्याची गरज आहे. आणि याची चार कारणं आहेत. ती कोणती आहेत ते या लेखात आपण पाहू या.
^ परि. 3 उदाहरणासाठी टेहळणी बुरूज १५ एप्रिल, २००९ मधल्या “सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते” या लेखात परि. १४-१६ पाहा.