बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का?
“उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे.”—प्रे. कार्ये २२:१६.
१. मुलांनी बाप्तिस्मा घेण्याआधी ख्रिस्ती पालकांनी कोणत्या गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे?
ब्लॉसम ब्रॅण्ट या बहिणीने बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा काय घडलं, याबद्दल सांगताना ती म्हणते, “कितीतरी महिने मी आईबाबांना सारखं म्हणायचे की मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, मग ते त्याबद्दल माझ्याशी बऱ्याचदा बोलायचे. तो किती गंभीर निर्णय आहे हे मला नीट समजलं आहे ना, याची खात्री त्यांना करून घ्यायची होती. शेवटी ३१ डिसेंबर, १९३४ रोजी माझ्या आयुष्यातला तो महत्त्वपूर्ण क्षण आला.” ब्लॉसमच्या आईवडिलांप्रमाणेच आजही पालक आपल्या मुलांना मदत करू इच्छितात. त्यांची इच्छा असते की मुलांनी सुज्ञ निर्णय घ्यावेत. मुलांनी बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि पालकांनी त्यांना योग्य कारण न सांगता थांबायला सांगितलं, तर यामुळे मुलांचं यहोवाशी असलेलं नातं कमकुवत होऊ शकतं. (याको. ४:१७) पण यासोबतच आपलं मूल ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी तयार आहे की नाही याची खात्री सुज्ञ पालक मुलाने बाप्तिस्मा घेण्याआधी करून घेतात.
२. (क) कोणती गोष्ट काही विभागीय पर्यवेक्षकांच्या लक्षात आली आहे? (ख) या लेखात आपण काय चर्चा करणार आहोत?
२ काही विभागीय पर्यवेक्षकांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे. ती म्हणजे, मंडळींमध्ये १५ ते २५ वयोगटातले असे बरेचसे तरुण आहेत, जे सत्यात जरी
वाढले असले तरी त्यांचा बाप्तिस्मा अजून झालेला नाही. ही तरुण मुलं अनेकदा सभांना, प्रचाराला जातात आणि आपण यहोवाचे साक्षीदार आहोत असाही त्यांचा समज असतो. पण कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्यांनी अजूनपर्यंत यहोवाला समर्पण केलेलं नसतं आणि बाप्तिस्माही घेतलेला नसतो. काहींच्या बाबतीत तर याचं कारण त्यांचे पालक असतात. कारण त्यांना वाटतं की आपली मुलं बाप्तिस्मा घेण्याइतपत अजून तयार झाली नाहीत. या लेखात आपण अशा चार गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना बाप्तिस्मा घेण्याचं प्रोत्साहन देण्यापासून स्वतःला रोखलं आहे.माझं मूल बाप्तिस्मा घ्यायला खरंच तयार आहे का?
३. ब्लॉसमच्या आईवडिलांना कोणती चिंता होती?
३ लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या ब्लॉसमच्या आईवडिलांना चिंता होती, की त्यांच्या मुलीला बाप्तिस्मा म्हणजे काय हे माहीत आहे का. तसंच, हा किती गंभीर निर्णय आहे हे समजण्याइतपत तिचं वय झालं आहे का. यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी आपलं मूल तयार झालं आहे, हे पालक कसं जाणू शकतात?
४. मत्तय २८:१९, २० मध्ये दिलेल्या येशूच्या आज्ञेमुळे आज पालकांना कशी मदत होऊ शकते?
४ मत्तय २८:१९, २० वाचा. एका व्यक्तीने अमुक वयाचं झाल्यावरच बाप्तिस्मा घेतला पाहिजे असं बायबल सांगत नाही. पण शिष्य बनवणं म्हणजे काय, यावर पालकांनी खोलवर विचार केला पाहिजे. मत्तय २८:१९ मध्ये “शिष्य करा” या शब्दांचा ग्रीक भाषेत, एखाद्या व्यक्तीला विद्यार्थी किंवा शिष्य बनवण्याचं ध्येय लक्षात ठेवून तिला शिकवणं असा अर्थ होतो. शिष्य म्हणजे अशी व्यक्ती जी येशूने शिकवलेल्या गोष्टी शिकते, त्या समजून घेते आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याची तिची इच्छा असते. म्हणून जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासूनच पालकांनी त्याला शिकवलं पाहिजे. असं करताना, मुलांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित करावं आणि येशूचं शिष्य बनावं यासाठी त्यांची मदत करण्याचं ध्येय पालकांच्या मनात असणं गरजेचं आहे. हे खरं आहे, की तान्ही मुलं बाप्तिस्मा घेण्यासाठी पात्र नसतात. पण बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळतं, की मुलं जरी लहान असली तरी त्यांना बायबलची सत्ये समजतात आणि त्यांचं त्यावर प्रेम असतं.
५, ६. (क) बायबलमध्ये तीमथ्यबद्दल जे सांगितलं आहे त्यावरून आपल्याला त्याच्या बाप्तिस्म्याबद्दल काय कळतं? (ख) सुज्ञ पालकांकडे आपल्या मुलांची मदत करण्याचा कोणता उत्तम मार्ग आहे?
५ तीमथ्य एक शिष्य होता आणि त्याने लहान असताना यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेषित पौलने म्हटलं, की तीमथ्यने “बालपणापासून” देवाच्या वचनातून सत्य शिकायला सुरुवात केली होती. तीमथ्यचे वडील यहोवाची सेवा करत नव्हते. पण त्याच्या आईने आणि आजीने त्याला देवाच्या वचनावर प्रेम करायला शिकवलं. त्यामुळे तीमथ्यचा विश्वास खूप मजबूत झाला. (२ तीम. १:५; ३:१४, १५) तो किशोरवयात किंवा तरुण असतानाच मंडळीत काही खास जबाबदाऱ्या हाताळण्याइतपत प्रौढ बनला होता.—प्रे. कार्ये १६:१-३.
६ हाताची पाचही बोटं सारखी नसतात तशी मुलंही सारखी नसतात. सगळी मुलं विशिष्ट वयात प्रौढ होतात असं नाही. काही मुलांना सत्य लवकर समजतं, ते सुज्ञ निर्णय घेतात, आणि लहानपणीच बाप्तिस्मा घेतात. तर इतर थोडी मोठी झाल्यावर बाप्तिस्मा घेतात. सुज्ञ पालक आपल्या मुलांना बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत नाहीत. त्याऐवजी, मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार प्रगती करावी यासाठी ते त्यांना मदत करतात. नीतिसूत्रे २७:११ (वाचा.) या वचनात दिलेल्या तत्त्वांचं मूल जेव्हा पालन करतं तेव्हा पालकांना खूप आनंद होतो. पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून ते स्वतःला विचारू शकतात की, ‘यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याइतपत माझ्या मुलाकडे ज्ञान आहे का?’
माझ्या मुलाकडे पुरेसं ज्ञान आहे का?
७. बायबलचं पुरेपूर ज्ञान घेतल्यावरच एक व्यक्ती बाप्तिस्मा घेऊ शकते का? स्पष्ट करा.
७ पालक आपल्या मुलांना सत्य शिकवतात, तेव्हा मुलांना सत्य व्यवस्थित समजावं यासाठी ते त्यांना मदत करतात. सत्याबद्दल ज्ञान मिळाल्यामुळे आपलं जीवन देवाला समर्पित करण्यासाठी मुलं प्रेरित होतात. पण याचा अर्थ हा होत नाही, की मुलाला प्रत्येक बायबल शिकवणीबद्दल सगळं माहीत झाल्यावरच तो बाप्तिस्मा घेऊ शकतो. खरंतर, ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्याने बाप्तिस्मा झाल्यानंतरही शिकत राहणं गरजेचं आहे. (कलस्सैकर १:९, १० वाचा.) मग बाप्तिस्मा घेण्यासाठी एका व्यक्तीने किती ज्ञान घेतलं पाहिजे?
८, ९. फिलिप्पैमध्ये तुरुंग अधिकाऱ्यासोबत काय घडलं आणि आपण त्याच्या अनुभवावरून काय शिकू शकतो?
८ पहिल्या शतकातल्या एका कुटुंबाच्या उदाहरणावरून पालकांना आज मदत होऊ शकते. (प्रे. कार्ये १६:२५-३३) जवळपास इ.स. ५० मध्ये पौल आपल्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यावर असताना फिलिप्पै शहरात गेला. तिथे असताना त्याच्यावर आणि सीलावर खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. मग रात्रीच्या वेळी खूप मोठा भूकंप झाला आणि त्यामुळे तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. तिथल्या अधिकाऱ्याला वाटलं की सर्व कैदी पळून गेले आहेत आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण पौलने त्याला रोखलं. मग पौल आणि सीला यांनी त्या तुरुंग अधिकाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला येशूबद्दल सत्य शिकवलं. त्यांनी शिकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि येशूच्या आज्ञांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हेही त्यांना समजलं. म्हणून मग त्यांनी वेळ वाया न घालवता लगेच बाप्तिस्मा घेतला. या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?
९ तो तुरुंग अधिकारी कदाचित एक निवृत्त रोमी सैनिक असावा. त्याला देवाच्या वचनाबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे ख्रिस्ती बनण्यासाठी त्याने देवाच्या वचनातली मूलभूत सत्यं जाणून घेण्याची गरज होती. यहोवा आपल्या सेवकांकडून कोणत्या अपेक्षा करतो हे जाणून घेण्याची व येशूच्या आज्ञेचं पालन करण्याची त्याची इच्छा होती. तो त्या थोड्या काळादरम्यान जे काही शिकला त्यामुळे त्याला बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा मिळाली. पण हेदेखील खरं आहे, की बाप्तिस्मा घेतल्यावरही तो आणखी शिकत राहिला असावा. तुमच्या मुलाचं यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करण्याची इच्छा असल्यामुळे, ‘मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे’ असं जेव्हा ते तुम्हाला म्हणतं तेव्हा तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याला मंडळीतल्या वडिलांशी बोलण्याचं प्रोत्साहन देऊ शकता. बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसं ज्ञान आहे का, हे वडील ठरवतील. * बाप्तिस्म्यानंतरही तो इतर ख्रिस्तींसारखं आयुष्यभर म्हणजे सर्वकाळासाठी यहोवाबद्दल शिकत राहील.—रोम. ११:३३, ३४.
माझ्या मुलासाठी कोणतं शिक्षण सगळ्यात उत्तम आहे?
१०, ११. (क) काही पालक काय विचार करतात? (ख) मुलाचं संरक्षण नेमकं कशामुळे होऊ शकतं?
१० माझ्या मुलाने बाप्तिस्मा घेण्याआधी उच्च शिक्षण आणि चांगली नोकरी मिळवली तर त्याचं भलं होईल, असं काही पालकांना वाटतं. या पालकांचे हेतू चांगले असावेत, पण त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे: ‘खऱ्या अर्थाने यशस्वी बनण्यासाठी यामुळे मदत होणार आहे का? हा निर्णय आपण बायबलमधून जे शिकत आहोत त्यानुसार आहे का? आपण आपल्या जीवनाचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी करावा अशी यहोवाची इच्छा आहे?’—उपदेशक १२:१ वाचा.
११ हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, की हे जग आणि जगातल्या गोष्टी यहोवाच्या विचारांच्या आणि इच्छांच्या विरुद्ध आहेत. (याको. ४:७, ८; १ योहा. २:१५-१७; ५:१९) यहोवासोबत एक घनिष्ठ नातं असल्यामुळे आपल्या मुलाचं सैतानापासून, या दुष्ट जगापासून आणि जगातल्या वाईट विचारसरणीपासून रक्षण होऊ शकतं. शिक्षण आणि चांगली नोकरी हेच जीवनात सर्वात महत्त्वाचं आहे, असं जर पालक मुलांना नेहमी सांगत राहिले तर त्यांना वाटू लागेल की यहोवासोबतच्या आपल्या नात्यापेक्षा या जगातल्या गोष्टीच जास्त महत्त्वाच्या आहेत. हे धोक्याचं ठरू शकतं. आनंदी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तुमच्या मुलाने या जगाकडून शिकावं, अशी तुमची इच्छा आहे का? यशस्वी होण्याचा आणि खरा आनंद मिळवण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तो म्हणजे, यहोवाला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवणं!—स्तोत्र १:२, ३ वाचा.
बाप्तिस्म्यानंतर मुलाच्या हातून गंभीर पाप घडलं तर?
१२. आपल्या मुलाने बाप्तिस्मा लवकर घेऊ नये असा विचार काही पालक का करतात?
१२ आपल्या मुलीने बाप्तिस्मा घेऊ नये, असा विचार एक आई करायची. ती म्हणते: “मला खरंतर सांगताना कसंतरी वाटतंय, पण याचं मुख्य कारण होतं बहिष्कृत करण्याची व्यवस्था.” त्या बहिणीप्रमाणे काही पालकांना वाटतं की आपलं मूल तरुण असल्यामुळे त्याच्या हातून काही चुका होऊ शकतात म्हणून त्याने थोडं समजूतदार झाल्यावरच बाप्तिस्मा घ्यावा. (उत्प. ८:२१; नीति. २२:१५) असे पालक तर्क करतात की त्यांच्या मुलाचा बाप्तिस्माच झाला नाही, तर त्याला बहिष्कृत करण्याचा प्रश्नच येणार नाही. पण अशा प्रकारे विचार करणं चुकीचं आहे.—याको. १:२२.
१३. जर एखाद्याचा बाप्तिस्मा झाला नसेल तर त्याला यहोवाला जाब द्यावा लागणार नाही असा याचा अर्थ होतो का? स्पष्ट करा.
१३ हे खरं आहे, की मुलाने अविचारीपणे बाप्तिस्म्याचा निर्णय घ्यावा असं पालकांना वाटत नाही. पण त्याचा बाप्तिस्मा झाल्यावरच त्याला यहोवाला जाब द्यावा लागेल, असा विचार करणं चुकीचं आहे. यहोवाच्या नजरेत कोणती गोष्ट योग्य आणि अयोग्य आहे हे जेव्हा मुलाला समजू लागतं, तेव्हापासूनच त्याच्यावर यहोवाला हिशोब देण्याची जबाबदारी येते. (याकोब ४:१७ वाचा.) आपल्या मुलांनी बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सुज्ञ पालक त्यांना निरुत्साहित करत नाहीत, तर ते त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडतात. मूल लहान असलं तरी ते त्याला यहोवाच्या नजरेत योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकवतात. (लूक ६:४०) तुमच्या मुलाचं यहोवावर प्रेम असल्यामुळे तो त्याच्या धार्मिक स्तरांनुसार चालण्याचा प्रयत्न करेल आणि यामुळे गंभीर पाप करण्यापासून त्याचं रक्षण होईल.—यश. ३५:८.
इतर जण मदत करू शकतात
१४. पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात तेव्हा वडील त्यांची मदत कशी करू शकतात?
१४ यहोवाच्या सेवेत ध्येय ठेवण्याबद्दल पालक तर आपल्या मुलांशी बोलतातच. पण मंडळीतले वडीलही याबद्दल सकारात्मक बोलून मुलांना मदत करू शकतात. एक बहीण आपला अनुभव सांगते की ती जेव्हा सहा वर्षांची होती तेव्हा बंधू रस्सल तिच्याशी बोलले. ती म्हणते, “माझ्या आध्यात्मिक ध्येयांबद्दल त्यांनी माझ्याशी १५ मिनिटं चर्चा केली.” याचा तिच्यावर काय परिणाम झाला? ती बहीण पुढे जाऊन पायनियर बनली आणि तिने ७० पेक्षा जास्त वर्षं पायनियर सेवा केली! यावरून स्पष्टच आहे, की सकारात्मक बोल आणि प्रोत्साहन यांमुळे एका व्यक्तीच्या जीवनावर खूप गहिरा परिणाम होतो आणि त्यानुसार ती आपल्या संपूर्ण आयुष्याला आकार देते. (नीति. २५:११) वडील मंडळीच्या सभागृहाशी संबंधित असलेल्या कामांमध्ये पालकांना आणि मुलांना मदत करण्यासाठी बोलवू शकतात. ते मुलांच्या वयानुसार आणि क्षमतेनुसार त्यांना काही कामं देऊ शकतात.
१५. मंडळीतले इतर जण मुलांची कशी मदत करू शकतात?
१५ मंडळीतले इतर जण कसे हातभार लावू शकतात? ते मुलांमध्ये योग्य प्रमाणात वैयक्तिक आस्था दाखवू शकतात. उदाहरणार्थ, मंडळीतल्या मुलांचं यहोवावर प्रेम वाढत चाललं आहे हे तुम्हाला दिसून येत आहे का? म्हणजे, एखाद्या मुलाने सभेत चांगलं उत्तर दिलं का? किंवा आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेत त्याचा एखादा भाग स्तो. ३५:१८.
होता का? त्याने शाळेत कोणाला साक्ष दिली का? किंवा जेव्हा काही चुकीचं करण्याचं प्रलोभन आलं, तेव्हा त्याने योग्य पाऊल उचललं होतं का? या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि लगेच त्याला शाबासकी द्या! सभा सुरू होण्याआधी आणि नंतर आपण मुलांशी बोलण्याचं ध्येय ठेवू शकतो. आपण जेव्हा असं करतो तेव्हा ते ‘मोठ्या मंडळीचे’ एक भाग आहेत असं त्यांनाही वाटेल.—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुमच्या मुलाला मदत करा
१६, १७. (क) मुलांनी बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे? (ख) सर्व ख्रिस्ती पालक कोणता आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१६ आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवणं, हा पालकांसाठी एक खूप मोठा बहुमान आहे. (स्तो. १२७:३; इफिस. ६:४) इस्राएल राष्ट्र यहोवाला समर्पित राष्ट्र होतं, त्यामुळे प्रत्येक इस्राएली व्यक्ती जन्मापासूनच यहोवाला समर्पित असायची. पण आपल्या मुलांच्या बाबतीत तसं नाही. पालकांचं यहोवावर आणि सत्यावर प्रेम आहे म्हणून मुलांचंही असेलच, असं गृहित धरून चालणार नाही. मूल या जगात येतं तेव्हापासूनच पालकांचं ध्येय असलं पाहिजे, की त्यांनी त्याला एक शिष्य बनवावं आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत करावी. यापेक्षा आणखी महत्त्वाचं दुसरं काहीच असू शकत नाही. एका व्यक्तीने समर्पण केलं, बाप्तिस्मा घेतला आणि यहोवाची विश्वासूपणे सेवा केली, तरच त्याला मोठ्या संकटादरम्यान स्वतःचा बचाव करणं शक्य होईल.—मत्त. २४:१३.
१७ जेव्हा ब्लॉसम ब्रॅण्टला बाप्तिस्मा घ्यायचा होता, तेव्हा ती खरंच तयार आहे का याची खात्री तिच्या पालकांना करून घ्यायची होती. जेव्हा त्यांना खात्री पटली तेव्हा त्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. ब्लॉसमचा बाप्तिस्मा होण्याच्या आदल्या रात्री तिच्या वडिलांनी काय केलं, त्याबद्दल सांगताना ती म्हणते: “त्यांनी सर्वांना गुडघे टेकून बसायला सांगितलं आणि मग त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी यहोवाला म्हटलं, की त्यांच्या छकुलीने आपलं जीवन समर्पित करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल ते खूप आनंदी आहेत.” या गोष्टीला ६० पेक्षा जास्त वर्षं झाल्यानंतर ब्लॉसम म्हणते: “माझ्या आयुष्यातली ती रात्र मी कधीच विसरणार नाही!” पालकांनो, तुमची मुलं जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करतील, बाप्तिस्मा घेऊन त्याचे सेवक बनतील तेव्हा तुम्हीही असाच आनंद आणि समाधान अनुभवावा अशी आमची प्रार्थना आहे!
^ परि. 9 पालक आपल्या मुलासोबत क्वेश्चन्स यंग पीपल आस्क —आन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम २, पृ. ३०४-३१०; टेहळणी बुरूज, १५ जून २०११ पृ. ३-६ यांवर चर्चा करू शकतात. तसंच, आपली राज्य सेवा, एप्रिल २०११ पृ. २ यावर असलेली “प्रश्न पेटी” हीदेखील पाहा.