तो “उठेल हे मला माहीत आहे”
“आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला उठवायला तिथे जात आहे.”—योहा. ११:११.
१. मार्थाला आपल्या भावाच्या बाबतीत कोणती खात्री होती? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
येशूची शिष्या आणि त्याच्या जवळच्या मित्रपरिवारापैकी एक असलेली मार्था खूप दु:खात होती. तिचा भाऊ लाजर मरण पावला होता. मग असं काही होतं का ज्यामुळे तिला सांत्वन मिळणार होतं? नक्कीच. येशूने तिला वचन दिलं, की “तुझा भाऊ उठेल.” पण या शब्दांमुळे तिचं दु:ख नाहीसं होणार नव्हतं. तरीसुद्धा तिने येशूच्या वचनावर विश्वास ठेवला आणि म्हटलं, की “शेवटल्या दिवशी, तो पुनरुत्थानात उठेल हे मला माहीत आहे.” (योहा. ११:२०-२४) भविष्यात पुनरुत्थान होईल या गोष्टीची तिला पक्की खात्री होती. पण येशूने त्याच दिवशी चमत्कार करून लाजरचं पुनरुत्थान केलं.
२. तुम्हालाही मार्थासारखीच खात्री बाळगायला का आवडेल?
२ अर्थात येशू आणि त्याचा पिता, आपल्या प्रिय व्यक्तीचं लगेच पुनरुत्थान करतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. पण, भविष्यात मात्र त्यांचं पुनरुत्थान होईल याची मार्थाप्रमाणेच तुम्हाला खात्री आहे का? कदाचित तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीला, आई किंवा वडिलांना, तुमच्या प्रेमळ आजी किंवा आजोबांना किंवा तुमच्या लाडक्या लेकराला मृत्युमध्ये गमावलं असेल. तसंच त्यांना घट्ट मिठी मारण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी, हसण्यासाठी तुम्ही अगदी
आतुर असाल. मार्थाप्रमाणेच तुमच्याजवळही भविष्यात पुनरुत्थान होईल अशी खात्री बाळगण्याची अनेक कारणं आहेत. तिच्याप्रमाणेच तुम्हीही म्हणू शकता: ‘माझी प्रिय व्यक्ती पुनरुत्थानात उठेल हे मला माहीत आहे.’ असं असलं तरीही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हासुद्धा विचार केला पाहिजे, की आपल्याला ही खात्री का आहे.३, ४. येशूने नुकतंच काय केलं होतं आणि त्यामुळे मार्थाचा विश्वास कसा मजबूत झाला?
३ मार्था यरुशलेमजवळ राहायची. त्यामुळे गालीलमधल्या नाईन इथे येशूने विधवेच्या मुलाचं जे पुनरुत्थान केलं होतं, ते तिने कदाचित पाहिलं नसावं; पण त्याबद्दल तिने ऐकलं असावं. तसंच, येशूने याईरच्या मुलीचं पुनरुत्थान केलं होतं हेही तिने ऐकलं असावं. त्या मुलीच्या घरातल्या सर्वांना “ती मेली आहे हे . . . माहीत होते.” पण येशूने तिच्या हाताला धरून म्हटलं: “बाळा, ऊठ!” आणि ती लगेच जिवंत झाली. (लूक ७:११-१७; ८:४१, ४२, ४९-५५) मार्था आणि तिची बहीण मरीया या दोघींनाही माहीत होतं, की येशू आजार बरे करू शकतो. त्यामुळे तो जर तिथे असता तर लाजर मेला नसता, असं त्यांना वाटलं होतं. पण लाजर तर मरण पावला होता. मग आता मार्था कोणती अपेक्षा करू शकत होती? ती काय म्हणाली त्याकडे लक्ष द्या. ती म्हणाली, की लाजर भविष्यात “शेवटल्या दिवशी” उठेल हे मला माहीत आहे. पण या गोष्टीची तिला एवढी खात्री का होती? तसंच भविष्यात तुमच्या प्रिय व्यक्तींचं पुनरुत्थान होईल, याबद्दल तुम्ही खात्री का बाळगू शकता?
४ पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याची सबळ कारणं आपल्याजवळ आहेत. त्यांपैकी काहींवर आता आपण चर्चा करू या. असं करताना कदाचित तुम्हाला देवाच्या वचनातून असे काही मुद्दे सापडतील ज्यांचा तुम्ही सहसा विचार केला नसेल. त्यामुळे, तुमच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही पुन्हा पाहू शकाल यावरचा तुमचा विश्वास आणखी पक्का होईल.
आशा वाढवणाऱ्या बायबलमधल्या घटना
५. लाजरचं पुनरुत्थान होईल याबद्दल मार्थाला एवढी खात्री का होती?
५ लक्षात घ्या, मार्था असं म्हणाली नाही, की ‘माझा भाऊ कदाचित उठेल;’ तर, “तो . . . उठेल हे मला माहीत आहे,” असं ती म्हणाली. मार्थाला एवढी खात्री का होती? कारण, आधीच्या काळात झालेल्या पुनरुत्थानांबद्दल तिला माहीत होतं. तिने कदाचित लहाणपणी यांबद्दल घरात आणि सभास्थानात ऐकलं असावं. आता आपण बायबलमध्ये दिलेल्या पुनरुत्थानाच्या तीन घटनांचं परीक्षण करू या.
६. मार्थाला कोणत्या उल्लेखनीय घटनेबद्दल नक्कीच माहीत असावं?
६ पुनरुत्थानाची पहिली घटना, देवाने एलीया संदेष्ट्याला चमत्कार करण्याची शक्ती दिली होती त्या काळात घडली. इस्राएलच्या उत्तरेकडे असलेल्या सारफथ नगरात एक गरीब विधवा राहायची. तिने एलीया संदेष्ट्याचा पाहुणचार केला होता. त्यामुळे यहोवाने एक चमत्कार केला. त्या स्त्रीच्या घरातलं पीठ आणि तेल संपणार नाही; तसंच, ती आणि तिचा मुलगा जिवंत राहतील याची यहोवाने काळजी घेतली. (१ राजे १७:८-१६) काही काळाने मात्र तिचा मुलगा आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पण एलीयाने तिची मदत केली. त्याने त्या मुलाला स्पर्श केला आणि यहोवाला प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.” देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि ते मूल पुन्हा जिवंत झालं. बायबलमध्ये नमूद केलेलं हे पहिलं पुनरुत्थान आहे. (१ राजे १७:१७-२४ वाचा.) या उल्लेखनीय घटनेबद्दल मार्थाला नक्कीच माहीत असावं.
७, ८. (क) अलीशाने कशा प्रकारे एका दुःखी स्त्रीचं सांत्वन केलं? (ख) अलीशाने केलेल्या चमत्कारामुळे यहोवाबद्दल काय समजतं?
७ बायबलमध्ये नमूद केलेली पुनरुत्थानाची दुसरी घटना, अलीशा संदेष्ट्याच्या काळात घडली. शूनेम नावाच्या नगरात एक इस्राएली स्त्री राहायची. तिला मूलबाळ नव्हतं. अलीशाला पाहुणचार दाखवल्यामुळे, यहोवाने तिला व तिच्या वयोवृद्ध पतीला आशीर्वाद दिला आणि त्यांना एक मुलगा झाला. पण काही वर्षांनी तो मुलगा मरण पावला. विचार करा, त्या स्त्रीला किती दुःख झालं असेल! इतकं, की अलीशाला भेटण्यासाठी ती ३० किलोमीटरचा प्रवास करून कर्मेल डोंगरावर गेली. अलीशाने त्या मुलाचं पुनरुत्थान करण्यासाठी आपला सेवक गेहजी याला पुढे पाठवलं. पण गेहजी त्या मुलाचं पुनरुत्थान करू शकला नाही. त्यानंतर, दुःखात बुडालेली २ राजे ४:८-३१.
ती स्त्री अलीशाला सोबत घेऊन घरी पोहोचली.—८ मग मृत मुलाला ज्या खोलीत ठेवलं होतं, तिथं अलीशा गेला आणि त्याने प्रार्थना केली. यहोवाने अलीशाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि चमत्कार करून मुलाला जिवंत केलं. आपल्या मुलाला जिवंत झालेलं पाहून त्या स्त्रीला खरंच किती आनंद झाला असेल! (२ राजे ४:३२-३७ वाचा.) त्या वेळी कदाचित तिला हन्नाच्या प्रार्थनेतले शब्द आठवले असतील. हन्नालाही मूलबाळ नव्हतं, पण यहोवाच्या आशीर्वादाने तिला शमुवेल झाला होता. त्यामुळे यहोवाची स्तुती करताना तिने म्हटलं होतं: “तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो.” (१ शमु. २:६) शूनेममधल्या स्त्रीच्या मुलाचं पुनरुत्थान करण्याद्वारे यहोवाने दाखवून दिलं, की त्याच्याकडे मृतांचं पुनरुत्थान करण्याची क्षमता आहे.
९. बायबलमध्ये नमूद केलेल्या पुनरुत्थानाच्या तिसऱ्या घटनेचं वर्णन करा.
९ पुनरुत्थानाची तिसरी घटना अलीशाच्या मृत्यूनंतर घडली. अलीशाने जवळजवळ ५० वर्षं संदेष्टा म्हणून देवाची सेवा केली होती. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पुढे काही काळानंतर जेव्हा कबरेत त्याची फक्त हाडं उरली होती, तेव्हा एक विलक्षण घटना घडली. काही इस्राएली लोक एका माणसाचा मृतदेह कबरेत ठेवत असताना, अचानक त्यांना शत्रू येत असल्याचे दिसले. त्यामुळे तो मृतदेह अलीशाच्या कबरेत टाकून ते पळून गेले. बायबल म्हणतं: “अलीशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायांवर उभा राहिला.” (२ राजे १३:१४, २०, २१) या घटनांवरून मार्थाची नक्कीच खात्री पटली असेल, की यहोवाकडे मृत्यूवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य आहे. आणि यांवरून तुम्हालाही खात्री पटत नाही का, की देवाकडे अफाट व अमर्याद सामर्थ्य आहे?
प्रेषितांच्या काळातल्या घटना
१०. पेत्रने मरण पावलेल्या एका ख्रिस्ती बहिणीच्या बाबतीत काय केलं?
१० ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतही देवाच्या विश्वासू सेवकांनी केलेल्या पुनरुत्थानाच्या घटनांबद्दल सांगण्यात आलं आहे. आपण लेखाच्या सुरुवातीला पाहिलं होतं, की येशूने कशा प्रकारे नाईन नगरात आणि याईरच्या घरी पुनरुत्थान केलं होतं. पुढे काही काळानंतर प्रेषित पेत्रनेही तबीथा म्हणजेच दुर्कस हिचं पुनरुत्थान केलं. तिचा मृतदेह ज्या खोलीत ठेवला होता तिथं पेत्र गेला आणि त्याने प्रार्थना करून म्हटलं: “तबीथा, ऊठ!” तेव्हा ती लगेच जिवंत झाली. मग पेत्रने तिला तिथे असलेल्या बंधुभगिनींकडे नेलं. या घटनेमुळे लोकांची इतकी खात्री पटली, की त्या शहरातले “बरेच जण प्रभूवर विश्वास ठेवू लागले.” हे नवीन शिष्य आता इतरांना येशूबद्दलचा संदेश आणि त्यासोबतच मृतांना जिवंत करण्याच्या यहोवाच्या शक्तीबद्दलही सांगू शकत होते.—प्रे. कार्ये ९:३६-४२.
११. वैद्य असलेल्या लूकने युतुखबद्दल काय सांगितलं आणि या घटनेचा इतरांवर कसा प्रभाव पडला?
११ पुनरुत्थानाची आणखी एक घटना विचारात घ्या. ही घटना अनेकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. एकदा प्रेषित पौल त्रोवसमध्ये माडीवरच्या खोलीत भरलेल्या सभेत भाषण देत होता. त्रोवस हे ठिकाण सध्या टर्कीच्या उत्तर-पश्चिमेकडे आहे. तिथे पौल मध्यरात्रीपर्यंत भाषण देत होता. त्या वेळी युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसून भाषण ऐकत होता. पण त्याला झोप लागली आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. कदाचित सगळ्यात आधी लूक त्याच्याकडे धावत गेला असावा. लूक एक वैद्य होता, त्यामुळे युतुख जखमी आणि बेशुद्ध नाही, तर मरण पावला आहे हे त्याच्या लक्षात आलं असावं. पौलसुद्धा लगेच खाली गेला. त्याने युतुखला मिठी मारली आणि “तो जिवंत आहे,” असं म्हणून सगळ्यांनाच चकित केलं. हा चमत्कार पाहिलेल्या सर्वांवरच याचा खूप प्रभाव पडला. एका मृत तरुणाचं पुनरुत्थान झालं आहे, हे जाणून “त्यांना अतिशय सांत्वन मिळाले.”—प्रे. कार्ये २०:७-१२.
भरवशालायक आशा
१२, १३. पुनरुत्थानाबद्दल आपण जी चर्चा केली त्यावरून कोणते प्रश्न कदाचित तुमच्या मनात येतील?
१२ आतापर्यंत आपण ज्या घटनांवर चर्चा केली, त्यांमुळे मार्थासारखीच पुनरुत्थानावर तुमची खात्री पटली असेल. आपण हा भरवसा बाळगू शकतो, की
आपल्याला जीवन देणारा देव हा मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करू शकतो. लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, पुनरुत्थानाच्या या प्रत्येक घटनेच्या वेळी देवाचा एक विश्वासू सेवक तिथे उपस्थित होता; जसं की, एलीया, येशू आणि पेत्र. तसंच, या घटना त्या काळात घडल्या जेव्हा यहोवा चमत्कार करत होता. पण जेव्हा असे चमत्कार होत नव्हते त्या काळात मरण पावलेल्या लोकांबद्दल काय? देव भविष्यात मृत लोकांना पुन्हा उठवेल अशी अपेक्षा त्या काळातले विश्वासू स्त्री-पुरुष करू शकत होते का? तसंच, “शेवटल्या दिवशी, तो पुनरुत्थानात उठेल हे मला माहीत आहे,” असं आपल्या भावाबद्दल म्हणणाऱ्या मार्थासारखा तेही भरवसा बाळगू शकत होते का? भविष्यात पुनरुत्थान होईल अशी खात्री मार्थाला का होती आणि तशीच खात्री तुम्हीही का बाळगू शकता?१३ बायबलचे अनेक अहवाल दाखवतात, की भविष्यात पुनरुत्थान होईल हे देवाच्या विश्वासू सेवकांना माहीत होतं. त्यांपैकी काही अहवाल आता आपण पाहू या.
१४. अब्राहामच्या अहवालातून पुनरुत्थानाबद्दल आपण काय शिकतो?
१४ यहोवाने अब्राहामला इसहाकच्या बाबतीत काय सांगितलं याचा विचार करा. खूप वर्षं वाट पाहिल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला होता. यहोवा अब्राहामला म्हणाला: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” (उत्प. २२:२) ही आज्ञा ऐकल्यानंतर अब्राहामला कसं वाटलं असेल? यहोवाने अब्राहामला असं अभिवचन दिलं होतं, की त्याच्या संततीद्वारे सर्व राष्ट्रं आशीर्वादित होतील. (उत्प. १३:१४-१६; १८:१८; रोम. ४:१७, १८) शिवाय, ही संतती इसहाकद्वारेच येईल असंही यहोवाने सांगितलं होतं. (उत्प. २१:१२) पण जर अब्राहामने आपल्या मुलाला अर्पण केलं असतं, तर देवाने दिलेलं अभिवचन कसं पूर्ण झालं असतं? पौलने देवाच्या प्रेरणेने याबद्दल असं स्पष्ट केलं, की देव इसहाकचं पुनरुत्थान करेल असा विश्वास अब्राहामला होता. (इब्री लोकांना ११:१७-१९ वाचा.) अर्थात, इसहाक लगेच किंवा काही तासांत, एका दिवसात किंवा एका आठवड्यात जिवंत होईल असा विचार अब्राहामने केला, असं बायबलमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. आपल्या मुलाचं पुनरुत्थान केव्हा होईल हे अब्राहामला माहीत नव्हतं. पण, यहोवा त्याला परत जिवंत करेल असा विश्वास मात्र त्याने बाळगला.
१५. देवाचा विश्वासू सेवक ईयोब याला कोणती आशा होती?
१५ देवाचा विश्वासू सेवक ईयोब यालाही माहीत होतं, की भविष्यात मृतांचं पुनरुत्थान होईल. त्याला हे माहीत होतं, की एखादं झाड कापून टाकलं तरी त्याला पुन्हा पालवी फुटते आणि जणू ते एक नवीन झाड बनतं. पण मानवांच्या बाबतीत असं होत नाही. (ईयो. १४:७-१२; १९:२५-२७) एखादा मनुष्य जर मेला तर तो स्वतःला जिवंत करू शकत नाही. (२ शमु. १२:२३; स्तो. ८९:४८) पण याचा अर्थ असा होत नाही, की देव मानवांचं पुनरुत्थान करू शकत नाही. खरंतर, ईयोबला भरवसा होता की यहोवा त्याची आठवण करेल. (ईयोब १४:१३-१५ वाचा.) अर्थात, भविष्यात हे केव्हा घडेल हे ईयोबला माहीत नव्हतं. पण, मानवांना जीवन देणारा निर्माणकर्ता आपली आठवण करून आपलं पुनरुत्थान करू शकतो; आणि तो हे नक्की करेल असा भरवसा त्याला होता.
१६. देवदूताने दानीएलला कसं प्रोत्साहन दिलं?
१६ देवाच्या आणखी एका विश्वासू सेवकाचा, दानीएलचा विचार करा. त्याने आयुष्यभर यहोवाची विश्वासूपणे सेवा केली होती आणि यहोवानेही त्याला नेहमीच आधार दिला होता. एकदा एका देवदूताने दानीएलला ‘परमप्रिय पुरुष’ असं म्हटलं. तसंच, “तुला शांती असो” आणि “हिंमत धर” असंही त्याला म्हटलं.—दानी. ९:२२, २३; १०:११, १८, १९.
१७, १८. यहोवाने दानीएलला कोणतं अभिवचन दिलं?
१७ वयाची शंभरी उलटल्यानंतर आणि आयुष्याच्या अखेरीस पोहोचल्यावर मात्र वृद्ध झालेल्या दानीएलला असा प्रश्न पडला असावा, की आता आपलं पुढे काय होईल? आपलं पुनरुत्थान होईल, अशी अपेक्षा दानीएलने केली असेल का? नक्कीच! त्याच्या पुस्तकाच्या शेवटी, देवाने त्याला दिलेल्या अभिवचनाबद्दल आपण असं वाचतो: “अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल.” (दानी. १२:१३) दानीएलला माहीत होतं, की मृतांना विश्रांती मिळते आणि तो ज्या अधोलोकात, म्हणजे कबरेत जाणार आहे, “तिथे काही उद्योग, युक्ती-प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.” (उप. ९:१०) पण, दानीएलसाठी हा शेवट नव्हता. यहोवाने त्याला भविष्यासाठी एक अद्भुत आशाही दिली होती.
१८ यहोवाच्या दूताने त्याला म्हटलं: “तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.” हे नक्की केव्हा घडेल हे दानीएलला माहीत नव्हतं. आपला मृत्यू होईल आणि आपल्याला आराम किंवा विश्रांती मिळेल हे त्याला समजलं होतं. पण, “तू . . . आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील,” हे अभिवचन त्याने ऐकलं तेव्हा त्याला समजलं, की त्याचं पुनरुत्थान भविष्यात होईल. आणि हे त्याच्या मृत्यूच्या बऱ्याच काळानंतर, अर्थात “युगाच्या समाप्तीस” घडणार होतं.
१९, २०. (क) आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या घटना आणि मार्था येशूला जे म्हणाली ते, एकमेकांशी कशा प्रकारे संबंधित आहे? (ख) आपण पुढच्या लेखात काय पाहणार आहोत?
१९ भविष्यात पुनरुत्थान होईल या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची सबळ कारणं मार्थाकडे होती; आणि म्हणूनच आपल्या विश्वासू भावाबद्दल ती म्हणाली: “शेवटल्या दिवशी, तो पुनरुत्थानात उठेल.” यहोवाने दानीएलला जे अभिवचन दिलं होतं आणि भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानावर मार्थाचा जो अढळ विश्वास होता, त्यांमुळे भविष्यात पुनरुत्थान होईल यावरचा आपलाही भरवसा वाढत नाही का?
२० या लेखात आपण प्राचीन काळात झालेल्या पुनरुत्थानाच्या खऱ्याखुऱ्या घटनांबद्दल शिकलो. त्या घटना दाखवून देतात, की मृत लोक पुन्हा जिवंत होऊ शकतात. आपण हेही पाहिलं, की देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या स्त्री-पुरुषांनीही भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाची आशा बाळगली. पण बायबलमध्ये असं एखादं उदाहरण आहे का, ज्यात पुनरुत्थानाचं अभिवचन दिल्याच्या अनेक वर्षांनंतर ते पुनरुत्थान झालं? असं एखादं उदाहरण असेल तर भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल आपला विश्वास आणखी मजबूत होईल. पण भविष्यात पुनरुत्थान नेमकं कधी होईल? याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.