१९१९—शंभर वर्षांआधी
चार वर्षांपर्यंत चाललेलं विश्वयुद्ध (नंतर त्याला पहिलं महायुद्ध असंही नाव देण्यात आलं) शेवटी १९१९ मध्ये संपलं. याच्या थोड्या काळाआधी राष्ट्रांनी आपसात लढाया थांबवल्या होत्या आणि १८ जानेवारी १९१९ ला पॅरीस पीस कॉन्फरन्स किंवा शांती परिषद याची सुरुवात झाली. या परिषदाने काही गोष्टी यशस्वीपणे घडवून आणल्या. त्यांपैकी एक म्हणजे ट्रिटी ऑफ वर्सेल्स किंवा व्हर्सायचा तह. यामुळे जर्मनीचं राष्ट्रांच्या गटासोबत चाललेलं युद्ध थांबलं. हा तह किंवा करार २८ जून १९१९ ला करण्यात आला.
या करारामुळे एक नवीन संघटना सुरू झाली. ती म्हणजे, लीग ऑफ नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघ. “जगभरातल्या सर्व राष्ट्रांमध्ये एकी असणं व जागतिक स्तरावर शांती आणि सुरक्षा स्थापित करणं” हा हिचा हेतू होता. ख्रिस्ती जगताच्या अनेक पंथांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पाठिंबा दिला. फेडरल कौन्सिल ऑफ द चर्चेस ऑफ क्राइस्ट या संघटनेने राष्ट्रसंघाची प्रशंसा करत म्हटलं की, हा संघ “पृथ्वीवरील देव राज्याची राजकीय अभिव्यक्ती आहे.” या संघटनेने पॅरीस पीस कॉन्फरन्सला आपल्या काही लोकांना पाठवून आपलं समर्थन दर्शवलं. त्यांपैकी एकाने म्हटलं की या परिषदेमुळे “जगाच्या इतिहासात नवीन युगाची सुरुवात होणार आहे.”
एक नवीन युग सुरू होणार होतं. पण ते त्या शांती परिषदेत उपस्थित असलेल्या लोकांमुळे नाही, तर १९१९ मध्ये आपल्या लोकांना प्रचार करण्यासाठी यहोवाने पूर्वी कधी नव्हे इतकं बळ दिल्यामुळे ते सुरू होणार होतं. पण त्याआधी बायबल विद्यार्थ्यांना खूप मोठ्या बदलाला सामोरं जावं लागणार होतं.
एक कठीण निर्णय
वॉच टॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीमध्ये पुढाकार घेणाऱ्या डायरेक्टर्सची वार्षिक निवडणूक ४ जानेवारी १९१९ या दिवशी ठरवण्यात आली होती. त्या वेळी जोसेफ एफ. रदरफर्ड यहोवाच्या लोकांचं नेतृत्व करत होते. पण त्यांना आणि आणखी सात जणांना अमेरिकेत जॉर्जिया इथल्या ॲटलँटाच्या तुरुंगात काहीही गुन्हा नसताना टाकण्यात आलं होतं. मग प्रश्न हा होता की तुरुंगात असलेल्या बांधवांना पुन्हा निवडून डायरेक्टर्स बनवायचं की त्यांच्या जागी इतरांना निवडायचं.
तुरुंगात असताना बंधू रदरफर्ड यांना संघटनेच्या भवितव्याची चिंता होती. त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष बनवणं योग्य राहील असं काही बांधवांना वाटत आहे ही गोष्ट त्यांना माहीत होती. म्हणून मग त्यांनी पत्र लिहून कळवलं की इवॅन्डर जे. कावर्ड याला अध्यक्ष बनवण्यात यावं. त्यांनी म्हटलं, की हा बांधव शांत, बुद्धिमान आणि प्रभूला विश्वासू आहे. पण अनेक बांधवांनी वेगळा मार्ग सुचवला. निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी असं त्यांनी म्हटलं. तुरुंगात असलेल्या बांधवांच्या बाजूने न्यायालयात लढलेल्या न्यायिक समितीलाही ही गोष्ट पटली. यावर चर्चा सुरू असताना काही बांधव नाराजही झाले.
तुरुंगात बंधू रदरफर्डच्या बाजूच्या खोलीत बंधू ए. एच. मॅकमिलन होते. ते त्याबद्दल म्हणतात की निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी बंधू रदरफर्ड यांनी भिंतीवर थाप मारली आणि त्यांनी बंधू मॅकमिलनला आपला हात बाहेर काढायला सांगितला. मग बंधू रदरफर्डने बंधू मॅकमिलनच्या हातावर एक टेलीग्राम ठेवला. त्यात थोडक्यात संदेश होता जो वाचल्यावर बंधू मॅकमिलनला त्यातला मजकूर समजला. त्यात लिहिलं होतं: “रदरफर्ड, वाईज, वॅन, बार्बर, ॲन्डरसन, बुली आणि स्पील पहिले तीन डायरेक्टर्स यांना आमच्याकडून प्रेम.” याचा अर्थ सर्व डायरेक्टर्स यांना पुन्हा निवडण्यात आलं होतं आणि जोसेफ रदरफर्ड व विल्यम वॅन ॲमबर्ग यांना पुन्हा मुख्य जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. आता बंधू रदरफर्ड पुन्हा अध्यक्ष बनले होते.
सुटका
या आठ बांधवांची सुटका व्हावी म्हणून बायबल विद्यार्थ्यांनी सरकारला एक विनंती अर्ज द्यायचं ठरवलं. आणि यासाठी या धाडसी भाऊबहिणींनी त्यावर ७,००,००० पेक्षा जास्त लोकांच्या सह्या मिळवल्या. मग २६ मार्च, १९१९ या तारखेला, हा अर्ज देण्याआधी बंधू रदरफर्ड आणि जबाबदारी असणाऱ्या इतर बांधवांची सुटका झाली.
मग बंधू रदरफर्ड यांचं स्वागत करायला आलेल्या भाऊबहिणींना ते म्हणाले: “मला पक्की खातरी पटली आहे की हा अनुभव आपल्याला पुढे येणाऱ्या कठीण काळासाठी तयार करेल. . . . बांधवांना बाहेर काढणं ही खरंतर तुमची लढाई नव्हती, तर . . . ही लढाई यहोवाच्या नावाला गौरव आणण्यासाठी होती आणि ज्यांनी यात सहभाग घेतला आहे, त्यांना मोठं प्रतिफळ मिळेल.”
त्या वेळी घटना ज्या पद्धतीने घडत होत्या त्यावरून बांधवांना समजत होतं की यहोवाचा त्यांना पाठिंबा आहे. १४ मे १९१९ ला अपील केलेल्या कोर्टाने म्हटलं: “या केसमध्ये ज्यांच्यावर खटला चालवण्यात आला आहे त्यांच्यासोबत . . . अन्याय झाला आहे आणि यामुळे जो निकाल होता तो उलटण्यात येतो.” तसं पाहायला गेलं तर बांधवांवर गंभीर गुन्हा केल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि जर आधी दिलेला निकाल उलटण्याऐवजी त्यांना माफी मिळाली असती किंवा त्यांची शिक्षा कमी केली असती तर त्यांच्यावर लावलेले आरोप कायमस्वरूपी राहिले असते. पण निकाल उलटल्यामुळे तसं झालं नाही. मग यानंतर त्यांच्यावर आणखी आरोप लावण्यात आले नाहीत. याचा परिणाम काय झाला? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या लोकांच्या बाजूने लढण्याची न्यायाधीश रदरफर्ड यांची कायदेशीर पात्रता टिकून राहिली. आणि सुटकेनंतर ते अनेक वेळा आपल्या बांधवांच्या बाजूने लढलेही.
प्रचार करण्याचा निर्धार
बंधू मॅकमिलन आठवून म्हणतात “येशू येईल आणि आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल म्हणून आम्हाला काहीच करायची
गरज नाही, असा विचार करून आम्ही हातावर हात ठेवून बसणार नव्हतो. आम्हाला जाणीव झाली की आम्हाला काहीतरी करावं लागेल ज्यावरून कळेल की प्रभूची इच्छा काय आहे.”मुख्यालयातले बांधव अनेक वर्षं करत असलेलं काम पुन्हा सुरू करू शकत नव्हते. पण का? कारण बांधव तुरुंगात असताना साहित्य छापण्यासाठी असलेल्या प्रिंटिंग प्लेट्स नष्ट करण्यात आल्या होत्या. ही खरंच निराश करणारी गोष्ट होती आणि प्रचारकार्य संपलं आहे का असा प्रश्न काही बांधवांना पडला होता.
बायबल विद्यार्थी राज्याचा जो आनंदाचा संदेश लोकांना सांगत होते आता त्यात आवड घेणारे कोणी उरले होते का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी बंधू रदरफर्ड यांनी एक भाषण द्यायचं ठरवलं. सर्वांना आमंत्रण देण्यात येणार होतं. बंधू मॅकमिलन यांनी म्हटलं की “समजा कोणी आलं नाही तर आपल्याला समजेल की जे प्रचारकार्य व्हायचं होतं ते झालं आहे आणि आता पुढे प्रचारकार्य करण्याची गरज नाही.”
मग ४ मे १९१९ हा दिवस उजाडला. बंधू रदरफर्ड यांची तब्येत खराब होती. तरी त्यांनी कॅलिफोर्निया इथल्या लॉस अँजिलीस या ठिकाणी “दुःखाने पीडित मानवांसाठी आशा” या विषयावर भाषण दिलं. जवळपास ३५०० लोक आले आणि जागा नसल्यामुळे कितीतरी लोकांना परत पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी १५०० लोक आले. बांधवांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं होतं. लोकांना अजूनही राज्याच्या संदेशात आवड होती!
त्यानंतर बांधवांनी जे पाऊल उचललं ते आज यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या प्रचारकार्यासाठी पाया ठरला; त्याचा प्रभाव आजही आपल्या प्रचारकार्यावर दिसून येतो.
भविष्यात होणाऱ्या वाढीसाठी सुसज्ज
१ ऑगस्ट, १९१९ या तारखेच्या द वॉचटॉवरमध्ये अशी घोषणा छापून आली की सप्टेंबरच्या सुरुवातीला ओहायोच्या सीडर पॉईंट इथे एक अधिवेशन भरणार आहे. त्या काळी मिझूरी इथे राहणारे क्लॅरेन्स बी. बिटी नावाचे बायबल विद्यार्थी त्याबद्दल आठवून म्हणतात: “सर्वांनी तिथे हजर राहिलंच
पाहिजे असं आम्हाला वाटत होतं.” अपेक्षेपलीकडे म्हणजे ६,००० पेक्षा जास्त भाऊबहीण तिथे उपस्थित राहिले! या आनंदात आणखी भर म्हणजे जवळच्या एरी नावाच्या तळ्यात २०० पेक्षा जास्त जणांनी बाप्तिस्मा घेतला.मग ५ सप्टेंबर, १९१९ ला म्हणजे अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बंधू रदरफर्ड यांनी “सोबत काम करणाऱ्यांसाठी संदेश” या भाषणात एक नवीन नियतकालिक, “द गोल्डन एज” * प्रकाशित होणार असल्याची घोषणा केली. त्यात “सध्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी आणि या मोठमोठ्या घटना का घडत [होत्या] त्याबद्दल शास्त्रवचनांचं स्पष्टीकरण” दिलं जाणार होतं.
सर्व बायबल विद्यार्थ्यांना या नियतकालिकेचा वापर करून धैर्याने प्रचार करायला सांगण्यात आलं. हे काम कसं सुव्यवस्थितपणे केलं जाणार त्याबद्दल एका पत्रात लिहिलं होतं, की “प्रत्येक बाप्तिस्माप्राप्त व्यक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिला सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे आणि तिने जगभरात साक्ष देण्याच्या या मोठ्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे.” या आमंत्रणाला बऱ्याच भाऊबहिणींनी चांगला प्रतिसाद दिला. आवेशी राज्य प्रचारकांनी खूप मेहनत घेतली आणि डिसेंबरपर्यंत ५०,००० पेक्षा जास्त लोकांनी हे नवीन नियतकालिक नियमितपणे मिळण्याची मागणी केली.
१९१९ या वर्षाच्या अखेरीस यहोवाचे लोक पुन्हा सुव्यवस्थित पद्धतीने आणि नव्या जोमाने काम करू लागले. शेवटच्या दिवसांबद्दल असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्याही पूर्ण झाल्या होत्या. तसंच, मलाखी ३:१-४ मध्ये देवाच्या लोकांची परीक्षा आणि त्यांचं शुद्धीकरण होण्याबद्दलची भविष्यवाणीदेखील पूर्ण झाली होती. त्यासोबतच, लाक्षणिक पद्धतीने “मोठी बाबेल” हिच्या तावडीत असलेल्या यहोवाच्या लोकांची आता सुटका झाली होती. आणि येशूने “विश्वासू आणि बुद्धिमान दास” * यांनासुद्धा नियुक्त केलं होतं. (प्रकटी. १८:२, ४; मत्त. २४:४५) याचाच अर्थ, बायबल विद्यार्थी पुढे राखून ठेवलेल्या यहोवाच्या कामासाठी पूर्णपणे सुसज्ज झाले होते.
^ परि. 22 द गोल्डन एज याचं नाव १९३७ मध्ये कॉन्सोलेशन असं ठेवण्यात आलं आणि १९४६ मध्ये अवेक! असं ठेवण्यात आलं.