व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विदेशी लोकांवर दया दाखवा

विदेशी लोकांवर दया दाखवा

“अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका.”—इब्री १३:२.

गीत क्रमांक: ३, ५०

१, २. (क) अनेक विदेशी लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना कोणत्या गोष्टीची आठवण करून दिली, आणि आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

जवळजवळ ३० वर्षांआधी घानामध्ये राहणारा स्टेफन [1] युरोपमध्ये राहायला आला. त्या वेळी तो यहोवाचा साक्षीदार नव्हता. तो म्हणतो: “इथं आल्यानंतर लवकरच मला जाणवलं की बहुतेक लोकांना माझं काहीच घेणं-देणं नव्हतं. इथलं हवामानदेखील माझ्यासाठी खूपच वेगळं होतं. एअरपोर्टवरून बाहेर पडल्यावर मी पहिल्यांदाच थंडी काय असते ते अनुभवत होतो. इतक्या कडाक्याची थंडी मला सहनच होत नव्हती. मला अक्षरशः रडू आलं.” तिथली भाषा शिकून घेणं स्टेफनसाठी खूप कठीण होतं, त्यामुळे एक चांगली नोकरी मिळवण्याकरता त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. शिवाय, तो आपल्या घरापासून आणि आपल्या कुटुंबापासून खूप दूर असल्यामुळे त्याला त्यांची खूप आठवण यायची आणि एकटेपणाही जाणवायचा.

कल्पना करा की तुम्ही स्टेफनच्या ठिकाणी आहात. अशा वेळी लोकांनी तुमच्याशी कसा व्यवहार करावा असं तुम्हाला वाटलं असतं? तुम्ही कुठल्या देशाचे आहात किंवा कुठल्या वर्णाचे आहात याची कोणतीही पर्वा न करता, राज्य सभागृहात लोकांनी प्रेमानं केलेल्या स्वागताची तुम्ही नक्कीच कदर केली असती. खरंतर बायबल खऱ्या ख्रिश्चनांना हेच करण्याचं उत्तेजन देतं. त्यात म्हटलं आहे: “अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका.” (इब्री १३:२) म्हणून मग आता आपण तीन प्रश्नांवर विचार करूयात: (१) विदेशी लोकांप्रती यहोवा देवाचा दृष्टिकोन कसा आहे? (२) विदेशी लोकांप्रती आपल्याला आपल्या दृष्टिकोनात काही बदल करण्याची गरज आहे का? (३) दुसऱ्या देशातील एखादी व्यक्ती आपल्या मंडळीत आल्यास, तिला आपलेपणाची जाणीव व्हावी यासाठी आपण काय करू शकतो?

विदेशी लोकांप्रती यहोवाचा असलेला दृष्टिकोन

३, ४. निर्गम २३:९ नुसार इस्राएली लोकांनी विदेशी लोकांसोबत कसा व्यवहार करावा अशी यहोवाची अपेक्षा होती, आणि का?

इस्राएली लोकांची इजिप्तच्या गुलामगिरीतून सुटका केल्यानंतर यहोवाने त्यांना काही नियम दिले. इस्राएली लोकांनी त्यांच्यासोबत आलेल्या विदेशी लोकांवर कशी दया दाखवली पाहिजे, याबद्दल त्यात सांगण्यात आलं होतं. (निर्ग. १२:३८, ४९; २२:२१) विदेशी लोकांना सहसा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे यहोवाने प्रेमळपणे त्यांची काळजी घेतली. उदाहरणार्थ, कापणी करणाऱ्यांनी कापणी करताना काही पीक शेतात मागे सोडणं गरजेचं होतं. आणि हे पीक विदेशी लोक वेचू शकत होते.—लेवी. १९:९, १०.

इस्राएली लोकांनी विदेशी लोकांचा आदर करावा, फक्त एवढंच यहोवाने सांगितलं नव्हतं. तर, विदेशी लोकांना कोणकोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या काय भावना असतात हेदेखील त्यांनी समजून घ्यावं अशी यहोवाची इच्छा होती. (निर्गम २३:९ वाचा.) इस्राएली लोक इजिप्तचे गुलाम बनले त्याच्या आधीपासूनच इजिप्तचे लोक त्यांना पसंत करत नव्हते व त्यांना त्यांची किळस वाटायची. कारण, इस्राएली लोक इजिप्तच्या लोकांपेक्षा खूप वेगळे होते. (उत्प. ४३:३२; ४६:३४; निर्ग. १:११-१४) विदेशी म्हणून जीवन जगत असताना इस्राएली लोकांना खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. यहोवाची इच्छा होती की त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आणि त्यांच्यासोबत राहत असलेल्या विदेशी लोकांवर दया दाखवावी.—लेवी. १९:३३, ३४.

५. विदेशी लोकांवर दया दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

यहोवा आजही बदललेला नाही. त्यामुळे, जेव्हा आपल्या मंडळीमध्ये विदेशी लोक येतात तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा आजही अशा लोकांवर दया करतो. (अनु. १०:१७-१९; मला. ३:५, ६) विदेशी लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांचा जरा विचार करा. त्यांना कदाचित नवीन भाषा समजत नसेल किंवा मग लोक त्यांच्यासोबत अन्यायीपणे वागत असतील. त्यामुळे, वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यावर दया दाखवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.—१ पेत्र ३:८.

विदेशी लोकांप्रती आपल्याला आपल्या दृष्टिकोनात काही बदल करण्याची गरज आहे का?

६, ७. सुरवातीच्या ख्रिश्चनांनी त्यांच्यामध्ये असलेल्या पूर्वग्रहांवर मात केली हे कशावरून दिसून येतं?

सुरवातीच्या ख्रिश्चनांनी, यहूदी लोकांमध्ये सर्वसामान्य असलेल्या पूर्वग्रहांना स्वतःच्या मनातून काढून टाकण्यासाठी बरीच मेहनत घेतली. उदाहरणार्थ, ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या वेळी जेव्हा विदेशी लोक यरुशलेममध्ये आले तेव्हा तिथं राहणाऱ्या यहुदी ख्रिश्चनांनी त्यांची प्रेमळपणे काळजी घेतली आणि त्यांचं आदरातिथ्य केलं. (प्रे. कृत्ये २:५, ४४-४७) यावरून दिसून येतं की “अतिथिप्रेमाचा” अर्थ विदेशी लोकांवर दया दाखवणं असाही होतो, हे यहुदी ख्रिश्चनांना समजलं होतं.

पण, पुढे जेव्हा ख्रिस्ती मंडळीत वाढ होत गेली, तेव्हा असं काहीतरी घडलं ज्यावरून दिसून आलं की ख्रिश्चनांमध्ये भेदभाव केला जात आहे. ग्रीक बोलणाऱ्या यहुदी लोकांची अशी तक्रार होती की हेल्लेणी किंवा ग्रीक बोलणाऱ्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रे. कृत्ये ६:१) ही समस्या सोडवण्यासाठी प्रेषितांनी मग सात पुरुषांची नेमणूक केली आणि कोणाकडेही दुर्लक्ष होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. प्रेषितांनी ज्यांची निवड केली त्या सर्वांची ग्रीक नावं होती. यामागचा उद्देश कदाचित हा असावा की दुर्लक्षित विधवांना संकोच वाटू नये.—प्रे. कृत्ये ६:२-६.

८, ९. (क) आपल्या मनात काही पूर्वग्रह आहेत की नाहीत हे तपासून पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रश्नांमुळे मदत होईल? (ख) आपण आपल्या मनातून कोणती गोष्ट काढून टाकली पाहिजे? (१ पेत्र १:२२)

आपल्या सर्वांवरच आपल्या संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो; मग आपल्याला याची जाणीव असो अथवा नसो. (रोम. १२:२) यासोबतच आपले शेजारी, सोबत काम करणारे, शाळासोबती हेदेखील इतर पार्श्‍वभूमीच्या, वंशाच्या किंवा वर्णाच्या लोकांबद्दल नकारात्मक आणि वाईट गोष्टी बोलत असतात. त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा आपण स्वतःवर प्रभाव पडू देतो का? किंवा मग आपण ज्या देशातून आहोत तिथल्या गोष्टींची किंवा तिथल्या संस्कृतीची कोणी टिंगल करत असताना आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो?

एक वेळ अशी होती जेव्हा प्रेषित पेत्राच्या मनातही यहुदी नसलेल्या लोकांप्रती काही पूर्वग्रह होते. पण, हळूहळू तो त्याच्या मनातील नकारात्मक भावनांना काढून टाकण्यास शिकला. (प्रे. कृत्ये १०:२८, ३४, ३५; गलती. २:११-१४) आपल्यालाही जर जाणवलं की आपल्या मनात काही पूर्वग्रह उत्पन्न होत आहेत किंवा आपला समाज इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं आपल्याला वाटू लागलं, तर काय? अशा वेळी आपण या विचारांना आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी लगेच पावलं उचलली पाहिजेत. (१ पेत्र १:२२ वाचा.) असं करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि तारण मिळवण्यासाठी आपल्यापैकी कोणीही पात्र नाही; मग आपण कोणत्याही राष्ट्राचे किंवा वंशाचे असलो तरीही. (रोम. ३:९, १०, २१-२४) त्यामुळे, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याचं कोणतंही कारण आपल्याजवळ नाही. (१ करिंथ. ४:७) आपला दृष्टिकोनही प्रेषित पौलासारखा असला पाहिजे. त्याने ख्रिश्चनांना असं सांगितलं की ते “परके व उपरी [विदेशी]” नाहीत, तर “देवाच्या घरचे” सदस्य आहेत. (इफिस. २:१९) आपल्या सर्वांनाच आपल्या मनातील पूर्वग्रह काढून टाकण्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. यामुळे, आपल्याला नवा मनुष्यत्व धारण करण्यास मदत होते.—कलस्सै. ३:१०, ११.

आपण विदेशी लोकांवर दया कशी दाखवू शकतो?

१०, ११. विदेशी लोकांप्रती दया दाखवण्याच्या बाबतीत बवाजाने यहोवाचं अनुकरण कसं केलं?

१० विश्वासू बवाजाने विदेशी लोकांप्रती यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न केला. हे कशावरून दिसून येतं? कापणीच्या वेळी शेताची पाहणी करण्यासाठी जेव्हा बवाज आपल्या शेतामध्ये गेला, तेव्हा मवाबातून आलेल्या रूथ नावाच्या एका विदेशी स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं. ती त्याच्या शेतात सरवा वेचण्यासाठी खूप मेहनत घेत होती. मोशेच्या नियमशास्त्रानुसार शेतात पडलेलं धान्य उचलण्याचा रूथला अधिकार होता. पण, जेव्हा बवाजाला समजलं की हा अधिकार असूनही सरवा वेचण्याआधी रूथनं परवानगी मागितली होती, तेव्हा त्याला ही गोष्ट आवडली. त्यामुळे, त्याने तिला पेंढ्यांमध्येही धान्य वेचण्याची परवानगी दिली.—रूथ २:५-७, १५, १६ वाचा.

११ पुढे जे घडलं त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की बवाजाला रूथची काळजी होती. आणि विदेशी या नात्याने तिला ज्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागत होता त्याचीही त्याला जाणीव होती. शेतात काम करणाऱ्या पुरुषांनी तिच्यासोबत दुर्व्यवहार करू नये, म्हणून तिने काम करणाऱ्या दासींसोबतच राहावं असं बवाजाने सांगितलं. तसंच, त्याच्या इतर कामगारांप्रमाणे तिलाही पुरेसं अन्न आणि पाणी मिळेल याकडे त्याने लक्ष दिलं. बवाजाने या गरीब विदेशी स्त्रीचा आदर केला आणि तिला धीर दिला.—रूथ २:८-१०, १३, १४.

१२. विदेशी लोकांवर दया दाखवल्याने कोणते चांगले परिणाम घडू शकतात?

१२ रूथने आपल्या सासूवर एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं. पण, फक्त याच कारणामुळे बवाजाने तिच्यावर दया दाखवली नव्हती. तर ती यहोवाची उपासना करू लागली आणि त्याच्या पंखांखाली तिने आसरा घेतला, या कारणामुळेही बवाजाने तिच्यावर दया दाखवली. रूथवर दया दाखवण्याद्वारे बवाज खरंतर यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचं अनुकरण करत होता. (रूथ २:१२, २०; नीति. १९:१७) त्याच प्रकारे, आपण सर्वांसोबत आणि खासकरून विदेशी लोकांसोबत जेव्हा दयाळूपणे वागतो, तेव्हा खरंतर यहोवाबद्दल शिकून घेण्यास त्यांना आपण एक प्रकारे मदतच करत असतो. तसंच, यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीवही त्यांना करून देत असतो.—१ तीम. २:३, ४.

विदेशी लोक राज्य सभागृहात येतात तेव्हा तुम्ही त्यांचं आनंदाने स्वागत करता का? (परिच्छेद १३, १४ पाहा)

१३, १४. (क) राज्य सभागृहात येणाऱ्या विदेशी लोकांना भेटण्यासाठी आपण पुढाकार घेणं का गरजेचं आहे? (ख) दुसऱ्या संस्कृतीतील लोकांशी बोलायला तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता?

१३ आपल्या राज्य सभागृहात जे विदेशी लोक येतात त्यांच्यावर आपण दया कशी दाखवू शकतो? आपण त्यांचं अगदी मनापासून स्वागत करू शकतो. नुकतेच स्थलांतरित झालेल्यांपैकी काही जण लाजाळू स्वभावाचे असल्यामुळे लोकांमध्ये मिसळत नाहीत. त्यांच्या संस्कृतीमुळे व पार्श्‍वभूमीमुळे नवीन ठिकाणी त्यांना कदाचित अवघडल्यासारखं वाटतं किंवा दुसऱ्या देशातील आणि वंशातील लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अशी भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे, त्यांना भेटण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांच्यात खरी आस्था दाखवून त्यांच्यावर दया दाखवली पाहिजे. यासोबतच, अभिवादन करताना त्यांच्या भाषेत काय बोललं जातं ते आपण शिकून घेऊ शकतो. यासाठी जर तुमच्या भाषेत JW लँग्वेज अॅप उपलब्ध असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता.—फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.

१४ इतर संस्कृतीतील लोकांसोबत बोलायला कदाचित तुम्हाला संकोच वाटत असेल. अशा वेळी तुम्ही स्वतःबद्दल त्यांना काहीतरी सांगू शकता. यामुळे, तुम्हाला कदाचित हे जाणवेल की तुम्ही विचारही केला नव्हता इतक्या गोष्टी तुमच्यात सारख्या आहेत. पण, त्याच वेळी हेदेखील लक्षात ठेवा की प्रत्येक संस्कृतीत काही चांगल्या गोष्टी असतात आणि काही कमतरतादेखील.

प्रेमानं स्वागत करा आणि आदरातिथ्य दाखवा

१५. जे नवीनच स्थलांतरित झाले आहेत त्यांना समजून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल?

१५ विदेशाहून आलेल्या लोकांना आपलेपणाची जाणीव व्हावी म्हणून तुम्ही काय करू शकता? सर्वात आधी स्वतःला विचारा: ‘जर मी परदेशात असतो तर लोकांनी माझ्याशी कसा व्यवहार करावा अशी अपेक्षा मी केली असती?’ (मत्त. ७:१२) स्थलांतरित झालेल्यांना नवीन देशाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे, धीर दाखवा. ते ज्या प्रकारे विचार करतात आणि प्रतिक्रिया दाखवतात ती वेगळी का आहे, हे सुरवातीला कदाचित तुम्हाला पूर्णपणे समजणार नाही. त्यांनी आपल्या संस्कृतीतील लोकांप्रमाणेच विचार करावा किंवा वागावं अशी अपेक्षा करू नका. तर, ते जसे आहेत तसंच त्यांना स्वीकारा.—रोमकर १५:७ वाचा.

१६, १७. (क) इतर संस्कृतीतील लोकांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (ख) आपल्या मंडळीत स्थलांतरित झालेल्यांना आपण कशा प्रकारे व्यावहारिक मदत पुरवू शकतो?

१६ आपण जर विदेशी लोकांच्या देशाबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास आपल्याला मदत होईल. आपण आपल्या कौटुंबिक उपासनेदरम्यान, आपल्या मंडळीत किंवा क्षेत्रात स्थलांतरित झालेल्या लोकांच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी काही संशोधन करू शकतो. यासोबतच, त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकतो. त्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवू शकतो. बायबल म्हणतं की स्वतः यहोवाने “परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार . . . उघडले” आहे. म्हणून आपणही यहोवाचं अनुकरण करून विदेशी लोकांसाठी जे “विश्वासाने एका घरचे” झाले आहेत, आपल्या घराचे दार उघडले पाहिजे.—प्रे. कृत्ये १४:२७; गलती. ६:१०; ईयो. ३१:३२.

दुसऱ्या देशातून आलेल्या नवीन लोकांना तुम्ही आदरातिथ्य दाखवता का? (परिच्छेद १६, १७ पाहा)

१७ स्थलांतरित झालेल्या कुटुंबासोबत जेव्हा आपण वेळ घालवतो, तेव्हा नवीन संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी ते जी मेहनत घेत आहेत ती आपल्याला समजते आणि त्यांची कदर बाळगण्यास आपल्याला मदत होते. कदाचित आपल्याला जाणवेल की नवीन भाषा शिकून घेण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. आणि त्यासाठी आपण त्यांना योग्य ती मदत पुरवू शकतो. शिवाय, चांगली नोकरी किंवा घर मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करतील अशा संघटनांची माहितीही आपण त्यांना देऊ शकतो. अशा प्रकारे व्यावहारिक मदत पुरवल्यास त्यांना खूप फायदा होऊ शकतो.—नीति. ३:२७.

१८. स्थलांतरित झालेले, रूथच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?

१८ नवीन संस्कृतीशी आणि देशाची जुळवून घेण्यासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांनीही मेहनत घेणं गरजेचं आहे. याबाबतीत रूथचं चांगलं उदाहरण आपल्यापुढे आहे. सरवा वेचण्याआधी तिने परवानगी मागितली. यावरून दिसतं की तिने तिथल्या संस्कृतीला आदर दाखवला. (रूथ २:७) आपल्याला सरवा वेचण्याचा अधिकार आहे आणि इतरांनी आपल्याला मदत करणं ही त्यांची नैतिक जबाबदारीच आहे, असा विचार तिने केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, तिच्यावर जी दया दाखवण्यात आली त्याची तिने कदर बाळगली आणि त्याबद्दल तिने इतरांनादेखील सांगितलं. (रूथ २:१३) स्थलांतरित झालेले नवीन लोक जेव्हा रूथसारखी मनोवृत्ती दाखवतात, तेव्हा मंडळीतील बंधुभगिनी आणि स्थानिक लोकदेखील त्यांचा आदर करतात.

१९. विदेशी लोकांचं मनापासून स्वागत करणं आणि त्यांना आदरातिथ्य दाखवणं का गरजेचं आहे?

१९ यहोवाने अपार कृपा दाखवून सर्वांनाच सुवार्ता ऐकण्याची संधी दिली आहे, यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत. स्थलांतरित झालेल्यांपैकी काहींना कदाचित त्यांच्या देशात बायबल अभ्यास करण्याची किंवा साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली नसेल. पण, आता ते आपल्या मंडळीत आले आहेत आणि त्यांना ती संधी मिळाली आहे, तर मग आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना नवीन देशात आपलंसं वाटावं म्हणून आपल्या परीनं होईल तितकं आपण केलं पाहिजे. कदाचित त्यांना आर्थिक रीत्या मदत पुरवणं किंवा इतर व्यावहारिक मदत पुरवणं आपल्याला शक्य नसेल. पण तरी, जेव्हा आपण त्यांच्यावर दया दाखवतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. तर मग, विदेशी लोकांचं मनापासून स्वागत करण्याचा आणि त्यांना आदरातिथ्य दाखवण्याचा आपण सर्व जण पुरेपूर प्रयत्न करत राहू या.—इफिस. ५:१, २.

^ [१] (परिच्छेद १) नाव बदलण्यात आलं आहे.