व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल—अचूक माहिती असलेलं एक भरवशालायक पुस्तक

बायबल—अचूक माहिती असलेलं एक भरवशालायक पुस्तक

संपूर्ण इतिहासात पाहिलं तर वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे लोक असं मानतात, की बायबल हे अचूक माहिती असलेलं भरवशालायक पुस्तक आहे. आज लाखो लोक बायबलच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगत आहेत. पण असेही काही लोक आहेत जे मानतात की बायबलची माहिती आपल्यासाठी उपयोगाची नाही आणि ते पुस्तक काल्पनिक आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला बायबलमधून अचूक माहिती मिळू शकते का?

बायबलमध्ये दिलेली माहिती भरवशालायक का आहे?

बायबलमध्ये दिलेली माहिती भरवशालायक आहे की नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता? एका उदाहरणाचा विचार करा. तुमचा मित्र वर्षानुवर्षं तुमच्याशी नेहमी खरं बोलला असेल तर तुम्ही त्याला नक्कीच भरवशालायक समजाल. बायबलनेसुद्धा त्या भरवशालायक मित्रासारखं प्रत्येक वेळी खरी माहिती सांगितली आहे का? याचं उत्तर मिळवण्यासाठी आता आपण काही उदाहरणं पाहू या.

प्रामाणिक लेखक

देवाने बायबल लिहायला ज्या लोकांचा वापर केला ते खूप प्रामाणिक होते. त्या लोकांनी बऱ्‍याचदा बायबलमध्ये आपल्या चुकांचा आणि अपयशांचा उल्लेख केला. उदाहरणार्थ, बायबलच्या एका पुस्तकाचा लेखक योना याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. पण त्याने ही गोष्ट लपवून न ठेवता त्याबद्दल लिहिलं. (योना १:१-३) खरंतर आपल्या पुस्तकाच्या शेवटी त्याने लिहिलं की देवाने त्याला कसं सुधारलं. पण त्यानंतर त्याने सुधारण्यासाठी स्वतः कोणती पावलं उचलली याबद्दल लिहिलं नाही, कारण त्याला स्वतःकडे जास्त लक्ष वेधून घ्यायचं नव्हतं. (योना ४:१, ४, १०, ११) बायबल पुस्तकं ज्या लोकांनी लिहिली त्यांच्या प्रामाणिकपणावरून हेच कळतं की अचूक माहिती पुरवणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं.

व्यावहारिक रीत्या अचूक माहिती

बायबल व्यावहारिक गोष्टींबद्दल नेहमी योग्य सल्ला देतं का? हो, नक्कीच देतं. उदाहरणार्थ, इतरांसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्याबद्दल बायबल काय म्हणतं याकडे लक्ष द्या: “ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.” (मत्तय ७:१२) तसंच, त्यात असंही म्हटलं आहे की “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१) खरंच हे सल्ले लिहिण्यात आले तेव्हा ते जितके व्यवहारोपयोगी होते तितकेच ते आजही आहेत.

ऐतिहासिक रीत्या अचूक माहिती

बायबलमध्ये बऱ्‍याच व्यक्‍तींचा, ठिकाणांचा आणि घटनांचा उल्लेख केला आहे. पुरातत्व विभागाने लावलेल्या शोधातून हे दिसून आलं की या सर्व गोष्टी काल्पनिक नाहीत तर खऱ्‍या आहेत. उदाहरणार्थ, एका अशा भविष्यवाणीचा विचार करा ज्यात एक कमी महत्त्वाची वाटणारी माहिती सांगितली होती. बायबलमध्ये म्हटलं आहे, की देवाचा सेवक नहेम्या याच्या काळात सोर (प्राचीन काळातलं फेनीके राष्ट्रातलं एक शहर) या शहराचे लोक यरुशलेममध्ये राहायला गेले आणि ते तिथे “मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून” विकायचे.—नहेम्या १३:१६.

बायबलमध्ये सांगितलेली ही गोष्ट खरी असल्याचा काही पुरावा आहे का? हो नक्कीच आहे. पुरातत्व विभागाच्या विशेषज्ञांना, इस्राएलमध्ये फेनीकेतून आणलेल्या वस्तूंचे काही अवशेष सापडले आहेत. यावरून दिसून येतं की इस्राएल आणि फेनीके या दोन प्राचीन राष्ट्रांमध्ये व्यापार चालायचा. तसंच, यरुशलेममध्ये भूमध्य सागरातून आणलेल्या माशांचेही काही अवशेष सापडले आहेत. पुरातत्व गोष्टींवर अभ्यास करणाऱ्‍या विद्वानांचं असं मत आहे की व्यापारी हे मासे भूमध्य सागरातून आणायचे. या पुराव्याचं परीक्षण केल्यावर एका विद्वानाने असं म्हटलं की “सोरचे लोक यरुशलेममध्ये मासे विकायचे याबद्दल नहेम्या १३:१६ या वचनात सांगितलेली गोष्ट अगदी पटण्यासारखी आहे.”

वैज्ञानिक रीत्या अचूक माहिती

बायबल हा प्रामुख्याने एक धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यात इतिहासाविषयीसुद्धा माहिती सांगितली आहे. पण जेव्हा विज्ञानाची गोष्ट येते तेव्हा विज्ञान आणि बायबल हे एकच माहिती सांगतात. एका उदाहरणाचा विचार करा.

जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी बायबलमध्ये सांगितलं होतं की “पृथ्वी निराधार टांगली आहे.” (ईयोब २६:७) पण काही लोकांचा काल्पनिक गोष्टींवर विश्‍वास होता की पृथ्वी पाण्यावर तरंगत आहे किंवा ती एका मोठ्या कासवाच्या पाठीवर आहे. बायबलच्या एका पुस्तकाचा लेखक, ईयोब याने त्याचं पुस्तक लिहिल्याच्या १,१०० वर्षांनंतरही लोकांचं असंच मत होतं की पृथ्वी अधांतरी राहू शकत नाही आणि तिला कशाचातरी आधार असणं गरजेचं आहे. आजपासून तीनशे वर्षांआधी म्हणजे १६८७ साली आयझॅक न्यूटन या वैज्ञानिकाने गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला आणि म्हटलं की पृथ्वीला एका अदृश्‍य शक्‍तीमुळे आधार मिळाला आहे आणि ती आपल्या कक्षेत फिरत आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात मिळालेल्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे या गोष्टीची खातरी पटली की जवळपास साडेतीन हजार वर्षांपूर्वी बायबलमध्ये जे लिहिलं होतं ते अगदी खरं आणि अचूक आहे!

भविष्यवाण्यांची अचूक माहिती

बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या कितपत खऱ्‍या आहेत? उदाहरण म्हणून आपण एका भविष्यवाणीचा विचार करू या. ती म्हणजे, बायबलच्या एका लेखकाने यशयाने प्राचीन काळातल्या बॅबिलॉन शहराच्या नाशाविषयी केलेली भविष्यवाणी.

भविष्यवाणी: इ.स.पू. आठव्या शतकात बायबलचा एक लेखक यशया याने बॅबिलॉन या शहराविषयी भविष्यवाणी केली. बॅबिलॉन पुढे जाऊन एका शक्‍तिशाली राष्ट्राची राजधानी बनणार होती. पण यशयाने सांगितलं की बॅबिलॉन शहराचा नाश केला जाईल आणि त्यात पिढ्या न्‌ पिढ्या कोणीच राहणार नाही. (यशया १३:१७-२०) त्या शहराचा नाश कोरेश नावाचा राजा करेल हेसुद्धा यशयाने सांगितलं. तसंच, त्याने हेही सांगितलं की कोरेश अशी काही युक्‍ती करेल ज्यामुळे नद्यांचा प्रवाह आटेल आणि ज्या दिवशी त्या शहराचा नाश होईल त्या दिवशी शहराचं मुख्य दार उघडं ठेवलं जाईल.—यशया ४४:२७–४५:१.

भविष्यवाणीची पूर्णता: यशयाने भविष्यवाणी केल्याच्या दोनशे वर्षांनंतर, पर्शिया देशाच्या राजाने बॅबिलॉनवर हल्ला केला. त्या राजाचं नाव भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे कोरेश होतं. बॅबिलॉन शहराभोवती उंच आणि मजबूत भिंती होत्या त्यामुळे त्या शहरात प्रवेश करणं कठीण होतं. म्हणून कोरेश राजाने शहरात जाणारी फरात नदी आटवली. त्याच्या सैनिकांनी त्या नदीचा प्रवाह एका दलदलीकडे वळवला. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी खूप कमी झाली. पाणी अगदी सैनिकांच्या गुडघ्यांना लागेल इतकं कमी झालं होतं त्यामुळे त्यांना शहराच्या मुख्य दारापर्यंत पोहोचणं शक्य झालं. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे नदीला लागून असलेलं शहराचं मुख्य दार बॅबिलॉनच्या सैनिकांकडून चुकून उघडं राहिलं होतं. त्यामुळे कोरेशचं सैन्य सहजपणे शहरात प्रवेश करू शकलं आणि त्यांनी त्या शहराचा नाश केला.

पण एक गोष्ट पूर्ण व्हायची बाकी होती. बॅबिलॉन शहरात पुन्हा कधी वस्ती होणार नाही असंही भविष्यवाणीत सांगितलं होतं. ही गोष्ट पूर्ण झाली का? काही शतकांपर्यंत लोक त्या शहरात राहत होते. पण आज आपण पाहिलं तर इराकमधल्या बगदादच्या शेजारी आपल्याला प्राचीन बॅबिलॉन शहराचे अवशेष पाहायला मिळतात. यावरून कळतं की बॅबिलॉनविषयी बायबलची भविष्यवाणी पूर्ण झाली आहे. खरंच, बायबल जेव्हा भविष्यात घडणाऱ्‍या घटनांबद्दल सांगतं तेव्हा त्यावरही आपण भरवसा ठेवू शकतो.