विवाहित जोडप्यांसाठी
१: वचनबद्धता
याचा काय अर्थ होतो?
एकमेकांची साथ न सोडण्याचं वचन देणारे पती-पत्नी विवाहाला कायमस्वरूपाचं बंधन समजतात आणि यामुळे त्यांच्यात सुरक्षिततेची भावना असते. यामुळे पती-पत्नीला अशी खातरी असते की आपला विवाह जोडीदार आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. अगदी कठीण समस्या आल्या तरीही.
समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावामुळे काहींना एकमेकांसोबत राहावं लागतं. पण वचनबद्धता यापेक्षा फार वेगळी आहे. ती आपसांत असलेलं प्रेम आणि एकमेकांबद्दल असलेला आदर यावर आधारित असते.
बायबल तत्त्व: “पतीनेही आपल्या पत्नीला सोडू नये.”—१ करिंथकर ७:११.
“तुम्ही जर वचनबद्ध असाल तर थोडं काही झाल्यावर लगेच वाईट वाटून घेणार नाही. तुम्ही क्षमा करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी तयार असाल. समस्या तुमच्यासमोर फक्त एक अडथळा असेल, घटस्फोट घेण्याचं कारण नाही.”—माईक. a
हे का महत्त्वाचं?
एकमेकांवर मनापासून प्रेम नसलेल्या जोडप्यांना जेव्हा समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा सहसा ते म्हणतात की ‘आपलं जमणारच नाही.’ मग ते विवाह बंधनातून मुक्त होण्याचे मार्ग शोधू लागतात.
“आपण लग्न केलं तरी आपल्याकडे घटस्फोट हा पर्याय आहेच, असा विचार करून अनेक जण विवाह करतात. अशा प्रकारच्या विवाहात सुरुवातीपासूनच वचनबद्धतेची कमतरता असते.”—जूली.
तुम्ही काय करू शकता?
स्वतःचं परीक्षण करा
वाद झाल्यावर . . .
-
आपल्या सोबत्याशी लग्न केल्याचा तुम्हाला कधी पस्तावा झाला आहे का?
-
दुसऱ्यासोबत असल्याचे स्वप्न तुम्ही पाहता का?
-
“मी तुला सोडून जातो” किंवा “मी अशा कोणाला तरी शोधतो ज्याला माझी कदर असेल” असं तुम्ही म्हणता का?
वरील एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्ही होकारार्थी दिली, तर तुम्हाला तुमच्या सोबत्याशी वचनबद्ध राहण्यासाठी आणखी मेहनत करण्याची गरज आहे.
तुमच्या जोडीदाराशी खालील प्रश्नांवर चर्चा करा
-
आपल्या विवाहातली वचनबद्धता कमकुवत झाली आहे का? असल्यास याचं काय कारण आहे?
-
वचनबद्धता मजबूत करण्यासाठी आपण आता कोणती पावलं उचलू शकतो?
सल्ले
-
एकमेकांवर असलेलं प्रेम वेळोवेळी व्यक्त करा
-
कामाच्या ठिकाणी आपल्या सोबत्याचा फोटो ठेवा
-
कामावर किंवा दूर असताना आपल्या जोडीदाराला रोज फोन करा
बायबल तत्त्व: “देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.”—मत्तय १९:६.
a काही नावं बदलण्यात आली आहेत.