आमच्या संग्रहातून
लाखो लोकांना माहीत असलेली साऊंड कार
“लाखो लोकांना माहीत असलेली अशी प्रभूच्या सेवेत असणारी एकमेव कार ब्राझीलमध्ये होती, लोक तिला ‘द वॉचटावर साऊंड कार’ म्हणून ओळखायचे.”—नथानिएल ए. युल, सन १९३८.
१९३० च्या दशकात, सुरवातीला ब्राझीलमध्ये राज्याच्या कार्याला म्हणावा तितका जोर आला नव्हता. पण, १९३५ साली नथानिएल आणि मॉड युल या पायनियर जोडप्यानं बंधू जोसेफ एफ. रदरफर्ड यांना पत्र लिहिलं. बंधू रदरफर्ड त्या काळी प्रचारकार्याचं नेतृत्व करायचे. या जोडप्यानं पत्रात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी ते “कुठंही आनंदानं जायला” तयार आहेत असं कळवलं.
नथानिएल हे ६२ वर्षांचे रिटायर झालेले सिव्हिल इंजीनियर होते. अमेरिकेतील, कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रॅन्सिस्को इथल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत ते सेवा संचालक म्हणून काम करत होते. तिथं ते प्रचारकार्याचं आयोजन करण्याची जबाबदारी हाताळायचे आणि लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी ध्वनी माध्यमांचा किंवा उपकरणांचा वापर करायचे. त्यांचा अनुभव आणि स्वेच्छेनं सेवा करण्याची वृत्ती त्यांच्या नवीन नेमणुकीसाठी एक आशीर्वादच ठरली. ब्राझीलच्या बहुभाषिक आणि व्यापक क्षेत्रात शाखा सेवक म्हणून काम करण्याची नेमणूक त्यांना मिळाली.
नथानिएल आणि मॉड हे १९३६ साली ब्राझीलमध्ये आले. त्यांच्यासोबत अॅन्टोनियो पी. आन्द्राद हा पायनियर आणि अनुवादक बांधवदेखील होता. पण, येताना त्यांनी त्यांच्यासोबत काही खास गोष्टीदेखील आणल्या होत्या; त्या म्हणजे ३५ फोनोग्राफ आणि एक साऊंड कार. ब्राझील हा जगातला पाचवा मोठा देश असला, तरी तिथं फक्त साठच प्रचारक होते! पण तरी, या ध्वनी माध्यमांच्या साहाय्यानं काही वर्षांतच लाखो लोकांपर्यंत सुवार्ता पोचणार होती.
नथानिएल आणि मॉड ब्राझीलमध्ये आले, त्याच्या एका महिन्यातच शाखा कार्यालयानं साऊ पाउलू इथं पहिलं सेवा अधिवेशन भरवलं. अधिवेशनात होणाऱ्या मुख्य भाषणाची जाहिरात करण्यासाठी ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच या साऊंड कारचा वापर करण्यात आला. त्यासाठी मॉडला ही कार चालवावी लागली. या जाहिरातीमुळे ११० लोक या अधिवेशनाला उपस्थित राहिले! अधिवेशनाच्या कार्यक्रमामुळे प्रचारकांचंही मनोधैर्य वाढलं आणि त्यांना प्रचारकार्यात आणखी जास्त
करण्याची प्रेरणा मिळाली. प्रचारकांनी प्रकाशनांचा आणि टेस्टमनी कार्डचा वापर करून प्रचारकार्य करण्याचं शिकून घेतलं. तसंच इंग्रजी, जर्मन, हंगेरियन, पोलिश, स्पॅनिश, आणि नंतर पोर्तुगीझ भाषेत असणाऱ्या फोनोग्राफ रेकॉर्डिंगचा वापर करण्याचंही त्यांनी शिकून घेतलं.त्यानंतर, १९३७ साली साऊ पाउलू, रीओ द जनीरो आणि कूरिटीबा इथं तीन सेवा अधिवेशनं भरवण्यात आली. या अधिवेशनांमुळे राज्य प्रचाराच्या कार्याला एक नवीनच वळण मिळालं. अधिवेशनाला आलेले बांधव घरोघरच्या सेवाकार्यात जायचे आणि त्यांच्यासोबत साऊंड कारदेखील असायची. त्या काळी किशोरवयीन असलेल्या जोसे मॅग्लोस्की यानं नंतर लिहिलं: “आम्ही आपली बायबल प्रकाशनं एका स्टँडवर मांडायचो. आणि साऊंड कारद्वारे रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवला जात असताना जे लोक ते ऐकण्यासाठी घराबाहेर पडायचे, त्यांच्यासोबत बोलायचो.”
बाप्तिस्मा शक्यतो नद्यांमध्ये दिला जायचा. तिथं आंघोळ करायला आलेले लोक ऊन खात बसायचे, तेव्हा बाप्तिस्मा देण्याचं काम पार पाडलं जायचं. त्या ठिकाणी साऊंड कार आणली जायची आणि बंधू रदरफर्ड यांचं बाप्तिस्म्याचं भाषण ऐकवलं जायचं. जेव्हा ध्वनीप्रक्षेपकातून त्यांचा भारदस्त आवाज घुमायचा, तेव्हा त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुकतेनं कारभोवती जमायचे. आणि त्याच वेळी या भाषणाचं पोर्तुगीझमध्ये भाषांतर केलं जायचं. नंतर, बाप्तिस्मा उमेदवारांचा बाप्तिस्मा व्हायचा आणि त्याच वेळी पोलिश भाषेत रेकॉर्ड केलेली राज्य गीते वाजवली जायची. आणि त्याच्यासोबत बंधुभगिनीदेखील वेगवेगळ्या भाषेत गीतं गायचे. १९३८ चं ईयरबुक सांगतं की “त्या ठिकाणचं वातावरण पेन्टेकॉस्टला झालेल्या घटनेची आठवण करून देणारं होतं.” खरंच, साऊंड कारच्या साहाय्यानं सुवार्ता सांगण्याची ही किती जबरदस्त संधी होती!
ऊन-पाऊस काहीही असलं तरी, अधिवेशनांनंतर प्रत्येक रविवारी बायबल आधारित भाषणं साऊंड कारच्या साहाय्यानं ऐकवली जायची. ही भाषणं पार्कमध्ये, लोकवस्त्यांमध्ये, तसंच साऊ पाउलूच्या मधोमध असलेल्या कारखान्यांमध्ये आणि जवळच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना ऐकवली जायची. यासोबतच, साऊ पाउलूच्या उत्तर-पश्चिमेला ९७ किमी अंतरावर कुष्ठरोग्यांची एक वस्ती होती. तिथल्या ३,००० रहिवाशांना साऊंड कारच्या मदतीनं दर महिन्याला कार्यक्रम ऐकवला जायचा. लवकरच, तिथं एक प्रगतिशील मंडळी स्थापित झाली. या मंडळीतील प्रचारकांना इतका त्रास असूनही, त्यांनी कुष्ठरोग्यांच्या दुसऱ्या वस्तीमध्ये जाऊन बायबलचा सांत्वनदायक संदेश सांगण्याकरता परवानगी मागितली.
शेवटी, १९३८ साल संपेपर्यंत पोर्तुगीझ भाषेत रेकॉर्डिंग तयार करण्यात आली. साऊंड कारच्या मदतीनं ‘ऑल सोल्स डे’च्या दिवशी (मृतकांचा दिवशी) प्रत्येक स्मशानभूमीत जाऊन, “मृत कुठं आहेत?,” “यहोवा” आणि “धनसंपत्ती” या पुस्तकांचं रेकॉर्डिंग ऐकवलं जायचं. यामुळे ४०,००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत सांत्वनदायक संदेश पोचवण्यात आला.
अगदी बेधडकपणे लोकांना बायबलचा संदेश सांगितला जात होता. याला, तिथल्या रागीट धर्मपुढाऱ्यांचा विरोध होता. त्यांनी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या साहाय्यानं आपल्या साऊंड कारवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. बहीण युल ही एका घटनेबद्दल सांगते. एकदा एका स्थानिक पाळकानं मोठ्या जमावाला साऊंड कार भोवती गोळा व्हायला सांगितलं. पण, तेव्हाच नगराध्यक्ष आणि काही पोलीस अधिकारीही तिथं आले आणि त्यांनी पूर्ण कार्यक्रम ऐकला. कार्यक्रम संपल्यानंतर नगराध्यक्ष बायबल प्रकाशनंही घेऊन गेले. त्या जमावानं कोणताही गोंधळ माजवला नाही. अशा प्रकारचा विरोध असूनही, १९४० च्या ईयरबुकमधील ब्राझीलच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं, की १९३९ हे वर्षं “सर्वात महान ईश्वरसत्ताकाची सेवा करण्यासाठी आणि त्याचं नाव घोषित करण्यासाठी एक सर्वोत्तम काळ ठरला.”
“द वॉच टावर साऊंड कार” ब्राझीलमध्ये आल्यामुळे तिथल्या प्रचारकार्याला खरोखरच एक वेगळं वळण मिळालं. लाखो लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी ते एक महत्त्वाचं साधन ठरलं. ती प्रसिद्ध कार १९४१ साली विकण्यात आली. पण, त्यामुळे राज्य प्रचाराचं काम काही थांबलं नाही. यहोवाच्या साक्षीदारांचा मोठा समुदाय आजही ब्राझीलच्या व्यापक क्षेत्रात नम्र अंतःकरणाच्या लोकांना सुवार्ता सांगत आहे.—ब्राझीलमधील आमच्या संग्रहातून.