यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?
या विधीला बऱ्याचशा बायबलमध्ये “प्रभुभोजन” किंवा प्रभूचं सांजभोजन असं म्हणण्यात आलंय. (१ करिंथकर ११:२०; पं.र.भा.) आम्ही बायबलमध्ये दिलेल्या पद्धतीप्रमाणेच हा विधी पाळतो. पण इतर पंथाचे लोक तसं करत नाहीत.
हा विधी का केला जातो?
प्रभूचं सांजभोजन येशूची आठवण ठेवण्यासाठी आणि त्याने आपल्यासाठी त्याचा जीव बलिदान दिला, याबद्दल कदर दाखवण्यासाठी केला जातो. (मत्तय २०:२८; १ करिंथकर ११:२४) काही लोकांचं म्हणणं आहे की प्रभूचं सांजभोजन खाल्ल्यामुळे, आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळू शकते. पण, बायबल तसं शिकवत नाही. उलट, बायबल असं शिकवतं की आपल्याला आपल्या पापांची क्षमा फक्त येशूवर विश्वास ठेवल्यामुळेच मिळू शकते.—रोमकर ३:२५; १ योहान २:१, २.
किती वेळा केला जावा?
येशूने आपल्या शिष्यांना हा विधी किती वेळा केला जावा हे स्पष्टपणे सांगितलं नाही. (लूक २२:१९) काही लोक हा विधी दर महिन्याला, दर आठवड्याला, दर दिवशी किंवा दिवसातून कित्येक वेळा करतात. तर असेही काही जण आहेत जे मनाला येईल तितक्या वेळा हा विधी पाळतात. पण हा विधी खरंच किती वेळा पाळला पाहिजे?
येशूने या विधीची सुरुवात यहुदी लोकांच्या वल्हांडण सणाच्या दिवशीच केली होती. आणि त्याच दिवशी नंतर त्याचा मृत्यूही झाला. (मत्तय २६:१, २) वल्हांडणाच्या दिवशी यहुदी लोक एका कोकऱ्याचं अर्पण द्यायचे. आणि बायबलमध्ये येशूच्या बलिदानाची तुलना त्या वल्हांडणाच्या कोकऱ्यासोबत करण्यात आली आहे. (१ करिंथकर ५:७, ८) वल्हांडण सण वर्षातून एकदाच साजरा केला जायचा. (निर्गम १२:१-६; लेवीय २३:५) आणि सुरुवातीचे ख्रिस्तीसुद्धा वर्षातून एकदाच येशूच्या मृत्यूचा दिवस पाळायचे. a यावरून कळतं की बायबलप्रमाणे हा विधी वर्षातून एकदाच पाळला जावा. म्हणूनच यहोवाचे साक्षीदारसुद्धा तसंच करतात.
केव्हा केला जावा?
येशूने हा विधी इ.स. ३३ च्या निसान महिन्याच्या १४ व्या दिवशी सूर्यास्तानंतर केला. (मत्तय २६:१८-२०, २६) सुरुवातीचे ख्रिश्चनही याच दिवशी प्रभूचं सांजभोजन करायचे. b यावरून कळतं की हा विधी कधी पाळला जावा. म्हणून आम्हीसुद्धा दर वर्षी याच दिवशी प्रभूच्या सांजभोजनाचा विधी पाळतो.
इ.स. ३३ च्या निसान १४ ला शुक्रवार होता. तरी दर वर्षी ही तारीख शुक्रवारीच येईल असं नाही. आधुनिक यहुदी कॅलेंडरसाठी जी पद्धत वापरली जाते, त्या पद्धतीने आम्ही ही तारीख काढत नाही. तर येशूच्या काळात जी पद्धत वापरली जात होती ती पद्धत वापरून आम्ही ही तारीख काढतो. c
भाकर आणि द्राक्षारस
सांजभोजनाच्या विधीची सुरुवात करताना येशूने वल्हांडण सणाच्या भोजनाच्या वेळी उरलेल्या बेखमीर भाकरीचा आणि लाल द्राक्षारसाचा उपयोग केला होता. (मत्तय २६:२६-२८) तसंच, आम्हीसुद्धा खमीर किंवा इतर पदार्थ न घातलेली भाकर वापरतो. आणि मसाले किंवा इतर पदार्थ न घातलेला साधा द्राक्षारस वापरतो.
काही पंथांमध्ये खमीर किंवा यीस्ट घातलेली भाकर वापरतात. पण बायबलमध्ये बऱ्याचदा खमीर भ्रष्टतेला आणि पापाला सूचित करतं. (लूक १२:१; १ करिंथकर ५:६-८; गलतीकर ५:७-९) पण येशूने कोणतंही पाप केलं नव्हतं. (१ पेत्र २:२२) म्हणून खमीर किंवा इतर गोष्टी नसलेली भाकरच येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण शरीराला खऱ्या अर्थाने सूचित करते. काही पंथांमध्ये अंबवलेल्या द्राक्षारसाऐवजी, म्हणजे वाईनऐवजी ताजा द्राक्षांचा रस वापरला जातो. कारण त्यांना वाटतं की दारू पिणं बायबलच्या मते पाप आहे.—१ तीमथ्य ५:२३.
प्रतिकं—खरोखरचं मांस आणि रक्त नाहीत
काही जणांना वाटतं, स्मारक विधीसाठी ठेवलेली भाकर आणि द्राक्षारस येशूच्या खरोखरच्या मांसात आणि रक्तात चमत्कारिक रितीने बदलते किंवा मिसळते. पण बायबल शिकवतं की स्मारक विधीसाठी वापरली जाणारी बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षारस ख्रिस्ताच्या मांसाला आणि रक्ताला सूचित करतं किंवा ती फक्त प्रतिकं आहेत. याचे बायबलमधून काही पुरावे पाहू या.
जर येशूने त्याच्या शिष्यांना त्याचं रक्त प्यायची आज्ञा दिली असती, तर तो त्यांना रक्ताबद्दल देवाचा नियम मोडायला लावत असता. (उत्पत्ती ९:४; प्रेषितांची कार्यं १५:२८, २९) पण हे अशक्य आहे. कारण रक्ताविषयी असलेला देवाचा नियम तो दुसऱ्यांना कधीच मोडायला लावणार नाही.—योहान ८:२८, २९.
जेव्हा प्रेषित द्राक्षारस पित होते, तेव्हा येशूने त्यांना म्हटलं, की त्याचं रक्त “ओतलं जाणार आहे.” म्हणजेच ते अजून ओतलं गेलं नव्हतं. तर मग द्राक्षारस त्याचं रक्त कसं असू शकतं?—मत्तय २६:२८.
येशूचं बलिदान “एकदाच” देण्यात आलं होतं. (इब्री लोकांना ९:२५, २६) पण जर ती भाकर आणि द्राक्षारस येशूच्या खरोखरच्या मांसात आणि रक्तात बदललं असतं, तर त्या विधीत भाग घेणाऱ्यांसाठी येशूने त्याचं बलिदान पुन्हा-पुन्हा दिल्यासारखं झालं असतं.
तसंच, लक्षात घ्या, येशूने असं नाही म्हटलं की “माझं बलिदान देत राहा.” तर त्याने असं म्हटलं की माझ्या बलिदानाची “आठवण म्हणून हे करत राहा.”—१ करिंथकर ११:२४.
भाकरीचं आणि द्राक्षारसाचं येशूच्या खरोखरच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर होतं, या शिकवणीवर काही लोक विश्वास ठेवतात. आणि हे सगळं काही बायबल वचनांवर आधारित आहे असं ते म्हणतात. उदाहरणार्थ, बऱ्याच बायबल भाषांतरांत द्राक्षारसाबद्दल येशू असं म्हणतो: “हे माझं रक्त आहे.” (मत्तय २६:२८) पण येशूच्या या शब्दांचं असंसुद्धा भाषांतर केलं जाऊ शकतं: “हे म्हणजे माझं रक्त” किंवा “हे माझ्या रक्ताला सूचित करतं.” d खरंतर, नेहमीप्रमाणे येशू इथेही उदाहरणं किंवा रूपक वापरून बोलत होता.—मत्तय १३:३४, ३५.
प्रभुभोजन कोण घेऊ शकतं?
जेव्हा यहोवाचे साक्षीदार सांजभोजनाचा विधी पाळतात, तेव्हा फक्त काही जणच प्रभुभोजन घेतात. असं का?
यहोवा देवाने जुन्या काळातल्या इस्राएली लोकांसोबत एक करार केला होता. पण येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे तो जुना करार रद्द करण्यात आला आणि एका ‘नवीन कराराची’ सुरुवात झाली. (इब्री लोकांना ८:१०-१३) यामुळे ज्यांच्यासोबत हा नवीन करार करण्यात आला, फक्त तेच या द्राक्षारसातून आणि भाकरीतून खाऊ शकतात. म्हणजे सगळ्या ख्रिश्चनांना नाही तर फक्त असे ख्रिस्ती ज्यांना या कराराचा भाग होण्यासाठी देवाने ‘बोलवलं’ किंवा आमंत्रण दिलं आहे, फक्त तेच प्रभुभोजन घेतात. (इब्री लोकांना ९:१५; लूक २२:२०) बायबलमध्ये सांगितलं आहे की त्यांची संख्या १,४४,००० आहे आणि ते स्वर्गातून येशूसोबत राज्य करतील.—लूक २२:२८-३०; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३.
ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्या या गटाला बायबलमध्ये ‘लहान कळप’ म्हणण्यात आलं आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना याच पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची संधी आहे. या गटाला बायबलमध्ये “मोठा लोकसमुदाय” असं म्हटलं आहे. (लूक १२:३२; प्रकटीकरण ७:९, १०) पृथ्वीवर कायम जीवन जगण्याची आशा असणारे जरी त्या द्राक्षारसातून पित नसले आणि त्या भाकरीतून खात नसले, तरी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे खंडणी बलिदान दिलं आहे, त्याबद्दल कदर दाखवण्यासाठी आपण या विधीला उपस्थित राहतो.—१ योहान २:२.
a द न्यू शॅफ-हरझॉग एनसायक्लोपिडिआ ऑफ रिलिजियस नॉलेज, खंड ४, पृ. ४३-४४ आणि मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांची सायक्लोपिडिया, खंड ८, पृ. ८३६ पाहा.
b द न्यू कॅमब्रिज हिस्ट्री ऑफ द बायबल, खंड १, पृ. ८४१ पाहा.
c आधुनिक यहुदी कॅलेंडरप्रमाणे, निसान महिन्याची सुरुवात नवीन चंद्रकोरीपासून होते. पण ही पद्धत पहिल्या शतकात वापरली जात नव्हती. त्याऐवजी यरुशलेममध्ये जेव्हा नवीन चंद्राची कोर पहिल्यांदा दिसायची तेव्हापासून निसान महिना सुरू व्हायचा. पण काही कारणांमुळे नवीन चंद्राची कोर दिसली नाही आणि ती एक-दोन दिवसांनंतर स्पष्ट दिसली, तर तेव्हापासून बायबलच्या काळात निसान महिन्याची सुरुवात व्हायची. त्यामुळे, यामध्ये नेहमी एक-दोन दिवसांचा फरक राहायचा. म्हणूनच यहोवाचे साक्षीदार स्मारक विधीची जी तारीख काढतात आणि आजचे यहुदी लोक वल्हांडणाची जी तारीख काढतात, ती प्रत्येक वेळेला सारखी नसते.
d जेम्स मॉफॅट यांचं अ न्यू ट्रान्सलेशन ऑफ द बायबल; चार्ल्स बी. विल्यम्स् यांचं द न्यू टेस्टमेंट—अ ट्रान्सलेशन इन द लँग्वेज ऑफ द पिपल आणि ह्यू जे. स्कोनफिल्ड यांचं द ओरिजनल न्यू टेस्टमेंट पाहा.