पाप म्हणजे काय?
बायबलचं उत्तर
पाप म्हणजे असं कोणतंही काम, भावना किंवा विचार जो देवाच्या स्तरांच्या विरोधात आहे. तसंच, त्यात देवाच्या दृष्टीने चुकीचं किंवा वाईट काम करून त्याच्या आज्ञा मोडणंही सामील आहे. (१ योहान ३:४; ५:१७) बायबलमध्ये असंही सांगितलंय की योग्य काय हे माहीत असून ते न करणं हेसुद्धा पाप आहे.—याकोब ४:१७.
ज्या मूळ भाषांमध्ये बायबल लिहिण्यात आलं होतं त्यांत, पाप यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दांचा अर्थ ‘निशाणा चुकणं’ किंवा ‘लक्ष्य चुकणं’ असा होतो. उदाहरणार्थ, प्राचीन काळातल्या इस्राएलचे काही सैनिक गोफणीतून दगड मारण्यात इतके कुशल होते, की त्यांचा नेम कधीच “चुकायचा नाही.” या वाक्यांशाचं शब्दशः भाषांतर केलं तर “पाप करायचा नाही” असं होईल. (शास्ते २०:१६) यावरून कळतं की पाप करणं म्हणजे देवाच्या परिपूर्ण स्तरांप्रमाणे वागायला चुकणं.
निर्माणकर्ता या नात्याने देवाला मानवांसाठी स्तर किंवा नियम बनवायचा अधिकार आहे. (प्रकटीकरण ४:११) आपल्याला आपल्या वागण्याचा देवाला हिशोब द्यावा लागेल.—रोमकर १४:१२.
आपल्याकडून कोणतंच पाप होणार नाही असं शक्य आहे का?
नाही. बायबल सांगतं की “सगळ्यांनीच पाप केलं आहे आणि ते देवाचे गौरवशाली गुण दाखवण्यात कमी पडतात.” (रोमकर ३:२३; १ राजे ८:४६; उपदेशक ७:२०; १ योहान १:८) असं का?
पहिले मानव म्हणजे आदाम-हव्वा हे सुरुवातीपासून पापी नव्हते. उलट ते परिपूर्ण होते. कारण देवाने त्यांना स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलं होतं. (उत्पत्ती १:२७) पण देवाची आज्ञा मोडल्यामुळे ते अपरिपूर्ण बनले. (उत्पत्ती ३:५, ६, १७-१९) आनुवंशिकतेमुळे आईवडिलांचे आजार जसे मुलांमध्ये येतात, तसंच आदाम-हव्वाला मुलं झाली तेव्हा त्यांच्यामध्येही वारशाने पाप आणि अपरिपूर्णता आली. (रोमकर ५:१२) इस्राएलच्या दावीद राजानेही म्हटलं, “मी तर जन्मतःच दोषी आहे.”—स्तोत्र ५१:५.
काही पापं इतर पापांपेक्षा गंभीर असतात का?
हो. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं की प्राचीन काळातल्या सदोममध्ये राहणारे “लोक दुष्ट होते” आणि “घोर पापं करायचे.” तसंच, “त्यांचं पाप खूप भयंकर” होतं. (उत्पत्ती १३:१३; १८:२०) एखादं पाप किती वाईट किंवा भयंकर आहे हे कोणत्या तीन गोष्टींवरून ठरतं ते आता पाहू या.
गंभीरता. अनैतिक लैंगिक कृत्यं, मूर्तिपूजा, चोरी, दारूडेपणा, लुबाडणूक, खून आणि भूतविद्या यांसारख्या गंभीर पापांपासून दूर राहण्याचा बायबल आपल्याला इशारा देतं. (१ करिंथकर ६:९-११; प्रकटीकरण २१:८) पण बायबल असंही म्हणतं की मुद्दाम नाही, तर नकळत झालेल्या चुका गंभीर पापांपासून वेगळ्या आहेत. जसं की, कधीकधी आपण नकळतपणे आपल्या वागण्याबोलण्याने इतरांना दुःखावतो. (नीतिवचनं १२:१८; इफिसकर ४:३१, ३२) असं असलं तरी कोणत्याही पापांना आपण हलकं समजू नये, कारण लहानसहान चुका करत राहिल्यामुळे आपल्या हातून गंभीर पाप होऊ शकतं.—मत्तय ५:२७, २८.
हेतू. देवाच्या आज्ञा माहीत नसल्यामुळे कधीकधी काही पापं होतात. (प्रे. कार्यं १७:३०; १ तीमथ्य १:१३) अशा प्रकारची पापं करण्याची बायबल सूट देत नाही. पण तरी जाणूनबुजून देवाच्या आज्ञा मोडण्यापेक्षा हे वेगळं आहे असं बायबल सांगतं. (गणना १५:३०, ३१) जाणूनबुजून पाप करणं हे एका “दुष्ट मनाचं” लक्षण आहे.—यिर्मया १६:१२.
एकदाच की वारंवार? एकदा पाप करणं आणि बऱ्याच काळापर्यंत एखादं पाप करत राहणं यांत फरक आहे असं बायबल सांगतं. (१ योहान ३:४-८) योग्य काय आहे हे माहीत असूनही जे “जाणूनबुजून पाप करत” राहतात, त्यांना देवाच्या न्यायदंडाचा सामना करावा लागेल.—इब्री लोकांना १०:२६, २७.
गंभीर पाप केल्यामुळे मनात दोषभावना येते आणि त्या दोषभावनेच्या ओझ्याखाली काही जण दबून जातात. उदाहरणार्थ, दावीद राजाने लिहिलं: “माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे. त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.” (स्तोत्र ३८:४) असं असलं तरी बायबल असा दिलासा देतं: “दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा, आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत; त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल, त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.”—यशया ५५:७.