व्हिडिओ पाहण्यासाठी

मला जगायचं नाही​—आत्महत्येचे विचार येतात तेव्हा बायबलमधून मला काही मदत मिळेल का?

मला जगायचं नाही​—आत्महत्येचे विचार येतात तेव्हा बायबलमधून मला काही मदत मिळेल का?

बायबलचं उत्तर

 हो नक्कीच! कारण बायबल हे देवाकडून आहे आणि तो “खचून गेलेल्यांचं सांत्वन करतो.” (२ करिंथकर ७:६) बायबल हे मानसिक आरोग्याविषयीचं पुस्तक नसलं, तरी आत्महत्येचा विचार करणाऱ्‍या अनेकांना यातून बाहेर यायला बायबलमुळे मदत झाली आहे. बायबलमधल्या उपयोगी सल्ल्यामुळे तुम्हालाही मदत होऊ शकते.

 बायबलमध्ये कोणता उपयोगी सल्ला दिलाय?

  • मन मोकळं करा.

     बायबल काय सांगतं? “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”​—नीतिवचनं १७:१७.

     याचा काय अर्थ होतो? आपल्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा आपल्याला दुसऱ्‍यांच्या आधाराची गरज असते.

     जर तुम्ही आपल्या भावना मनात कोंडून ठेवल्या, तर एक वेळ अशी येईल जेव्हा ते ओझं तुम्हाला सहन होणार नाही. पण जर तुम्ही कोणाजवळ आपलं मन मोकळं केलं, तर तुमचं दुःख थोडं हलकं होऊ शकतं. तसंच, तुमच्या समस्यांकडे सकारात्मक नजरेने पाहायला तुम्हाला मदत होऊ शकते.

     हे करून पाहा: आजच तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्‍तीशी किंवा जवळच्या मित्राशी बोला. a मन मोकळं करण्यासाठी तुम्ही आपल्या भावना लिहूनही काढू शकता.

  • तज्ज्ञांची मदत घ्या.

     बायबल काय सांगतं? “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.”​—मत्तय ९:१२.

     याचा काय अर्थ होतो? आपण आजारी असतो तेव्हा आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

     आत्महत्येचा विचार मनात येणं हे मानसिक किंवा भावनिक आजाराचं लक्षण असू शकतं. शारीरिक आजार असतो तेव्हा आपण डॉक्टरांना जाऊन भेटतो, आपल्याला लाज वाटत नाही. मानसिक आजाराच्या बाबतीतही आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मानसिक आणि भावनिक आजारांवर उपचार केले जाऊ शकतात.

     हे करून पाहा: मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्‍या तज्ज्ञांची लवकरात लवकर मदत घ्या.

  • देवाला आपली काळजी आहे हे विसरू नका.

     बायबल काय सांगतं? “दोन पैशांना पाच चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, त्यांपैकी एकीलाही देव विसरत नाही. . . . घाबरू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.”​—लूक १२:६, ७.

     याचा काय अर्थ होतो? देव तुम्हाला मौल्यवान समजतो.

     तुम्हाला कदाचित खूप एकटं-एकटं वाटत असेल, पण देवाला तुमच्या दुःखाची जाणीव आहे. तुम्हाला जरी जगावंसं वाटत नसलं, तरी देवाला तुमची काळजी आहे. स्तोत्र ५१:१७ यात असं म्हटलंय, “हे देवा, दुःखी आणि हताश झालेलं हृदय तू झिडकारणार नाहीस.” देवाला वाटतं की तुम्ही जगावं कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.

     हे करून पाहा: देवाचं तुमच्यावर प्रेम आहे याबदद्‌ल बायबलमध्ये दिलेल्या पुराव्यांचं परीक्षण करा. जसं की, जून २०१६ च्या टेहळणी बुरूज अंकात पान क्र. ३-५ वर असलेला, “यहोवा ‘तुमची काळजी घेतो’” हा लेख पाहा.

  • देवाला प्रार्थना करा.

     बायबल काय सांगतं? “आपल्या सगळ्या चिंता [देवावर] टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”​—१ पेत्र ५:७.

     याचा काय अर्थ होतो? देव आपल्याला सांगतो, की आपल्याला कोणत्याही चिंता असल्या तरी आपण त्या अगदी मनमोकळेपणाने त्याला सांगाव्यात.

     देव तुम्हाला मनाची शांती देईल आणि तुमच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहनशक्‍तीही देईल. (फिलिप्पैकर ४:६, ७, १३) जे देवाला मनापासून हाक मारतात त्यांना तो नक्कीच मदत करतो.​—स्तोत्र ५५:२२.

     हे करून पाहा: आजच देवाला प्रार्थना करा. यहोवा हे त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा आणि त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करा. (स्तोत्र ८३:१८) तुम्हाला सहन करायला ताकद मिळावी म्हणून त्याच्याकडे मदत मागा.

  • भविष्यासाठी बायबलमध्ये दिलेल्या आशेवर विचार करा.

     बायबल काय सांगतं? “ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्या जीवनासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.”​—इब्री लोकांना ६:१९, तळटीप.

     याचा काय अर्थ होतो? तुमच्या भावनासुद्धा वादळात हेलकावे खाणाऱ्‍या जहाजासारख्या असू शकतात, पण बायबलमध्ये दिलेली आशा तुमच्या मनाला स्थिर करू शकते.

     ही आशा काल्पनिक नाही, तर ती देवाच्या अभिवचनावर आधारित आहे. त्याने आपली सगळी दुःखं काढून टाकायचं वचन दिलंय.​—प्रकटीकरण २१:४.

     हे करून पाहा: बायबलमधल्या आशेबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला धडा २ वाचा.

  • तुम्हाला आवडणाऱ्‍या गोष्टी करा.

     बायबल काय सांगतं? “आनंदी मन हे उत्तम औषध आहे.”​—नीतिवचनं १७:२२.

     याचा काय अर्थ होतो? जेव्हा आपण मनाला आनंद देणाऱ्‍या गोष्टी करतो तेव्हा आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं.

     हे करून पाहा: असं काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला सहसा आनंद होतो. जसं की, मन प्रसन्‍न करणारं संगीत ऐका, चांगलं काहीतरी वाचा किंवा एखादा छंद जोपासा. तसंच, दुसऱ्‍यांना मदत करण्यासाठी काहीतरी करा. यामुळेही तुम्हाला नक्कीच आनंद होईल. मग त्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असल्या तरीसुद्धा.​—प्रे. कार्यं २०:३५.

  • तुमचं आरोग्य जपा.

     बायबल काय सांगतं? ‘शारीरिक प्रशिक्षण उपयोगी आहे.’​—१ तीमथ्य ४:८.

     याचा काय अर्थ होतो? व्यायाम केल्यामुळे, पुरेशी झोप घेतल्यामुळे आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं.

     हे करून पाहा: कमीत कमी १५ मिनिटं वेगाने चालायचा व्यायाम करा.

  • तुमच्या भावना आणि परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही हे लक्षात ठेवा.

     बायबल काय सांगतं? “उद्या तुमचं जीवन कसं असेल, हे तुम्हाला माहीत नाही.”​—याकोब ४:१४.

     याचा काय अर्थ होतो? कधीकधी आपल्यासमोर एखादी मोठी समस्या असते आणि ती कधीच सुटणार नाही असं आपल्याला वाटू शकतं. पण अशी समस्यासुद्धा तात्पुरती असू शकते.

     आज तुमची परिस्थिती कितीही निराशाजनक वाटत असली, तरी पुढे ती बदलू शकते. म्हणून त्या परिस्थितीचा सामना कसा करता येईल याचा विचार करा. (२ करिंथकर ४:८) आज ना उद्या तुमची समस्या सुटेल, म्हणून आत्महत्येचा विचार सोडून द्या.

     हे करून पाहा: बायबलमधून अशा लोकांबद्दल वाचा, जे इतके निराश झाले होते की त्यांनाही जीवन नकोसं झालं होतं. पण पुढे, त्यांनी अपेक्षाही केली नव्हती असे चांगले बदल त्यांच्या जीवनात कसे घडले याकडे लक्ष द्या. त्यांपैकी काही उदाहरणं पाहू या.

 बायबल अशा व्यक्‍तींबद्दल सांगतं का, ज्यांना जीवन नकोसं झालं होतं?

 हो. बायबल आपल्या अशा काही व्यक्‍तींबद्दल सांगतं जे एका अर्थाने असं म्हणाले की “मला जगायचं नाही.” पण देव त्यांच्यावर रागावला नाही, उलट त्याने त्यांना मदत केली. तसंच तो तुम्हालाही मदत करेल.

एलीया

  •  तो कोण होता? एलीया एक धाडसी संदेष्टा होता. पण त्यालाही निराशेचा सामना करावा लागला. याकोब ५:१७ मध्ये म्हटलंय, “एलीया हा आपल्यासारख्याच भावना असलेला माणूस होता.”

  •  त्याला मरून जावंसं का वाटत होतं? एलीयाला खूप एकटं-एकटं वाटत होतं. तो खूप घाबरला होता आणि आपली काहीच किंमत नाही असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने कळकळीने अशी प्रार्थना केली, “हे यहोवा, पुरे झालं! आता माझा जीव घेऊन टाक.”​—१ राजे १९:४.

  •  त्याला कशामुळे मदत झाली? एलीयाने देवाला आपल्या मनातलं सगळं सांगितलं. मग देवाने त्याला धीर कसा दिला? देवाने त्याच्याबद्दल काळजी दाखवली आणि त्याला मदत करण्याची ताकद आपल्याजवळ आहे हेही त्याला दाखवलं. तसंच, देवाने एलीयाला हा भरवसा दिला की तो अजूनही त्याच्या नजरेत मौल्यवान आहे आणि त्याने एलीयाला एक सहायकसुद्धा दिला, जो त्याची काळजी घेईल आणि त्याला मदत करेल.

  •  एलीयाबद्दल वाचा: १ राजे १९:२-१८.

ईयोब

  •  तो कोण होता? ईयोब एक श्रीमंत माणूस होता आणि तो खऱ्‍या देवाचा विश्‍वासू उपासक होता.

  •  त्याला मरून जावंसं का वाटत होतं? ईयोबवर अचानक खूप संकटं आली. त्याची सगळी मालमत्ता त्याने गमावली. एका विपत्तीमुळे त्याच्या सगळ्या मुलांचा मृत्यू झाला. तसंच त्याला एक वेदनादायक आजारही झाला. आणि शेवटी, या सगळ्या समस्यांसाठी तो स्वतःच जबाबदार आहे असा खोटा आरोप त्याच्या मित्रांनी त्याच्यावर लावला. त्यामुळे ईयोब असं म्हणाला: “मला माझ्या जीवनाचा वीट आलाय.”​—ईयोब ७:१६.

  •  त्याला कशामुळे मदत झाली? ईयोबने देवाला प्रार्थना केली आणि आपल्या समस्यांबद्दल दुसऱ्‍यांशीही तो बोलला. (ईयोब १०:१-३) अलीहू नावाच्या एका मित्राने त्याला सहानुभूती दाखवली, प्रोत्साहन दिलं आणि त्याच्या परिस्थितीबद्दल योग्य विचार करायला त्याला मदत केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देवाने दिलेला सल्ला आणि मदत ईयोबने स्वीकारली.

  •  ईयोबबद्दल वाचा: ईयोब १:१-३, १३-२२; २:७; ३:१-१३; ३६:१-७; ३८:१-३; ४२:१, २, १०-१३.

मोशे

  •  तो कोण होता? मोशे प्राचीन इस्राएल राष्ट्राचा पुढारी आणि देवाचा विश्‍वासू संदेष्टा होता.

  •  त्याला मरून जावंसं का वाटत होतं? मोशेवर कामाचा खूप भार होता आणि त्यामुळे तो थकून जायचा. तसंच, लोक सतत त्याची टीका करायचे. म्हणून त्याने देवाला अशी विनंती केली: “मला आत्ताच मारून टाक.”​—गणना ११:११, १५.

  •  त्याला कशामुळे मदत झाली? मोशेने आपल्या भावना देवाला सांगितल्या. देवाने त्याला त्याच्या कामाचा भार आणि तणाव कमी करायला मदत केली.

  •  मोशेबद्दल वाचा: गणना ११:४-६, १०-१७.

a जर तुमच्या मनातल्या आत्महत्येच्या भावना खूप तीव्र असतील आणि त्या वेळी जर तुमचे जवळचे लोक तुमच्यासोबत नसतील, तर मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्‍या हेल्पलाईनला संपर्क करा.