प्रस्तावना
पवित्र बायबल हे मुळात देवाकडून आहे आणि त्याद्वारे तो आपल्याशी बोलतो. देवाची ओळख करून घेण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. (योहान १७:३; २ तीमथ्य ३:१६) बायबलमध्ये यहोवा देवाने मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा संकल्प कळवला आहे.—उत्पत्ती ३:१५; प्रकटीकरण २१:३, ४.
लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणारं बायबलसारखं दुसरं कोणतंच पुस्तक नाही. ते आपल्याला प्रेम, दया आणि करूणा यांसारखे यहोवा देवाचे गुण दाखवण्याची प्रेरणा देतं. तसंच, ते लोकांना आशा देतं आणि अतिशय कठीण परिस्थितीतही धीर धरायला मदत करतं. याशिवाय, देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या या जगातल्या गोष्टीही ते उघडकीस आणतं.—स्तोत्र ११९:१०५; इब्री लोकांना ४:१२; १ योहान २:१५-१७.
बायबल मुळात हिब्रू, ॲरामेईक (अरामी) आणि ग्रीक भाषांत लिहिलं होतं. आणि आज संपूर्ण बायबलचं किंवा त्याच्या काही भागांचं भाषांतर ३,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. आजपर्यंत सगळ्यात जास्त भाषांमध्ये भाषांतर केलेलं आणि वाटप केलेलं हे पुस्तक आहे. बायबलबद्दल आपण अशीच अपेक्षा करू शकतो! कारण त्यात अशी भविष्यवाणी केली आहे, की “सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्तय २४:१४.
बायबलमधला संदेश खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही असं भाषांतर तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जे मूळ लिखाणांच्या अगदी जवळ आहे. इतकंच नाही, तर ते वाचायला आणि समजायलाही सोपं आहे. या भाषांतरात काही अतिरिक्त लेखही दिले आहेत. जसं की, “बायबलचं भाषांतर कोणत्या तत्त्वांवर आधारित असलं पाहिजे?” “बायबलच्या या भाषांतराची वैशिष्ट्यं,” आणि “बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?” या अतिरिक्त लेखांमध्ये हे समजावलं गेलं आहे, की हे बायबल कोणत्या भाषांतर तत्त्वांवर आधारित आहे आणि या आवृत्तीची वैशिष्ट्यं काय आहेत.
जे यहोवा देवावर प्रेम करतात आणि त्याची उपासना करतात, त्यांना देवाच्या वचनाचं अचूक आणि समजायला सोपं असं भाषांतर वाचायची इच्छा असते. (१ तीमथ्य २:४) हे लक्षात घेऊन नवे जग भाषांतर जास्तीत जास्त भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेतही आम्ही बायबलची ही आवृत्ती तयार केली आहे. प्रिय वाचक, तुम्हाला देवाचा शोध घेता यावा आणि तुम्हाला तो सापडावा म्हणून पवित्र शास्त्राचं हे भाषांतर तुम्हाला नक्कीच मदत करेल, अशी आम्ही आशा बाळगतो आणि हीच आमची प्रार्थना आहे.—प्रेषितांची कार्यं १७:२७.
नवे जग बायबल भाषांतर समिती