चौकट १९ख
छोट्याशा प्रवाहाची पुढे खळखळणारी नदी बनते!
यहोवाच्या मंदिरातून पाण्याचा एक छोटासा प्रवाह वाहतो आणि यहेज्केल त्यासोबत पुढे-पुढे जातो. पाण्याचा हा प्रवाह वाढत जातो आणि फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर त्याची एक खळखळून वाहणारी खोल नदी बनते. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर हिरवीगार झाडं आहेत. त्यांना चांगली, रसरशीत फळं येतात आणि त्यांच्या पानांचा उपयोग रोग बरे करण्यासाठी केला जातो. या सर्व गोष्टींचा काय अर्थ होतो?
आशीर्वादांची नदी
प्राचीन काळात: यहुदी लोक बंदिवासातून परत आपल्या मायदेशात आले आणि त्यांनी मंदिरात शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली, त्यानंतर त्यांना भरभरून आशीर्वाद मिळू लागले
आजच्या काळात: १९१९ मध्ये शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून यहोवाच्या सेवकांना कधी नाही इतके आशीर्वाद मिळू लागले; म्हणजेच, त्यांना शुद्ध उपासना करता यावी म्हणून त्यांच्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत
भविष्यात: हर्मगिदोननंतर, यहोवा आपल्याला आणखी अनेक आशीर्वाद देईल. जसं की, तो आपल्याला परिपूर्ण बनवेल आणि नवीन सत्यं शिकवेल
जीवन देणारं पाणी
प्राचीन काळात: यहुदी त्यांच्या मायदेशात परतले तेव्हा यहोवाने त्यांना भरपूर आशीर्वाद दिले. त्यांची संख्या वाढत गेली, पण तरी त्यांना काही कमी पडलं नाही. कारण यहोवाची उपासना करता यावी म्हणून त्यांच्यासाठी पुरेशा तरतुदी करण्यात आल्या
आजच्या काळात: आज अनेक जण सत्य शिकत आहेत आणि नंदनवनासारख्या वातावरणात सोबत मिळून यहोवाची सेवा करत आहेत; एका अर्थी त्यांना नवीन जीवन मिळालं आहे
भविष्यात: असंख्य लोकांना नवीन जगात जिवंत केलं जाईल. त्यांना आणि हर्मगिदोनमधून वाचलेल्यांना यहोवा भरपूर आशीर्वाद देईल
फळं देणारी आणि रोग बरे करणारी झाडं
प्राचीन काळात: यहुदी लोक त्यांच्या मायदेशी परतले, तेव्हा यहोवाने त्यांना उत्तम शिक्षण दिलं आणि त्यांच्यासाठी अशा तरतुदी केल्या ज्यांमुळे त्यांना शुद्ध उपासना करता आली. तसंच, त्याने त्यांचा दिर्घकाळ असलेला लाक्षणिक रोगसुद्धा बरा केला; म्हणजेच, खोट्या उपासनेपासून दूर राहण्यासाठी त्यांना मदत केली
आजच्या काळात: आज जगात योग्य मार्गदर्शनाचा तुटवडा आहे. पण यहोवाच्या सेवकांना आध्यात्मिक अन्न मुबलक प्रमाणात मिळत आहे. यामुळे त्यांना मोहांचा प्रतिकार करणं शक्य होतं आणि जगातल्या लोकांसारखी वाईट वृत्ती टाळायला मदत होते
भविष्यात: ख्रिस्त आणि त्याच्या १,४४,००० सहराजांच्या मदतीने देवाची आज्ञा पाळणारे सेवक परिपूर्ण होतील आणि सदासर्वकाळ उत्तम आरोग्याचा आनंद घेतील!
अध्याय १९, परिच्छेद ४-२१ वर परत जाण्यासाठी