कथा १७
भिन्न असलेले जुळे भाऊ
इथे असलेली दोन मुलं अगदी वेगळी आहेत, नाही का? त्यांची नावं तुम्हाला ठाऊक आहेत का? शिकारी आहे, तो एसाव. आणि मेंढरांची काळजी घेणारा आहे, तो याकोब.
एसाव आणि याकोब, हे इसहाक आणि रिबकेचे जुळे मुलगे होते. एसाव चांगला शिकारी होता आणि तो घरी कुटुंबासाठी अन्न आणत असल्यानं त्याच्या वडिलांचा खूप लाडका होता. पण रिबकेचं याकोबावर अधिक प्रेम होतं, कारण तो सालस आणि शांत मुलगा होता.
आजोबा अब्राहाम अजून हयात होते. आणि यहोवाबद्दल त्यांना बोलताना ऐकायला याकोबाला खूप आवडायचं. अखेरीस, ती जुळी मुलं १५ वर्षांची असताना, वयाच्या १७५ व्या वर्षी अब्राहाम मरण पावला.
एसाव ४० वर्षांचा झाला तेव्हा, त्यानं कनान देशातल्या दोन स्त्रियांशी लग्न केलं. त्यामुळे इसहाक आणि रिबकेला अतिशय दुःख झालं. कारण त्या स्त्रिया यहोवाची भक्ती करत नव्हत्या.
मग एका दिवशी अशी गोष्ट झाली की, ज्यामुळे एसावाला आपल्या भावाचा अतिशय राग आला. इसहाकानं त्याच्या मोठ्या मुलाला आशीर्वाद देण्याची वेळ आली. याकोबापेक्षा एसाव मोठा असल्यानं, आपल्याला तो आशीर्वाद मिळेल, अशी अपेक्षा एसावाला होती. परंतु आशीर्वाद मिळण्याचा हक्क अगोदरच त्यानं याकोबाला विकला होता. शिवाय, ते दोन्ही मुलगे जन्मले तेव्हा, तो आशीर्वाद याकोबाला मिळेल, असं देवानं म्हटलं होतं. आणि तसचं झालं. इसहाकानं, याकोबाला आशीर्वाद दिला.
मागाहून त्याबद्दल एसावाला कळलं, तेव्हा तो याकोबावर अतिशय संतापला. तो इतका रागावला की, याकोबाला ठार करील असं म्हणाला. रिबकेनं ते ऐकल्यावर तिला मोठी चिंता पडली. त्यामुळे ती, आपल्या नवऱ्याला म्हणाली: ‘याकोबानंही एखाद्या कनानी स्त्रीशी लग्न केल्यास अगदी कहर होईल.’
तेव्हा, इसहाकानं याकोबाला बोलावून सांगितलं: ‘कनानमधल्या एखाद्या स्त्रीशी लग्न करु नकोस. त्याऐवजी, हारानला तुझ्या बथुवेल आजोबांच्या घरी जा. आणि लाबान या त्यांच्या मुलाच्या एका मुलीशी लग्न कर.’
याकोबानं त्याच्या वडिलांचं ऐकलं, आणि तात्काळ, हारानला राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे जाण्याच्या प्रवासाला लागला.