व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २८

“पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष

“पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष

पहिल्या शतकात येशूच्या शिष्यांनी सुरू केलेलं कार्य आज यहोवाचे साक्षीदार पुढे नेत आहेत

१. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत कोणत्या गोष्टी सारख्या आहेत?

 त्यांनी धैर्याने साक्ष दिली. मनापासून पवित्र शक्‍तीचं मार्गदर्शन आणि मदत स्वीकारली. छळाला घाबरून आपलं प्रचारकार्य थांबवलं नाही. आणि यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत या सर्व गोष्टी खऱ्‍या होत्या. तशाच, त्या आजच्या काळातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीतही खऱ्‍या ठरल्या आहेत.

२, ३. प्रेषितांची कार्यं पुस्तक खास का आहे?

बायबलमधल्या प्रेषितांची कार्यं या उत्कंठा वाढवणाऱ्‍या पुस्तकातले, विश्‍वास मजबूत करणारे अहवाल वाचून तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल. हे पुस्तक खूप खास आहे. कारण ख्रिस्ती विश्‍वासाचा सुरुवातीचा इतिहास सांगणारं, देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं हे एकच पुस्तक आहे.

प्रेषितांची कार्यं पुस्तकात, ३२ देशांतल्या, ५४ शहरांतल्या आणि ९ बेटांवरच्या ९५ व्यक्‍तींचा नावाने उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक म्हणजे सामान्य लोकांची, गर्विष्ठ धार्मिक पुढाऱ्‍यांची, अहंकारी शासकांची आणि क्रूरपणे छळ करणाऱ्‍यांची एक रोमांचक कहाणी आहे. पण, त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुमच्या-आमच्या पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींची कहाणी आहे. या भाऊबहिणींनी जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना तर केलाच, पण त्यासोबतच आनंदाच्या संदेशाचा आवेशाने प्रचारही केला.

४. प्रेषित पौल, तबीथा आणि पहिल्या शतकातल्या इतर विश्‍वासू साक्षीदारांसोबत आपलं खास नातं का आहे?

आवेशी प्रेषित पेत्र आणि पौल, सर्वांचा लाडका वैद्य लूक, उदार बर्णबा, धाडसी स्तेफन, दयाळू तबीथा, पाहुणचार करणारी लुदिया आणि इतर अनेकांनी केलेल्या चांगल्या कामांना आता जवळजवळ २,००० वर्षं उलटून गेली आहेत. तरीही, आपलं या सर्वांशी एक खास नातं आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण, त्यांच्याप्रमाणेच आपल्यावरही शिष्य बनवण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. (मत्त. २८:१९, २०) हे काम करणं हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे!

“. . . पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत.”​—प्रे. कार्यं १:८

५. येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांनी आपलं प्रचारकार्य करायला कुठून सुरुवात केली?

येशूने आपल्या शिष्यांवर कोणतं कार्य सोपवलं होतं यावर विचार करा. तो म्हणाला होता, “पवित्र शक्‍ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) सर्वातआधी, पवित्र शक्‍तीने शिष्यांना “यरुशलेममध्ये”  साक्ष देण्यासाठी मदत केली. (प्रे. कार्यं १:१–८:३) त्यानंतर, पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाने त्यांनी “संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये”  साक्ष दिली. (प्रे. कार्यं ८:४–१३:३) मग, ते आनंदाचा संदेश “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत”  घेऊन गेले.​—प्रे. कार्यं १३:४–२८:३१.

६, ७. सेवाकार्य करण्यासाठी, पहिल्या शतकातल्या बांधवांकडे नव्हत्या अशा कोणत्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत?

आपल्या पहिल्या शतकातल्या बांधवांकडे साक्षकार्य करण्यासाठी संपूर्ण बायबल नव्हतं. मत्तयचं आनंदाच्या संदेशाचं पुस्तक कमीतकमी इ.स. ४१ पर्यंत तरी त्यांच्याकडे नव्हतं. प्रेषितांची कार्यं पुस्तक लिहून पूर्ण होण्याच्या आधी, म्हणजे इ.स. ६१ च्या आसपास पौलची काही पत्रं लिहिण्यात आली होती. पण, पहिल्या शतकातल्या बांधवांकडे संपूर्ण पवित्र शास्त्राच्या स्वतःच्या प्रती नव्हत्या किंवा आवड दाखवणाऱ्‍या लोकांना देण्यासाठी वेगवेगळं साहित्यही नव्हतं. येशूचे शिष्य बनण्याआधी, यहुदी ख्रिश्‍चनांनी सभास्थानांमध्ये हिब्रू शास्त्रवचनांचं वाचन ऐकलं होतं. (२ करिंथ. ३:१४-१६) पण, ही वचनं लक्षात ठेवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली असेल. कारण इतरांना ती सांगण्यासाठी त्यांना ही वचनं पाठ करावी लागली असतील.

आज, आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाकडे बायबलची वैयक्‍तिक प्रत आहे, तसंच मोठ्या प्रमाणात बायबल साहित्यही आहे. आपण जवळजवळ २४० देशांत अनेक भाषांमध्ये आनंदाचा संदेश घोषित करून शिष्य बनवण्याचं कार्य करत आहोत.

पवित्र शक्‍तीची मदत

८, ९. (क) येशूचे शिष्य पवित्र शक्‍तीच्या मदतीने काय करू शकले? (ख) आज विश्‍वासू दास पवित्र शक्‍तीच्या मदतीने काय तयार करत आहे?

येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना साक्ष देण्याचं काम सोपवलं, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “पवित्र शक्‍ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल.” देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने, येशूचे शिष्य शेवटी संपूर्ण पृथ्वीभर साक्ष देण्याचं काम करणार होते. पेत्र आणि पौलने पवित्र शक्‍तीद्वारे आजारी लोकांना बरं केलं, दुष्ट स्वर्गदूतांना काढलं, इतकंच काय, तर मेलेल्या लोकांनाही जिवंत केलं! पण, पवित्र शक्‍तीकडून मिळालेल्या सामर्थ्याचा याहून महत्त्वाचा उद्देश होता. या शक्‍तीमुळे प्रेषित आणि इतर शिष्य सर्वकाळाचं जीवन देणारं अचूक ज्ञान लोकांना देऊ शकले.​—योहा. १७:३.

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूचे शिष्य “पवित्र शक्‍तीने  त्यांना सामर्थ्य दिलं त्याप्रमाणे . . . वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले.” त्यामुळे त्यांनी “देवाच्या अद्‌भुत गोष्टींबद्दल” साक्ष दिली. (प्रे. कार्यं २:१-४, ११) आज आपण चमत्काराने वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत नाही. पण, पवित्र शक्‍तीच्या मदतीने, विश्‍वासू दास अनेक भाषांमध्ये बायबल साहित्य तयार करत आहे. उदाहरणार्थ, दर महिन्याला अनेक भाषांमध्ये टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  या नियतकालिकांच्या लाखो प्रती छापल्या जातात. तसंच jw.org या आपल्या वेबसाईटवर १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबल आधारित साहित्य आणि व्हिडिओ आहेत. यामुळे आपण “देवाच्या अद्‌भुत गोष्टींबद्दल” सर्व राष्ट्रांच्या, वंशांच्या आणि भाषांच्या लोकांना सांगू शकतो.​—प्रकटी. ७:९.

१०. बायबलचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी १९८९ पासून कोणते प्रयत्न करण्यात आले आहेत?

१० विश्‍वासू दासाने १९८९ पासून, नवे जग भाषांतर  वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर खास लक्ष दिलं आहे. बायबलचं आतापर्यंत २०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं आहे. तसंच, त्याच्या लाखो प्रती छापण्यात आल्या आहेत. आणि आणखी अनेक भाषांमध्ये भाषांतराचं काम अजून चालू आहे. या सर्व गोष्टी फक्‍त देवामुळे आणि त्याच्या पवित्र शक्‍तीमुळेच शक्य झाल्या आहेत.

११. साक्षीदारांच्या साहित्याचं भाषांतर किती मोठ्या प्रमाणावर चाललं आहे?

११ आज १५० पेक्षा जास्त देशांमध्ये शेकडो ख्रिस्ती बांधव स्वेच्छेने भाषांतराचं कार्य करत आहेत. याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको, कारण पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाने यहोवा देवाबद्दल, त्याच्या मसीही राजाबद्दल आणि स्वर्गात स्थापन झालेल्या त्याच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याचं काम फक्‍त एकच संघटना करत आहे!​—प्रे. कार्यं २८:२३.

१२. पौल आणि इतर ख्रिश्‍चनांनी आपलं प्रचारकार्य कशाच्या मदतीने केलं?

१२ पिसिदियाच्या अंत्युखियामध्ये पौलने यहुदी आणि विदेशी लोकांना प्रचार केला. त्यांपैकी, ज्यांची “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” होती त्यांनी विश्‍वास स्वीकारला. (प्रे. कार्यं १३:४८) लूकने प्रेषितांची कार्यं पुस्तकाच्या शेवटी लिहिलं, की पौल “कोणत्याही अडथळ्याशिवाय . . . अगदी मोकळेपणाने” देवाच्या राज्याचा प्रचार करत होता. (प्रे. कार्यं २८:३१) हा प्रेषित कुठे प्रचार करत होता? त्या वेळच्या जगातल्या सर्वात शक्‍तिशाली साम्राज्याच्या राजधानीत, म्हणजे रोममध्ये! भाषणांद्वारे असो किंवा इतर मार्गांनी, येशूचे सुरुवातीचे शिष्य पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाने आणि मदतीनेच आपलं प्रचारकार्य करत राहिले.

छळ होत असतानाही प्रचार करत राहा!

१३. आपला छळ होत असताना आपण प्रार्थना करत राहणं का गरजेचं आहे?

१३ येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांचा छळ केला गेला, तेव्हा त्यांनी धैर्य मिळवण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली. याचा काय परिणाम झाला? ते पवित्र शक्‍तीने परिपूर्ण झाले आणि देवाचं वचन धैर्याने सांगायला त्यांना मदत मिळाली. (प्रे. कार्यं ४:१८-३१) छळ होत असताना प्रचार करत राहण्यासाठी बुद्धी आणि शक्‍ती मिळावी, म्हणून आपणही यहोवाला प्रार्थना करतो. (याको. १:२-८) यहोवाचा आशीर्वाद आणि पवित्र शक्‍तीची मदत असल्यामुळेच आपण आपलं प्रचारकार्य करत राहू शकतो. क्रूरपणे केलेला छळ असो किंवा तीव्र विरोध असो, कोणतीच गोष्ट आपलं साक्ष देण्याचं कार्य थांबवू शकत नाही. जेव्हा आपला छळ केला जातो, तेव्हा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी पवित्र शक्‍तीची मदत, तसंच बुद्धी आणि धैर्य मिळावं म्हणून आपण प्रार्थना करत राहिलं पाहिजे.​—लूक ११:१३.

१४, १५. (क) “स्तेफनच्या हत्येनंतर बांधवांचा छळ होऊ लागल्यामुळे” काय घडलं? (ख) आधुनिक काळात साइबीरिया इथल्या अनेक लोकांपर्यंत सत्य कसं पोहोचलं?

१४ शत्रूंच्या हातून मृत्यू येण्याच्या आधी स्तेफनने धैर्याने साक्ष दिली. (प्रे. कार्यं ६:५; ७:५४-६०) त्या वेळी मंडळीविरुद्ध “छळाची लाट उसळली.” तेव्हा प्रेषितांना सोडलं, तर इतर सर्व शिष्य यहूदीया आणि शोमरोनात विखुरले गेले. पण यामुळे प्रचारकार्य थांबलं नाही. “ख्रिस्ताबद्दल” शिकवण्यासाठी फिलिप्प शोमरोनात गेला आणि त्यामुळे तिथल्या अनेक लोकांनी देवाचं वचन स्वीकारलं. (प्रे. कार्यं ८:१-८, १४, १५, २५) अहवालात पुढे असंही म्हटलं आहे: “स्तेफनच्या हत्येनंतर बांधवांचा छळ होऊ लागल्यामुळे ज्यांची पांगापांग झाली, ते फेनिके, कुप्र आणि अंत्युखियापर्यंत गेले. पण त्यांनी फक्‍त यहुद्यांनाच वचनाबद्दल सांगितलं. मग त्यांच्यापैकी काही जण कुप्र आणि कुरेने इथून अंत्युखियाला आले आणि ते ग्रीक बोलणाऱ्‍या लोकांना प्रभू येशूबद्दलचा आनंदाचा संदेश सांगू लागले.” (प्रे. कार्यं ११:१९, २०) त्या काळात छळामुळे राज्याचा संदेश दूरपर्यंत पसरला.

१५ आधुनिक काळातही, पूर्वीच्या सोव्हिएत संघात असंच घडलं. खासकरून १९५० च्या दशकात हजारो यहोवाच्या साक्षीदारांना साइबीरियामध्ये तडीपार करण्यात आलं. तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेल्यामुळे, त्या मोठ्या प्रदेशात आनंदाच्या संदेशाचा सतत प्रसार होत गेला. यहोवाच्या साक्षीदारांना स्वतःचे पैसे खर्च करून १०,००० किलोमीटर दूर प्रचार करण्यासाठी कधीच जाता आलं नसतं! पण, सरकारने स्वतःहून त्यांना इतक्या दूर पाठवलं होतं. याविषयी एक बांधव म्हणाला: “साइबीरिया इथल्या हजारो नम्र मनाच्या लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी जणू या अधिकाऱ्‍यांनीच मदत केली.”

यहोवाकडून भरभरून आशीर्वाद!

१६, १७. साक्षकार्यावर यहोवाचा आशीर्वाद होता याचे कोणते पुरावे आपल्याला प्रेषितांची कार्यं पुस्तकात पाहायला मिळतात?

१६ पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांवर यहोवाचा आशीर्वाद होता यात काहीच शंका नाही. पौल आणि इतरांनी राज्याच्या संदेशाचं बी पेरलं, “पण देव [ते] वाढवत राहिला.” (१ करिंथ. ३:५, ६) या साक्षकार्यावर यहोवाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे ते वाढत गेलं, याचे अनेक पुरावे आपल्याला प्रेषितांची कार्यं पुस्तकात पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, अहवालात म्हटलं आहे, की “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. तसंच, याजकांपैकीही बऱ्‍याच जणांनी विश्‍वास स्वीकारला.” (प्रे. कार्यं ६:७) राज्याचं कार्य जसं वाढत गेलं, तसं “संपूर्ण यहूदीया, गालील आणि शोमरोन इथल्या मंडळीत शांतीचा काळ आला आणि मंडळीची उन्‍नती झाली. बांधव यहोवाचं [आदराने] भय मानत होते. त्यांना पवित्र शक्‍तीद्वारे सांत्वन मिळालं आणि त्यांची संख्या वाढत गेली.”​—प्रे. कार्यं ९:३१.

१७ धैर्याने दिलेल्या साक्षीमुळे, सीरियाच्या अंत्युखियामध्ये यहुदी आणि ग्रीक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना सत्याचा संदेश ऐकायला मिळाला. अहवालात असंही म्हटलं आहे, की “यहोवाचा हात त्यांच्यावर होता आणि बरेच जण विश्‍वास स्वीकारून प्रभूकडे वळले.” (प्रे. कार्यं ११:२१) त्या शहरात झालेल्या सत्याच्या वाढीबद्दल पुढे म्हटलं आहे: “यहोवाचं वचन झपाट्याने पसरत गेलं आणि बऱ्‍याच लोकांनी विश्‍वास ठेवला.” (प्रे. कार्यं १२:२४) तसंच, पौल आणि इतर बांधव विदेश्‍यांना पूर्णपणे साक्ष देत राहिल्यामुळे, “यहोवाच्या शक्‍तीमुळे त्याचं वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला.”​—प्रे. कार्यं १९:२०.

१८, १९. (क) “यहोवाचा हात” आज आपल्यासोबतही आहे असं आपण का म्हणू शकतो? (ख) यहोवा आपल्या लोकांची मदत करतो याविषयी एक अनुभव सांगा.

१८ “यहोवाचा हात” आज आपल्यासोबतही आहे यात काहीच शंका नाही. त्यामुळेच आज अनेक लोक विश्‍वास स्वीकारत आहेत आणि यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेत आहेत. तसंच, पौल आणि सुरुवातीच्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे आपणही यहोवाच्या मदतीने आणि आशीर्वादामुळेच विरोधाचा आणि तीव्र छळाचा सामना करू शकतो; आणि आपलं सेवाकार्य यशस्वीपणे करत राहू शकतो. (प्रे. कार्यं १४:१९-२१) यहोवा देव नेहमी आपल्या पाठीशी राहील. आपल्यावर कोणत्याही परीक्षा आल्या, तरी त्याच्या ‘सर्वकाळाच्या बाहूंचा’ आपल्याला नेहमी आधार असेल. (अनु. ३३:२७) यहोवाच्या महान नावामुळे, तो कधीच आपल्या लोकांना सोडणार नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.​—१ शमु. १२:२२; स्तो. ९४:१४.

१९ एका उदाहरणावर विचार करा: बंधू हारॉल्ट ऑप्ट यांना त्यांच्या प्रचारकार्यामुळे, दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात नात्झी लोकांनी साक्सनहाउसन छळ छावणीत पाठवलं. मे १९४२ मध्ये पोलिसांनी त्यांच्या लहान मुलीला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांची पत्नी एल्सा हिला अटक केली. त्यांनी त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या छळ छावण्यांमध्ये पाठवलं. सिस्टर ऑप्ट म्हणतात, “जर्मन छळ छावण्यांमध्ये मला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. तो म्हणजे जेव्हा तुमच्यावर कठीण परीक्षा येतात तेव्हा यहोवाची पवित्र शक्‍ती तुम्हाला खूप बळ देते! अटक होण्याआधी मी एका बहिणीचं पत्र वाचलं. तिने लिहिलं होतं, की कठीण परीक्षेत यहोवाची पवित्र शक्‍ती तुम्हाला शांती देते. मला वाटलं की ती थोडं वाढवून सांगत असेल. पण मी स्वतः परीक्षांचा सामना केला तेव्हा मला कळलं की तिचं म्हणणं खरं आहे. कारण हे असंच घडतं. आपल्याला या गोष्टीचा अनुभव नसेल तर आपण त्याची कल्पना करू शकणार नाही. पण माझ्यासोबत खरंच असं घडलं.”

अगदी पूर्णपणे साक्ष देत राहा!

२०. घरात कैद असताना पौलने काय केलं, आणि आपल्या काही भाऊबहिणींना यातून कोणतं प्रोत्साहन मिळू शकतं?

२० पौल “देवाच्या राज्याचा प्रचार करायचा” असं प्रेषितांची कार्यं पुस्तकाच्या शेवटी म्हटलं आहे. (प्रे. कार्यं २८:३१) पौलला घरात कैद करून ठेवल्यामुळे तो रोममध्ये घरोघरचं प्रचारकार्य करू शकत नव्हता. पण, तरीही जे त्याच्याकडे येत होते त्या सर्वांना तो साक्ष देत राहिला. आज आपले काही भाऊ आणि बहिणी वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे असेच घरात किंवा काही देशांमध्ये नर्सिंग होम्समध्ये आहेत. तरी, आजही त्यांचं देवावर प्रेम आहे, आणि त्यांना प्रचार करण्याची खूप इच्छा आहे. आपण अशा भाऊबहिणींबद्दल यहोवाला प्रार्थना करू शकतो. तसंच, स्वर्गातल्या आपल्या पित्याबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल शोध घेत असणाऱ्‍या लोकांची या भाऊबहिणींशी भेट व्हावी अशी आपण त्याला विनंती करू शकतो.

२१. आज आपण काळाची गरज ओळखून प्रचारकार्य का केलं पाहिजे?

२१ आपल्यापैकी बहुतेक जण घरोघरचं तसंच इतर सेवाकार्य करू शकतात. तेव्हा, राज्याचे प्रचारक या नात्याने “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष देण्याच्या कामात सहभाग घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू या. काळाची गरज ओळखून आपण हे काम केलं पाहिजे, कारण ख्रिस्ताच्या उपस्थितीचं “चिन्ह” स्पष्टपणे दिसत आहे. (मत्त. २४:३-१४) त्यामुळे आपण आपल्या वेळेचा चांगला वापर केला पाहिजे. “प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” राहण्याची आजच वेळ आहे.​—१ करिंथ. १५:५८.

२२. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण काय करत राहण्याचा निश्‍चय केला पाहिजे?

२२ यहोवाचा “महान आणि भयानक दिवस” येण्याची वाट पाहत असताना, आपण विश्‍वासूपणे आणि धैर्याने साक्ष देत राहण्याचा निश्‍चय करू या. (योए. २:३१) बिरुयाच्या लोकांसारखे अनेक लोक आपल्याला आजही भेटतील. “त्यांनी फार उत्सुकतेने देवाचं वचन स्वीकारलं” होतं. (प्रे. कार्यं १७:१०, ११) तेव्हा, “शाब्बास, चांगल्या आणि विश्‍वासू दासा!” असे शब्द लाक्षणिक अर्थाने ऐकू येईपर्यंत, आपण साक्ष देण्याचं कार्य आवेशाने आणि विश्‍वासूपणे करत राहू या. (मत्त. २५:२३) आपण असं केलं, तर देवाच्या राज्याविषयी “पूर्णपणे साक्ष” देण्यात सहभागी होण्याचा आशीर्वाद आपल्यालाही मिळाला, याचं आपल्याला सर्वकाळ समाधान असेल!