येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते?
येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते?
जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी, सा.यु. ३३ साली यहुदी वल्हांडण सणाच्या दिवशी, एक निरपराध मनुष्य दुसऱ्यांना जीवन देण्याकरता मृत्यू पावला. तो मनुष्य कोण होता? तो नासरेथचा येशू होता. आणि त्याच्या या थोर कृत्यामुळे कोणाला फायदा होणार होता? सबंध मानवजातीला. त्याच्या या जीवनदायक बलिदानाचा सारांश बायबलच्या या सुपरिचित वचनातून मिळतो: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
हे वचन बऱ्याच जणांनी ऐकलेले असले तरी फार कमी लोकांना त्याचा खरा अर्थ समजतो. त्यांना वाटते: ‘ख्रिस्ताच्या बलिदानाची आपल्याला काय गरज आहे? आणि एका मनुष्याने आपले जीवन दिल्यामुळे सबंध मानवजातीची मृत्यूपासून सुटका होणे कसे शक्य आहे?’ बायबलमध्ये या प्रश्नांची स्पष्ट व पटण्याजोगी उत्तरे दिली आहेत.
मानवजातीत मरण कसे पसरले?
काही जणांचे असे मत आहे की मानवांना या पृथ्वीवर फक्त काही काळ राहण्याकरता निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या मते, जीवनातील सर्वसामान्य सुखदुःखे अनुभवल्यानंतर मृत्यू होऊन मानवांनी यापेक्षा चांगल्या ठिकाणी जावे असा देवाचा उद्देश होता. या धारणेनुसार, मनुष्याचा मृत्यू व्हावा हे देवानेच ठरवले आहे. पण मानवजातीत मरण पसरण्यामागे एक वेगळेच कारण असल्याचे बायबल सांगते. ते म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) या वचनातून स्पष्ट होते की मानव पापामुळे मरतात. पण ज्या “एका माणसाच्या” पापाद्वारे मानवजातीत मरण पसरले तो कोण आहे?
द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात सांगितल्यानुसार, सर्व मानवांचा एकच पूर्वज आहे असे बहुतेक शास्त्रज्ञ मानतात. आणि त्या पूर्वजाबद्दल, अर्थात त्या ‘एका माणसाबद्दल’ बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. उत्पत्ति १:२७ असे म्हणते: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” हे पहिले मानवी जोडपे सर्वसमर्थ देवाच्या निर्मितीकृत्यांपैकी सर्वोत्कृष्ट होते असे बायबल सांगते.
यहोवा देवाने पहिल्या मनुष्याला निर्माण केल्यानंतर काय काय घडले याविषयी उत्पत्तीच्या अहवालात सांगितले आहे. पण लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी की त्या संपूर्ण अहवालात देवाने मृत्यूचा कोठेही उल्लेख केला नाही. फक्त देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यास त्याचा परिणाम मृत्यू असेल असे देवाने पहिल्या मानवाला सांगितले. (उत्पत्ति २:१६, १७) मानवांनी पृथ्वीवरील सुंदर नंदनवनात, सर्वकाळ आनंदी व निरोगी राहावे अशी देवाची इच्छा होती. त्यांनी म्हातारे होऊन शेवटी मरून जावे असा त्याचा उद्देश नव्हता. तर मग, सबंध मानवजात मृत्यूच्या विळख्यात कशी आली?
उत्पत्तीच्या ३ ऱ्या अध्यायातील अहवालातून आपल्याला समजते की पहिल्या मानवी जोडप्याने त्यांना जीवन देणाऱ्या यहोवा देवाच्या आज्ञेचे जाणूनबुजून उल्लंघन केले. तेव्हा, देवाने आधीच सांगितल्याप्रमाणे, त्यांना मृत्यूदंड सुनावला. त्याने मनुष्याला म्हटले: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) देवाचे हे शब्द खरे ठरले. कालांतराने, देवाची आज्ञा भंग करणाऱ्या त्या दोघांचाही मृत्यू झाला.
पण या आज्ञाभंगाचे दुष्परिणाम केवळ त्या पहिल्या मानवी जोडप्यालाच भोगावे लागले नाहीत. तर त्यांची संततीही परिपूर्ण जीवन उपभोगण्याच्या संधीपासून वंचित झाली. यहोवा देवाने आदाम व हव्वेला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा” असे सांगितले. त्याच्या या उद्देशात अद्याप न जन्मलेल्या मानवाच्या संततीचाही त्याने समावेश केला. (उत्पत्ति १:२८) हळूहळू, मानवांनी सबंध पृथ्वी व्यापून टाकावी आणि या पृथ्वीवर सर्वकाळ आनंदाने राहावे असा यहोवाचा उद्देश होता. पण त्यांचा पूर्वज आदाम याने, अर्थात त्या ‘एका माणसाने’ सर्व मानवांना पापाचे आणि त्याअर्थी मृत्यूचेही गुलाम बनण्याकरता विकून टाकले. पहिल्या मानवाचाच एक वंशज, प्रेषित पौल याने लिहिले: “मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे.”—रोमकर ७:१४.
विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांनी अलीकडच्या काळात ज्याप्रमाणे महान व अनमोल कलाकृतींची नासधूस केली आहे त्याचप्रमाणे पाप करून आदामाने, मानवजातीच्या रूपातील देवाच्या अद्भुत कलाकृतीची नासधूस केली. कालांतराने आदामाच्या मुलांना मुले झाली, नंतर नातवंडे आणि अशारितीने एकेक नवीन पिढी येत राहिली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. त्या सर्वांचा मृत्यू का झाला? कारण ते सर्व जण आदामाचे वंशज होते. बायबल म्हणते: “एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली.” (रोमकर ५:१५) आजारपण, म्हातारपण, वाईट गोष्टी करण्याची ओढ आणि मृत्यू हे सर्व आदामाने आपल्या स्वतःच्याच कुटुंबाचा विश्वासघात केल्याचे दुःखदायक परिणाम आहेत. त्या कुटुंबात आपल्या सर्वांचाही समावेश आहे.
रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने, स्वतःप्रमाणेच सर्व अपरिपूर्ण मानवांच्या दयनीय अवस्थेचे आणि पापाच्या परिणांमाविरुद्ध त्यांच्या संघर्षाचे वर्णन केले. तो म्हणाला: “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” पौलाने एक चांगला प्रश्न उपस्थित केला, नाही का? खरोखरच, पौलाला आणि पाप व मृत्यूच्या गुलामीतून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांनाच कोण सोडवू शकत होता? पौलाने स्वतःच या प्रश्नाचे उत्तर दिले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:१४-२५) होय, आपल्या निर्माणकर्त्याने त्याच्या पुत्राच्या, म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने आपल्याला पाप व मृत्यूच्या दास्यातून सोडवण्याची तरतूद केली आहे.
देवाने केलेल्या तरतुदीत येशूची भूमिका
मानवजातीला पापाच्या जीवघेण्या दास्यातून मुक्ती देण्यात आपली काय भूमिका आहे याविषयी येशूने वर्णन केले होते. त्याने म्हटले: ‘मनुष्याचा पुत्र अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.’ (मत्तय २०:२८, ईझी टू रीड व्हर्शन) येशूच्या जीवनाचे बलिदान खंडणी कशी ठरली? त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
बायबल येशूचे वर्णन करताना तो “निष्पाप” व “पापी जनांपासून वेगळा” होता असे म्हणते. त्याच्या सबंध जीवनात तो देवाच्या नियमांना पूर्णपणे आज्ञाधारक राहिला. (इब्री लोकांस ४:१५; ७:२६) त्याअर्थी, येशूचा मृत्यू हा आदामाच्या मृत्यूप्रमाणे पाप व आज्ञाभंगाचा परिणाम नव्हता. (यहेज्केल १८:४) येशूने खरे तर मरणदंड भोगण्यासारखे काहीही केले नव्हते. तरीपण, मानवजातीला पाप व मृत्यूच्या विळख्यातून मुक्त करण्याची आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःहून मरण पत्करले. याआधी सांगितल्याप्रमाणे, येशू “आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी” स्वेच्छेने पृथ्वीवर आला होता. कोणत्याही मनुष्याने आजपर्यंत दाखवले नव्हते, अशा अद्भुत प्रेमाने प्रेरित होऊन येशूने मानवजातीतील ‘प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घेतला.’—इब्री लोकांस २:९.
येशूने बलिदान केलेले जीवन आदामाने पाप करून गमावलेल्या जीवनाच्या समतुल्य होते. येशूच्या मृत्यूमुळे काय परिणाम झाला? यहोवाने “सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून” त्याचे बलिदान स्वीकारले. (१ तीमथ्य २:६) याचा अर्थ, येशूच्या जीवनाचे मोल देवाने मानवजातीला पापाच्या व मृत्यूच्या गुलामीतून पुन्हा विकत घेण्यासाठी वापरले.
मानवजातीच्या निर्माणकर्त्याच्या या महान प्रेमळ कृत्याविषयी बायबलमध्ये बरेचदा उल्लेख केला आहे. पौलाने ख्रिस्ती बांधवांना, “तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा” असे म्हणून त्याची आठवण करून दिली. (१ करिंथकर ६:२०; ७:२३) पेत्रानेही ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले की देवाने सोन्यारुप्याने नव्हे तर आपल्या पुत्राच्या रक्ताने त्यांना, मरणाकडे नेणाऱ्या निरर्थक जीवनातून मुक्त केले. (१ पेत्र १:१८, १९) ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानायोगे यहोवाने मानवांना अटळ मृत्यू व सार्वकालिक नाशापासून सोडवले.
ख्रिस्ताच्या खंडणीपासून तुम्हालाही फायदा होऊ शकतो का?
ख्रिस्ताच्या खंडणीमुळे कोणाकोणाला फायदा होऊ शकतो याविषयी प्रेषित योहानाने असे लिहिले: “[येशू ख्रिस्त] आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:२) होय, ख्रिस्ताने पुरवलेली खंडणी ही सबंध मानवजातीकरता आहे. पण, सर्वांना या अमूल्य तरतुदीपासून आपोआपच फायदा होईल असा याचा अर्थ होतो का? नाही. एखाद्या दुर्घटनेमुळे खाणीत अडकून पडलेल्या कामगारांची कल्पना करा. या कामगारांना सोडवायला आलेले बचाव पथक त्यांना बाहेर काढण्यासाठी एक पिंजरा खाली सोडते. पण बाहेर पडण्यासाठी प्रत्येक कामगाराला त्या पिंजऱ्यात चढावे लागेल. त्याच प्रकारे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानापासून फायदा मिळवू इच्छिणाऱ्यांनी फक्त देवाच्या आशीर्वादाची वाट पाहून चालणार नाही. त्यांना आपल्या बाजूनेही काही पावले उचलावी लागतील.
खंडणीपासून फायदा मिळवण्याकरता देव आपल्याकडून कोणती पावले उचलण्याची अपेक्षा करतो? योहान ३:३६ असे सांगते: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” आपण ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवावा अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. पण इतकेच पुरेसे नाही. “आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो.” (१ योहान २:३) त्याअर्थी, पाप व मृत्यूपासून सुटका मिळवण्याकरता दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एकतर, आपण ख्रिस्ताच्या खंडणीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.
येशूच्या खंडणीवर आपण विश्वास ठेवतो हे दाखवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याच्या मृत्यूचे स्मरण करून त्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करणे. मृत्यू होण्याआधी येशूने आपल्या विश्वासू प्रेषितांसोबत एका अर्थसूचक भोजनविधीची स्थापना केली. त्या प्रसंगी त्याने त्यांना असे सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या पुत्रासोबत असलेली त्यांची मैत्री अतिशय मोलाची वाटते आणि ते या आज्ञेचे पालन करतात. या वर्षी, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी शनिवार, २२ मार्चला सूर्यास्तानंतर पाळला जाईल. येशूच्या आज्ञेचे पालन करून तुम्हीही या खास सभेला उपस्थित राहावे असे आम्ही तुम्हाला हार्दिक आमंत्रण देऊ इच्छितो. तुमच्या क्षेत्रातील यहोवाचे साक्षीदार या सभेची वेळ व ठिकाण तुम्हाला सांगू शकतील. ख्रिस्ताच्या खंडणीद्वारे आदामाच्या पापाच्या घातक परिणामांपासून मुक्त होण्याकरता तुम्ही आणखी काय केले पाहिजे याविषयी स्मारकविधीच्या या सभेत अधिक माहिती दिली जाईल.
आपल्याला सर्वनाशापासून बचावण्याकरता आपल्या निर्माणकर्त्याने व त्याच्या पुत्राने दिलेल्या या महान बलिदानाविषयी आज फार कमी लोकांना पूर्ण समज आहे; आणि फार कमी लोक त्याविषयी कृतज्ञता बाळगतात. पण जे या बलिदानावर विश्वास ठेवतात ते एक विशेष प्रकारचा आनंद अनुभवतात. प्रेषित पेत्राने आपल्या ख्रिस्ती बांधवांविषयी असे लिहिले: “तुम्ही . . . [येशूवर] विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.” (१ पेत्र १:८, ९) आपल्या मनात येशू ख्रिस्ताविषयी प्रेम उत्पन्न केल्याने आणि त्याच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवल्याने आज तुम्हीही आपल्या जीवनात हा आनंद उपभोगू शकता. तसेच, भविष्यात पाप व मृत्यूपासून मुक्ती मिळण्याचीही तुम्ही आशा बाळगू शकता. (w०८ ३/१)