“यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा”
“आपल्या कामात आळस करू नका. . . . यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा.”—रोम. १२:११, NW.
१. बरेच लोक दासत्वाबद्दल काय विचार करतात, आणि रोमकर १२:११ मध्ये सांगितलेले दासत्व कशा प्रकारे वेगळे आहे?
दास म्हणजे अशी व्यक्ती जिच्यावर तिचा मालक क्रूरपणे अधिकार चालवतो, तिच्यावर जुलूम करतो आणि तिला अन्यायी वागणूक देतो, असा विचार बऱ्याच लोकांच्या मनात येतो. पण, देवाचे दास असणे ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. देवाच्या प्रेरित वचनात सांगितले आहे की एक ख्रिस्ती व्यक्ती एका प्रेमळ मालकाचा दास म्हणून सेवा करण्याची निवड करू शकते. खरेतर, प्रेषित पौलाने जेव्हा ख्रिश्चनांना “यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा” असे प्रोत्साहन दिले, तेव्हा तो त्यांना सांगत होता की त्यांनी देवावरील प्रेमामुळे त्याची सेवा करावी. (रोम. १२:११) तर मग, देवाचे दास म्हणून सेवा करण्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? आपण सैतानाचे आणि त्याच्या जगाचे गुलाम बनण्याचे कसे टाळू शकतो? आणि आपण यहोवाचे दास म्हणून विश्वासूपणे सेवा करतो तेव्हा आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
“माझ्या धन्यावर . . . मी प्रेम करतो”
२. (क) दासत्वातून मुक्त होण्याची संधी असूनही एखादा इस्राएली दास तसे करण्यास नकार का द्यायचा? (ख) एखाद्या दासाने कान टोचून घेतल्यास त्यावरून काय दिसून यायचे?
२ यहोवा आपल्याकडून कशा प्रकारच्या दासत्वाची अपेक्षा करतो हे आपल्याला त्याने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रातून शिकायला मिळते. नियमशास्त्रानुसार, इब्री दासांना त्यांच्या सेवेच्या सातव्या वर्षी मुक्त केले जायचे. (निर्ग. २१:२) पण, एखाद्या दासाचे त्याच्या मालकावर प्रेम असेल आणि तो पुढेही त्याची सेवा करत राहू इच्छित असेल, तर याविषयी यहोवाने नियमशास्त्रात एक खास तरतूद केली होती. मालकाने आपल्या दासाला दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ आणून एका तीक्ष्ण अवजाराने त्याचा कान टोचायचा होता. (निर्ग. २१:५, ६) असे का केले जायचे? इब्री भाषेत, आज्ञापालनाचा संबंध ऐकण्याशी आहे. त्याअर्थी, कान टोचून घेणारा दास पुढेही आपल्या मालकाची आज्ञाधारकपणे सेवा करण्यास इच्छुक आहे हे दिसून यायचे. हे आपण यहोवाला केलेल्या समर्पणासारखेच आहे. आपण जेव्हा समर्पण करतो, तेव्हा आपण असे म्हणत असतो, की यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण स्वच्छेने त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास तयार आहोत.
३. कोणत्या गोष्टीमुळे प्रेरित होऊन आपण देवाला समर्पण करतो?
३ ख्रिस्ती म्हणून बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण स्वतःला सादर केले त्याआधीच आपण यहोवाचे दास या नात्याने त्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास उत्सुक असल्यामुळे आपण त्याला आपले जीवन समर्पित केले. असे करण्यासाठी कोणीही आपल्याला जोरजबरदस्ती केली नव्हती. लहान मुलेदेखील केवळ पालकांना खूश करण्याच्या इच्छेने नव्हे, तर यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याच्या इच्छेने समर्पण करून बाप्तिस्मा घेतात. स्वर्गातील आपल्या मालकावरील, म्हणजेच यहोवावरील प्रेमामुळे आपण आपले जीवन त्याला समर्पित करतो. प्रेषित योहानाने असे लिहिले: “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.”—१ योहा. ५:३.
स्वतंत्र, तरीही दास
४. “नीतिमत्त्वाचे गुलाम” बनण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
४ यहोवाने आपल्याला त्याचे दास या नात्याने सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आपण किती आभारी आहोत! ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आपला विश्वास असल्यामुळे, आपल्याला पापाच्या गुलामीतून मुक्त होणे शक्य झाले आहे. याचा अर्थ, आपण अद्यापही अपरिपूर्ण असलो, तरी आपण स्वच्छेने यहोवाची आणि येशूची सेवा करण्याची निवड करू शकतो. याविषयी पौलाने त्याच्या एका पत्रात अगदी स्पष्टपणे सांगितले: “तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.” नंतर त्याने ही ताकीद दिली: “ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो.” (रोम. ६:११, १६-१८) पौलाने येथे “मनापासून” आज्ञापालन करण्याविषयी उल्लेख केला याकडे लक्ष द्या. खरोखर, आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करतो, तेव्हा आपण “नीतिमत्त्वाचे गुलाम” बनतो.
५. आपल्याला कोणता संघर्ष करावा लागतो, आणि का?
५ असे असूनही, यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्यासाठी आपल्याला काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. आपल्याला दोन गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. त्यांपैकी एक आहे आपली अपरिपूर्णता. पौलालाही हा संघर्ष करावा लागला होता. त्याने लिहिले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.” (रोम. ७:२२, २३) अपरिपूर्ण असल्यामुळे, आपल्यालाही शारीरिक इच्छांविरुद्ध सतत संघर्ष करण्याची गरज आहे. प्रेषित पेत्र आपल्याला असा सल्ला देतो: “दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.”—१ पेत्र २:१६.
६, ७. सैतान कशा प्रकारे या जगातील गोष्टींना आकर्षक बनवतो?
६ दुरात्म्यांच्या प्रभावाखाली असलेल्या या जगाविरुद्धदेखील आपल्याला संघर्ष करावा लागतो. हा आपला दुसरा संघर्ष आहे. यहोवाप्रती व येशूप्रती असलेली आपली एकनिष्ठा भंग करण्यासाठी या जगाचा शासक सैतान आपल्यावर हल्ला करतो. तो आपल्याला त्याच्या भ्रष्ट प्रभावाला बळी पाडून त्याचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतो. (इफिसकर ६:११, १२ वाचा.) यासाठी, हे जग आपल्याला आकर्षक, मोहक वाटावे असा प्रयत्न सैतान करतो. याविषयी प्रेषित योहानाने अशी ताकीद दिली: “जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.”—१ योहा. २:१५, १६.
७ आज लोकांना जास्तीत जास्त सुखचैनीच्या गोष्टी हव्या आहेत. ही गोष्ट सबंध जगभरात पाहायला मिळते. सैतान लोकांना असा विश्वास करायला लावत आहे, की आपल्याजवळ पैसा असला, तर आपण आनंदी असतो. त्यामुळे आज सगळीकडे मोठमोठी दुकाने, मॉल दिसतात. जाहिरातींतून लोकांना असे प्रोत्साहन दिले जाते, की जास्तीत जास्त वस्तू जमा करणे आणि मौजमजा करणे याच जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, ट्रॅव्हल कंपन्या जगातील सुंदर-सुंदर ठिकाणे पाहायला जाण्यासाठी सहलींचे आयोजन करतात. अशा सहलींवर सहसा सांसारिक मनोवृत्तीच्या लोकांसोबत जावे लागते. अशा रीतीने, या जगातील लोक आपल्याला आपली जीवनशैली बदलण्याचे उत्तेजन देत असतात, आणि तेही या जगाच्या स्तरांनुसार.
८, ९. आपल्यासमोर कोणता धोका आहे, आणि का?
८ पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतील काही जणांनी या जगाचा दृष्टिकोन आत्मसात केला होता. त्यांच्याविषयी बोलताना पेत्राने ही ताकीद दिली: “दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते. भ्रमांत असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात. ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.”—२ पेत्र २:१३, १८, १९.
९ आपण जर आपल्या “डोळ्यांची वासना” पूर्ण करण्याचा, म्हणजेच आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. उलट, आपण या जगाचा अदृश्य मालक, दियाबल सैतान याचे गुलाम बनू. (१ योहा. ५:१९) पैशाचे व सुखचैनीच्या वस्तूंचे गुलाम बनणे फारच धोकादायक आहे, कारण या गुलामगिरीतून बाहेर पडणे खूप कठीण असते.
समाधान देणारे करियर
१०, ११. आज सैतान खासकरून कोणाला आपले लक्ष्य बनवतो, आणि शाळा-कॉलेजांतील कोर्सेसमुळे कशा प्रकारे त्यांच्यासमोर समस्या निर्माण होऊ शकते?
१० सैतानाने एदेन बागेत केले त्याप्रमाणेच तो आजही सहसा अनुभव नसलेल्यांवर हल्ला करतो. तो खासकरून तरुणांना आपले लक्ष्य बनवतो. एखादी तरुण व्यक्ती, किंवा कोणीही, जेव्हा यहोवाचे दास बनून त्याची सेवा करण्यासाठी पुढे येतो तेव्हा सैतानाला मुळीच आनंद होत नाही. देवाच्या या शत्रूची हीच इच्छा आहे, की यहोवाला समर्पण केलेले सर्वच जण त्याला एकनिष्ठ राहू नयेत आणि त्यांच्या समर्पणानुसार जगण्यात ते अपयशी व्हावेत.
११ आपण पुन्हा एकदा त्या दासाचा विचार करू या ज्याने स्वच्छेने आपला कान टोचून घेतला होता. कान टोचल्यामुळे त्याला थोड्या वेळासाठी वेदना झाल्या असतील; पण त्या वेदना लवकरच नाहीशा झाल्या, आणि त्याच्या कानावर दासत्वाची कायमची खूण पडली. त्याचप्रमाणे, एखाद्या तरुणाला त्याच्या मित्र-सोबत्यांपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणे कठीण वाटू शकते; इतकेच काय तर त्याला वेदनादायकही वाटू शकते. या जगात करियर घडवल्याने आपण समाधानी होऊ शकतो हा विचार सैतान वाढीस लावतो. पण, आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे याचा ख्रिश्चनांनी विचार केला पाहिजे. येशूने असे शिकवले: “ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे ते आनंदी आहेत.” (मत्त. ५:३, NW) ख्रिश्चनांनी सैतानाच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. यहोवाच्या नियमांचे पालन करण्यात त्यांना आनंद वाटतो, आणि ते त्याच्या नियमांवर रात्रंदिवस मनन करतात. (स्तोत्र १:१-३ वाचा.) पण, आजच्या काळात शाळा-कॉलेजांमध्ये जे कोर्सेस शिकवले जातात त्यांमुळे यहोवाच्या सेवकांजवळ मनन करण्यासाठी आणि त्यांची आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी वेळच उरत नाही.
१२. आज अनेक तरुण कोणती निवड करू शकतात?
१२ जगिक मालकाच्या अधीन असलेल्या गुलामाला ख्रिस्ती या नात्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अतिशय कठीण जायचे. पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात असा प्रश्न विचारला: “तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय?” नंतर, त्याने असा सल्ला दिला: “त्याची चिंता करू नको; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो.” (१ करिंथ. ७:२१) साहजिकच, मालक जुलुमी असल्यास अशा मालकाच्या गुलामीतून मुक्त होणेच सर्वात उत्तम होते. आज, अनेक देशांत, मुलांनी विशिष्ट वयापर्यंत शिक्षण घेणे कायद्याने आवश्यक आहे. त्यानंतर पुढचे शिक्षण घ्यायचे की नाही याची निवड विद्यार्थी करू शकतात. पण, या जगात करियर करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचे ठरवल्यास, पूर्णवेळ यहोवाची सेवा करण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकते.—१ करिंथकर ७:२३ वाचा.
उच्च शिक्षण की सर्वश्रेष्ठ शिक्षण?
१३. यहोवाच्या सेवकांना कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे सर्वात जास्त फायदा होईल?
१३ पौलाने कलस्सैमधील ख्रिश्चनांना असा इशारा दिला: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सै. २:८) आज अनेक विद्वान “माणसांच्या संप्रदायाप्रमाणे . . . असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा” शिकवतात. उच्च शिक्षणात सहसा याच गोष्टींचा समावेश होतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना नेहमीच व्यावहारिक कौशल्ये शिकवली जातात असे नाही. त्यामुळे विद्यार्थी दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यास सज्ज नसतात. याउलट, यहोवाचे सेवक अशा शिक्षणाची निवड करतात ज्यामुळे त्यांना आवश्यक कौशल्ये शिकण्यास आणि आपले जीवन साधे ठेवून देवाची सेवा करत राहण्यास मदत मिळते. ते पौलाने तीमथ्याला दिलेल्या सल्ल्याचे पालन करतात: “चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीम. ६:६, ८) म्हणूनच, खरे ख्रिस्ती विद्यापीठांतील मोठमोठ्या पदव्या मिळवण्याऐवजी “शिफारसपत्रे” प्राप्त करण्यावर, म्हणजेच इतरांना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात. क्षेत्र सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याद्वारे ते असे करतात.—२ करिंथकर ३:१-३ वाचा.
१४. फिलिप्पैकर ३:८ नुसार, पौलाने देवाचा आणि ख्रिस्ताचा दास बनून सेवा करण्याच्या सुहक्काकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
१४ प्रेषित पौलाचाच विचार करा. त्याला यहुदी नियमशास्त्राचा शिक्षक गमलिएल याच्याकडून शिक्षण मिळाले होते. पौलाला मिळालेल्या शिक्षणाची तुलना आजच्या काळातील विद्यापीठाच्या शिक्षणाशी केली जाऊ शकते. पण, देवाचा आणि ख्रिस्ताचा दास बनून सेवा करण्याच्या सुहक्काच्या तुलनेत पौलाने या शिक्षणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? त्याने लिहिले: “ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो.” त्याने पुढे असे म्हटले: “त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै. ३:८) ख्रिस्ती तरुणांनी आणि पालकांनी पौलासारखा दृष्टिकोन बाळगल्यास, शिक्षणाच्या बाबतीत सुज्ञपणे निर्णय घेण्यास त्यांना मदत मिळेल. (चित्रे पाहा.)
सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा फायदा घ्या
१५, १६. यहोवाची संघटना कोणते शिक्षण देते, आणि त्या शिक्षणाचा उद्देश काय आहे?
१५ उच्च शिक्षण देणाऱ्या बहुतेक संस्थांमधील वातावरण कसे असते? अशा ठिकाणी सहसा राजकारणाला आणि बंडखोर प्रवृत्तीला उत्तेजन दिले जाते. (इफिस. २:२) याउलट, यहोवाची संघटना ख्रिस्ती मंडळीच्या शांतिपूर्ण वातावरणात सर्वश्रेष्ठ शिक्षण पुरवते. दर आठवडी होणाऱ्या ईश्वरशासित सेवा प्रशालेचा फायदा घेण्याची सुसंधी आपल्या सर्वांनाच लाभली आहे. शिवाय, इतरही प्रशाला आहेत ज्यांचा आपण फायदा घेऊ शकतो. उदाहरणार्थ, अविवाहित असलेल्या पायनियर बंधूंकरता एक प्रशाला आहे जिला ‘अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला’ म्हटले जाते. तसेच, विवाहित पायनियरांकरता एक प्रशाला आहे जिला ‘ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला’ असे म्हटले जाते. देवाकडून मिळणाऱ्या अशा शिक्षणामुळे स्वर्गातील आपला मालक यहोवा याच्या आज्ञांचे पालन करण्यास आपल्याला मदत होते.
१६ आपण वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स (इंग्रजी) किंवा सीडी-रॉमवर असलेली वॉचटावर लायब्ररी (हिंदी) यांतूनही समृद्ध आध्यात्मिक खजिना शोधू शकतो. अशा प्रकारच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे यहोवाची उपासना करणे. या शिक्षणामुळे, आपण इतरांना देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करू शकतो. (२ करिंथ. ५:२०) परिणामस्वरूप, तेदेखील इतरांना शिकवण्यास सज्ज होतील.—२ तीम. २:२.
यहोवाच्या दासाला मिळणारे आशीर्वाद
१७. सर्वश्रेष्ठ शिक्षणाची निवड केल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?
१७ येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टान्तातील दोन विश्वासू दासांची त्यांच्या मालकाने प्रशंसा केली आणि त्याने त्यांच्यावर आणखी काम सोपवण्याद्वारे त्यांना आपल्या आनंदात सामील केले. (मत्तय २५:२१, २३ वाचा.) आज आपणही सर्वश्रेष्ठ शिक्षणाची निवड केल्यास, आपण आनंदी होऊ आणि आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. मायकलचेच उदाहरण पाहा. तो शाळेत इतका हुशार होता, की विद्यापीठातून पुढचे शिक्षण घेण्याच्या संधीबद्दल चर्चा करण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याची खास भेट घेतली. पण, सामान्य पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी त्याला मदत व्हावी म्हणून त्याने कमी काळात पूर्ण करता येईल असा एक व्यावसायिक अभ्यासक्रम निवडला तेव्हा त्याच्या शिक्षकांना खूप आश्चर्य वाटले. आपण हातातील चांगली संधी गमावली असे मायकलला वाटते का? तो म्हणतो: “पायनियर या नात्यानं—आणि आता मंडळीतील वडील या नात्यानं बायबलमधून जे शिक्षण मला मिळालं ते मला खूप मोलाचं वाटतं. बाहेर काम करून मी जो पैसा कमावला असता, त्यापेक्षा मला मिळालेले आशीर्वाद आणि विशेषाधिकार हे कितीतरी जास्त मौल्यवान आहेत. मी उच्च शिक्षण न घेण्याचं ठरवलं याचा मला खूप आनंद वाटतो.”
१८. सर्वश्रेष्ठ शिक्षणाची निवड का करावी?
१८ सर्वश्रेष्ठ शिक्षणामुळे आपल्याला देवाची इच्छा काय आहे हे शिकायला मिळते आणि त्यामुळे यहोवाचे दास बनून त्याची सेवा करण्यास आपल्याला साहाय्य होते. या शिक्षणामुळे आपल्याला “नश्वरतेच्या दास्यातून मुक्त” होण्याची आणि कालांतराने “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” प्राप्त करण्याची आशा मिळते. (रोम. ८:२१) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्वश्रेष्ठ शिक्षणाची निवड करून आपण दाखवू शकतो, की आपल्या स्वर्गातील मालकावर, म्हणजे यहोवावर आपण खरोखर प्रेम करतो.—निर्ग. २१:५.