लोकांना ‘झोपेतून उठण्यास’ मदत करा
लोकांना ‘झोपेतून उठण्यास’ मदत करा
“समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे.” —रोम. १३:११.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
ख्रिश्चनांनी आध्यात्मिक रीत्या जागे राहणे का महत्त्वाचे आहे?
जागृत प्रचारकांनी चांगले ऐकणारे व निरीक्षण करणारे का असले पाहिजे?
प्रेमळपणा व सौम्यता हे गुण आपल्या सेवाकार्यात किती महत्त्वाचे आहेत?
१, २. अनेकांना कोणत्या अर्थाने जागे होण्याची गरज आहे?
वाहन चालवता-चालवता डोळ्यांवर झापड आल्यामुळे किंवा झोपी गेल्यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. इतर काही जण, कामाला जाण्यासाठी वेळेवर उठत नसल्यामुळे किंवा कामावर पेंगत असल्यामुळे हातची नोकरी गमावून बसतात. पण, आध्यात्मिक झोपेचे परिणाम याहून गंभीर असू शकतात. म्हणूनच, या महत्त्वाच्या संदर्भात बायबल म्हणते: ‘जो जागृत राहतो तो धन्य.’—प्रकटी. १६:१४-१६.
२ यहोवाचा मोठा दिवस जवळ येत आहे तशी सर्वसामान्य मानवजात आध्यात्मिक अर्थाने झोपेत आहे. ख्रिस्ती धर्मजगताच्या काही धर्मगुरूंनीसुद्धा आपल्या कळपांचा उल्लेख ‘निद्रिस्त राक्षस’ असा केला आहे. आध्यात्मिक झोप नेमकी काय आहे? खऱ्या ख्रिश्चनांनी सदैव जागे राहणे इतके महत्त्वाचे का आहे? आपण इतरांना आध्यात्मिक झोपेतून जागे होण्यास कशी मदत करू शकतो?
आध्यात्मिक झोप—ती काय आहे?
३. आध्यात्मिक रीत्या जागे नसलेल्या व्यक्तीचे वर्णन तुम्ही कसे कराल?
३ लोक झोपलेले असतात तेव्हा ते सहसा निष्क्रिय असतात. याच्या अगदी उलट, जे आध्यात्मिक रीत्या झोपलेले असतात ते अतिशय व्यस्त असू शकतात, पण आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत ते व्यस्त नसतात. ते कदाचित घर-संसाराच्या चिंतांमध्ये किंवा भौतिक सुखे, प्रतिष्ठा अथवा पैसा मिळवण्यात झपाटल्यासारखे गुंतलेले असतील. अशा सर्व गोष्टींमुळे त्यांच्या आध्यात्मिक गरजांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होते. पण, जे लोक आध्यात्मिक रीत्या जागे असतात त्यांना आपण “शेवटल्या दिवसांत” जगत आहोत याचे भान असते आणि त्यामुळे देवाची इच्छा पूर्ण करण्यात ते शक्य तितके क्रियाशील असतात.—२ पेत्र ३:३, ४; लूक २१:३४-३६.
४. “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये” या सल्ल्याचा काय अर्थ होतो?
४ पहिले थेस्सलनीकाकर ५:४-८ वाचा. येथे प्रेषित पौल सहविश्वासू बांधवांना “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये” असा सल्ला देतो. त्याच्या सल्ल्याचा काय अर्थ होता? यहोवाच्या नैतिक स्तरांकडे दुर्लक्ष करणे हे “झोप” घेण्यासारखे आहे. तसेच, दुष्ट लोकांचा नाश करण्याची यहोवाची वेळ जवळ आली आहे या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करणेदेखील “झोप” घेण्यासारखे आहे. या दुष्ट लोकांनी त्यांचे मार्ग व मनोवृत्ती अनुसरण्यास आपल्याला प्रभावित करू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
५. आध्यात्मिक रीत्या झोपेत असलेले लोक सहसा कशा प्रकारच्या मनोवृत्ती दाखवतात?
५ आपल्या कृत्यांचा जाब विचारणारा देव या जगात नाही असे काही लोकांना वाटते. (स्तो. ५३:१) इतर काहींना असे वाटते, की देवाला मानवांमध्ये आस्था नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल आस्था बाळगण्यात काहीच अर्थ नाही. तर असेही काही जण आहेत, ज्यांना वाटते, की आपण एखाद्या धर्माचे सदस्य असलो तर आपण देवाचे मित्र होऊ. असे सर्व लोक आध्यात्मिक रीत्या झोपेत आहेत. त्यांनी जागे होण्याची गरज आहे. अशा लोकांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?
आपण स्वतः जागे असले पाहिजे
६. ख्रिश्चनांनी आध्यात्मिक रीत्या जागे राहण्याचा सतत प्रयत्न का केला पाहिजे?
६ इतरांना झोपेतून जागे करण्यासाठी आपण स्वतः जागे असले पाहिजे. याचा काय अर्थ होतो? देवाचे वचन लाक्षणिक झोपेचा संबंध ‘अंधाराच्या कामांशी’ म्हणजे चैनबाजी, मद्यपान, विषयविलास, कामासक्ती, कलह व मत्सर यांच्याशी जोडते. (रोमकर १३:११-१४ वाचा.) अशा प्रकारचे आचरण टाळणे सोपे नाही. त्यासाठी जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाडी चालवताना झोपी जाणे घातक असू शकते या गोष्टीकडे दुर्लक्ष करणारा वाहनचालक आपला जीव धोक्यात घालत असतो. तर मग, आध्यात्मिक रीत्या झोपी जाणे जीवघेणे असू शकते याचे भान राखणे एका ख्रिस्ती व्यक्तीकरता किती महत्त्वाचे आहे!
७. लोकांविषयी चुकीचा दृष्टिकोन बाळगण्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?
७ उदाहरणार्थ, एखादा ख्रिस्ती असा विचार करू शकतो की त्याच्या क्षेत्रातील लोक कधीच सुवार्ता ऐकणार नाहीत. (नीति. ६:१०, ११) तो कदाचित असा तर्क करू शकतो, की ‘जर कोणीच प्रतिसाद देत नसेल, तर इतक्या उत्साहानं लोकांना साक्ष देण्याची व त्यांना मदत करण्याची काय गरज?’ हे कबूल आहे, की आज अनेक जण कदाचित आध्यात्मिक रीत्या झोपी गेलेले असतील. पण, त्यांची परिस्थिती व मनोवृत्ती बदलण्याची शक्यता आहे. अशांपैकी काही जण झोपेतून जागे होतात व सुवार्तेला प्रतिसाद देतात. आणि आपण स्वतः जागे राहिलो, म्हणजे राज्याचा संदेश अधिक परिणामकारक रीतीने सांगण्याचे नवनवीन मार्ग आपण आजमावले तर आपण त्यांना मदत करू शकतो. आपल्याला जागे राहण्यास मदत करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपले सेवाकार्य इतके महत्त्वाचे का आहे याची वारंवार स्वतःला आठवण करून देणे.
आपले सेवाकार्य इतके महत्त्वाचे का आहे?
८. आपले ख्रिस्ती सेवाकार्य इतके महत्त्वाचे का आहे?
८ हे नेहमी लक्षात असू द्या, की आज क्षेत्रातील लोक सुवार्तेला कसाही प्रतिसाद देत असले, तरी आपल्या प्रचार कार्यामुळे यहोवाचा सन्मान होतो आणि हे कार्य यहोवाचा उद्देश साध्य करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते. जे लोक सुवार्ता मानत नाहीत अशांवर लवकरच न्यायदंड बजावला जाईल. लोक ज्या प्रकारे आपल्या प्रचार कार्याला प्रतिसाद देतात त्याच्या आधारावरच त्यांचा न्याय केला जाईल. (२ थेस्सलनी. १:८-१०) शिवाय, एका ख्रिस्ती व्यक्तीने असा तर्क करणेही चुकीचे ठरेल, की जर ‘नीतिमान व अनीतिमान’ अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे ‘पुनरुत्थान होणार’ असेल, तर जीव तोडून प्रचार करण्याची काय गरज? (प्रे. कृत्ये २४:१५) देवाच्या वचनावरून आपल्याला समजते, की ज्यांना ‘शेरडे’ म्हणून वेगळे केले जाईल ते “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील.” आपल्या प्रचार कार्यातून देवाची अपार दया व्यक्त होते, कारण या कार्यामुळे लोकांना त्यांच्या जीवनात बदल करण्याची व “सार्वकालिक जीवन” प्राप्त करण्याची संधी मिळते. (मत्त. २५:३२, ४१, ४६; रोम. १०:१३-१५) पण, आपणच जर प्रचार केला नाही, तर लोकांना हा जीवनदायक संदेश कसा ऐकायला मिळेल?
९. सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्यात सहभाग घेतल्याने तुम्हाला स्वतःला व इतरांनाही कशा प्रकारे फायदा झाला आहे?
९ सुवार्तेचा प्रचार केल्यामुळे आपल्या स्वतःलादेखील फायदा होतो. (१ तीमथ्य ४:१६ वाचा.) लोकांना यहोवाबद्दल व त्याच्या राज्याबद्दल सांगितल्याने देवावरील तुमचा स्वतःचा विश्वास व प्रेम आणखी दृढ होते हे तुम्ही अनुभवले नाही का? या कार्यामुळे तुम्हाला ख्रिस्ती गुण विकसित करण्यास मदत मिळाली नाही का? सेवाकार्यात सहभाग घेऊन देवावरील आपली श्रद्धा व्यक्त केल्याने तुमचा आनंद द्विगुणित होत नाही का? अनेकांना, इतरांना सत्य शिकवण्याची सुसंधी लाभली आहे. देवाच्या आत्म्याने त्यांच्या बायबल विद्यार्थ्यांचा जीवनक्रम बदलण्यास मदत केली आहे हे पाहून त्यांना अत्यानंद झाला आहे.
चांगले निरीक्षण करा
१०, ११. (क) येशू आणि पौल जागरूक होते व चांगले निरीक्षक होते हे त्यांनी कसे दाखवून दिले? (ख) जागरूक राहिल्याने व निरीक्षण केल्याने आपण आपले सेवाकार्य कशा प्रकारे सुधारू शकतो याचे उदाहरण द्या.
१० सुवार्तेबद्दल निरनिराळ्या व्यक्तींची आस्था निरनिराळ्या मार्गांनी जागी होऊ शकते. त्यामुळे निरीक्षण करण्याच्या बाबतीत ख्रिस्ती सेवकांनी जागरूक असले पाहिजे. या बाबतीत येशूने आपल्यासमोर उत्तम उदाहरण मांडले आहे. येशू परिपूर्ण होता त्यामुळे तो एका परूश्याच्या मनातील राग, एका पापपूर्ण स्त्रीने मनापासून केलेला पश्चात्ताप आणि एका विधवेची निःस्वार्थ मनोवृत्ती ओळखू शकला. (लूक ७:३७-५०; २१:१-४) त्या प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक गरज ओळखून तो त्यांना मदत करू शकला. पण, चांगले निरीक्षक असण्यासाठी देवाच्या सेवकांना परिपूर्ण असण्याची गरज नाही. हे प्रेषित पौलाने आपल्या उदाहरणावरून दाखवले. निरनिराळ्या लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी त्याने आपली प्रस्तावना त्यांच्या पार्श्वभूमीनुसार व मनोवृत्तीनुसार जुळवून घेतली.—प्रे. कृत्ये १७:२२, २३, ३४; १ करिंथ. ९:१९-२३.
११ येशू व पौल यांच्याप्रमाणे आपण जागरूक असण्याचा व निरीक्षण करण्याचा सतत प्रयत्न केला, तर लोकांची आस्था कशा प्रकारे जागृत करता येईल हे समजणे आपल्याला शक्य होईल. उदाहरणार्थ, तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा अशा काही गोष्टींचे निरीक्षण करा ज्यांवरून तुम्हाला त्यांची संस्कृती, त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ते समजेल. ते त्या क्षणी काय करत आहेत त्याकडे कदाचित तुम्ही लक्ष देऊ शकता आणि त्याबद्दल दोन शब्द बोलून तुम्ही आपले संभाषण सुरू करू शकता.
१२. सेवाकार्य करताना आपण आपसातील संभाषणाकडे लक्ष का दिले पाहिजे?
१२ एक जागरूक निरीक्षक विकर्षणे टाळण्याचा प्रयत्न करतो. सेवाकार्यात आपण ज्या बंधू किंवा भगिनीसोबत कार्य करत असतो त्यांच्याशी संभाषण केल्याने एकमेकांना प्रोत्साहन मिळू शकते. असे असले, तरी आपण मुळात इतरांना प्रचार करण्यासाठी क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेतो हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. (उप. ३:१, ७) तेव्हा, साक्षकार्य करत असताना आपले आपसातील संभाषण सेवाकार्याच्या आड येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आस्थेवाईक लोकांशी ज्या विषयांवर बोलणार आहोत त्यांविषयी चर्चा केल्याने आपल्याला आपल्या सेवाकार्याचे उद्दिष्ट सदैव डोळ्यांसमोर ठेवणे शक्य होईल. तसेच, सेवाकार्यात काही वेळा मोबाईल फोनचा चांगला उपयोग होत असला, तरी घरमालकाशी संभाषण करताना आपल्या मोबाईल फोनमुळे संभाषणात बाधा येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
वैयक्तिक आस्था दाखवा
१३, १४. (क) एका व्यक्तीला कोणत्या गोष्टीबद्दल आस्था आहे हे आपण कसे समजू शकतो? (ख) आध्यात्मिक गोष्टींबद्दल लोकांची आस्था कशामुळे जागी होऊ शकते?
१३ जे प्रचारक नेहमी जागृत व दक्ष असतात ते लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात. क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेण्यासाठी तुम्ही तिला कोणते प्रश्न विचारू शकता? त्या व्यक्तीला जगात अस्तित्वात असलेल्या भरमसाट धर्मांची, तिच्या परिसरातील हिंसेची किंवा सरकारच्या असफलतेची काळजी वाटते का? जीवसृष्टीत पाहायला मिळणाऱ्या अद्भुत रचनेवर दोन शब्द बोलून किंवा बायबलमधील सल्ला किती उपयुक्त आहे हे दाखवून तुम्ही एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक आस्था जागी करू शकता का? प्रार्थनेचा विषय हा जवळजवळ सर्वच संस्कृतीच्या लोकांचा, इतकेच नव्हे तर काही नास्तिकांचाही आवडीचा विषय आहे. आपली प्रार्थना ऐकणारा कोणी देव आहे का, असा प्रश्न अनेकांना भेडसावतो; तर इतर काहींना देव सर्वच प्रार्थना ऐकतो का? नसल्यास, देवाने आपली प्रार्थना ऐकावी म्हणून आपण काय करावे? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.
१४ अनुभवी प्रचारक किती कुशलतेने लोकांशी संभाषण सुरू करतात याचे निरीक्षण केल्याने आपण बरेच काही शिकू शकतो. आपण लोकांची उलटतपासणी करत आहोत किंवा त्यांच्या खासगी जीवनात डोकावत आहोत असे त्यांना वाटू नये म्हणून अनुभवी प्रचारक कशा प्रकारे लोकांशी बोलतात त्याकडे लक्ष द्या. तसेच, या प्रचारकांना घरमालकाचा दृष्टिकोन जाणून घेण्याची इच्छा आहे हे त्यांच्या आवाजावरून व हावभावांवरून कसे दिसून येते त्याकडेही लक्ष द्या.—नीति. १५:१३.
प्रेमळपणा व कुशलता
१५. प्रचार कार्यात आपण प्रेमळपणाचा गुण का दाखवला पाहिजे?
१५ तुम्ही गाढ झोपलेले असताना तुम्हाला कोणी जागे केले तर तुम्हाला आवडेल का? अनेकांना झोपेतून असे अचानक जागे केल्याचे मुळीच आवडत नाही. गाढ झोपलेल्या व्यक्तीला सहसा हळू उठवलेले आवडते. आध्यात्मिक रीत्या झोपेत असलेल्या लोकांनाही अशा प्रकारे जागे केलेले आवडते. उदाहरणार्थ, क्षेत्रात कोणी तुमच्यावर खेकसले तर काय करणे सगळ्यात उत्तम राहील? अशा वेळी त्या व्यक्तीच्या भावनांची प्रेमळपणे कदर करा, तिच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल तिचे आभार माना आणि शांतपणे तेथून निघून जा. (नीति. १५:१; १७:१४; २ तीम. २:२४) तुमच्या प्रेमळ वागणुकीचा कदाचित त्या व्यक्तीवर प्रभाव पडेल आणि पुढच्या वेळी कोणी साक्षीदार तिच्याकडे गेला, तर ती कदाचित सकारात्मक प्रतिसाद देईल.
१६, १७. क्षेत्रात आपण समजबुद्धी कशी दाखवू शकतो?
१६ इतर काही प्रसंगी, तुम्हाला क्षेत्रातील लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेवर मात करणे शक्य होईल. क्षेत्रात भेटणारे काही जण निव्वळ संभाषण संपवण्याच्या उद्देशाने असे म्हणतील, “आम्हाला आमचा धर्म आहे” किंवा “आम्हाला नाही ऐकायचंय.” पण अशा वेळीसुद्धा, तुम्ही कुशलतेने प्रयत्न करून घरमालकाला प्रेमळपणे एखादा कुतूहलजनक प्रश्न विचारला, तर आध्यात्मिक गोष्टींबद्दलची त्याची आस्था जागी करणे कदाचित तुम्हाला शक्य होईल.—कलस्सैकर ४:६ वाचा.
१७ काही वेळा क्षेत्रात आपल्याला असे लोक भेटतात ज्यांना वाटते की ते खूप व्यस्त आहेत, त्यामुळे आपला संदेश ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अशा वेळी, ते व्यस्त आहेत हे मान्य करून तेथून निघून जाणे सगळ्यात चांगले. पण एखाद्या प्रसंगी, तुम्ही घरमालकाला थोडक्यात काहीतरी अर्थपूर्ण सांगू शकता असे कदाचित तुम्हाला वाटेल. काही बंधुभगिनी केवळ एका मिनिटात बायबल उघडतात, त्यातून एखादे विचारप्रवर्तक वचन वाचतात व पुढच्या वेळी चर्चा करण्यासाठी घरमालकाला एखादा प्रश्नसुद्धा विचारतात. काही वेळा, अशा लहानशा प्रस्तावनेमुळे घरमालकाची आस्था इतकी जागृत झाली आहे, की संक्षिप्त संभाषण करण्याइतकेपण आपण व्यस्त नाहीत असे त्यांना जाणवते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा हा मार्ग तुम्ही आजमावून पाहू शकता का?
१८. अनौपचारिक साक्षकार्य अधिक परिणामकारक रीतीने करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
१८ आपण अनौपचारिक साक्षकार्य करण्यास नेहमी तयार असलो, तर दैनंदिन जीवनातील कामे करताना आपल्याला भेटणाऱ्या लोकांची आस्था आपण जागी करू शकतो. अनेक बंधुभगिनी आपल्या खिशात किंवा हँडबॅगमध्ये नेहमी काही साहित्य ठेवतात. संधी मिळेल तेव्हा लोकांना साक्ष देताना उपयोग करता येईल असे एखादे शास्त्रवचनही ते लक्षात ठेवतात. अनौपचारिक साक्ष देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी करू शकता याबद्दल तुम्ही तुमच्या मंडळीच्या सेवा पर्यवेक्षकांना किंवा पायनियरांना मदत मागू शकता.
आपल्या नातेवाइकांना हळू जागे करा
१९. आपल्या नातेवाइकांना मदत करण्याचे आपण सोडून का देऊ नये?
१९ आपल्या नातेवाइकांना सुवार्ता स्वीकारण्यास मदत करायला आपण नक्कीच इच्छुक आहोत. (यहो. २:१३; प्रे. कृत्ये १०:२४, ४८; १६:३१, ३२) त्यांनी सुरुवातीला आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही, तर पुन्हा प्रयत्न करण्याची उत्सुकता कदाचित आपल्याला वाटणार नाही. आपल्याला कदाचित असे वाटेल की त्यांची मनोवृत्ती बदलण्यासाठी आपण फारसे काही करू शकत नाही. पण, काही घटनांमुळे तुमच्या नातेवाइकांच्या जीवनात किंवा दृष्टिकोनात बदल होऊ शकतो. किंवा मग, सत्य शिकवण्याची तुमची क्षमता सुधारल्यामुळे कदाचित तुमचे नातेवाईक आता चांगला प्रतिसाद देऊ शकतात.
२०. आपल्या नातेवाइकांशी विचारशीलतेने बोलणे का महत्त्वाचे आहे?
२० आपण आपल्या नातेवाइकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. (रोम. २:४) सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांशी आपण प्रेमळपणे बोलतो त्याचप्रमाणे आपण आपल्या नातेवाइकांशीही बोलू नये का? तेव्हा, आपल्या नातेवाइकांशी नेहमी सौम्यतेने व आदराने बोला. त्यांना उठता-बसता बायबलवर उपदेश देण्याऐवजी, सत्यामुळे तुम्हाला स्वतःला कशा प्रकारे फायदा झाला आहे याचा पुरावा द्या. (इफिस. ४:२३, २४) यहोवाने ‘जे हितकारक ते शिकवण्याद्वारे’ कशा प्रकारे तुमचे जीवन समृद्ध केले आहे ते त्यांना सांगा. (यश. ४८:१७) एका ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन कसे असावे हे तुमच्या उदाहरणावरून त्यांना दिसू द्या.
२१, २२. नातेवाइकांना मदत करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे याचे एक उदाहरण द्या.
२१ अलीकडेच एका बहिणीने असे लिहिले: “मी आपल्या वागण्याबोलण्याद्वारे नेहमीच आपल्या १३ भावंडांना साक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. मी दरवर्षी न चुकता प्रत्येकाला पत्र लिहिते. पण, गेल्या ३० वर्षांत त्यांच्यापैकी एकानंही सत्य स्वीकारलं नाही.”
२२ बहिणीने पुढे लिहिले: “एके दिवशी, मी शेकडो मैल दूर राहणाऱ्या माझ्या एका बहिणीला फोन केला. तिनं मला सांगितलं, की तिनं तिच्या चर्चमधील प्रचारकाला तिच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास सांगितलं होतं, पण आजपर्यंत त्यानं तिच्यासोबत अभ्यास केला नाही. तिच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास मला आवडेल असं मी तिला सांगितलं तेव्हा तिनं म्हटलं: ‘ठीक आहे, पण मी तुला आत्ताच सांगून ठेवते: मी यहोवाची साक्षीदार कधीच बनणार नाही.’ मी तिला बायबल नेमके काय शिकवते?, हे पुस्तक पोस्टानं पाठवलं आणि दर एकदोन दिवसांनी तिला फोन करत राहिले. पण, तिनं ते पुस्तक उघडूनही पाहिलं नव्हतं. शेवटी मी तिला तिचं पुस्तक घ्यायला सांगितलं, आणि सुमारे १५ मिनिटं त्यात उद्धृत केलेली काही शास्त्रवचनं आम्ही फोनवरून वाचली व त्यांवर चर्चा केली. अशा रीतीनं काही वेळा फोनवरून चर्चा केल्यानंतर तिनं १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे, अभ्यास करण्यासाठी ती मला फोन करू लागली; काही वेळा मी सकाळी झोपेतून उठण्याआधीच आणि काही वेळा तर दिवसातून दोन वेळा. त्याच्या पुढच्याच वर्षी, तिचा बाप्तिस्मा झाला आणि आणखी एका वर्षानंतर ती पायनियर सेवा करू लागली.”
२३. लोकांना आध्यात्मिक झोपेतून जागे करण्याच्या बाबतीत आपण हार का मानू नये?
२३ लोकांना आध्यात्मिक झोपेतून जागे करणे ही एक कला आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांना जागे करण्याच्या आपल्या प्रयत्नांना नम्र अंतःकरणाचे लोक अजूनही प्रतिसाद देत आहेत. दरमहा सरासरी २०,००० हून अधिक लोक बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार बनत आहेत. तेव्हा, प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील आर्खिप्पा नावाच्या बांधवाला जो सल्ला दिला त्याचे आपण मनापासून पालन करू या. त्याने म्हटले: “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.” (कलस्सै. ४:१७) निकडीच्या भावनेने प्रचार करण्याचा काय अर्थ होतो हे समजण्यास पुढील लेख आपल्या सर्वांना मदत करेल.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चौकटा]
जागे राहण्यासाठी
▪ देवाची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त असा
▪ अंधाराच्या कामांपासून दूर राहा
▪ आध्यात्मिक झोपेच्या धोक्यासंबंधी सावध असा
▪ तुमच्या क्षेत्रातील लोकांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
▪ प्रचार करण्याचे नवनवीन मार्ग आजमावून पाहा
▪ तुमच्या सेवेचे महत्त्व नेहमी लक्षात ठेवा