वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
प्रेषित पौलाने “सर्व इस्त्राएल लोकांचे तारण होईल” असे म्हटले. (रोम. ११:२६) सर्व यहुदी लोक भविष्यात केव्हातरी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतील असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता का?
नाही, पौलाच्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता. राष्ट्र या नात्याने, अब्राहामाच्या नैसर्गिक वंशजांनी येशूला मशीहा म्हणून स्वीकारले नाही. येशूचा मृत्यू झाल्यानंतरच्या वर्षांत, सर्वच्या सर्व यहुदी लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारणार नाहीत हे स्पष्ट झाले. तरीसुद्धा, “सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल” हे पौलाचे शब्द खरे होते. ते कशा प्रकारे?
येशूने आपल्या काळातील यहुदी धर्मपुढाऱ्यांना म्हटले: “देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्याला ते दिले जाईल.” (मत्त. २१:४३, पं.र.भा.) इस्राएल राष्ट्राने सामूहिक रीत्या येशूला अव्हेरल्यामुळे यहोवा आपले लक्ष आता एका नव्या, आत्मिक राष्ट्राकडे वळवेल असे येशू म्हणत होता. पौलाने या राष्ट्राला ‘देवाचे इस्राएल’ म्हटले.—गलती. ६:१६.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील इतर उताऱ्यांवरून आपल्याला समजते की ‘देवाच्या इस्राएलात’ आत्म्याने अभिषिक्त असणारे १,४४,००० सदस्य आहेत. (रोम. ८:१५-१७; प्रकटी. ७:४) या गटात यहुदीतर व्यक्तीही असतील हे प्रकटीकरण ५:९, १० यावरून स्पष्ट होते. या वचनांत अभिषिक्त ख्रिस्ती, “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून” येतात असे सांगितले आहे. आत्मिक इस्राएलच्या या सदस्यांना “राज्य व याजक” होण्याकरता व ‘पृथ्वीवर राज्य करण्याकरता’ खासपणे निवडण्यात आले आहे. निवडलेले राष्ट्र या नात्याने यहोवाने इस्राएलचा अव्हेर केला असला, तरीसुद्धा या राष्ट्रातील व्यक्ती त्याच्यासोबत एक नातेसंबंध जोडू शकत होत्या. प्रेषित व आरंभीच्या अनेक ख्रिश्चनांच्या बाबतीत असेच घडले. अर्थात, इतर सर्व मानवांप्रमाणेच या यहुद्यांनाही येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे मोल देऊनच विकत घ्यावे लागले.—१ तीम. २:५, ६; इब्री २:९; १ पेत्र १:१७-१९.
पहिल्या शतकातील बहुतेक नैसर्गिक यहुद्यांनी येशूसोबत सहशासक होण्याची संधी गमावली, तरीसुद्धा यामुळे देवाचा उद्देश निष्फळ ठरला नाही. यहोवाचा उद्देश निष्फळ ठरणे शक्यच नाही, कारण तो आपल्या संदेष्ट्याद्वारे असे म्हणतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यश. ५५:११.
यहोवाने १,४४,००० सहशासकांना आपल्या पुत्रासोबत स्वर्गात स्थानापन्न करण्याचा जो संकल्प केला आहे, त्याच्याबाबतीतही हे शब्द खरे ठरतील. बायबल स्पष्टपणे दाखवते की देव सर्व १,४४,००० जणांना अभिषिक्त करेल. त्यांत एकही जण कमी नसेल!—प्रकटी. १४:१-५.
त्याअर्थी, “सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल” असे लिहिताना, यहुदी मोठ्या संख्येने ख्रिस्ती धर्म स्वीकारतील असे पौल भाकीत करत नव्हता. तर, आत्मिक इस्राएलच्या १,४४,००० सदस्यांनी स्वर्गात आपल्या पुत्रासोबत अर्थात येशू ख्रिस्तासोबत राज्य करावे असा जो देवाचा उद्देश आहे, तो अवश्य पूर्ण होईल असे पौल सांगू इच्छित होता. देवाच्या नियुक्त वेळी ही पूर्ण संख्या, म्हणजेच “सर्व इस्राएल” यांचे तारण झालेले असेल व कालांतराने ते मशीही राज्यात राजे व याजक या नात्याने कार्य करतील.—इफिस. २:८.
[२८ पानांवरील चित्रे]
अभिषिक्त जन “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून” येतात