स्वेच्छेने देवाची सेवा करणे
स्वेच्छेने देवाची सेवा करणे
“मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (२ करिंथकर १२:१५) यहोवाच्या सेवकांनी कोणता दृष्टिकोन व कोणती मनोवृत्ती विकसित केली पाहिजे हे पौलाच्या या शब्दांवरून तुम्ही सांगू शकाल का? एका बायबल विद्वानाने म्हटले, की पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना वरीलप्रमाणे लिहिले तेव्हा त्याला खरे तर असे म्हणायचे होते, की “मी तुमच्या कल्याणासाठी माझी शक्ती, माझा वेळ, माझं आयुष्य आणि माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व खर्च करायला तयार आहे. एक पिता जसे आपल्या मुलांसाठी आपखुशीने सर्वकाही करायला तयार असतो तसे मीही तुमच्यासाठी करायला तयार आहे.” ख्रिस्ती सेवेसाठी वेळ आल्यास पौल “सर्वस्वी खर्ची पडण्यास” किंवा “जिवात जीव आहे तोवर” सेवा करण्यास तयार होता.
हे सर्व तो “फार आनंदाने” करायला तयार होता. जेरुसलेम बायबलनुसार तो “पूर्णपणे तयार” होता. ही झाली पौलाची गोष्ट. आता आपल्याबद्दल काय? यहोवा देवाची सेवा करण्याकरता आणि इतरांच्या हितासाठी आपणही आपला वेळ, आपली शक्ती, आपली कौशल्ये आणि आपली साधनसंपत्ती खर्च करायला तयार आहोत का? असे करणे कदाचित सोपे नसेल, पण यहोवाच्या सेवेसाठी आपण हे “फार आनंदाने” करायला तयार आहोत का?
सेवा करण्यास नकार
बहुतेक लोक देवाच्या सेवेपासून केवळ अंग चोरत नाहीत, तर त्यांना देवाची सेवा करायची इच्छाच नसते. कारण ते कृतघ्न, स्वार्थी व बंडखोर असतात. सैतानाने आदाम आणि हव्वेला अशाचप्रकारे विचार करायला लावले होते. त्याने त्यांना खोटे सांगितले, की ते “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होतील म्हणजे बरोबर काय आणि चूक काय हे स्वतः ठरवू शकतील. (उत्पत्ति ३:१-५) आज अशा मनोवृत्तीच्या लोकांना स्वच्छंदी जीवन जगायला आवडते. त्यांना कोणतेही बंधन किंवा नियम नको असतात, देवाची काय इच्छा आहे याची त्यांना पर्वा नसते. (स्तोत्र ८१:११, १२) त्यांच्याजवळ जे काही आहे त्या सर्व गोष्टींचा ते फक्त स्वतःच्या हितासाठी उपयोग करतात.—नीतिसूत्रे १८:१.
कदाचित तुमची अशी टोकाची भूमिका नसेल. सध्याच्या जीवनाबद्दल आणि त्याहूनही जास्त म्हणजे, भविष्यात परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याच्या आशेबद्दल कदाचित तुम्हाला मनापासून कृतज्ञता वाटत असेल. (स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:१-४) यहोवाने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दलही तुम्ही मनापासून त्याचे आभार मानत असाल. परंतु, एका धोक्यापासून आपण सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. सैतान आपल्याला चुकीच्या पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करू शकतो. आणि असे करण्यामुळे आपली सेवा व्यर्थ ठरेल, यहोवा ती स्वीकारणार नाही. (२ करिंथकर ११:३) पण हे कसे होऊ शकते?
स्वेच्छेने सेवा करणे आवश्यक आहे
आपण स्वेच्छेने आणि पूर्ण मनाने सेवा करावी अशी यहोवा अपेक्षा करतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला कधीही जबरदस्ती करत नाही. उलट सैतानच, लोकांनी त्याची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी किंवा लोकांना फसवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतो. हे खरे आहे, की बायबलमध्ये आपल्याला देवाची सेवा करण्याची आज्ञा दिली आहे; देवाच्या आज्ञा व विधी पाळणे हे आपले कर्तव्य आहे, आपल्याकडून अशी अपेक्षा केली जाते असेही बायबल सांगते. (उपदेशक १२:१३; लूक १:६) तरीपण, देवाची सेवा करण्यामागचा आपला मुख्य हेतू म्हणजे आपण त्याच्यावर प्रेम करतो, हा आहे.—निर्गम ३५:२१; अनुवाद ११:१.
पौलाने म्हटले, की देवाची सेवा करण्यासाठी मी खूप झटेन परंतु देवाबद्दल माझ्या मनात “प्रीती नसली” तर माझी सर्व सेवा व्यर्थ होईल. (१ करिंथकर १३:१-३) बायबल लेखकांनी जेव्हा ख्रिश्चनांना देवाचे दास असे संबोधले तेव्हा त्यांना असे म्हणायचे नव्हते, की या ख्रिश्चनांकडून जबरदस्तीने सेवा करवून घेतली जात आहे. (रोमकर १२:११; कलस्सैकर ३:२४) परंतु त्यांना असे म्हणायचे होते की, यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल त्यांच्या मनात सखोल आदर व प्रेम असल्यामुळे ते स्वेच्छेने त्यांच्या अधीन आहेत.—मत्तय २२:३७; २ करिंथकर ५:१४; १ योहान ४:१०, ११.
आपण देवाची सेवा करत असताना, लोकांबद्दलही आपले प्रेम व्यक्त झाले पाहिजे. “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो,” असे पौलाने थेस्सलनीकामधील मंडळीला लिहिले. (१ थेस्सलनीकाकर २:७) अनेक देशांमध्ये, आईने आपल्या मुलांची काळजी घेणे ही एक कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु आई, कायद्याचे पालन करावे लागते म्हणून आपल्या मुलांची काळजी घेते का? नाही. ती आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करते म्हणून त्यांची काळजी घेते. एक प्रेमळ आई आपल्या मुलांसाठी सर्वकाही त्याग करायला आनंदाने तयार असते! पौलाने ज्यांची सेवा केली त्यांच्याबद्दलही त्याला अशीच “कळकळ” होती. आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो त्यांची मदत करायला “राजी” होता. (किंग जेम्स व्हर्शननुसार, “तयार;” आणि न्यू इंटरनॅशनल व्हर्शननुसार “त्याला आनंद होता.”) (१ थेस्सलनीकाकर २:८) पौलाचे उदाहरण अनुसरण्यास प्रेम आपल्याला प्रवृत्त करील.—मत्तय २२:३९.
नाराजीने सेवा करण्याबाबत काय?
देव आणि लोक यांच्यापेक्षा आपण स्वतःवर जास्त प्रेम करता कामा नये. असे असेल तर आपण करत असलेली सेवा पूर्ण मनाची ठरणार नाही. कदाचित आपल्या मनात असे देखील विचार येतील की देवाची सेवा करावी लागत असल्यामुळे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, आपल्या मर्जीप्रमाणे जीवन व्यतीत करू शकत नाही. काही इस्राएली लोक असाच विचार करू लागले होते. त्यांचे देवाबद्दलचे प्रेम आटले होते. ते देवाची नाममात्र सेवा करत होते. याचा परिणाम? देवाची सेवा त्यांना जणू “पीडा” वाटू लागली.—मलाखी १:१३.
देवाला आपण करत असलेले बलिदान नेहमी “दोषहीन” अर्थात “सर्वोत्तम” असले पाहिजेत. (लेवीय २२:१७-२०; निर्गम २३:१९) परंतु, मलाखीच्या दिवसांतील लोक दोषहीन किंवा सर्वोत्तम प्राणी अर्पण करण्याऐवजी, त्यांना नको असलेले प्राणी यहोवाला बलिदान देण्यासाठी आणत. ही बलिदाने यहोवाने स्वीकारली का? त्याने याजकांना सांगितले: “तुम्ही अंधळा पशु अर्पिता [तेव्हा असे म्हणता] हा अधर्म नव्हे . . . लंगडा किंवा रोगी असा बलि देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पाहा; तो तुजवर प्रसन्न होईल काय? . . . लुटून आणिलेले, लंगडा किंवा रोगी, असा पशु आणून तुम्ही अर्पिता; तुमच्या हातून असले अर्पण मला पसंत होईल काय?”—मलाखी १:८, १३.
आज आपल्याबाबतीत हे कसे घडू शकते? आपण पूर्ण मनाने किंवा स्वेच्छेने यहोवाची सेवा केली नाही तर कदाचित आपल्याला करावे लागणारे त्याग “पीडा” वाटू लागतील. (निर्गम ३५:५, २१, २२; लेवीय १:३; स्तोत्र ५४:६; इब्री लोकांस १३:१५, १६) उदाहरणार्थ, यहोवाच्या कार्याला आपण आपला उरलासुरला वेळ देतो का?
समजा एखाद्या इस्राएली मनुष्याला, त्याचे हित चिंतणाऱ्या त्याच्या कुटुंबातील कोणा सदस्याने किंवा एखाद्या लेवीने त्याच्याजवळ असलेल्या जनावरांमधून सर्वात उत्तम जनावर निवडून ते अर्पण करण्याची बळजबरी केल्यास, यहोवा देवाने त्याचे हे अर्पण स्वीकारले असते का? (यशया २९:१३; मत्तय १५:७, ८) यहोवाने अशी अर्पणे आणि जे लोक ही अर्पणे करीत होते त्या लोकांना देखील कायमचे त्यागले.—होशे ४:६; मत्तय २१:४३.
देवाची इच्छा करण्यास आनंदी
देवाने आपली सेवा स्वीकारावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. येशूने म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:३०) देवाची स्वखुशीने सेवा करण्यात येशूला आनंद वाटत होता. दावीदाने येशूविषयी असे भाकीत केले होते: “तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.” आणि येशूने हे पूर्ण करून दाखवले.—स्तोत्र ४०:८.
यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात येशूला आनंद वाटत होता हे खरे आहे, परंतु हे नेहमीच सोपे नव्हते. येशूला अटक होऊन, त्याची परीक्षा घेण्यात आली व त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले त्याआधी काय घडले त्याचा विचार करा. गेथशेमाने बागेत येशू “अति खिन्न” झाला होता; तो “अत्यंत विव्हळ” झाला होता. त्याच्यावरील मानसिक ताण इतका भारी होता की तो प्रार्थना करत असताना त्याच्या “रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर मत्तय २६:३८; लूक २२:४४.
पडावे असा त्याचा घाम पडत होता.”—पण येशू असा अति विव्हळ का झाला? तो स्वतःबद्दल जास्त विचार करत होता किंवा त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यात इतका रस राहिला नव्हता अशातली बाब नाही. तो मृत्यूला तोंड द्यायला तयार होता. किंबहुना, “प्रभुजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही,” असे पेत्राने त्याला एकदा म्हटले तेव्हा तो त्याच्यावर क्रोधित झाला! (मत्तय १६:२१-२३) परंतु, एक गुन्हेगार म्हणून त्याच्या होणाऱ्या मृत्यूचा यहोवावर आणि त्याच्या पवित्र नावावर कसा परिणाम होईल याची त्याला जास्त काळजी लागली होती. त्याला अगदी निर्दयीपणे मारले जात असताना त्याच्या पित्याला किती यातना होतील याची येशूला जाणीव होती.
येशूने हेही ओळखले होते की यहोवाचा उद्देश पूर्ण होण्याचा महत्त्वपूर्ण समय अगदी जवळ येऊन ठेपला आहे. देवाच्या नियमांचे विश्वासूपणे पालन करण्याद्वारे येशू हे दाखवून देणार होता की आदामालाही देवाच्या नियमांचे पालन करणे शक्य होते आणि परीक्षेत असताना मनुष्य स्वखुशीने व विश्वासूपणे देवाची सेवा करणार नाही हा सैतानाचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. तसेच, येशूमार्फत भविष्यात यहोवा देव सैतान आणि त्याच्या बंडाळीमुळे उद्भवलेल्या सर्व परिणामांना कायमचे काढून टाकणार आहे हे देखील त्याला माहीत होते.—उत्पत्ति ३:१५.
येशूवर किती मोठी जबाबदारी होती! त्याच्या पित्याच्या नावावर लागलेला कलंक दूर करणे, विश्वव्यापी शांती आणणे आणि मानव कुटुंबाचे तारण करणे—हे सर्व येशूच्या विश्वासूपणावर आधारलेले होते! येशूने ही गोष्ट ओळखली होती, म्हणूनच त्याने अशी प्रार्थना केली: “हे बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९) सर्वात कठिणातल्या कठीण परिस्थितीतही येशूने आपल्या पित्याच्या इच्छेच्या अधीन राहण्याची तयारी दाखवली.
“आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे”
यहोवाची सेवा करताना येशूने ज्याप्रकारे तीव्र मानसिक तणावाचा सामना केला त्याप्रमाणे आज सैतान देवाच्या सेवकांवरही दबाव आणील अशी आपण अपेक्षा करू शकतो. (योहान १५:२०; १ पेत्र ५:८) देवाची सेवा करण्याची आपली तयारी असली तरी हे इतके सहजसोपे नाही. कारण आपण अपरिपूर्ण आहोत. येशूने पाहिले होते की त्याने आपल्या शिष्यांना सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करायला त्यांना किती जड जात होते. म्हणूनच तो म्हणाला: “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” (मत्तय २६:४१) पण येशू तर परिपूर्ण होता. मग शिष्यांना त्याने सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करायला जड जात होते हे त्याने कसे ओळखले? त्याला माहीत होते की त्याचे शिष्य आदामाची संतती असल्यामुळे अपरिपूर्ण आदामाकडून त्यांनाही अपरिपूर्णता वारशाने मिळाली होती. म्हणूनच ते शरीराने व मनाने अपरिपूर्ण, कमजोर होते. यामुळेच त्यांना यहोवाची सेवा करायला झटावे लागत होते.
आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपण देवाची सेवा पूर्णार्थाने करू शकत नाही अशी खंत पौलाप्रमाणे आपल्यालाही वाटू शकते. पौलाने त्याविषयी असे लिहिले: “इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.” (रोमकर ७:१८) आपल्यालाही सर्व चांगली कामे करायला अनेकदा जड जाते. (रोमकर ७:१९) याचा अर्थ आपल्याला चांगले ते करण्याची इच्छा नाही, असे नाही. तर आपले अपरिपूर्ण शरीर आपल्या प्रयत्नांच्या आड येते.
पण म्हणून निराश होण्याची गरज नाही. आपल्याला मनापासून देवाची सेवा करण्याची इच्छा असेल तर यहोवा देव नक्की आपण करीत असलेली सेवा स्वीकारेल. (२ करिंथकर ८:१२) तेव्हा, देवाच्या इच्छेच्या पूर्णपणे अधीन राहण्याच्या ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करण्याचा आपण ‘होईल तितका प्रयत्न’ करू या. (२ तीमथ्य २:१५; फिलिप्पैकर २:५-७; १ पेत्र ४:१, २) अशी मनोवृत्ती बाळगल्यास तो जरूर आपल्याला प्रतिफळ देईल आणि साहाय्यही करील. आपल्या कमजोरीची भरपाई करण्यासाठी तो आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देईल. (२ करिंथकर ४:७-१०) पौलाप्रमाणे आपणही यहोवाच्या साहाय्याने त्याच्या मौल्यवान सेवेत स्वतःला ‘फार आनंदाने खर्च करू व सर्वस्वी खर्ची पडू.’
[२१ पानांवरील चित्र]
पौलाने स्वेच्छेने आपल्याकडून होईल तितक्या चांगल्याप्रकारे यहोवाची सेवा केली
[२३ पानांवरील चित्र]
सर्वात कठीण परिस्थितीतही येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली