व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले.”—स्तोत्र १३९:१६

देव तुमच्या भावना समजू शकतो

देव तुमच्या भावना समजू शकतो

आपल्या निर्मितीवरून आपण काय शिकतो?

मानवांमध्ये असणाऱ्‍या सर्वात जवळच्या म्हणजे सारख्या दिसणाऱ्‍या जुळ्यांमध्ये असलेल्या नात्याचा विचार करा. त्यांचं आपसांत एक खास घनिष्ठ नातं असतं. ट्‌वीन स्टडीज सेंटर या संघटनेची अधिकारी नॅन्सी सिगल जी स्वतः जुळ्या बहिणींपैकी एक आहे म्हणते, की जुळ्यांना एकमेकांच्या भावना समजत असल्यामुळे आपसांत चांगला संवाद साधता येतो. एका स्त्रीनेही जुळ्या बहिणीसोबत असलेल्या तिच्या नात्याबद्दल म्हटलं: “आम्हाला एकमेकींबद्दल सर्वकाही माहीत आहे.”

कोणत्या गोष्टीमुळे जुळ्यांना एकमेकांना समजून घ्यायला मदत होते? शोधकर्त्यांच्या मते संगोपन आणि वातावरण जरी यासाठी कारणीभूत असलं, तरी खासकरून सारख्या दिसणाऱ्‍या जुळ्यांना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्या आनुवंशिक रचनेमुळे (जेनॅटिक मेकअपमुळे) मदत होते.

विचार करा: ज्या सृष्टिकर्त्याने ही सर्व अद्‌भुत रचना केली आहे तो आपल्यापैकी प्रत्येकाला चांगल्या प्रकारे ओळखतो. बायबलच्या एका लेखकाने, दावीदने म्हटलं: “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता . . . माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले.” (स्तोत्र १३९:१३, १५, १६) फक्‍त देवच आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्याला आपल्या आनुवंशिक रचनेबद्दलच नाही, तर ज्या अनुभवांमुळे आपलं व्यक्‍तिमत्त्व घडलं आहे त्याबद्दलही माहीत आहे. या दोन गोष्टी देवाला माहीत असल्यामुळे आपण खातरीने म्हणू शकतो की तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.

देवाच्या समजशक्‍तीबद्दल बायबल आपल्याला काय शिकवतं?

दावीदने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. हे परमेश्‍वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.” (स्तोत्र १३९:१, २, ४) फक्‍त इतकंच नाही तर यहोवा आपल्या मनातल्या भावना जाणतो आणि आपले ‘विचार व कल्पनाही समजतो.’ (१ इतिहास २८:९; १ शमुवेल १६:६, ७) बायबलच्या या वचनांतून आपल्याला देवाबद्दल काय समजतं?

आपण जरी प्रार्थनेत आपले सर्वच विचार आणि भावना व्यक्‍त करत नसलो, तरी आपला निर्माणकर्ता आपल्याला चांगल्या प्रकारे जाणतो. कारण आपण काय करतो व ते का करतो हे तो समजतो. आपल्याला एखादी चांगली गोष्ट करण्याची मनापासून इच्छा असते, पण आपल्या कमतरतांमुळे आपल्याला ती गोष्ट करणं शक्य होत नाही हेही तो जाणतो. देवानेच आपल्या मनात प्रेमाची भावना घातली आहे आणि यामुळे तो आपल्यातले चांगले विचार आणि हेतू पाहू शकतो व ते समजू शकतो. तसंच असं करण्यासाठी तो उत्सुकही असतो.—१ योहान ४:७-१०.

देवाच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. त्याला आपल्या दुःखांचीही जाणीव आहे. इतर कोणाला जरी ती माहीत नसली किंवा ते आपली परिस्थिती पूर्णपणे समजत नसले तरी देव ती चांगल्या प्रकारे समजतो

ही वचनं आपल्याला आश्‍वासन देतात

  • “कारण यहोवाचे डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो त्यांच्या याचनेकडे कान लावतो.”—१ पेत्र ३:१२.

  • देव असं वचन देतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

देव खूप दयाळू आहे

देव आपली परिस्थिती आणि आपल्या भावना जाणतो हे समजल्यामुळे तुम्हाला समस्यांमध्ये धीर धरायला मदत होईल का? नायजीरिया इथे राहणारी ॲना हिच्यासोबत काय घडलं याचा विचार करा. ती म्हणते: “माझ्या जीवनातल्या वाईट परिस्थितींमुळे मला प्रश्‍न पडला की माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का. माझे पती वारले होते. माझ्या मुलीला हायड्रोसिफलस (डोक्यात जास्त प्रमाणात पाणी साठणं) हा आजार झाला. मला सतत तिची काळजी घ्यावी लागायची. मग मला स्तनाचा कॅन्सर झाला आणि त्यासाठी मला शस्त्रक्रिया करावी लागली. शिवाय किमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे उपचार घ्यावे लागले. दवाखान्यात उपचार घेत असताना, स्वतःकडे आणि मुलीकडे लक्ष देणं मला खूप कठीण गेलं.”

या परिस्थितीतून सावरायला ॲनाला कशामुळे मदत मिळाली? ती म्हणते: “मी फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांवर विचार करायचे. त्यात म्हटलं आहे की ‘सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.’ जेव्हा-जेव्हा हे वचन मला आठवायचं तेव्हा-तेव्हा मला यहोवाच्या आणखी जवळ असल्यासारखं वाटायचं. मला कळायचं की, मी स्वतःला जितकं ओळखत नाही तितक्या चांगल्या प्रकारे तो मला ओळखतो. मला ख्रिस्ती मंडळीतल्या माझ्या प्रिय बंधूभगिनींकडूनही खूप प्रोत्साहन मिळालं.

मला आज जरी शारीरिक समस्या असल्या तरी माझी आणि माझ्या मुलीची परिस्थिती सुधारली आहे. यहोवा आमच्या बाजूने असल्यामुळे आम्ही शिकलोय की समस्यांचा सामना करताना नकारात्मक विचार करायचा नाही. याकोब ५:११ आपल्याला आश्‍वासन देतं: ‘ज्यांनी धीराने संकटे सोसली ते धन्य! ईयोबच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे आणि शेवटी यहोवाने त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केले त्यावरून यहोवा दयाळू व अतिशय कनवाळू [किंवा “कृपाळू,” तळटीप] आहे हेही तुम्ही पाहिले आहे.’” यहोवाला ईयोबची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत होती. त्यामुळे आपण खातरी बाळगू शकतो की आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या यहोवा चांगल्या प्रकारे समजू शकतो.